Water Management Agrowon
यशोगाथा

Agriculture Water Management : उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर महत्त्वाचा

Water Conservation : पाणी व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे म्हणजे वाहणारे पाणी अडवून त्याचा साठा करणे आणि पुढे गरजेप्रमाणे या साठ्याचा पुढील पावसाळ्यापर्यंत वापर करणे गरजेचे असते.

प्रताप चिपळूणकर

प्रताप चिपळूणकर

कालव्याचे पाणी फिरविण्याची सुविधा देताना जादा पाणी निचरून जाणारी चराचीही सुविधा समांतर उभी राहणे गरजेचे आहे. उघडे चर थोड्याच दिवसांत बाजूची माती ढासळून भरतात. त्यात पाण कणसे वाढत जातात, कालांतराने त्यातील पाणी प्रवाही रहाण्याऐवजी डबके साठल्यासारखे साठून राहिल्याने परिसरातील जमिनी पाणथळ झाल्या आहेत. हे लक्षात घेऊन पाणी व्यवस्थापनावर सर्वांनी संघटीतपणे विचार करावा.

जलसंवर्धनाचे तंत्र : भाग २

पावसाचे पाणी काही जमिनीत जिरते तर काही जमिनीवरून आडवे वाहते. दोनही प्रकारचे पाणी पुढे ओघळ, ओढा, नाले आणि शेवटी नदीतून वाहत पुढे जाते. असे वाहणारे पाणी अडवून त्याचा साठा करणे आणि पुढे गरजेप्रमाणे या साठ्याचा पुढील पावसाळ्यापर्यंत वापर करणे गरजेचे असते. लोकसंख्या वाढू लागली तसे पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याची गरज वाढू लागली. औद्योगिकीकरणासाठी देखील पाण्याची गरज देखील वाढत आहे. आज पृष्ठभागावर वाहणाऱ्या पाण्यावरच जास्तीत जास्त काम चालते. सह्याद्री डोंगररांगांत नद्यांचे उगम होतात. तेथे प्रचंड पाऊस पडतो. तेथे लहान मोठी धरणे नद्यांवर बांधून काही ठिकाणी हे पाणी गरजेनुसार पुढे वर्षभर नदीत सोडले जाते. तर काही ठिकाणी कालव्याने हे पाणी पुढे दूरवरील पावसाचे दुर्भिक्षाचे भागात नेले जाते. या भागातील फार मोठे क्षेत्र बागायती केले आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नदीत सोडलेले पाणी पुढे जागोजागी बंधारे बांधून उपसा जलसिंचनाद्वारे परिसरातील जमिनीत फिरविले जाते. चढावर पाणी साठवायचे आणि कालवे काढून गुरुत्वाकर्षाने ते त्या नदीच्या खोऱ्यात शक्य तितके फिरविले जाते. पाणी प्रवाही करण्यासाठी कोणतीही ऊर्जा लागत नाही परंतु सुरवातीला धरण बांधणे आणि कालवे काढणे यासाठी खूप मोठा खर्च सरकारला करावा लागतो. पुढे लाभधारकाकडून पाणीपट्टी गोळा केली जाते.

कालव्यातून पाणी वाहत असता ते दोनही बाजूला पाझरून एका बाजूला पाण्याची नुकसानी होते आणि दुसऱ्या बाजूला बाजूच्या जमिनी पाणथळ बनतात. ते टाळण्यासाठी कालव्याचे अस्तरीकरण केले जाते. हे देखील मोठे खर्चिक काम आहे. कालव्याचे पाणी प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी उपकालवा, मोठ्या चाऱ्या, लहान चाऱ्या काढाव्या लागतात. या लहान मोठ्या चाऱ्यांचे अस्तरीकरण होत नाही. यामुळे या सर्वांचा पाण्याची जास्तीत जास्त कार्यक्षमता मिळविण्यासाठी नियोजन करणे खूप मोठे काम आहे. लहान, मोठ्या कालव्यातून बारमाही पाणी वाहत असते. परंतु पुढील मोठ्या व लहान चाऱ्या बारमाही प्रवाही नसतात. त्यात फेराप्रमाणे पाणी सोडले जाते. यामुळे यात तण मोठ्या प्रमाणात वाढते. त्यांची सातत्याने स्वच्छता म्हणजे मोठे डोकेदुखीचे काम आहे.

कालवा शक्य तितक्या चढावरून फिरविला जातो. यामुळे कालव्याचे पाझराचे पाणी सखल भागाकडे जमिनीखालून वाहत असते. कालव्यातून मिळणाऱ्या पाण्याचे आकारमान मोठे असल्याने असे पाणी देण्यासाठी शेताची योग्य रचना करावी लागते. अशा भागातील ऊस क्षेत्राला फुली पद्धतीने पाणी दिले जाते. बऱ्याच वेळा पुढील फेर योग्य वेळेत मिळेल याची शेतकऱ्यांना शाश्वती नसते. अशा फुल्या भरून पाणी पाजले जाते. पाणी दिवसरात्र प्रवाही असल्याने रात्रपाळीत पाण्याचा आणखी जास्त गैरवापर होतो.

शेतकऱ्याला जी पाणीपट्टी भरावी लागते, त्याचे दर हेक्टरवर ठरलेले असतात. तुम्ही किती पाण्याचा वापर करता याचा हिशेब करून दर आकारणे केवळ अशक्य आहे. खूप चढावरील हलक्या जमिनीत पाणी भरून ठेवले गेल्याने पाझराचे पाणी जमिनीखालून सखल भागाकडे वाहू लागते. सखल भागात जमिनी जड होत जातात तसेच पाणी नदीकडे वाहण्याचा वेग मंदावत जातो. हे तटलेले पाणी पुढे जाण्यास मार्ग न मिळाल्याने जमिनीचे पृष्ठभागावर येऊ लागते आणि त्या भागातील जमिनी पाणथळ बनतात. पाण्याचे पृष्ठभागावरील पाणी उष्णतेने वाफ होऊन हवेत जाते. मात्र त्यात मिसळलेले क्षार तेथेच साठत जाऊन पुढे अशा जमिनीत गवताची काडीही उगवत नाही.

महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर अशा नापिक जमिनीचे पट्टे तयार झाले आहेत. अशा जमिनी परत पिकाखाली आणणे हे काम वैयक्तिक पातळीवर करणे शक्य नसते. अशा जमिनीत सुधारणा करण्याचे तंत्र खूप महाग आहे. जवळपास नवीन जमीन विकत घेण्याच्या आसपास खर्च आहे. कालव्याचे पाणी फिरविण्याची सुविधा देतानाच जादा पाणी निचरून जाणारी चराचीही सुविधा समांतर उभी राहणे गरजेचे आहे. खर्चामुळे इकडे दुर्लक्ष होते. कालवा काढण्यास शेतकरी जमीन देण्यास तयार असतो. परंतु निचरा चरासाठी जमीन हस्तांतरण हा फार क्लिष्ट विषय आहे. उघडे चर थोड्याच दिवसात बाजूची माती ढासळून भरतात. त्यात पाण कणसे वाढत जातात, कालांतराने त्यातील पाणी प्रवाही रहाण्याऐवजी डबके साठल्यासारखे साठून राहिल्याने चरांचे व्यवस्थापन हाही मोठा खर्चिक विषय आहे.

पाणी वापराचे नियोजन महत्त्वाचे

महाराष्ट्रात १९३६ साली इंग्रजांनी नीरा, प्रवरा व गोदावरी पाटबंधारे योजना अशा पाणी योजना राबविल्या. त्यांनी नियम ठेवला होता की १/३ जमिनीत बागायती पीक घ्यायचे आणि २/३ जमिनीत जिरायती पिके घ्यायची. तीन एकर जमिनीपैकी एक एकरांस पाणी परवाना मिळत असे. त्यांचा पाणथळ जमिनी पुढे होऊ नयेत यासाठी वरील नियमाचे नियोजन असावे. परंतु शहाण्या शेतकऱ्यांनी वैध अवैध मार्गाने नेहमीच मंजुरीपेक्षा जास्त ऊस लावला. आता तर तो नियमच कालौघात नष्ट झाला. परिणाम आपण पाहातच आहोत.

उपसा जलसिंचनामध्ये अनेक गैरप्रकार आहेत. वसुली जास्त होण्यासाठी नेहमीच क्षमतेपेक्षा जास्त क्षेत्राला पाणी दिले जाते. मग दोन पाण्याच्या पाळ्यांत ३० ते ३५ दिवसाचे अंतर पडते. मग शेतकरी साखळ्या मारुन जास्तीत जास्त पाणी भरून घेतात. काही दिवस जास्त पाण्याने तर काही दिवस कमी पाण्याने ऊस मार खातो. एखाद्याने पाणी भरून घेतले की त्याने असे केले मग मी का नाही. सर्वांचीच चुकीच्या मार्गाने वाटचाल होते. कार्यक्षम पाणी व्यवस्थापनाचे सूत्र असे आहे, की कमीत कमी पाण्यात पाण्याची पाळी संपविणे. दोन पाळ्यांत कमीत कमी योग्य अंतर राखणे. वास्तवात सर्व उलट दिशेने वाटचाल चालू आहे.

उपसा सिंचनाचे पाट फक्त पावसाळा संपल्यानंतर एकदाच स्वच्छ केले जातात. मुख्य पाट संस्थेतर्फे स्वच्छ केले जातात. त्यापुढील लहान पाट कधीच स्वच्छ केले जात नाहीत. याबाबतचे संशोधन सांगते, की पाटात तण वाढलेली असतील तर ५० टक्के पाणी वाटेत मुरते आणि ५० टक्केच पाणी जमिनीपर्यंत जाते. स्वतःची विहीर असेल व त्यात मुबलक पाणी असेल तर यापेक्षा वेगळे चित्र दिसणार नाही.

- प्रताप चिपळूणकर,

८२७५४५००८८

(लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

ठिबक सिंचन तंत्राचा अभ्यास करा

आपण फक्त इस्त्राईलमधून ठिबक सिंचन आणले. तेथे जे पीक लावायचे त्याच्या आठवडावार पाण्याच्या गरजांचा अभ्यास केला जातो. संगणकावर आठवडावार किती वेळ संच चालवायचा याची माहिती भरली जाते. त्याचे काटेकोर पालन केले जाते. आपल्याकडे संच किती तास चालू ठेवला पाहिजे याचे काही गणित नसते. मोबाईलवर घरात बसून सिंचन करता येते हे मुख्य फायदे गृहित धरून ठिबक संच वापरले जातात. सर्वच जण असे करतात असे मला म्हणायचे नाही. काही अभ्यासू शेतकरी सर्व शास्त्रशुद्ध माहिती शिकून घेऊनही या सुधारित पद्धतीचा वापर करीत असावेत.

आपल्याकडे ठिबक पाहिजे या भावनेतून प्रथम मी ठिबक सिंचन संच घेतला. ठिबक संच विक्रेता हा आपला मार्गदर्शक. माझ्या विहिरीत शेजारून वाहणाऱ्या ओघळाचे पाणी आत घेतले आहे. मार्गदर्शकांच्या ही बाब लक्षात आली नसावी. त्याने फक्त जाळीची गाळणी दिली. ही गाळणी सतत गाळाने बंद होत असल्याने ठिबक संचाचे पाणीही अनेक ठिकाणी बंद पडत असे हे नुकसान झाल्यावरच लक्षात येई. शेवटी पिकाचे नुकसान होऊ लागल्याने संच काढून काठीवर टांगून ठेवला. चार वर्षानंतर कृषी महाविद्यालयातील एकदा या विषयातील प्राध्यापकापुढे अडचण मांडल्यानंतर त्याने सांगितले, की तुम्हाला वाळूच्या गाळणीची गरज आहे.

बाजारात चौकशी केली. एका ठिकाणी थोडे दिवस वापरलेली एक वाळूची गाळणी मिळाली. याची किंमत २५,००० सांगण्यात आली. रानात पाटाला ३ ते ४ सागवानाची झाडे मोठी झाली होती. ती विकून २५,००० उभे केले. एक लाख रुपयांचे भांडवल ठिबकमध्ये अडकले होते. वाळूची गाळणी बसविल्यापासून गेले कित्येक वर्षे विनातक्रार संच काम करत आहे. मोठ्या प्रमाणावर सरकारी अनुदान मिळते म्हणून संच घ्यावयाचे आणि पुढे गोठ्यात एका काठीवर टांगून ठेवल्याची बरीच उदाहरणे सापडतील. वापरकर्ता आणि मार्गदर्शकांच्या अपुऱ्या ज्ञानामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांचे नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांनी यातून काही शिकावे. थोडक्यात ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा!’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT