Agriculture Warehouses : गोदामामध्ये शेतीमाल साठवण सुविधा

Maharashtra State Wakhar Corporation : शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळवून देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत शेतीमाल तारण योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
Godown
GodownAgriculture

Agricultural Mortgage Scheme : दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या अल्प भूधारक शेतकऱ्यांकडे (SMF) देशातील ८६ टक्क्यांपेक्षा जास्त शेतजमीन आहे. अशा छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे विक्रीयोग्य शेतीमाल साठवून ठेवण्याची आर्थिक ताकद नसते. शेतीमालाची शास्त्रोक्त पद्धतीने बांधलेल्या गोदामांमध्ये साठवण करून मागणी आणि पुरवठ्याच्या अर्थशास्त्राद्वारे योग्य किंमत मिळण्याची प्रतीक्षा करणे, हा पर्याय छोट्या आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांनी स्वीकारणे आवश्यक आहे.

हंगामात सामान्यतः सर्वच पिके एकाच वेळेस काढणीस येत असल्याने शेतीमालाच्या किमतीत घसरण होते. शेतीमालाच्या स्थिर मागणी परिस्थितीत किमतीच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा उपलब्ध असल्यास पीक काढणीदरम्यान शेतीमालाच्या किमतीत होणारी घट व अचानक झालेल्या घसरणीला आळा बसू शकतो.

उपलब्ध बाजारपेठेतील माहितीनुसार, खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील शेतीमालाच्या गोदामातील एकूण साठवणुकीत शेतकऱ्यांचा वाटा हा २ टक्क्यांपेक्षा कमी आहे. हा वाटा वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी गुणात्मक साठवणुकीची सवय लावून, आवश्यकता भासल्यास त्यावर तारण कर्ज घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी प्रचार यंत्रणा जागृत करण्याची गरज आहे.

शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळवून देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हे जागतिक बँक अर्थसाह्यित स्मार्ट प्रकल्प व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांचे मदतीने राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत शेतीमाल तारण योजनेचा प्रचार व प्रसिद्धी करीत आहे. तसेच यामध्ये प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, अर्थात विविध कार्यकारी सेवा सहकरी संस्थांना सुद्धा यात सामावून घेण्यात आलेले आहे.

शेतीमालाला विक्रीवेळी योग्य बाजारभाव हा किती असावा याचे अनुमान शेतकरी वर्गाकडून काढताना त्यांचा गोंधळ उडतो. शेतीमालाचे बाजारभाव त्यांच्या किमतीतील चढउतार हे जगभरात घडणाऱ्या विविध घडामोडींवर अवलंबून असतात.

प्रत्येक शेतकऱ्याने शेतीमालाला किती बाजारभाव असताना किती शेतीमाल विकायचा? हे सुद्धा वेळोवेळी उपलब्ध माहितीच्या स्रोतावरून ठरवायचे असते. त्यासाठी उपलब्ध माहितीचे स्रोतसुद्धा खात्रीलायक असणे आवश्यक आहे.

माहिती देणारे सर्व स्रोत हे थोड्याफार फरकाने समानच माहिती देत असले, तरी अंतिम निर्णय हा शेतकऱ्याने घेणे आवश्यक आहे. तसेच शेतीमालाची घरात होणारी साठवण आणि शेतामधूनच होणारी थेट विक्री थांबविणे अत्यंत आवश्यक आहे.

Godown
Sugarcane FRP : साताऱ्यातील ऊसदरप्रश्‍नी आज बैठक

अपेक्षित बाजारभाव मिळविण्यासाठी महत्त्वाच्या बाबी

थेट शेतामधून शेतीमालाची विक्री करणे टाळावे. काढणीनंतर शेतीमालावर प्राथमिक प्रक्रिया म्हणजेच शेतीमाल वाळवून स्वच्छ करणे. प्राथमिक प्रक्रिया केलेल्या शेतीमालाची महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठवणूक करून आवश्यकता भासल्यास त्यावर कर्ज घेणे.

अथवा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात उपलब्ध असलेल्या स्वच्छता व प्रतवारी केंद्रामधून शेतीमाल स्वच्छ करून नंतर साठवणूक करून गोदाम भाड्यात ५० टक्के सूट घेणे. आवश्यकता असल्यास ९ टक्के दराने कर्ज घेणे.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाची उपलब्धता नसेल, तर नजीकच्या खासगी गोदामात धान्य साठवावे.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ किंवा खासगी गोदामाची सुविधा उपलब्ध नसेल तर प्राथमिक प्रक्रिया करून शेतीमाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी न्यावा. परंतु अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गोदामामध्ये शेतीमाल साठवण करावी. आवश्यकता असल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीमधून कर्ज घ्यावे.

शेतीमालावर प्राथमिक प्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध नसेल, तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमाल स्वच्छता व प्रतवारी केंद्रामधून शेतीमाल स्वच्छ करून त्याची साठवणूक करावी. आवश्यकता असल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीमधून कर्ज घ्यावे.

शेतीमाल बाजारभावाविषयी माहिती देणारे विविध स्रोत जसे ‘ॲग्रोवन’सारख्या वृत्तपत्रामध्ये येणाऱ्या माहितीची नोंद ठेवणे अथवा महाराष्ट्र राज्य पणन मंडळ व नॅशनल ई-रेपॉसिटोरी लिमिटेड यांचे संकेतस्थळ, कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा जागतिक बँक अर्थसाह्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण कृषी परीवर्तन प्रकल्प (स्मार्ट) या प्रकल्पाचे संकेतस्थळ (www.smart-mh.org) यावरून बाजारभावाच्या नोंदी शेतकरी वर्गाने ठेवणे अपेक्षित आहे.

स्मार्ट प्रकल्पांतर्गत बाजारभावाच्या माहितीबाबत स्वतंत्र विभाग कार्यरत असून, सदर विभागामार्फत वेळोवेळी शेतीमालाच्या बाजारभावाची माहिती संकेतस्थळाद्वारे तसेच व्हॉट्सॲपद्वारे विविध ग्रुपमध्ये पुरविण्यात येते.

बाजारभावाचा अंदाज घेऊन थोडा थोडा शेतीमाल बाजारात आणावा. शेतीमाल विक्रीवेळी सर्व मानांकने जसे ओलाव्याचे योग्य प्रमाण, खडे व मातीचे प्रमाण, पोत्याचा आकार किंवा पोत्यात माल भरण्याचे प्रमाण इत्यादींचे पालन करणे आवश्यक आहे.

नॅशनल ई-रेपॉसिटोरी लिमिटेड (एनईआरएल), एनसीडीईएक्स, एमसीएक्स, एनईएमएल, सीसीआरएल व ॲग्रीबाजार यासारख्या शेतीमालाच्या विक्रीविषयक प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे. या प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या व्यवहारात सहभागी होऊन शेतीमालाचा योग्य बाजारभाव मिळविण्यासाठी प्रयत्न करणे अशा प्रकारचे विविध पर्याय शेतकरी वर्गाने अंगीकारणे आवश्यक आहे.

सहकारी संस्था, शेतकरी कंपन्या व महिला बचत गटांचे फेडरेशन यांनी वरीलप्रमाणे सुचविलेल्या शेतीमाल विक्री व्यवस्थापन विषयांमध्ये क्षमता बांधणी करून योग्य बाजारभाव शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे हाच खरा संस्था उभारणीचा उद्देश आहे.

- प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. पुणे)

Godown
Sericulture Industry : रेशीम उद्योगाला ‘पोकरा’चे बळ

मिळणाऱ्या सुविधा

शेतीमालाची थेट विक्री न करता त्यावर प्राथमिक प्रक्रिया करून नंतर थेट प्रक्रिया उद्योगास विक्री केल्यास आर्थिकदृष्‍ट्या फायदेशीर ठरते. या माध्यमातून थेट विक्रीवेळी मध्यस्थांना मिळणारे पैसे शेतकरी वर्गास मिळतात. तसेच योग्य बाजारभाव मिळू शकतो.

चालू खरीप हंगामात तसेच मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने यातील एक पर्याय शेतकरी वर्गाला उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तो म्हणजे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये शेतीमाल साठवण केल्यास गोदाम भाड्यात ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. तसेच आवश्यकता असल्यास ९ टक्के व्याजदराने कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

शेतकरी कंपन्यांनी त्यांच्या सभासद शेतकरी वर्गाचे धान्य एकत्रित करून वखार महामंडळाच्या गोदामात ठेवल्यास गोदाम भाड्यात २५ टक्के सूट घेऊन आवश्यकता असल्यास ९ टक्के दराने कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. याकरिता वखार महामंडळ सातत्याने विविध जिल्ह्यांत वखार केंद्रांवर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या मदतीने कार्यशाळा घेऊन या योजेनबाबत माहिती देत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या सुमारे १५० हून अधिक वखार केंद्रांवर स्वच्छता व प्रतवारी केंद्रातून शेतीमाल स्वच्छता सुविधा उपलब्ध आहे. तसेच ज्या शेतकरी कंपन्या अथवा सहकारी संस्थांना वखार केंद्रावरील स्वच्छता व प्रतवारी केंद्र भाडे करारावर घेण्याची इच्छा आहे, त्यांनी ते भाड्याने घेऊन शेतकरी सभासदांचा शेतीमाल स्वच्छ करून तो त्याच वखार केंद्रामध्ये साठवू शकतात.

वखार महामंडाळात शेतीमाल साठवणे किंवा गोदाम भाड्याने घेणे किंवा गोदामातील आवश्यक तेवढी जागा भाड्याने घेणे असे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजेच शेतकरी कंपनीला कमी खर्चात शेतीमाल विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ एक उत्तम पर्याय आहे.

येथूनच पुढे नॅशनल ई-रेपॉसिटोरी लिमिटेड (एनईआरएल), एनसीडीईएक्स, एमसीएक्स, एनईएमएल, सीसीआरएल व ॲग्रीबाजार या सारख्या शेतीमाल विक्रीविषयक प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून शेतीमाल विक्रीचा पर्यायही शेतकरी वर्गाला अथवा शेतकरी कंपन्याना उपलब्ध होऊ शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com