Rainfall Deficit : नाझरे आभाळात दिवसभर ढगांची ये-जा सुरू आहे. अधूनमधून काळेकुट्ट ढग दाटून येतात; मात्र पावसाचा थेंबही पडत नसल्याने सांगोला तालुक्याच्या पश्चिम भागातील नाझरा, चोपडी, बलवडी, हातीद परिसरातील शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. ‘काळ्याकुट्ट ढगांची दाटी होते, पण पाऊस येत नाही’, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
काही दिवसांपासून परिसरात सतत वारे वाहत आहेत. त्यामुळे पाऊस पडेल, अशी आशा निर्माण करणारे वातावरण तयार होते. मात्र काही वेळातच ढग निघून जात असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा येत आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले की, आता पाऊस येईल, अशी अपेक्षा निर्माण होते. ढगांची गर्दी, वाऱ्याचा वाढता वेग आणि त्यानंतर मोकळे होणारे आभाळ, असे चित्र सध्या परिसरात पाहायला मिळत आहे.
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष सतत आकाशाकडे लागले आहे. विंधन विहिरीतील पाणीही हळूहळू कमी होत आहे. पावसाच्या अनिश्चिततेचा सर्वाधिक परिणाम खरीप पिकांवर होण्याची शक्यता आहे. सुरवातीच्या पावसामुळे पिकांना काही प्रमाणात आधार मिळाला; मात्र आता पावसाने दडी मारल्याने कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रातील काही पिकांची वाढ खुंटण्याची भीती निर्माण झाली आहे.
दिवसभर शेताकडे पाहून पिकांची परिस्थिती जाणून घेणारा शेतकरी सध्या आभाळातील ढगांची दिशा पाहत आहे. ढग दिसले की आशा निर्माण होते; मात्र पाऊस न पडता ते पुढे सरकले की पुन्हा चिंता वाढते. राज्यातील अनेक भागांत पाऊस होत असताना सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर पुढील शेतीचे नियोजन करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
विहिरी, बोअरवेल आणि तलावांमधील पाणीसाठ्यावरही शेतकऱ्यांचे लक्ष आहे. पावसाअभावी भविष्यात या जलस्रोतांवरही ताण येण्याची शक्यता आहे. शेतीच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्याचे पावसाचा परिणाम जगण्यावर होत आहे.
बागायती क्षेत्र कमी होण्याची भीती
ऑगस्ट महिना मध्यावर आला तरी अजून मोठा पाऊस नसल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांचे हाल होतच आहेत. मात्र आता पाण्याचे साठे विहिरी, बोअरवेल्स यांचे पाणी कमी होऊ लागल्याने आता बागायत असलेल्या क्षेत्रावरही मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.