Vitthal Devotion: जसजशी वारी जवळ येते तसतसे गावाकडच्या माणसांचं वारीशी तादात्म्य पावलेलं भक्तीभावाचं नातं दिवसागणिक अधिकच घट्ट होत जातं. कारण इकडे शेतकरी आषाढीला आलेला असतो आणि तिकडे त्याच्या वाडीवस्तीत, गावात, शेतशिवारात, पंढरीचा विठ्ठल नानाविध कामं करत असतो. .आपल्यापैकी अनेक जण वारीच्या दिवसांत एक वाक्य कायम ऐकतात, वाचतात आणि ते वाक्य म्हणजे, ‘एक तरी वारी अनुभवली पाहिजे.’ वारकऱ्याचे आणि पांडुरंगाचे नाते समजले, की या पंक्तीचा अर्थ सहज उमगतो! जसजशी वारी जवळ येते तसतसे गावाकडच्या माणसांचं वारीशी तादात्म्य पावलेलं भक्तिभावाचं नातं दिवसागणिक अधिकच घट्ट होत जातं. कारण इकडे शेतकरी आषाढीला आलेला असतो आणि तिकडे त्याच्या वाडीवस्तीत, गावात, शेतशिवारात, पंढरीचा विठ्ठल नानाविध कामं करत असतो..Ashadhi Wari: अहिल्यानगर जिल्ह्यात वारकऱ्यांची मांदियाळी.तो कधी वरुणराजाला दावणीला जुंपतो, वावटळीला मुठीत कोंडतो, कधी वाफ्यातल्या पाण्यात लोळतो, कधी दंडातल्या पाण्यासोबत वाहतो, विहिरींच्या झऱ्यात झिरपतो, गोठ्यातल्या गायीच्या डोळ्यात दाटतो तर कधी शेवरीसोबत रानभर फिरतो, उसाच्या फडात हरवतो, भाजीपाल्याच्या पेंड्यात गुंतवून घेतो तर कधी नांगराच्या फाळाशी रुतून बसतो तर कधी पाभरीच्या तळातून ओघळतो, बांधावरच्या झाडांच्या सावलीत ताणून देतो, कधी कारभारणीच्या डोईवरल्या दुरडीत डोकावतो, पानाफुलांच्या आड लपतो, कधी गंमत म्हणून कुसळीच्या रूपाने तळपायात घुसतो! चंद्रमौळी घराच्या पत्र्यातून ओलेत्या डोळ्याने आपल्या लेकरांचा संसारही न्याहाळतो, गावातल्या देवळात विराजमान असणाऱ्या आपल्या मूर्तीरूपास आलिंगनही देतो, तिथल्या शिखराभोवती रुंजी घालतो, गावकुसात वाऱ्याबरोबर सैर करतो, चावडीवरच्या सुखदु:खाच्या गप्पा ऐकतो, पारावरच्या थकलेल्या तळहातांना आपल्या गाली लावतो, ऐन्यात न बघता कुंकू लावणाऱ्या सवाष्णीच्या कपाळाचे चुंबन घेतो, पोराबाळांसोबत आट्यापाट्या खेळतो, अंगात उधाण आल्यागत दिवसभर सर्वत्र घुमतो!.सांज होताच निळाईच्या पायथ्याशी बाजेवर पडून रुखमाईला सांगतो, ‘‘मी इथे इतका खुश आहे की माझ्यासाठी हेच कैलास आहे, हेच वैकुंठ आहे, हाच स्वर्ग आहे, हेच तिन्ही लोक आहेत, इथली सारी लेकरं हीच आपली जन्मजन्माची आप्तं आहेत!’’ आषाढीची ओढ भाविकाच्याच नव्हे, तर विठूच्या हृदयीसुद्धा गारुड करते. मशागत केलेलं शेतशिवार पाठीमागे टाकून शेतकरी विठूच्या भेटीस येतो तेव्हा विठुरायाच्या तृप्त चेहऱ्यात आपले हिरवेकंच झालेले शेतच त्याला दिसते. त्याचा जीव पुरता खुलून जातो नि वारीचे उधाण त्याच्या नसानसांत भिनते. वारीच्या निमित्ताने आपली दुःखं हलकी करायला आलेल्या वारकऱ्यांचे समाधानाने फुललेले चेहरे पाहून पांडुरंग धन्य होतो, सुखावतो. विठूकडे आलेल्या या लेकरांचे त्याच्याशी असणारे नाते भावभक्तीपेक्षाही अनोख्या परस्परासक्तीचे असते. हे नाते मायलेकराचे असते म्हणूनच सगळी वारकरी मंडळी विठोबाला माउली असं संबोधतात..आषाढ वारीचे प्रारंभापासून सांगतेपर्यंतचे एक समीकरण असते. माघ वारी झाली की पंढरीकडे जाणारा ओघ कमी होत जातो. माघ असेपर्यंत हवेत थोडासा गारवा असतो मात्र फाल्गुन येतानाच उन्हाची चाहूल घेऊन येतो. पीकपाण्यातून हाती काय आले, याचा हिशेब हा महिना देऊन जातो. मग हळूहळू वस्त्यांवरची कामे उरकली जातात. येणारा दिवस उन्हं वाढवतच राहतो. त्याची दखल बळीराजा घेत राहतो. फाल्गुन सरू लागतो आणि वसंताचे आगमन होते. निसर्गाला उधाण येते, पानाफुलांतील रंगांची, गंधाची उधळण मन मोहून घेते. .फाल्गुनातल्या अमलकी एकादशीला उन्हातही बऱ्यापैकी गर्दी पंढरीत गोळा होते, तिच्यातही वसंताचे उधाण दिसते. काहीसे सुसह्य ऊन, झेपेल अशी गर्दी यातून वाट काढत ही एकादशी निघून जाते. मराठी वर्षातल्या अखेरच्या महिन्यातले सण पुढ्यात येतात, रंगपंचमी अन् होळी. होळीनंतर येणारी धुळवड मात्र बेजान गावात नवा जीव ओतायचा प्रयत्न करते. फाल्गुन संपला की उत्तरायण निम्मे सरते. राहिलेले उत्तरायण चैत्र, वैशाख, ज्येष्ठाकडे डोळे लावून बसते; तर वय झालेली, अंथरुणाला खिळून असलेली गावाकडची साधीभोळी माणसे मनातल्या मनात, ‘राहिलेल्या उत्तरायणात तरी आपल्याला पांडुरंगाच्या चरणी लीन करावे’ म्हणून प्रार्थना करू लागतात. चैत्राची सुरुवात गुढीपाडव्याने होते, नवनिर्मितीचा हा महिना बळीराजाला थोडंसं कोड्यातही टाकतो. .कारण यात पडणारे ऊन आणि सरत चाललेला पाणीसाठा याचा नेमका अंदाज बांधता येत नाही. या धकाधकीत चैत्री एकादशी येते. बळीराजा पांडुरंगाला आपली हकीकत ऐकवतो. पंढरीतली गर्दी सरते, दरम्यान गावगाडा चालूच असतो, सृष्टीचक्रही सुरू असते. पुढे उन्हं आणखी वाढत जातात. चैत्र संपतो आणि शेतकऱ्याची अग्निपरीक्षा घेणारा वैशाख येतो. वैशाखात अंगाची लाहीलाही होत राहते; मातीच्याही देहाची होरपळ सुरू होते. जमिनीतले पाणी हळूहळू खोल जाते, डोळ्यांतले पाणी मात्र सतत दाटू लागते. भर उन्हाळ्यात जगवलेली पिके कधी आधार देतात, तर कधी देशोधडीला लावून जातात, शेतकरी सैरभैर होऊन जातो. कुणाचा उभा ऊस पाण्यावाचून करपून जाऊ लागतो, तर कुणाची डाळिंबाची बाग तेल्या रोगाच्या घशात जाते. पिके जळून जाऊ लागतात. तरीही बळीराजा आशा सोडत नाही, मनातल्या गाभाऱ्यात असणाऱ्या पांडुरंगाचा तो धावा सुरूच ठेवतो, विठुराया कधी ऐकतो तर कधी नवा धडा शिकवतो..Ashadhi Wari 2026: निवृत्तिनाथ महाराजांच्या दिंडीचे अहिल्यानगरला स्वागत.अखितीला आंब्याची पूजा होते, आमरसाची ओठावरची चव बळीराजाचे दुःख काही काळासाठी का होईना हलके करून जाते. आंब्यांला आलेला भरगच्च मोहोर कधी गारपीटीत तर कधी वाऱ्यावावधानात झडून जातो. थोडासा मोहर राहतो तोही नीट अंग धरत नाही. अखिती नंतर चारा संपू लागतो, घरातले धान्य तळाशी जाते आणि मग सुरू होते जिवाची उपासमार! मग माणसे मिळेल त्या कामावर जातात, पंचक्रोशीत कुठे जनावरांच्या छावण्या सुरू असल्या तर घरटी एखाद दुसरा माणूस त्या मुक्या जिवासंगे छावणीत जाऊन राहू लागतो. ज्येष्ठ मास येताच कडक उन्हाच्या जोडीने अधूनमधून शिरवळ यायला सुरू होते. आपल्या शेतशिवारापासून दूर गेलेल्या शेतकऱ्याची पावले पुन्हा एकदा रानाकडे वळू लागतात..आपल्या घरधन्याची ओढाताण घरातल्या बायका बघत असतात, त्याची जगण्याची लढाई बघून त्यांचा जीव हरखून जातो नि मग वटसावित्रीच्या पुनवेला या भोळ्याभाबड्या बायका आपल्याला जन्मोजन्मी हाच पती लाभावा म्हणून वडाच्या झाडाला पूजतात. बायका वडापाशी येऊन त्याच्या बुंध्याला धागा बांधताना आपलं हितगुज त्याच्या कानाशी करतात, आपल्या धन्याचे हाल सांगतात. काळजाच्या आतनं आलेल्या या गोष्टी वडाला घायाळ करून जातात, भूमिपुत्राचे हाल वड आधी ढगांच्या कानी घालण्यासाठी आपल्या पानाफांद्यातून वरपर्यंत घेऊन जातो, बेपर्वा झालेले ढग त्याला दाद देत नाहीत तेव्हा वड नाराज होतो, आपलं गाऱ्हाणं मातीपाशी करायचं ठरवतो. आपल्या पारंब्यातून मातीकडं सांगावा धाडतो. .आपल्या भूमिपुत्राचे हाल ऐकून मातीचा जीव कासावीस होऊन जातो. माती तापत जाते, इतकी तापते की तिच्यावर पाय ठेवला तर भाजून निघावे. आपल्या पोराबाळांच्या आबाळीने संपप्त झालेल्या मातीचे हे रूप दुर्गेसारखे असते. सगळ्या आसमंतात असेल नसेल तितके बाष्प गोळा होते अन् वळवाचा पाऊस चांगलीच हजेरी लावून जातो. आयाबायांच्या डोळ्यात बऱ्याच दिवसांनी आनंदाश्रू तरळून जातात. मातीला जरा हायसे वाटते. बळीराजालाही बरे वाटते. गावाकडची माणसं मात्र थोडीशी गोंधळूनही जातात. पावसाचा अंदाज बांधण्यास सुरुवात होते. मनाचा हिय्या करून शेतकरी ज्येष्ठ महिन्याचा पहिला पंधरवडा संपला की काळजावर भला मोठा दगड ठेवून पुन्हा एकदा शेतीचा डाव मांडतो! त्यासाठी आधी तो विठुरायाला आपलं साकडं घालतो. त्याची वारी चालू ठेवण्याचे अभिवचन देतो, त्याबदल्यात तो काही मागत नाही. मातीची कुस उजविण्यासाठी त्याची करुणा भाकतो. पंढरीत विटेवर हात ठेवून उभा असलेला विठोबा साऱ्या चराचरांत प्रकट होत राहतो. वारकऱ्यांना तो जाणवत राहतो, त्यांना कुठल्या न कुठल्या रूपानं भेटत राहतो. या भेटीचा बळीराजा काय तो अर्थ काढतो अन् मातीचं देणं फेडण्यासाठी कामाला लागतो..गावाकडे आजही ‘मृगाची पेरणी...धनधान्य देई...’ या परंपरागत समजुतीसोबत ‘सत्ताविसातून नऊ वजा केले तर शून्य येते,’ असंही म्हटलं जातं. यानुसार एकूण सत्तावीस नक्षत्रांतून पावसाची नऊ नक्षत्रे कोरडी गेली, तर दुष्काळ पडतो. ही नऊ नक्षत्रे व्यवस्थित बरसली, तर मात्र अन्नधान्याची संपन्नता येते. शेतकऱ्यांचे हे पारंपरिक गणित अगदी अचूक असते. मृगातच जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पेरण्या होतात. गावाकडे मे महिन्याच्या मध्यापासून जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत प्रत्येक गावात सुतार शेतीची अवजारे तयार करण्यात मग्न असतो. सुताराच्या दारात तिफण करून घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसते. .त्यासाठी लागणारे साहित्य लोहाराकडून आणले जाते. ही सगळी कामे फक्त मृगाच्या आगमनावर अवलंबून असतात. गावगाडा चालतो तो या पावसाच्या जोरावर आणि बळीराजाची धारणा असते की पंढरीचा आपला सावळा देव हे चक्र हाकत असतो. डोळ्यात साठवलेल्या विठूच्या रूपाची आता गावाकडच्या माणसांना ओढ लागून राहते. तो कामे पटापटा उरकू लागतो. बी-बियाण्यांसाठी खेडोपाडी भरणारे आठवडा बाजार गजबजून जातात. त्यामुळे बलुतेदारांसह, बाजारहाट, अलीकडे औषधांची- खतांची दुकानेही गजबजून जातात. दरम्यान, शेतीत वर्षभर राबणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बैल पोळा साजरा करतो. .मृगाच्या आगमनापासून ते हस्ताच्या रसरशीत कामगिरीवर पुढच्या वर्षीचे गणित अवलंबून असते. जर-तरचा हा पाठशिवणीचा खेळ बळीराजाची पाठ कधीच सोडत नाही. त्यामुळे आपल्या मनातले हे मणामणाचे ओझे शेतकरी साहजिकच विठूच्या चरणी ठेवतात. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ यांच्या रानजाळात बळीराजा पुरता कातावून गेलेला असतो. त्याच्यापुढे सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन जेव्हा आषाढ येतो, तेव्हा आषाढाच्या मध्यात येते ती आषाढी वारी..तमाम मराठी जणांच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा नितळ सच्चा, प्रेमळ आणि मायाळू आविष्कार म्हणजे वारी. थेट पायावर डोकं टेकवून गाऱ्हाणे ऐकणारा काळ्या मातीतल्या लोकांचा काळासावळा देव म्हणजे पांडुरंग. कोणतेही अवडंबर न माजवता थेट भेटतो तो विठ्ठल. वारी म्हणजे सुख वारी म्हणजे तृप्तता, वारी म्हणजे सेवा आणि वारी म्हणजे समर्पण. समस्त जनतेतले भेदाभेद दूर करून सर्वांना भक्तिमार्गाच्या माध्यमांतून एका धाग्यात गुंफण्याची महान कामगिरी मराठी संतांनी केलीय, जोवर मराठी माणूस असेल तोवर वारी असेल. वारीच्या उपलब्धीसाठी संतांचे सदैव ऋणी राहिले पाहिजे. त्या ऋणाच्या जाणिवेसाठी एक तरी वारी अनुभवली पाहिजे.८३८०९७३९७७(लेखक समाजस्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे साहित्यिक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.