Zero Tillage Farming : शून्य मशागत तंत्र ठरतेय फायद्याचे!

Farming Technique : शिरनेर (ता. अंबड, जि. जालना) येथील आसाराम लक्ष्मण घुगरे यांनी निवृत्तीनंतर आपली शेती शास्त्रशुद्ध केली आहे. मोसंबी फळबागेसह पारंपरिक कपाशी, ज्वारी, गहू, हरभरा या पिकांमध्ये कमीत कमी मशागतीचे तंत्र अवलंबल्‍याने खर्चात बचत साधली आहे. शेतीला गोपालन, कुक्कुटपालनाची जोड उत्पन्नाला हातभार लागत आहे.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

Sustainable Agriculture : जालना जिल्ह्यातील शिरनेर (ता. अंबड) येथील आसाराम लक्ष्मण घुगरे हे मत्स्योदरी ज्युनिअर कॉलेजला प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्या वेळी नोकरी सांभाळून पत्नी कुशीवर्ता यांच्या सहकार्याने शेती करत. २०२३ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्णवेळ शेतीत झोकून दिले. सेवा निवृत्तीवेळी मिळालेल्या रकमेतून आणखी चार एकर शेती विकत घेत वडिलोपार्जित सहा एकर शेतीत भर घातली.

अशी आहे पीकपद्धती

एकूण शेतीपैकी पाच एकरवर मोसंबीची एक हजार झाडे. त्यात २२ वर्षाची ३०० झाडे, सात वर्षाची ४५० तर पाच वर्षाची २५० झाडे आहेत. याशिवाय दरवर्षी तीन ते चार एकरवर कपाशी, अर्धा एकरात कायमस्वरूपी नेपियर गवत, अर्धा एकर मका, कपाशी काढून रब्बीत ज्वारी, गहू, किंवा हरभरा अशी पिके ते घेतात.

विना नांगरणी शेती तंत्राकडे प्रवास

अलीकडील चार वर्षात घुगरे यांनी फळबागेत पूर्ण विनानांगरणी शेती करू लागले आहेत. त्यात त्यांना देवगाव (ता. पैठण) येथील शेतकरी दीपक जोशी, प्रताप चिपळूणकर यांचे मार्गदर्शन मिळते. जमिनीमध्ये अनावश्यक नांगरणी व अन्य ढवळाढवळ कमी केली आहे. तणांच्या नियंत्रणासाठी ब्रश कटरचा वापर सुरू केला असून, कापलेले तण जागीच कुजवले जाते. या कमी किंवा शून्य मशागत तंत्रामुळे मशागत, तणनियंत्रण, निंदणी यावर होणाऱ्या खर्चात सुमारे ३० ते ३५ हजारांची बचत होत असल्याचे ते सांगतात. जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण अधिक राहिल्याने फळगळ कमी होत अगदी नगण्य झाली आहे. पूर्वी भेडसावणारी मोसंबी झाडांची मर ही समस्याही पूर्णतः थांबली असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

Agriculture
Zero Tillage : कार्बन क्रेडिटसाठी शून्य मशागत तंत्रज्ञान फायदेशीर

कपाशी व्यवस्थापन

कपाशीला दोन वेळा विभागून शिफारशीनुसार रासायनिक खत दिले जाते.

कपाशीला बेसल डोस विक्री एक बॅग व नंतर २१ दिवसांनी एकरी तीन बॅग दिले जाते रासायनिक खत

कपाशीचे फरदड घेणे टाळून रब्बी पीक घेतात.

कपाशी साधारण चार एकर असून, त्यातून साडेतीन ते चार लाखाचे उत्पन्न हाती येते. त्याचा उत्पादन खर्च ८७ ते ८८ हजार रुपये येतो.

वर्ष उत्पादन (प्रति एकर) मिळालेला दर (रु. प्रति क्विंटल)

२०२१-२२ १० क्विंटल १० हजार

२०२२-२३ १६ क्विंटल ८ हजार

२०२३-२४ २३ क्विंटल ७ हजार

कपाशीवरील यंदाचा खर्च (प्रति एकरी )

कपाशी बियाणे ६००० रु., खत १७ हजार रु., सुमारे सात फवारणी २० हजार रु., वेचणी ४५००० रु.

एकूण खर्च - ८८ हजार रुपये.

ज्वारी, गहू, हरभरा, कडबा यामधून खर्च वजा जाता किमान सव्वा लाख रुपये उत्पन्न.

अशी होते बचत...

मोसंबीत तण ब्रश कटरने कापून जागीच जिरवल्यामुळे खतावरील एकरी आठ हजाराचा खर्च वाचतो.

संपूर्ण शेतीत आंतरमशागत, निंदणी थांबविल्याने वर्षाकाठी ३० ते ३५ हजाराची बचत

गोपालनामुळे शेतीसाठी दरवर्षी दहा ट्रॉली म्हणजेच सुमारे ३० हजार रुपयांचे शेणखत मिळते.

जनावरांच्या चाऱ्यांसाठी अर्धा एकरात नेपियर गवताची लागवड केली आहे.

पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी संपूर्ण १० एकर क्षेत्र ठिबक खाली आणले आहे.

Agriculture
Zero Tillage Farming : शून्य मशागत तंत्राने माती करूया समृद्ध

इतर महत्त्वाचे

सिंचनासाठी एक विहीर व सात बोअरवेल आहे.

चार वर्षापासून सोलर कृषी पंपामुळे खर्चात बचतीसह दिवसा सिंचन करणे शक्य होत आहे.

मध्य प्रदेशातील एक मजूर दाम्पत्य सालदार म्हणून ठेवले असून, वर्षाकाळी त्यांना सव्वा लाख रुपये दिले जातात.

गावरान कुक्कुटपालन अन् गोपालन

पाच वर्षापूर्वीसुमारे एक हजार गुंतवून पाच गावरान कोंबड्यांसह परसबागेतील कुक्कुटपालन सुरू केले. पक्ष्यांची संख्या ५० ते ६० पर्यंत नियंत्रित ठेवतात. सध्या त्यांच्याकडे ४० गावरान कोंबड्या आहेत. त्यापासून दररोज आठ ते दहा अंडी मिळतात. त्यासह वर्षाला किमान १०० पक्ष्यांची विक्री यातून किमान ७० ते ८० हजार रुपये उत्पन्न मिळते.

दोन बैल, एक गीर गाय, एक लाल कंधारी गाय, दोन कालवडी व दोन गोऱ्हे अशी एकूण ९ जनावरे त्यांच्याकडे आहेत. ही जनावरे प्रामुख्याने शेतीसाठी शेण, गोमूत्र आणि घरगुती दुधांसाठी सांभाळलेली आहे. दोन गाईंपासून बछड्यांना पाजल्यानंतर शिल्लक राहणारे दूध स्वतःच्या आणि शेतकामासाठी ठेवलेल्या मजुराच्या कुटुंबासाठीच प्रामुख्याने ठेवले जाते.

मोसंबीचे उत्पादन वाढले

उत्पादनक्षम मोसंबी बागेत मृग व आंबिया बहराचे उत्पादन घेतात. गेल्या तीन वर्षापासून पाच एकरमधून सरासरी ६० ते ६५ टन आंबिया बहराची तर ३० ते ३५ टन मृग बहरातून असे सुमारे १०० टन फळे त्यांना मिळतात. पूर्वी हे उत्पादन आधी केवळ ४० ते ५० टनांमध्येच घुटमळायचे असे घुगरे सांगतात. दोन वर्षापासून उत्पादित मोसंबीला सरासरी २० ते २२ हजार रुपये प्रति टन दर त्यांना मिळतो आहे. यंदा आंबिया बहराच्या सुमारे ३५ टन मोसंबीला सुमारे ३० हजार रुपये प्रति टन असा दर मिळाला. बागेत आणखी ६० ते ६५ टन मोसंबी झाडांवर असल्याचा त्यांचा दावा आहे. फळांच्या उत्तम दर्जामुळे व्यापाऱ्याकडून प्रतिटन सहा ते सात हजार रुपये अधिक दर मिळत असल्याचेही घुगरे सांगतात.

मोसंबी व्यवस्थापनातील महत्त्वाचे

मोसंबी लागवड - ७०० झाडे १५ बाय १५ फूट, ३०० झाडे १६ बाय १६ फूट अंतरावर.

गोमूत्र, शेण, गूळ व वेस्ट डीकंपोजर जिवाणू संवर्धक यापासून निर्मिती स्लरीचा महिन्यातून एकदा वापर.

विद्राव्य खत १९:१९:१९ दोन महिन्यातून एकदा एकरी सहा किलो प्रमाणात देतात.

विद्राव्य खते दिल्यानंतर १५ ते २० दिवसांनी स्लरी दिली जाते.

एकरी एक किलो ट्रायकोडर्माच्या जोडीला दोन किलो गूळ २०० लिटर पाण्यात मिसळून पावसाळ्यात दोन वेळा ठिबकद्वारे दिले जाते.

पावसाळा संपल्यानंतर एकरी ५०० ग्रॅम ताम्रयुक्त बुरशीनाशक दिले जाते.

तणनियंत्रणासाठी ब्रश कटरचा वापर केला जातो. त्यामुळे खर्चात मोठी बचत होते.

अशा उत्तम व्यवस्थापनामुळे तीन वर्षात पाच एकर मोसंबी बागेतून वर्षाकाठी दीड लाख रुपये उत्पादन खर्च वजा जाता सरासरी १८ लाखांपर्यंत उत्पन्न हाती येत आहे.

- आसाराम घुगरे, ९४२३७२९३१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com