Success Story : कृषक पुत्र शेतकरी कंपनीची आश्‍वासक वाटचाल

Article by Manik Rasve : परभणी जिल्ह्यातील उक्कलगाव (ता. मानवत) येथील उच्चशिक्षित कृषी पदवीधर तरुणांच्या पुढाकारातून कृषक पुत्र शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापन झाली.
Farmer Producer Company
Farmer Producer CompanyAgrowon

Farmers Produce Company : परभणी जिल्ह्यातील उक्कलगाव (ता. मानवत) येथील कृषक पुत्र शेतकरी उत्पादक कंपनीने अल्पावधीत आपली ओळख तयार केली आहे. उक्कलगाव येथील अंगद नन्हेर कंपनीचे अध्यक्ष आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून त्यांनी बी.एस्सी.(कृषी) पदवी संपादन केली. मीरत येथूनएम.एस्सी., तर बिहार येथून ते पी.एचडी.(कृषिविद्या) झाले आहेत.

काही काळ परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाती शिक्षण सहयोगी म्हणून ते कार्यरत होते. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून गाव परिसरातील शेती व शेतकऱ्यांच्या प्रगतीस चालना देण्याच्या उद्देशाने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.

आपले कृषी पदवीधारक मित्र गोविंद मसलकर व राम मसलकर (कंपनीचे विद्यमान संचालक) यांना बरोबर घेत शेतकऱ्यांनी एकत्रित केले.

प्रत्येकी दोन लाख रुपये भागभांडवल जमा केले. त्यातून ऑगस्ट २०२२ मध्ये कृषक पुत्र शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाली. शेतकरी उन्नती होईल घरोघरी ही कंपनीची ‘टॅग लाइन’ आहे. दहा सदस्यांचे संचालक मंडळ आहे. उपाध्यक्ष अयोध्या हरिश्‍चंद्र खुपसे, तर सचिव नवनाथ कोल्हे आहेत. कंपनीत परिसरातील १५ गावांमधून सुमारे ३०३ शेतकरी सभासद आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील सुमारे दोन हजारांवर शेतकरी कंपनीशी जोडले गेले आहेत.

शेतीमाल खरेदीद्वारे कार्याचा श्रीगणेशा

सर्वप्रथम कंपनीने मानवत येथे भुसार माल खरेदी केंद्र सुरू केले. सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, तूर आदी मालाची खरेदी सुरू केली. विक्रीसाठी माल आणलेल्या शेतकऱ्यांकडून अडत, तसेच हमाली घेतली जात नाही.

मालाच्या खरेदीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. रोखीचे व्यवहार कमी आहेत. खरेदी केलेल्या सोयाबीनची ‘ऑइल मिल’ला विक्री केली जाते. त्यामुळे अधिक फायदा होतो.

Farmer Producer Company
Guava Farming : पडोळ यांनी लोकप्रिय केला श्रीहरी ब्रॅण्ड पेरू

शेतीपूरक उपक्रम

कंपनीने मानवत येथील पाळोदी रस्त्यावर कृषी निविष्ठा केंद्र सुरू केले आहे. दहा शेतकऱ्यांनी मागणी केल्यास थेट बांधावर त्यांना खताचा पुरवठा होतो. गटाद्वारे खरेदी केल्यास कीडनाशके सवलतीच्या दरात पुरवण्यात येतात. थेट बांधावर जाऊन, मेळाव्यांद्वारे कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार केला जातो. शासकीय अनुदानावर ५० शेतकऱ्यांना तुषार संचाचा लाभ देण्यात आला.

तीस ते ४० एकर क्षेत्र ठिबक सिंचन सिंचनाखाली आणले. जनसुविधा केंद्रांद्वारे सभासदांचे पीकविमा प्रस्ताव विमामूल्य दाखल केले जातात. अन्य ‘ऑनलाइन’ सुविधांचा लाभ दिला जातो. शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन व बियाणे संकलनाचे महत्त्व समजावावे यासाठी नागरजवळा येथील शाळेत बीजगोळा उपक्रम राबविला. तृणधान्य आंतरराराष्ट्रीय वर्षानिमित्त जनजागृती करण्यात आली.

खाद्य तेल निर्मिती...

कंपनीने उक्कलगाव शिवारात गोदाम भाडेतत्त्वावर घेतले आहे. अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी महावितरणकडून एक्स्प्रेस फीडर बसविले आहे ‘कोल्ड प्रेस ऑइल’ संयंत्र लातूर येथून घेतसे आहे. त्याद्वारे मागील वर्षी नवरात्रीच्या काळात खाद्यतेल निर्मिती सुरू केली. प्रति तास २ क्विंटल तेलबियांपासून ४० ते ५० क्विंटल तेल उत्पादन त्यातून मिळत आहे.

कच्च्या मालाची म्हणजे करडई, शेंगदाणा, तीळ, मोहरी आदी तेलबियांची बाजारभावापेक्षा क्विंटलमागे २०० ते ३०० रुपये अधिक दराने सभासदांकडून खरेदी केली जाते. परिसरातील शेतकऱ्यांनाही पाच रुपये प्रति किलो दराने करडईपासून तेल तयार करून दिले जाते. शिवाय पेंडही दिली जाते. एखाद्या शेतकऱ्याने पेंड कंपनीला दिली तर गाळपाची रक्कम वजा करून क्विंटलमागे ५५० रुपये परतावा दिला जातो. सध्या महिन्याला २५०० ते ३००० लिटर तेल उत्पादन घेतले जात आहे.

Farmer Producer Company
Farm Management : काटेकोर व्यवस्थापन हेच शेतीचे सूत्र

विक्री व्यवस्था

कृषक पुत्र ब्रॅण्ड नावाने एक, पाच व १५ लिटर आकारामानात पॅकिंग.

मानवत तसेच पुणे येथील बाणेर, शिवाजी नगर येथे आउटलेट्‍स. छत्रपती संभाजीनगर, परभणी येथील किराणा दुकानांमध्येही विक्री.‘ऑनलाइन’ पद्धतीने मागणी केल्यास घरपोच पुरवठा.

तीळ, मोहरी, जवस यांचे तेल मागणीनुसार तयार करून दिले जाते.

प्रति लिटर करडई तेल २५० रुपये, शेंगदाणा तेल २७० रुपये, सूर्यफूल तेल

२७० रुपये, मोहरी तेल २८० रुपये, जवस तेल ३०० रुपये असे दर.

महिन्याला ७०० ते ८०० क्विंटलपर्यंत पेंड निर्मिती होते. परभणी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पशुपालकांकडून त्यास मागणी.

प्रति किलो करडई पेंड २० रुपये, शेंगदाण पेंड

५५ रुपये, तर सूर्यफूल पेंड १५ रुपये असे दरआहेत.

उल्लेखनीय उलाढाल

मागील वर्षापासून गांडूळ खत, व्हर्मिवॉश निर्मिती केली जात आहे. गांडूळ खताच्या बेडचीही विक्री केली जाते. गेल्या वर्षी कंपनीच्या सभासदांच्या शेतावर स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग करण्यात आला.

कंपनीचे हमीभाव शेतीमाल खरेदी केंद्र आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत २०२२-२३ मध्ये ९५२ शेतकऱ्यांकडीव १४ हजार ९२५ क्विटंल हरभऱ्याची कंपनीने हमीभावाने खरेदी केली. मागील दोन वर्षे कंपनीने दोन कोटी उलाढाल साध्य केली आहे. आगामी काळात धान्य स्वच्छता व प्रतवारी युनिट सुरू केले जाणार आहे. पशुखाद्य निर्मितीही केली जाणार आहे.

अंगद नन्हेर ८८५५८८५०४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com