
गोपाल हागे
राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष
Agriculturte Success story : अकोला जिल्ह्यातील देगाव येथील शेतकऱ्यांनी सिंचन, नवी पीक पद्धती, विज्ञान- तंत्रज्ञानाचा वापर यातून शेतीत आश्वासक वाटचाल केली आहे. त्यांना कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आदींचे मार्गदर्शन लाभत आहे. गावातील शाळाही तंत्रत्रानाच्या बाबतीत प्रगत होत असून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला जात आहे.
अकोला जिल्ह्यात देगाव हे सुमारे साडेसहा हजार लोकसंख्येचे गाव आहे. सुमारे १४०० हेक्टर क्षेत्र आहे. शेती हाच मुख्य व्यवसाय असलेल्या इथल्या शेतकऱ्यांनी नव्या पीकपद्धतींचा अंगीकार सुरू केला. त्यासाठी सर्वप्रथम सूक्ष्मसिंचनाला चालना देण्यात आली. बहुसंख्य शेतकरी ठिबक, तुषार सिंचन पद्धतीचा वापर करतात. पावसाचे पाणी जागेवर जिरविण्यासाठी शेतकऱ्यांनी बांधबंदिस्तीचे उपक्रम राबविले आहेत. सौरऊर्जेचा वापरही शेतकरी करू लागले. त्यामुळे दिवसाही सिंचन करणे शक्य झाले. गावात आता बारमाही शेती होते. खरिपात सोयाबीन, तूर, रब्बीत गहू, चिया तर उन्हाळी हंगामात ज्वारी, तीळ, मूग, कांदा अशी पिके गावच्या शिवारात दिसून येतात. केळी, खजूर आदीचेही प्रयोग सुरू आहेत.
लिंबू व मसाला पिकांना उत्तेजन
सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्याने सुमारे ११५ हेक्टरवर लिंबू बागा उभ्यारल्या आहेत. अकोला कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ गजानन तुपकर, त्यांचे सहकारी व बाळापूर कृषी विभाग- आत्मा यंत्रणा यांच्या पुढाकाराने लिंबू पिकात मार्गदर्शनपर कार्यक्रम घेतले जातात. प्रत्येक तांत्रिक सत्रात अन्नद्रव्ये, कीड-रोग व्यवस्थापन, पावसाळ्यातील फळझाडांचे नियोजन, हस्त बहर, सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान ताण नियोजन, ड्रोनद्वारे फवारणी आदी विषयांवरील प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना व्यवस्थापन सुधारणे शक्य झाले. लिंबू उन्हाळी हंगामात बाजारात आणणे व चांगला दर मिळवणे शक्य झाले. हे पीक शेतकऱ्यांना एकरी तीन ते साडेतीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळवून देणारे बनले आहे. बडीशेप, काळे जिरे, कोथिंबीर आदी मसालेवर्गीय पिकांची प्रात्यक्षिके डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत. देगाव नैसर्गिक शेतकरी उत्पादक गटाची स्थापना व नावीन्यपूर्ण पीक म्हणून मसूरच्या लागवडीतून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. शेतकरी महिला गटांच्या स्थापनेतून विविध लोणची, पापड, डाळी आदींच्या रूपाने प्रक्रिया उद्योगाविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
शेतरस्त्यांचे काम
सुमारे १४०० हेक्टर सुपीक जमीन असूनही गावात एकही शेतरस्ता तयार झालेला नाही. शासन व लोकप्रतिनिधींचे या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याचे गावकरी सांगतात. महाविकास आघाडीच्या काळात सरकारने दोन शेतरस्ते मंजूर केले. परंतु पावसाळा जवळ आल्यामुळे काम झाले नाही. सत्तापालट झाल्यानंतरही काम रखडले. शासनाने तातडीने शेतरस्त्यांचे काम तडीस न्यावे अशी मागणी शेतकरी सातत्याने करीत आहेत.
उत्पादनातून संपन्नतेकडे
सुधारित पीक पद्धती स्वीकारल्यानंतर गावातील शेती उत्पादकता व उत्पन्नात बदल झाला आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी पिके घेतली जायची. आता नव्या तंत्राच्या वापरातून
पीक उत्पादन एकरी सव्वा ते दीडपटीने वाढल्याचे दिसून आले आहे. या वर्षी योगेश लढे या तरुण शेतकऱ्याने गादीवाफ्यावर तुरीची लागवड केली. त्यांना एकरी आठ ते नऊ क्विंटल उत्पादन मिळाले. पूर्वी हेच उत्पादन तीन- चार क्विंटल दरम्यान होते. लिंबाचे हस्त बहरातील उत्पादन एकरी ६ ते ७ टनांवरून १० टनांवर पोचले आहे. अर्तकारणास वाव मिळाल्याने शेतकरी आर्थिक व सामाजिकदृष्ट्या संपन्न होऊ लागले आहेत. गावशिवारात आज चांगली मोठी घरे, शेतीतील पायाभूत सुविधा दिसून येतात. यांत्रिकीकरणाचा वापर होण्याच्या दृष्टीने ट्रॅक्टर्स, विविध यंत्रे बांधावर पोहोचत आहेत.
शाळेत रुजला वैज्ञानिक दृष्टिकोन
देवागमध्ये जिल्हा परिषदेची पहिली ते आठवीपर्यंत शाळा आहे. उच्चश्रेणी मुख्याध्यापक दिनेश गुलाबराव ठाकरे यांनी आपल्या शिक्षक सहकाऱ्यांच्या मदतीने भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता वाढीस चालना दिली. पहिली ते सातवीपर्यंत सुमारे २२५ विद्यार्थी येथे शिकतात. अभ्यासिका, पिण्यासाठी शुद्ध पाणी, स्काउट-गाइड उपक्रमात सहभाग, सुंदर शाळा अभियानात तालुक्यात पहिला क्रमांक तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. जिल्ह्यातील पहिले ‘सायन्स पार्क’ शाळेत उभे राहणार आहे. सन २०१४-१५ मध्ये शिक्षकांनी शाळेची रंगरंगोटी केली. त्यापुढील वर्षी मुख्याध्यापक महोदयांनी ‘हँडवॉश स्टेशन’ तयार केले. लोकवर्गणीतून शाळा ‘डिजिटल’ होण्यासह सव्वा लाख संकलित निधीतून शाळेच्या पटांगणात पेव्हर्स व रंगमंच यांचे काम झाले. एकनाथराव दुधे यांनी बालवाचनालय, कपाट व कक्षनिर्मिती उभारण्यासाठी ५० हजारांची मदत केली. आणखी ५० हजार रुपयांच्या त्यांच्या मदतीतून तीन एलईडी टीव्ही व एक लाख ११ हजार रुपयांच्या मदतीतून शाळेचे प्रवेशद्वार निर्माण केले. दानशूर व्यक्ती दि. मो. मानकर यांच्या साडेसात लाख रुपये देणगीतून शाळेसाठी सुसज्ज सभागृह, तर रामराम लढे यांच्या ४१ हजारांच्या देणगीतून टीनशेड बांधले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणण्यासाठी स्मार्ट क्लासेस आणि विविध ई-लर्निंग प्लॅटफॉर्मचा उपयोग करण्यात येत आहे.
विकासकामांमध्ये अग्रेसर
शेतीत विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर, पीकपद्धतीचे प्रयोग यातून अर्थकारणाला गती मिळून गावातील कुटुंबाचा आर्थिक स्तर सुधारला. पर्यायाने गावाच्या विकासाला चालना मिळाली. खासगी व शासकीय आरोग्य सेवा निर्माण झाल्या. स्वातंत्र्यसैनिकांची पार्श्वभूमी गावाला आहे. गुरुदेव सेवा मंडळ, वारकरी संप्रदायाची ही भूमी आहे. याच गावात शंकर महाराज होऊन गेले. गावात दरवर्षी १५ ते २० हजार लोकसंख्येच्या उपस्थितीत भंडारा (महाप्रसाद) होतो. हे सर्वधर्मीय एकात्मतेचे प्रतीक आहे. अद्ययावत ग्रामपंचायत यंत्रणा व प्रशासन आहे. वीस वर्षांपासून रक्तदानाची परंपरा आहे. त्यात जराही खंड पडलेला नाही. विशेष म्हणजे गावात २२ डॉक्टर्स तयार झाले आहेत. पाच जण उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करतात. नवी पिढी चांगल्या पद्धतीने घडवण्याचे प्रयत्न होत आहेत.
संपर्क ः दिनेश गुलाबराव ठाकरे, ९८५०२१८३७१
(उच्चश्रेणी मुख्याध्यापक)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.