Success Story : विना बर्फ थंड रसातून उंचावले अर्थकारण

Article by Gopal Hage : बुलडाणा जिल्ह्यातील भानापूर येथील गोपाल आव्हाळे कुटुंबाची केवळ ५८ गुंठे शेती आहे. ऊस रसवंती व्यवसायाचा पर्याय निवडून अत्यंत व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापन व यांत्रिकीकरण करून तो यशस्वी केला.
Gopal Avhale
Gopal AvhaleAgrowon

पश्‍चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात साखर कारखानदारी कमी प्रमाणात विकसित झाली आहे. त्यामुळे येथील ऊस रसवंतीसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. पश्‍चिम महाराष्ट्रातूनही हजारो क्विंटल ऊस या भागात येतो. बुलडाणा जिल्ह्यात भानापूर (ता. लोणार) येथील अत्यल्प भूधारक म्हणजे ५८ गुंठे शेती असलेले गोपाल आव्हाळे यांनी या छोटेखानी व्यवसायात काही वर्षांपूर्वी पाऊल ठेवले. आज शेतीसोबत हा रसवंती व्यवसाय त्यांच्या कुटुंबाच्या अर्थार्जनाचे प्रमुख साधन झाले आहे. काळानुरुप व्यवसायात नव्या संकल्पना त्यांनी अंगीकारल्या.

उसाचा व्यवसाय

गोपाल यांचे वडील किसन २००१ पासून उसाची शेती करायचे. सन २०१० पर्यंत त्यांनी नजीकच्या जिल्ह्यांतील कारखान्यांना ऊस पुरवला. पुढे कारखाने बंद झाले. त्यानंतर आव्हाळे यांनी २०१३ मध्ये काळ्या उसाची लागवड सुरू केली. मेहकर, लोणार, सुलतानपूर आदी जवळच्या बाजारपेठांमध्ये खाण्याच्या उद्देशाने त्याची विक्री ते करू लागले. कालांतराने उसाची आवकही घटल्याने अपेक्षित दर मिळेना. खर्चाचा बोजा वाढला. व्यवसाय अडचणीत आला.

रसवंती व्यवसायाची मुहूर्तमेढ

आव्हाळे दरवर्षी संत गजानन महाराज संस्थानच्या पायी दिंडीत सहभागी होतात. आजवर त्यांनी पायी सात वारी पूर्ण केल्या. या वारी मार्गात ठिकठिकाणी ऊस रसवंती पाहण्यास मिळायच्या. या व्यवसायाचे स्वरूप व अर्थकारण समजावून घेतल्यानंतर हा चांगला पूरक व्यवसाय होऊ शकतो असे लक्षात आले. त्यातून २०१८ मध्ये गावाशेजारीच येसापूर फाट्यावर एका शेतकऱ्याच्या शेतात भाडेतत्त्वावर जागा

घेतली. अशा प्रकारे सुलतानपूर-जालना मार्गावर संत गजानन महाराज नावाने रसवंती सुरू झाली. एक एकरात को ८६०३२ या वाणाची लागवड केली. भांडवलाचा विचार करून वीस हजार रुपयांचे गाळप यंत्र विकत घेतले. त्यास ग्राहकांचा प्रतिसाद मिळू लागला. पहिल्याच वर्षी रसवंतीसाठी वापरून शेतातील शिल्लक नऊ टन उसाचीही विक्री करता आली.

Gopal Avhale
Farm Management : काटेकोर व्यवस्थापन हेच शेतीचे सूत्र

सुधारणांमुळे वाढला प्रतिसाद

ग्राहकांची संख्या वाढू लागली तशी रसाची मागणी वाढू लागली. पण गाळप यंत्राची क्षमता कमी होती. यंत्राच्या डिझेलचा काहीसा गंध रसाला यायचा. यंत्र आवाजही करायचे. मग २०१९-२० मध्ये दोन अश्‍वशक्ती क्षमतेचे आवाज विरहित, स्वच्छ रस देणारे पावणेतीन लाख रुपये किमतीचे यंत्र घेतले. तीनशे किलो ऊस मावू शकेल एवढा डीप फ्रिज घेतला. त्यामुळे ऊस थंड राहून ग्राहकांना रसही ताजा, थंड व विना बर्फाचा मिळू लागला. रसवंतीचा परिसरही स्वच्छ, आरोग्यदायी

ठेवला. रसासाठी पेपर ग्लासचा (यूज ॲण्ड थ्रो) वापर केला. अशा प्रकारे सर्वतोपरी काळजी घेऊन तयार केलेला गुणवत्तापूर्ण रस ग्राहकांच्या पसंतीस उतरला. मेहकर- जालना मार्गाने ये-जा करणारे

तसेच मेहकर, लोणार, सुलतानपूर येथूनही ग्राहक रसाचा आस्वाद घेण्यासाठी येथे येऊ लागले. ‘पार्सल’ येणाऱ्यांची संख्या वाढली.

Gopal Avhale
Watermelon Production : आमचा माल आम्हीच थेट विकू...

उल्लेखनीय उलाढाल

जानेवारी ते जून या काळात उन्हाळ्याचे दिवस जास्त असल्याने आव्हाळे यांची रसवंती पूर्ण जोमात असते. या कालावधीत दररोज चार- पाच हजार, तर काही वेळा कमाल १० हजारांपर्यंत देखील उत्पन्न मिळते. वर्षभरातील अन्य काळातही कमी-अधिक प्रमाणात रसवंती सुरू असते. वर्षाला आठ ते नऊ लाख रुपये उलाढाल करण्यापर्यंत व्यवसायाने मजल मारली आहे. ५० रुपये प्रति लिटर, तर ३०० मिलि ग्लास १५ रुपये व २१० मिलि ग्लास १० रुपये या दराने विक्री होते.

ऊस उपलब्धतेचे नियोजन

प्रति दिन अडीच ते तीन क्विंटल उसाची गरज भासते. घरचा सुमारे एक एकरभर ऊस उपलब्ध होतो. त्या व्यतिरिक्त अन्य शेतकऱ्यांकडूनही ऊस खरेदी केला जातो. त्यासाठी पावसाळ्यापासून ते जानेवारीपर्यंत २० ते २२ टन उसाची नोंदणी करून वाहतूक व तोडणी खर्च देऊन तो खरेदी केला जातो. घरच्या शेतीत वडिलांसह आई सुनंदा, पत्नी शांता देखील ऊसतोडणी, साळणी आदी कामे करतात. कुटुंबातील सर्वांच्या कामांमुळेच श्रमाची विभागणी होते. मजुरी खर्चात बचत होते.

उंचावले अर्थकारण

पूर्वी पारंपरिक पीक पद्धत होती. इतरांकडे मोलमजुरी करावी लागे. घरची केवळ ५८ गुंठे शेती असूनही आव्हाळे कुटुंबाचे अर्थकारण व त्याचबरोबर सामाजिक पत रसवंती व्यवसायातून उंचावली आहे. गोपाल यांना आपल्या तीनही मुलींना चांगले शिक्षण देणे शक्य झाले आहे. सुमारे १६ लाख रुपये खर्चून शेतात सिमेंट क्राँक्रीटचे पक्के घर उभारले आहे. त्यासाठी कोणते कर्ज काढावे लागले नाही. ऊस वाहतुकीसाठी दोन लाख रुपये गुंतवून जुना ट्रॅक्टर खरेदी करता आला.

गोपाल आव्हाळे ९१५८१३२१५९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com