Sustainable Agriculture Techniques: मी १८७० मध्ये प्रथम श्रेणीत कृषी पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन पूर्ण वेळ शेतकरी झालो. महाविद्यालयात पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेण्यापूर्वीच पदवीधर झाल्यानंतर शेती करण्याचा निर्णय असल्यामुळे पदव्युत्तर शिक्षण किंवा नोकरी शोधण्याचा प्रश्नच नव्हता. कृषी पदवीधर असल्याने आपण आता कृषितज्ज्ञ झाल्याच्याच आविर्भावात रानात प्रवेश केला. मात्र थोड्याच काळात आपण आव कितीही आणत असलो तरी आपल्याला प्रत्यक्ष शेतीतील काहीच येत नसल्याचे लक्षात आले.
शेतात शिरताना बालवाडीमध्येच पाय टाकत असल्याची आणि नव्यानेच सारे काही शिकायचे असल्याची भावना असायची. खरेच आहे, परीक्षेसाठी पाठांतरावर भर देणारे शिक्षण आणि प्रत्यक्षातील त्याचा वापर यात जमीन अस्मानाचे अंतर होते. शिक्षणानंतर कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करताना त्या त्या क्षेत्राविषयी अधिक अभ्यास करण्याशिवाय पर्यायच नसतो. मग काय, वर्षानुवर्षांचा अनुभव असलेल्या घरातील ज्येष्ठ मंडळीसह जुन्या जाणकार गडीमाणसांच्या हाताखाली एकेक इयत्ता पार पाडत खऱ्या शिक्षणाला सुरुवात झाली.
महाविद्यालयीन काळात शिकलेल्या एकेका शास्त्रीय घटकांची उजळणी व वापराला अनुभवांची जोड मिळाल्याने पहिली १५-२० वर्षांत चांगली उत्पादन पातळी मिळवणे शक्य झाले. पण पुढे १५-२० वर्षांनंतर उत्पादन घसरू लागले. खरेतर जमीन तीच, करणाराही तोच, साधारणपणे तंत्र व संसाधनेही समान असताना उत्पादन का घसरतेय, हेच समजेना. उत्पादन का घसरतेय, या संबंधी वाचन व शोध सुरू झाला. आजकाल इंटरनेटवर जसा माहितीचा पूर आलेला आहे, तो नव्हता. त्यामुळे एकेक पुस्तक मागवणे, लेख मागवणे सुरू झाला.
या काळात तमिळनाडू येथील विद्यापीठातून ऊस पिकावरील एक ग्रंथ मागविला होता. त्याचे वाचन चालू असता एक आकृती पाहण्यात आली. त्यात पिकाचा जमिनीवर वाढलेला आणि जमिनीखाली वाढलेला भाग दाखविलेला होता. तिथे केशमुळांभोवती ठिपके दाखवून, ते सूक्ष्मजीव असल्याचा उल्लेख होता. ते पिकाच्या अन्नद्रव्यांच्या शोषणात विविध प्रकारे मदत करत असल्याचा उल्लेखही होता. आणि एकदम मला जाणवले, याच घटकाचा माझ्या उत्पादन कमी होण्याशी काहीतरी संबंध असावा. पूर्वी चांगले उत्पादन मिळत होते, म्हणजे पिकाचे पोषण व्यवस्थित होत असावे.
आता उत्पादन घटतेय, म्हणजेच पिकाचे पोषण व्यवस्थित होत नाही. बाकी सर्व डोळ्यांना दिसणारे ढोबळ घटक सारखेच होते, मग डोळ्यांना न दिसणाऱ्या या सूक्ष्मजीवाचे कार्य पूर्वीसारखे होत नसावे. मग या भू - सूक्ष्म जीवशास्त्राचा अभ्यास सुरू झाला. ही साधारण ३५ वर्षांपूर्वीची गोष्ट. कोल्हापुरातील चार ग्रंथालयातून पुस्तके उपलब्ध करत वाचन सुरू झाले. त्या अभ्यासाने माझा शेतीकडे पाहण्याचा संपूर्ण दष्टिकोनच बदलून टाकला. या शास्त्राने उत्पादन घटीमागील शंकांचे निरसन तर केलेच पण त्या व्यतिरिक्त अनेक नवीन गोष्टीही शिकविल्या.
सूक्ष्मजीवांचे महान कार्य...
आपण शेतीत फार कष्ट करतो ही माणसाची भावना असते. पण आपल्यापेक्षा अधिक कष्ट जमिनीत वाढणारे सूक्ष्मजीव करत असल्याचे लक्षात आले. त्यांच्या शरीरक्रियेतील प्रत्येक गोष्ट अगदी चयापचयापासून पुनरुत्पादनापर्यंत सर्व कामे करताना त्यांचा संबंध जमिनीतील सेंद्रिय कर्बाशी आणि पिकांशी असतो. आपण पिकांसाठी म्हणून शेणखत किंवा कोणतेही सेंद्रिय खत देतो, ते खरेतर त्यांच्यासाठीच असते.
हरितक्रांतीदरम्यान आपल्याला एका बाजूला सुधारित जाती, खते, कीडनाशके यांचा वापर शिकवला. त्याला पूर्वापार दिल्या जाणाऱ्या सेंद्रिय खतांची जोड असल्याने सुरुवातीला पिकांचे उत्पादन वाढत गेले. पण पुढे पुढे विविध कारणांनी पशुपालन कमी कमी होत गेले, तसा शेतातील सेंद्रिय खतांचा वापरही कमी कमी होत गेला. म्हणजेच सूक्ष्मजीवांचे अन्नच आपण कमी करत गेलो. या भुकेल्या सूक्ष्मजीवांकडून अपेक्षित काम होईना झाले. पिकाचे कुपोषण होऊ लागले. उत्पादन घटले.
पूर्वी आपण रासायनिक खते देत होतो. त्यात वाढही करून काहीच फायदा होईना, कारण आपण दिलेली रासायनिक खते पिकाला तशीच घेता येत नाहीत. जमिनीतील सूक्ष्मजीव त्यावर प्रक्रिया करून पिकाला खाण्यायोग्य बनवत असतात. पिकांची मुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांकडे गरजेच्या अन्नद्रव्यांची मागणी करतात, त्या मागणीइतकाच पुरवठा सूक्ष्मजीव उपलब्ध करून देतात. यातून पिकाचे संतुलित पोषण होते.
या साठी पिकाबरोबर सूक्ष्मजीवांच्या अन्नाच्या तरतूदही शेतकऱ्याने प्रथम करणे गरजेचे आहे. तरच पिकाचे उत्पादन योग्य पातळीवर पोहोचू शकेल. हा प्राथमिक नियम २०२५ मध्येही बहुतांश शेतकऱ्यांना ज्ञात नाही. म्हणूनच शेतीची आज दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. सूक्ष्मजीवांचे कामकाज उघड्या डोळ्यांना दिसत नसल्याने त्याविषयी सर्वसामान्य शेतकऱ्यांना समजावणेही अवघड होते. ही परिस्थिती फक्त भारतातच आहे असे नाही, सर्व विकसित देशातही असेच चित्र आहे.
शेणखत द्यायचे तरी किती?
शेणखत द्यायचे हे मला समजले. मग ते देण्याच्या दिशेने माझे प्रयत्न सुरू झाला. घरचे आणि आजूबाजूला उपलब्ध होईल, तितके कंपोस्ट खत जमिनीला देऊ लागलो तरी जास्तीत जास्त माझ्या एकूण क्षेत्रातील तिसऱ्या भागालाच पुरेल इतके कंपोस्ट देणे शक्य होत असे. सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासाने प्रत्येक वर्षी प्रत्येक पिकाला गरजेइतके सेंद्रिय खत दिले तरच जमिनीची सुपीकता टिकून राहील, हे समजत होते.
पण प्रचलित मार्गाने ते देणे विविध कारणांमुळे अशक्य असल्याचेही जाणवत होते. बाजारातून विकत घेऊन शेणखत किंवा कंपोस्ट वापरणे हे अत्यंत महागडे ठरत होते. कारण त्यात वाहनामध्ये कंपोस्ट भरणे, वाहतूक आणि उतरून घेणे, पुन्हा शेतीभर विखूरणे यासाठी मनुष्यबळासह अन्य बाबींवर मोठा खर्च होत असे. त्यामुळे विकतचे पर्याय टाळण्याचे बंधनच स्वतःवर घालून घेतले. आणि शेतातच करता येतील, असे नवे, स्वस्त व सुलभ पर्याय शोधायला लागलो.
पीक अवशेषांचा वापर ते शून्य मशागत तंत्राचा जन्म
पीक कापणीनंतर पिकाच्या जमिनीवरील भागांचा वापर करू लागलो. त्यातून अपेक्षेइतका परिणाम मिळत नसल्याचे दिसून आले. मग पीक कापणीनंतर पिकाचे जमिनीखालील अवशेषांवर लक्ष केंद्रित केले. पण माझ्याकडे असलेल्या ऊस या पिकाचे जमिनीखालील अवशेष पुन्हा पुन्हा फुटत राहतात. त्यासाठी तणनाशकाचा वापर करून पाहिला. कारण जमीन नांगरणे, रोटाव्हेटर मारून जमिनीखालील पीक अवशेषांचे तुकडे करणे चुकीचे ठरत होते. उलट त्याचा जमिनीवर वाढलेला भाग तणनाशकाने मारून जमिनीची कोणतीही मशागत किंवा हलवाहलव न करता पुढील भाताचे पीक घेण्याचा निर्णय घेतला.
यातूनच सुमारे २० वर्षांपूर्वी माझे शेतीत विना नांगरणी तंत्राचा वापर सुरू झाला. भात पीकही उत्तम आले व त्यानंतर त्याच जुन्या सरी वरंब्यावर फक्त सरीच्या तळात एक नांगराचा तास मारून उसाची लागवड केली. ही दोन्ही पिके पहिल्याच वर्षी उत्तम आली. त्यामुळे शून्य मशागत तंत्र अधिक पक्के झाले. या तंत्रामुळे एकाच दगडात अनेक पक्षी मारले जातात. नांगरणीसह पूर्वमशागतीच्या खर्चात बचत झाली. चार बांधाच्या आतच फुकटात मिळणाऱ्या पीक अवशेषांतून सेंद्रिय खताची पूर्ण गरज भागते. सेंद्रिय खतावरील खर्च बंद झाला. तणनाशकामुळे तणांच्या नियंत्रणाच्या खर्चाबरोबरच मनुष्यबळाचा खर्चही वाचला.
या तंत्रामुळे पाणी व रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होतो. एकूणच खर्चात बचत होऊन, उत्पादनात वाढ मिळते. यापेक्षा शेतकऱ्यांना आणखी काय हवे? यातूनच मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष हेच पुढील पिकासाठीचे सेंद्रिय खत हा एक नवीन नियम शेतासाठी बनवला. सलग काही वर्षे या तंत्राच्या वापरातून पिकाच्या उत्पादनाचा दर्जा अत्युत्तम असल्याचे लक्षात आले.
मग पुन्हा कारणांचा शोध घेऊ लागलो. जागेवर सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या प्रक्रियेतून तयार होणारी काही उप उत्पादने जमिनीच्या शुद्धीकरणाचे काम करत असल्याचा अंदाज आला. त्यामुळे जमिनीचा वाढत चाललेला सामू व क्षारता कमी होते. त्यामुळे उत्पादनाचा दर्जा सुधारतो. आज आपण शेतकरी उत्पादन जास्त मिळवण्यासाठी वेड्यासारखी धावपळ करताना दर्जाकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळेच उत्पादन चांगले मिळाले तरी दर्जाअभावी योग्य तो दर मिळण्यात अडचणी येतात.
सेंद्रिय खतांची उच्च-नीचता...
सेंद्रिय खतातही उच्च-नीचता असते, हा नवाच धडा मिळाला. उदा. जमिनीच्या वरील अवयवांचे खत हलके, त्यातही पानांचे सर्वांत हलके, तर जमिनीखालील अवशेषांचे होणारे खत सर्वांत चांगले हे समजले. आजही आपण सेंद्रिय खत म्हटले की सर्वांत हलक्या अशा शेणखत - कंपोस्ट खतालाच मिठी मारून बसलो आहोत.
जमिनीमध्ये स्थिर आणि अस्थिर अशा दोन प्रकारचे सेंद्रिय कर्ब असते. कुजण्यास जड पदार्थापासून स्थिर सेंद्रिय कर्ब मिळते, तर लवकर कुजणाऱ्या, हलक्या पदार्थापासून अस्थिर सेंद्रिय कर्ब मिळते. थोडा विचार करून बघा, आजपर्यंत आपण फक्त अस्थिर सेंद्रिय खतच वापरत आल्याचे लक्षात येईल. जमिनीची शाश्वत सुपीकता मिळवायची असेल, तर स्थिर सेंद्रिय कर्ब वापरणे गरजेचे आहे. पूर्वी शेतात न कुजणारे भाग घरगुती जळणांसाठी वापरले जात. पण आता सवलतीत गॅस सिलिंडर मिळत असल्याने ते गोळा करण्याची उठाठेव कोण करणार? आज रोटाव्हेटरचा वापर करून पीक अवशेषांचे तुकडे केले जातात. बारीक तुकडे झाल्यामुळे ते जलद कुजतात. शेतकरी हे जलद कुजणे चांगले मानत असले तरी जमिनीच्या दृष्टीने नुकसानीचे आहे हे लक्षातही येत नाही.
तणनिर्मूलनाकडून तण व्यवस्थापनाकडे...
सुरुवातीला तण म्हणजे पिकाचे शत्रू, हीच कल्पना डोक्यात होती. त्यामुळे तणांच्या निर्मूलनासाठी शक्य ते सारे पर्याय वापरायचे. त्यातही तणनाशकाने निर्मूलन करताना तरी डोळ्यासमोर केवळ तेवढेच ध्येय असायचे. तणे हेही वनस्पतीच आहेत, कुजून त्याचेही खतच होते. मग त्यांना मारण्याऐवजी काही चांगला उपयोग करून घेता येईल का, या दिशेने विचारचक्र सुरू झाले. म्हणजेच तण निर्मूलनाकडून तण व्यवस्थापनाकडे वाटचाल सुरू झाली. तण व्यवस्थापन हे अलिबाबाच्या गुहेसारखे आहे. जितके आत जाऊ तितके रत्नांचे भरलेले हंडे म्हणजे तणांचे फायदेच दिसू लागले.
आता पीक व तणे यात साहचर्य बसविण्याचा विचार सुरू झाला. पिकांना त्रास देणारी तणे कोणती आणि फारसा त्रास न देणारी तणे कोणती, हे शोधू लागलो. त्रास देणारी तणे लवकर मारायची, तर त्रास न देणारी तणे अधिक मोठी व जुनी करून मारायची, हा विचार प्रथम ठरवला. तोही पुढे बदलला. तण मारण्यापेक्षा कापून टाकणे चांगले, या निष्कर्षाप्रत आलो. रानात पिकासोबतच काही प्रमाणात तणे असणे चांगले, हा नवीनच विचार उदयास आला. शेतीशास्त्रात ‘तण खाई धन’ या अर्थाची म्हण प्रचलित आहे, त्याचे रूपांतर माझ्या दृष्टीने ‘तण देई धन’ असे झाला. पिकामध्ये तणे असल्यास त्यांची अन्न व पाण्यासाठी स्पर्धा होते, म्हणून तणे नकोत, असा सामान्य दृष्टिकोन असतो. आता मी म्हणतो, पीक व तणामध्ये स्पर्धा झाली पाहिजे. म्हणजे पिकाने तणाबरोबर स्पर्धा करून झगडून अन्न मिळविले पाहिजे.
आपण एकाच पिकाच्या शेतीला (मोनोकल्चर) नावे ठेवतो आणि शेतात अन्य काही वाढूच देत नाही, हे कसे? म्हणजेच आपण आपली सर्व शेती त्या त्या हंगामापुरती तरी मोनोकल्चरच करून टाकतो. तण व्यवस्थापन करायचे म्हणजे त्यांना मुक्त वाढू द्यायचे, असेही नाही. त्या ऐवजी शेतात पिकाची सशक्तता जपताना तणे अशक्त ठेवायची. म्हणजे पिकावर हल्ला करणारे रोग-किडी तिकडे वळतील. आपल्या फवारण्याही कमी होतील. जमिनीवर तणांचे हिरवे आच्छादन योग्य प्रकारे झाल्यास पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते. उघड्या जमिनीतून पाण्याचे जितके बाष्पीभवन होते, त्यापेक्षा खूप कमी पाणी तण स्वतःसाठी वापरते.
अनुभवानंतर आपोआप प्रसार
माझ्या कोल्हापूर भागामध्ये ऊस आणि काही ठरावीक पिकांमध्ये यश मिळाले. तंत्र यशस्वी झाले. पण महाराष्ट्रातील अन्य भागातील शेतकऱ्यांची पीकपद्धती वेगळी होती. त्यांच्याकडून विविध बाबींबद्दल सातत्याने होत असलेल्या विचारणांमुळे विचाराला चालना मिळत होती. त्यानुसार शून्य मशागत शेती तंत्रामध्ये योग्य बदल सुचवू लागलो. केंद्र सरकारच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) मार्फत विदर्भ मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातून प्रसाराचे काम चालू आहे काही मंडळींनी हे तंत्र स्वतः शिकले.
त्यातील फायदे लक्षात आल्यानंतर स्वयंस्फूर्तीने प्रसाराचे काम अंगावर घेतले. यात दीपक जोशी, रावसाहेब मोरे (छत्रपती संभाजीनगर), विठ्ठल वैद्य (जालना), उमेश पोहदरे, नोचादरखान पठाण (यवतमाळ), शिवहरा केदार (अहिल्यानगर), दिनकर काळे, संतोष सपकाळ, राम पुंड असे अनेक शेतकरी स्वतः विना नांगरणी शेती करतानाच विस्ताराचेही काम करत आहेत. नेरळ (जि. रायगड) येथील चंद्रशेखर भडसावळे यांनी स्वतः प्रथम कोकणातील राब, रोप, चिखदणी, पुनर्लागवड यासाठी पेरभात शेतीचे सोपे तंत्र विकसित केले.
कोकणासह मराठवाडा, विदर्भातील भात उत्पादक पट्ट्यामध्ये हे सोपे एस.आर.टी. तंत्राचा प्रसार केला. पुढे भारतातील अन्य राज्यांमध्येच नव्हे, तर थायलंड, अमेरिका, इटलीसारख्या अन्य देशांतही या तंत्राचा प्रचार केला आहे. आता हे तंत्र जगातील १०० पेक्षा जास्त देशात वापरले जाते. त्या संबंधात कार्यरत शास्त्रज्ञ दर दोन वर्षांनी एकत्र येऊन झालेल्या कामांचा आढावा घेतात. भारतात नवी दिल्ली येथे ९-२-२००८ मध्ये अशी बैठक झाली होती. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे व पॅराग्वे या देशातही भातशेतीच्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त शेती या तंत्राने होऊ लागल्याचे सांगितले जाते.
प्रसारामध्ये ‘अॅग्रोवन’चा वाटा
माझ्यासारख्या केवळ कृषी पदवीधर असलेल्या शेतकऱ्याच्या प्रयोगांना दै. ‘ॲग्रोवन’ने सुरुवातीपासूनच मोठी प्रसिद्धी दिली. चक्क माझ्या तीन मोठ्या लेखमाला प्रकाशित केल्या. लेख प्रकाशित झाला, की तो दिवस आणि पुढील एखादा दिवस शेतकऱ्यांचे फोन सतत येत. लेखांच्या प्रकाशनावरच न थांबता त्यावर आधारित पुस्तकेही त्यांनी प्रकाशित केली. ही पुस्तकेही शेतकऱ्यांमध्ये इतकी लोकप्रिय ठरली, की दरवर्षी त्याची नवीन आवृत्ती काढावी लागते.
लेख, पुस्तके यातून या तंत्राचे अनुकरण करणारे, शेती करणारे अनेक जण संपर्काअभावी अज्ञातही आहेत. कारण माझ्यासारख्या सामान्य माणसाची (म्हणजेच सरड्याची) धाव कुंपणापर्यंतच..., पण अॅग्रोवनमधील लेख मात्र महाराष्ट्रातीलच नव्हे, जवळच्या कर्नाटक, म.प्रदेश, गुजरात राज्यातील लोकांपर्यंत पोहोचत आहेत. या सर्व लोकांचे फोन येतात, आता वयाप्रमाणे झेपेल इतका प्रवास करत त्यांच्या शेतापर्यंत जातो. या शेतकऱ्यांना या तंत्राचे फायदे दिसतात, अन् ते स्वतःच विस्ताराचा भार खांद्यावर घेतात, असा आहे आजवरचा शेतीला शाश्वततेकडे नेण्याचा आमचा प्रवास...
- प्रताप चिपळूणकर ८२७५४५००८८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.