Future Challenges of Climate Change: भारत, पाकिस्तान, बांगलादेश या दक्षिण आशियायी देशांत गेले दोन-तीन महिने तापमान सतत वाढत आहे. भारतासकट या सर्व गरीब देशांमध्ये हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी लोकांचे प्रमाण खूप मोठे आहे. यातील बहुसंख्य लोक उघड्यावर काम करतात. त्यामुळे त्यांना प्रखर उन्हात काम करावे लागते. आजारी पडू या भीतीने कामावर गेले नाही तर त्यांची त्या दिवसाची चूल पेटत नाही..आपल्या देशात देखील उष्णतेमुळे मरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण मृत्यू झाल्यावर तत्कालीन वेगळ्याच कारणाने मृत्यू झाल्याची नोंद केली जाते. त्यामुळे उष्माघाताचे गांभीर्य आकडेवारीत पकडले जात नाही..एवढेच नाही युरोपियन देशांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. ब्रिटन, फ्रान्स मध्ये अनेक ठिकाणी तापमान ऐतिहासिक उंचीवर पोहोचत आहे. शाळांना सुट्ट्या दिल्या गेल्या आहेत. १२ देशांनी नागरिकांना इशारे जारी केलेले आहेत..Climate Change Crisis: आशियात हवामान बदलाचे संकट.धोरणकर्त्यांना या वर्षी ‘एल निनो’ची पंचिंग बॅग मिळाली आहे. सारे बिल अल निनो वर फाडले जात आहे. पण वातावरणातील बदलामुळे उन्हाळ्यातील तापमान, पावसाळयात अतिवृष्टी, हिवाळ्यात शून्याखाली तापमान आणि हिमवृष्टी, वणवे इ. घटनांची तीव्रता आणि वारंवारिता दरवर्षी वाढत आहे. गेली काही वर्षे पृथ्वीच्या विविध भूभागावर घडणाऱ्या टोकाच्या वातावरणीय बदलाच्या घटना एकत्र बघितल्या तर त्यातून तयार होणारा पॅटर्न कळेल. त्याचे गांभीर्य कळेल..काही गोष्टींची नोंद घेतली पाहिजेवातावरणीय बदल तापमान फक्त आकडेवारीतून कळत नाही, तर कोट्यवधी नागरिकांच्या यातना, त्यांच्या आप्तांचे अकाली मृत्यू, त्यांनी पै पै करून तयार केलेल्या मत्ता, शेती, घरे, गुरेढोरे यांचे नुकसान, त्यावर मात करण्यासाठी काढलेली कर्जे... हे आयाम त्याला आहेत..वातावरणीय बदलातून होणाऱ्या मृत्यूंना, नुकसानीला अर्थात वर्गीय आयाम आहे. शहरी भाग असू दे नाहीतर ग्रामीण; तेथील गरीब, निम्न मध्यमवर्गीय कायमचे जीवनातून उठतात. त्याचा अर्थ असा की आपत्तीनंतर त्यांना फक्त शासनच मदत करू शकते. एनजीओ वगैरे चांगले काम करतात, पण त्यांना सर्वार्थाने मर्यादा आहेत..Climate Change Impact: हवामान बदलाने बिघडतेय जलचक्राचे गणित.क्लायमेट चेंज हा असा प्रश्न आहे की तो जगातील राष्ट्रे समुदायिकपणेच सोडवू शकतात. एकेकटे राष्ट्र आपल्यापुरता सोडवू शकतच नाही. त्यासाठी सौहार्द आणि परस्पर विश्वास हवा. आपले, आपल्या पुढच्या पिढ्यांचे भविष्य एकत्रितपणे गुंफलेले आहे ही परिपक्व जाणीव हवी. आणि आजच्या जागतिक ताणतणावाच्या युगात गेल्या काही वर्षांत या विषयावर जे काही साध्य केले गेले होते ते वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहे. उदा ट्रम्प यांची अमेरिका युनोच्या क्लायमेट चेंज परिषदेतून बाहेर पडली आहे.ऊर्जेच्या वापरातून हवेत जाणारे कार्बन उत्सर्जन आणि वातावरण बदलाचा जैव संबंध आता प्रस्थापित झाला आहे. ऊर्जा वापरली जाणार. पण तंत्रज्ञान एवढे नक्कीच प्रगत आहे, की प्रत्येक किलो कॅलरी ऊर्जा जाळल्यानंतर कमीत कमी कार्बन हवेत जाईल. पण ते साध्य करायचे तर भांडवली खर्च आणि रनिंग कॉस्ट वाढते, नफ्याच्या मार्जिन्स कमी होतात. शेअरचे भाव हवे तसे वाढत नाहीत इत्यादी. याचे नियमन करणारे नियमाक, त्यातील भ्रष्टाचार आपल्याला माहीत आहेच..गेली ३० वर्षे हा प्रश्न जागतिक व्यासपीठांवर गंभीर पणे चर्चिला जात आहे. पण जागतिक कॉर्पोरेट भांडवल, नेहमीच्या पद्धतीने, आपदा मे अवसर म्हणून या अरिष्टाकडे गुंतवणूक आणि नफा कमावण्याच्या संधी म्हणून बघत आहे. जगात क्लायमेट फायनान्सिंग साठी खासगी भांडवलासाठी नेपथ्यरचना केली जात असते. बोलबाला झालेल्या कार्बन क्रेडिट उद्योगातून नक्की काय रिझल्ट्स मिळाले, हे कोणीही सांगणार नाही..वातावरण बदलाचा मुद्दा पृथ्वीच्या, अर्थव्यवस्थेच्या सर्व दारांवर धडका मारत आहे. आपण सामुदायिकपणे मनाची कवाडे बंद करून बसलो आहोत. सर्व दारे, खिडक्या, भिंती तोडून तो घुसणार हे नक्की. घुसेल तेव्हा कदाचित उशीर झालेला असेल.(लेखक प्रख्यात अर्थविश्लेषक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.