Agriculture Warehouse Business : गोदाम आधारित शेतीमाल मूल्य साखळी निर्माण करण्याच्या अनुषंगाने विविध प्रकल्पांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकरी कंपन्या आणि सहकारी संस्था यांनी त्यादृष्टीने आपली क्षमता बांधणी करणे आवश्यक आहे. विविध योजनांमधून गोदाम उभारणीनंतर गोदाम व्यवसाय म्हणून चालविणे हे एक आव्हान सर्व शेतकरी कंपन्यांसमोर असणार आहे.
याकरिता नॅशनल ई-रिपोजिटरी लिमिटेड (एनईआरएल)सारखी वखार विकास व नियामक प्राधिकरणाने (WDRA) मान्यता दिलेली ही संस्था ‘एनसीडीईएक्स’ या भारतातील सर्वात मोठ्या वायदे बाजार संस्थेची सहयोगी संस्था आहे. ही संस्था शेतीमाल विक्री मूल्य साखळीत कामकाज करीत आहे. या संस्थेच्या साह्याने गोदाम प्रमाणिकरण, ई-वखार पावती निर्मिती, शेतीमाल बाजारभावविषयक माहिती आणि शेतीमाल विक्री व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयांवर सहकार्य मिळू शकते.
या संस्थेचे रिपोजिटरी सहभागीदार कसे व्हावे याबाबत आपण यापूर्वी माहिती घेतली आहे. गोदाम-सेवा पुरवठादार (WSP) होऊन कशाप्रकारे शेतकरी, प्रक्रियादार आणि खरेदीदार यांना सेवा पुरविता येऊ शकतात, याबाबत समुदाय आधारित संस्थांनी या विषयाबाबत संपूर्ण माहिती घेऊन गोदाम आधारित शेतीमाल मूल्य साखळी निर्माण करणे गरजेचे आहे.
पुढील पाच वर्षांत विविध प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकरी कंपन्या, सहकारी संस्था व महिला बचत गटांचे फेडरेशन यांची सुमारे ५,००० हून अधिक प्रमाणित गोदामांची उभारणी होणार आहे. या गोदामांच्या माध्यमातून गोदाम हीच बाजारपेठ निर्माण होणार आहे. परंतु या गोदामांचे प्रमाणीकरण हे मोठे आव्हान असणार आहे.
गोदाम सेवा पुरवठादार
गोदाम सेवा पुरवठादार (WSP) म्हणजे वखार विकास आणि नियामक प्राधिकरण (WDRA) यांच्याकडे नोंदणीकृत असलेली कोणतीही व्यक्ती ज्याच्याकडे रेपॉजिटरी मार्गदर्शक तत्त्वांनुसार गोदाम उपलब्ध असून, गोदाम आधारित सेवा देण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान उपलब्ध आहे.
अशा व्यक्तीकडे गोदाम आधारित सेवा देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ, कौशल्य, ज्ञान, अनुभव असणे आवश्यक आहे. त्यासोबतच स्वतःचा स्वतंत्र, प्रशिक्षित आणि अनुभवी कर्मचारी वर्गाची नेमणूक करणे गरजेचे आहे.
गोदाम सेवा पुरवठादाराची भूमिका आणि जबाबदारी
वखार विकास व नियमन कायद्यानुसार गोदामधारक किंवा गोदाम सेवा पुरवठादार खालील घटकांना जबाबदार आहे.
शेतीमाल ठेवीदारांची संपूर्ण माहिती (केवायसी) ठेवणे.
शेतीमालाची गुणवत्ता आणि प्रमाण याची तपासणी करणे.
गोदामात ठेवलेल्या मालाची इलेक्ट्रॉनिक पावती ठेवीदाराला देणे.
शेतीमाल किंवा वस्तूधारकाला ठेवलेल्या मालाचे वितरण करणे.
एनईआरएल ठेवीदार समुदायाच्या सर्व विभागांना, वित्तीय संस्थांना इलेक्ट्रॉनिक-निगोशिएबल गोदाम पावती (eNWR) आणि इलेक्ट्रॉनिक-गोदाम पावती (eWR) देण्याची परवानगी देते.
गोदाम सेवा पुरवठादार इलेक्ट्रॉनिक-निगोशिएबल गोदाम पावती आणि इलेक्ट्रॉनिक-गोदाम पावती देण्यासाठी आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या शेतीमालाच्या अथवा वस्तूच्या देखभालीसाठी जबाबदार असेल.
गोदाम सेवा पुरवठादार होण्यासाठी आवश्यक पात्रता
वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाकडे (WDRA) नोंदणीकृत गोदामे, गोदाम सेवा पुरवठादार किंवा गोदामधारक म्हणून एनईआरएलकडे नोंदणी करण्यास पात्र ठरू शकतात.
गोदाम सेवा पुरवठादार प्रक्रिया आणि शुल्क
वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाकडे (WDRA) नोंदणीकृत असलेल्या सर्व गोदामांना रेपॉजिटरी सिस्टिममध्ये प्रवेश देण्यात येतो. यासाठी आवश्यक प्रक्रिया आणि शुल्क याबाबत एनईआरएलच्या संकेतस्थळावर भेट देऊन माहिती घ्यावी. शेतकरी उत्पादक कंपन्यांना वार्षिक मेंटेनन्स शुल्कात फेब्रुवारी २०२० पासून सूट देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या साह्याने आंदुरा शेतकरी उत्पादक कंपनी ही अकोला जिल्ह्यात कार्यरत आहे. या शेतकरी उत्पादक कंपनीने सुमारे २००० टन क्षमतेचे गोदाम वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाकडे नोंदणीकृत केली असून, एनईआरएलकडे गोदाम सेवा पुरवठादार म्हणून नोंद केली आहे. असे काम करणारी शेतकरी कंपन्यांमधील विदर्भातील ही एकमेव शेतकरी कंपनी असण्याची शक्यता आहे.
राज्यातील गोदाम उभारलेल्या किमान १०० शेतकरी कंपन्या व सहकारी संस्थांनी अशाप्रकारे पुढील एक वर्षात कामकाज सुरू केले, तर गोदाम आधारित मूल्य साखळीत खरे स्थित्यंतर किंवा बदल घडण्यास सुरुवात होऊन या संस्था सक्षम होतील. शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळून हा पैसा शेतकऱ्याकडे राहील.
‘एनईआरएल’कडे गोदाम सेवा पुरवठादार म्हणून नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
ओळखीचा पुरावा (POI) :
ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारल्या जाणाऱ्या कागदपत्रांची यादी :
स्पष्ट छायाचित्र असलेले पॅन कार्ड.
आधार कार्ड.
पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स / मतदार ओळखपत्र.
खालीलपैकी कोणत्याही यंत्रणेद्वारे जारी केलेले अर्जदाराच्या फोटोसह ओळखपत्र/दस्तऐवज : केंद्र/राज्य सरकार आणि त्याचे विभाग, वैधानिक/नियामक प्राधिकरणे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, अनुसूचित व्यावसायिक बँका, सार्वजनिक वित्तीय संस्था, विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालये, ICAI, ICWAI, ICSI, बार कौन्सिल इत्यादींसारख्या व्यावसायिक संस्था तसेच बँकांनी मान्य केलेले क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड
पत्त्याचा पुरावा (POA) :
ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारली जाणारी कागदपत्रे :
पासपोर्ट.
मतदार ओळखपत्र / रेशन कार्ड.
नोंदणीकृत भाडे करार / नोंदणीकृत विक्री करार
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने जारी केलेले आधार पत्र.
बँक खाते विवरण / बँक पासबुक - ३ महिन्यांपेक्षा जुने नसावे.
वीजबिल / गॅसबिल / टेलिफोन बिल यांसारखी उपयुक्त बिले - ३ महिन्यांपेक्षा जुनी नसावीत.
फ्लॅट देखभाल बिल / विमा प्रत.
खालीलपैकी कोणत्याही यंत्रणेद्वारे जारी केलेल्या पत्त्याचा पुरावा : शेड्यूल्ड कमर्शिअल बँका/अनुसूचित सहकारी बँक/बहुराष्ट्रीय विदेशी बँका/राजपत्र अधिकारी/नोटरी विधानसभा/संसदेचे सार्वजनिक/निवडलेले प्रतिनिधी यापैकी कोणत्याही यंत्रणेद्वारे मान्य केलेले दस्तऐवज सरकार किंवा वैधानिक प्राधिकरण.
खालीलपैकी कोणत्याही यंत्रणेद्वारे जारी केलेले ओळखपत्र/पत्त्यासह दस्तऐवज : केंद्र/राज्य सरकार आणि त्याचे विभाग, वैधानिक/नियामक प्राधिकरणे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, अनुसूचित व्यावसायिक बँका, सार्वजनिक वित्तीय संस्था, विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालये आणि व्यावसायिक ICAI, ICWAI, ICSI, बार कौन्सिल इत्यादी संस्थांमार्फत देण्यात येणारे ओळखपत्र.
जोडीदाराच्या नावावरील पत्त्याचा पुरावा स्वीकारला जाऊ शकतो.
- प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०
(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.