Success Story of Kirtangali Gaon : नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील किर्तांगळी येथे पाऊसमान तसे कमीच असते. गावाचे एकूण क्षेत्र ६०२ हेक्टर असून, पैकी शेतीखालील क्षेत्र ४५७ हेक्टर आहे. पाऊस झाला तरी जलसंधारणाच्या कामांअभावी पाणी वाहून जायचे. बाजरी, सोयाबीन, मका, उशिराच खरीप तसेच रब्बीतील कांदा, गहू अशी पिके व्हायची.
शेतीतून उत्पन्न नसल्याने उदरनिर्वाहासाठी अनेक ग्रामस्थ जवळच्या सिन्नर ‘एमआयडीसी’ त कामासाठी जायचे. दरम्यान २०१६ मध्ये सिन्नर येथील युवामित्र संस्थेच्या माध्यमातून गावात कासारी नाक्यावरील गणूबाबा बंधाऱ्याचे खोली-रुंदीकरण झाले.
त्यासाठी संस्थेचे संस्थापक व कार्यकारी संचालक कै. सुनील पोटे यांची मदत झाली. पुढे पाऊस पडल्यानंतर पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. भूजलपुनर्भरण झाल्याने परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढली. शेतकऱ्यांत चैतन्य निर्माण झाले. त्यातून पाण्याची चळवळ येथे रुजली.
जलसमृद्धी कार्यक्रम
पूर्वी विहिरीतील पाणीसाठा हाच काही मोजक्या शेतकऱ्यांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत होता. मात्र १२ वर्षांपूर्वी कालवा आल्याने आवर्तनाची सोय झाली. अलीकडील काळात २ पैकी १ आवर्तन मिळत आहेत. त्यामुळे आव्हाने अजून संपली नव्हतीच. शेतकरी ७० फुटांपर्यंत खोल विहिरी खोदायचे.
पण पाणी लागण्याची शाश्वती नसायची. किर्तांगळी गाव देवनदी आणि कासारी नाल्याच्या प्रवाहाच्या मध्यभागी वसले आहे. मात्र नाल्यात पूर्णतः गाळ साचल्याने खोली कमी असून, तो जमीन सपाटीला आला होता.
त्यामुळे पाणी साठवणक्षमता कमी झाली होती. सन २०१८ मध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून युवा मित्र संस्थेने गाळमुक्त बंधारे बांधून खडकाळ व मुरमाड जमिनी सुपीक करणे व भूजल पुनर्भरण या उद्देशाने जलसमृद्धी कार्यक्रम हाती घेतला होता. टाटा ट्रस्टकडून त्यासाठी यांत्रिकी मदत तर शासनाच्या विविध विभागाने इंधन खर्च देऊ केला. त्यातून गावालगतच्या कासारी नाल्याचे खोली- रुंदीकरण झाले.
कामांची फलश्रुती
झालेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर जलसाठा वाढला. त्याचा १०६ विहिरींना फायदा झाला. सुमारे ४२४ एकर क्षेत्र सिंचनाखाली आले. निघालेला गाळ ५७ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने वाहून नेला. त्यातून ३४ एकर क्षेत्र विकसित झाले. तत्कालीन सरपंच दगू चव्हाणके यांनी व्यवसाय बाजूला ठेऊन पूर्णवेळ कामासाठी दिला.
तत्कालीन आमदार राजाभाऊ वाजे व अधिकाऱ्यांनीही वेळोवेळी भेट देऊन ग्रामस्थांचा उत्साह वाढविला. सोबतच बंधाऱ्याची दुरुस्ती आणि भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत ‘रिचार्ज शाफ्ट’चे काम झाले. देवनदीवर कोल्हापूर बंधाऱ्याचे काम झाले. नाला ओलांडून जाणाऱ्या कडवा कालव्याच्या जलसेतूमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे संपूर्ण पात्रात पाणीसाठा होतो.
‘रिचार्ज शाफ्ट’चा दोनशेहून अधिक विहिरींना फायदा झाला. सरपंच सौ. कुसुमताई शांताराम चव्हाणके, उपसरपंच खंडेराव सयाजी घुले ग्रामविकासाचा गाडा पुढे नेत आहेत. सुदर्शन राष्ट्रनिर्माण स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख सुरेश चव्हाणके यांचेही मार्गदर्शन मिळते.
गाव झाले बागायती
पूर्वीच्या जिरायती पिकांची जागा आता द्राक्षे, उन्हाळी कांदा, टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, ऊस, मधुमका, कलिंगड आदी पिकांनी घेतली आहे. हंगामात १० ते १५ वाहनांतून टोमॅटोचे दररोज दोन हजार क्रेट बाजारात जातात. चारापिके वाढल्याने दुग्ध व्यवसायाला चालना मिळाली आहे.
ठिबक सिंचन, पॉली मल्चिंग आहेच. शिवाय पाच शेतकऱ्यांकडे शेडनेट आहे. सुमारे ९५ टक्के शेतकऱ्यांकडे कांदाचाळी आहेत. पन्नास शेतकऱ्यांची निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात आघाडी आहे. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाली आहे. भाजीपाला वाहतुकीसाठी अनेक शेतकऱ्यांकडे स्वमालकीची वाहने आहेत. तीस ते ३५ तरुण शेतीमाल वाहतूक व्यवसाय करतात.
पूरक व्यवसायाला चालना
गावात संकरित गायींची संख्या दोन हजारांपर्यंत, शेळ्या ४००, मेंढ्या ५०० व ४० पर्यंत म्हशी असव्यात. चार वर्षांत दूध संकलन केंद्रांची संख्या ४ ते ५ पर्यंत पोहोचली आहे. दहा ते पंधरा शेतकऱ्यांकडे मोठे गोठे आहेत. चाऱ्याची स्वयंपूर्णता झाल्याने खरीप व रब्बी मका असतो. त्यामुळे धान्य व मुरघास या दोन्ही गरजा पूर्ण होतात. अनेक शेतकऱ्यांच्या घरासमोर मुरघासाची
साठवणूक केलेली दिसते. सुमारे १५ शेतकरी ब्रॉयलर तर दोन ते तीन शेतकरी लेयर कुक्कुटपालनातून पुढे आले आहेत.
विकासात गावाची आघाडी
संत हरिबाबांच्या विचारांचा आध्यात्मिक, सांस्कृतिक व धार्मिक वारसा जपत एकीने गावाची वाटचाल
भविष्यात ग्रामपंचायत महसूल वाढीसाठी पडीक जमिनीवर आंबा, नारळ, चिंच लागवड.
पाणी वितरणसाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या निधीतून ट्रॅक्टर व टँकर.
भूमिगत गटारी योजनेमुळे परिसर दुर्गंधीमुक्त.
शंभर टक्के हागणदारीमुक्त गाव
गावात पुरुष व महिलांचे सुमारे ३० महिला बचत गट.
देवनदी घाटाचे बांधकाम पूर्णत्वाकडे.
संत श्री हरिबाबा मंदिर परिसरात संत वन विकसित करून देशी प्रजातींच्या झाडांची लागवड.
पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी ‘आरओ प्लांट’.
‘हर घर जल’ योजनेच्या माध्यमातून वाडीवस्त्यांवर पाणी वितरण प्रगतिपथावर
माथा ते पायथा अंतर्गत देवनदी बंधाऱ्यातून २५ अश्वशक्तीच्या पंपाद्वारे पाणी उपसा. त्याद्वारे
उंचावरील आगाण माळा बंधाऱ्यात पाणी आणण्याची कार्यवाही.
गावातील उच्चशिक्षित तरुणही शेतीत कार्यरत. युवा प्रयोगशील शेतकऱ्यांचा कृषी प्रदर्शनांना भेटी देऊन नवी माहिती मिळविण्याचा प्रयत्न.
सन २०१८ मध्ये संत हरिबाबा पाणी वापर संस्थेची शेतकऱ्यांकडून स्थापना. सुमारे २५० सभासद.
कडवा कालव्याची पाण्याची मागणी, पाणीपट्टी आकारणी ही कामे संस्थेच्या माध्यमातून होतात.
कृषिविस्तार कार्यक्रमांचेही गावात होते आयोजन.
संपर्क : दगू चव्हाणके, ८३२९९१२५१४
(माजी सरपंच तथा अध्यक्ष, संत हरिबाबा पाणी वापर संस्था)
मुकुंद चव्हाणके, ९८२३४७९८७४
(युवा शेतकरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.