Rain Dry Spell: जूनअखेरीस झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने खरीप पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अंकुरलेली पिके करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी विहिरीतील उपलब्ध संरक्षित पाण्यावर तुषार सिंचन करून पिके जगविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. .पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर दुबार पेरणीचे संकट अटळ असल्याचे चित्र येवला तालुक्यात दिसत आहे. तालुक्यात यंदा सोयाबीन, मका, बाजरी, मूग आणि भुईमूग पिकांची पेरणी उशिराने झाली. पेरणीनंतर आवश्यक पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. मका हे तालुक्यातील प्रमुख पीक असून त्यानंतर सोयाबीनचे क्षेत्र आहे. मात्र वाढीच्या टप्प्यावर पाऊस नसल्याने ही पिके अडचणीत आली आहेत..Weekly Weather: यंदाचा मॉन्सून उशिरा का?.अधूनमधून पडणाऱ्या हलक्या सरींमुळे पिके कशीबशी तग धरून आहेत. काही ठिकाणी मका वाढला असला, तरी अनेक शेतांत पिके अजूनही दोन ते तीन पानांच्या अवस्थेत आहेत. उन्हाच्या झळांमुळे पाने पिवळी पडू लागली आहेत.शेतकरी विहिरीतील मर्यादित पाणीसाठ्यावर तुषार सिंचन करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र भूजलपातळी आधीच घटल्याने हा पर्यायही दीर्घकाळ टिकणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे..अनेक गावांत दिवसा वीजपुरवठा खंडित होत असल्याने सिंचनाचे नियोजन विस्कळीत होत आहे. पाऊस आणखी लांबल्यास पिकांची वाढ, फुटवे आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच बियाणे, खते, मशागत आणि पेरणीवर मोठा खर्च झालेला असताना दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे..Soybean Crop Management: ‘एल निनो’ परिस्थितीत कोरडवाहू सोयाबीन व्यवस्थापन.तालुक्यात पावसाचे असमान चित्र१९ जुलैअखेरच्या आकडेवारीनुसार, तालुक्याच्या पूर्व भागातील अंदरसूल महसूल मंडळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. नगरसुल व राजापूर मंडळातही पावसाची स्थिती समाधानकारक आहे. मात्र पश्चिम भागातील जळगाव, पाटोदा आणि सावरगाव मंडळांत सरासरीच्या सुमारे दोनतृतीयांश पाऊस झाला आहे. अंगणगाव महसूल मंडलात केवळ ३६.७ टक्के पाऊस झाल्याने परिस्थिती चिंताजनक आहे..संरक्षित पाण्यामुळे सध्या पिके तग धरून असली, तरी सतत सिंचन करून खरीप वाचविणे शक्य नसल्याचे शेतकरी सांगतात. जुलैच्या उर्वरित कालावधीत दमदार पाऊस झाला तरच पिकांना नवसंजीवनी मिळेल. अन्यथा दुबार पेरणी, वाढलेला उत्पादन खर्च आणि घटणारे उत्पादन, असा तिहेरी फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे..अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. सोयाबीन, मका आणि इतर पिके करपू लागली आहेत. पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवेल.वाल्मीक सांगळे, शेतकरी, सत्यगाव (ता. येवला).पाऊस कमी असल्याने पिके तग धरून आहेत. स्प्रिंकलरने पाणी द्यावे लागत आहे; त्यात वीजपुरवठाही सातत्याने मिळत नाही. पिके जगविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र अडचणी कायम आहेत.किरण लभडे, शेतकरी, निमगाव मढ (ता. येवला).पावसाअभावी अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या. जिथे पेरणी झाली, तिथे खर्च मातीआड गेला. आता विहिरीच्या पाण्यावर पिके जगवावी लागत आहेत. नैसर्गिक संकटाबरोबरच आर्थिक संकटही शेतकऱ्यांसमोर उभे आहे.सुनील पैठणकर, नगरसुल (ता. येवला).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.