Agriculture Warehouse : गोदाम परवान्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता

जिल्हा स्तरावर सहकार विभागांतर्गत जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून (नवीन गोदाम परवाना किंवा जुना गोदाम परवाना नूतनीकरण) गोदाम परवाना घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे.
Agriculture Warehouse
Agriculture WarehouseAgrowon

शेतकरी उत्पादक कंपनी (Farmers Producers Company), सहकारी संस्था व महिला बचत गटाचे (Women's self-help group) फेडरेशन या सर्व समुदाय आधारित संस्थांनी विविध योजनांमधून उभारलेल्या गोदामांच्या माध्यमातून व्यवसाय (Warehousing Business) उभारणी करण्यासाठी अटी शर्ती पूर्ण कराव्या लागतात.

गोदाम भाड्याने देणे हा एकच पर्याय गोदाम उभारणीनंतर अपेक्षित नसून शेतमाल तारण योजना (Agriculture Produce Mortgage) अथवा गोदाम पावती योजना किंवा धान्य तारण योजना सुरू करून यातून शेतकरी कंपनी अथवा सहकारी संस्था व सोबतच या संस्थांच्या सभासद शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे अपेक्षित आहे.

यात शेतमालाचे बाजारभाव शेतकरी वर्गापर्यंत पोहोचवून, शेतमालाचे संकलन गोदाम स्तरावर करून ज्या शेतकऱ्याना शेतमाल साठवायचा आहे, त्यांना गोदाम पावती देणे आणि ज्या शेतकऱ्याना शेतमालावर प्रक्रिया करावयाची आहे.

(प्रक्रिया केंद्र शक्यतो गोदामाच्या बाहेर उभारणे अपेक्षित) त्यांना स्वच्छता प्रतवारी केंद्र व तूर, हरभरा इत्यादी कडधान्याकरीता दाळमिल आणि गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी इत्यादी धान्यांकरीता आटा मशिन अथवा पीठ गिरणी गोदाम परिसरात उभारून शेतकऱ्यांना सेवा असे व्यवसाय प्रकार यापुढील काळात शेतकरी कंपन्यांकडून व सहकारी संस्थाकडून उभारले जातील.

अशा व्यवसाय उभारणीस कृषी सहयोग शेतकरी कंपनी आणि नेरपिंगळाई विविध कार्यकारी सहकारी संस्था, अमरावती यांच्या माध्यमातून यापूर्वीच सुरवात झालेली आहे.

Agriculture Warehouse
Agriculture Warehouse : गोदाम पावतीविषयक विमा महत्त्वाचा...

वरीलप्रमाणे व्यवसायाच्या दोन पर्यायांपैकी गोदाम पावती व्यवसाय सुरू करताना मुंबई वखार कायदा १९५९ व १९६० अन्वये सहकार व पणन विभागाकडून गोदाम परवाना घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीयकृत बँकेकडून गोदाम पावतीवर कर्ज देण्यासाठी निधी उभारणी करताना सुद्धा गोदाम परवाना घेणे गरजेचे आहे.

जिल्हा स्तरावर सहकार विभागांतर्गत जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून (नवीन गोदाम परवाना अथवा जुना गोदाम परवाना नूतनीकरण) गोदाम परवाना घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे.

मुंबई वखार अधिनियम १९५९ कलम ५ आणि ६ तसेच नियम १९६० मधील नियम ६ नुसार पुढीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

१) विहित नमुना प्रपत्र क्र. १ मध्ये (जिल्हा उपनिबंधक किंवा सहाय्यक निबंधक कार्यालयात नमुना उपलब्ध) अर्ज सादर करावा, त्यावर अर्जदाराची स्वाक्षरी, दिनांक आणि १० रुपये कोर्ट फी स्टॅम्प तसेच नमुना प्रपत्र क्र. १ मधील रकाने भरणे आवश्यक आहे. (गोदाम क्षमता, गोदामाची लांबी X रुंदी X उंची नवीन प्रस्ताव/जुना प्रस्तावासाठी नमूद करणे आवश्यक आहे.)

२. गोदाम मालकी पत्र जसे ७/१२ , नमुना नंबर ८ , भाडे करार पत्रक इ.

३. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (नियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ६ व ७ आणि नियम, १९६७ मधील नियम क्र. ७ मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार गोदाम मालकाने बाजार समितीकडून विहित नमुन्यातील परवाना घेणे बंधनकारक आहे.

तसेच दरवर्षी सदर परवाना नूतनीकरण करणे आवश्यक आहे. सदर परवान्याची छायांकित प्रत प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.

४. बँक पत मर्यादा चालू कालावधीचे जोडले आहे काय? (बँक सॉलव्हन्सी प्रमाणपत्र) (परवाना नूतनीकरण नवीन प्रस्ताव/जुना प्रस्तावासाठी आवश्यक)

५. मागील परवान्याची प्रत जोडलेली आहे काय ? (नवीन गोदाम प्रस्तावाला लागू नाही)

६. वेअर हाउसिंग परवाना शुल्क स्टेट बँक ऑफ इंडिया भरणा केलेल्या चलनाची(जिल्हा उपनिबंधक किंवा सहाय्यक निबंधक कार्यालयात चलनाची माहिती उपलब्ध)मूळ प्रत जोडावी.

(चलन भरताना गोदामाची लांबी X रुंदी X उंची २१ फुटाप्रमाणे उदा. १२५ X ७५ X २१ = १,९६,८७५/- लांबी रुंदी पोत्याची उंची) (१,९६,८७५क्युबीक फूट)

१,९६,९७५ X ५० = ४००/- रुपये परवाना फी.२५,०००

७. गोदामाचे प्लॅन इस्टीमेटची प्रत (नवीन प्रस्तावासाठी)

८. नगर परिषद/ग्राम पंचायत यांचे गोदाम बांधकामास दिलेल्या मंजुरीची प्रत (नवीन प्रस्तावासाठी)

९. गोदाम बांधकाम पूर्ण झाल्याबाबत इंजिनिअर यांचे प्रमाणपत्र मंजुरीची प्रत (नवीन प्रस्तावासाठी)

१०. बांधकाम क्युबीक फुटात असल्याबाबत इंजिनिअर / आर्किटेक्टचे प्रमाणपत्र (नवीन प्रस्तावासाठी/ परवाना नूतनीकरणासाठी)

११. सुरक्षा अनामत रक्कम अटीत नमुना नं (४) (जिल्हा उपनिबंधक किंवा सहाय्यक निबंधक कार्यालयात नमुना उपलब्ध) १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दोन जामीनदारांचे स्वाक्षरीसह व त्यात सुरक्षा अनामत रक्कम नमूद केली आहे काय? याबाबत तपशील पुढील प्रमाणे

उदा :- १,९६ ,८७५ X १० रु. (क्युबीक फूट X १०) =१९,६८७ १०० १००

Agriculture Warehouse
Warehouse Management : गोदाम व्यवस्थापनच्या कश्या करणार उपाययोजना?

१२. परवाना नूतनीकरण प्रस्तावासोबत बचत प्रमाणपत्रांची छायांकित प्रत जोडणे त्याप्रमाणे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांची छायांकित प्रत जोडावे अथवा बँक गॅरंटी आवश्यक.

१३. पाणी / विद्युत पुरवठा असल्याबाबत प्रमाणपत्र (नवीन प्रस्तावासाठी)

१४. फर्म असल्यास फर्मचे नोंदणी प्रमाणपत्र व स्वाक्षरी करिता प्राधिकृत केले असल्याबाबतचे पत्र व भागीदारी दस्त प्रत (नवीन प्रस्तावासाठी/ परवाना नूतनीकरणासाठी)

१५. आग प्रतिबंधात्मक उपाययोजना.

१६. गोदामाच्या नकाशाची प्रत. (नवीन प्रस्तावासाठी)

१७. गोदाम विमा / गोदामातील मालाची विमा पावती (नवीन प्रस्तावासाठी/ परवाना नूतनीकरणासाठी)

विमा कंपनीचे नांव: ---------------------- विमा कालावधी दि. -------- ते दि. ----

१८. क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे वेअर हाऊस तपासणी अहवाल ज्याप्रमाणे गोदामातील मालाची नोंद मालकनिहाय क्विंटल मध्ये असावी, तपासणी अहवालात गोदाम क्षमता पूर्वी दिलेल्या परवाना नूतनीकरणाप्रमाणे क्युबीक फुटाची नोंद असावी. (परवाना नूतनीकरणासाठी)

१९. प्रकल्प अहवाल (नवीन प्रस्तावासाठी)

२०. तपासणी अधिकारी यांचा चौकशी अहवाल.

२१. उपनिबंधक / सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे शिफारस पत्र.

वरील सुरक्षा अनामत व सेक्युरीटी बॉण्ड राज्य वखार व केंद्रीय वखार महामंडळाचे गोदामास लागू नाही.

याबाबत जिल्हा व सहाय्यक निबंधक स्तरावर गोदाम परवाना विषयक सेवा उपलब्ध असून राज्यातील ज्या शेतकरी कंपनी व सहकारी संस्थानी गोदामे उभारली आहेत, त्यांनी तत्काळ नजीकच्या कार्यालयात संपर्क साधून गोदाम परवाना काढण्यासाठी अर्ज प्राप्त करून घ्यावा. गोदाम परवाना नमुना खालील प्रमाणे सादर करण्यात येत आहे.

प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था किंवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांना जागतिक बँक अर्थसहाय्यीत स्मार्ट प्रकल्पांतर्गत गोदाम पावती उद्योगात उतरण्यासाठी साहाय्य करण्यात येत आहे.

हा उद्योग उभारणीच्या दृष्टीने कोलॅटरल व्यवस्थापन संस्था साहाय्य करणार असून या प्रकल्पात जुन्या गोदामाचे नूतनीकरण, नवीन गोदाम उभारणी, स्वच्छता व प्रतवारी केंद्र, व कोलॅटरल व्यवस्थापन संस्थांचे सेवा शुल्क अशा एकूण उपप्रकल्प किमतीवर व शासकीय कॉस्ट नॉर्म नुसार ६० टक्के अनुदान उपलब्ध होणार आहे.

याची अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दिनांक ३० मार्च २०२३ असून महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे येथे सायंकाळी ५.०० वाजेपूर्वी अर्ज सादर करावेत.

अधिक माहितीसाठी www.smart-mh.org आणि www.mahamcdc.com या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत. प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थाकरीता ही व्यवसायाची उत्तम संधी उपलब्ध असून त्याचा सहकारी संस्थांनी फायदा घ्यावा.

संपर्क : प्रशांत चासकर,९९७०३६४१३०, (शेतमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ञ ,प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या.पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com