Poultry Industry Agrowon
यशोगाथा

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

Kadaknath Chicken : युवा व्यावसायिक संदीप दिनेश सोनवणे यांनी २०१६ मध्ये कडकनाथ जातीच्या कुक्कुटपालनाची सुरुवात केली. त्यानंतर बदलती बाजारपेठ व ग्राहकांची मागणी- संधी यांचा विचार करून नावीन्यपूर्ण व आरोग्यदायी उत्पादनांची श्रेणी आकर्षक पॅकिंगद्वारे बाजारपेठेत उतरवली.

मुकूंद पिंगळे

Poultry Industry : नाशिक येथील युवा पोल्ट्री उद्योजक संदीप सोनवणे यांचा नाशिकपासून जवळच आडगाव येथे मोठा पोल्ट्री प्रकल्प आहे. कडकनाथ या देशी जातीच्या कोंबडीचे पालन तेथे केले जाते. या पक्ष्याची अंडी व मांसात औषधी गुणधर्म असल्याने त्यास सर्वत्र मोठी मागणी असते.

संदीप यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यापूर्वी या पक्ष्याचा मूळ अधिवास असलेल्या झबुआ (मध्य प्रदेश) येथे भेट देऊन पक्ष्याविषयी सविस्तर अभ्यास केला. सुरुवातीला म्हणजे २०१६ मध्ये अवघ्या १०० पक्ष्यांपासून सुरुवात झाली.

नाशिकसह मुंबई शहरात ग्राहकांचे जाळे विणले. मागणीनुसार वेळेवर अंडी पुरवठा करण्यावर भर दिला. त्यामुळे ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे व्यवसाय विस्तार करणे शक्य झाले.

आज ४० हजार पक्षी क्षमतेपर्यंत पोल्ट्रीची क्षमता गाठली आहे. प्रति तास पाच क्विंटल क्षमतेची स्वयंचलित फीड मिल, दर महिन्याला ३० हजार पक्षी पैदास क्षमतेची अत्याधुनिक हॅचरी, ब्रूडिंग अशी यंत्रणा आहे.

प्रयोगशाळेत नमुने अभ्यासून १८ प्रकारचे घटक निवडून संतुलित कुक्कुटखाद्य तयार केले जाते. त्यामुळेच अंडी आणि चिकनची उच्च गुणवत्ता मिळते. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मागणी तयार केली आहे. कडकनाथ पक्षिपालनासाठी ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त केले आहे.

‘पॅकेजिंग’वर केले संशोधन

सुरुवातीला संदीप पारंपरिक पद्धतीनेच अंडी विक्री करीत असल्याने उलाढाल मर्यादितच होती. मात्र आजकाल मोठी शहरे, मॉल्समध्ये नावीन्यपूर्ण पॅकेजिंग व ब्रॅण्डिंग असलेल्या उत्पादनांकडे ग्राहक अधिक आकर्षित होत असल्याचे दिसून येते. हीच बाब विचारात घेऊन संदीप यांनी व्यावसायिक दृष्टिकोन आपल्यामध्ये विकसित केला. सन २०१७ मध्ये ग्राहक व बाजाराभिमुख या बाजू विचारात घेत कार्यपद्धतीत सुधारणा केली.

आपल्या उत्पादनाकडे ग्राहक आकर्षित झाला पाहिजे, त्यावरील लेबल वा माहिती- तपशील त्याने वाचला पाहिजे यादृष्टीने ‘पॅकेजिंग’वर संशोधन कार्य सुरू केले. यात आकर्षक डिझाइन. रंगसंगती यांचाही विचार केला. विविध पॅकिंग प्रकाराच्या चाचण्या घेतल्या. ग्राहकाने उत्पादन खरेदी केल्यानंतर पॅकिंग वापरात यावे, ते फेकून देता कामा नये हा दुय्यम उद्देशही ठेवला होता.

जेणेकरून आपल्या उत्पादनाचा ब्रॅण्ड कायम त्याच्यासमोर राहील हा उद्देश होता. अन्न सुरक्षितता, प्रयोगशाळा अहवाल अशा तांत्रिक बाजूंचाही विचार केला. त्यातून ‘कडकनाथ ॲग्रोवर्ल्ड’ या नावाने व्यवसाय नोंदणीकृत झाला. तर ‘कडकनाथ’ हा ट्रेडमार्कही मिळाला. ‘प्रॉमिसिंग हेल्थ विथ टेस्ट’ म्हणजेच चवीबरोबर आरोग्याचीही हमी असे ‘स्लोगन’ तयार केले.

अंडी विक्री व पॅकिंग

देशभरात दररोज १० हजारांपर्यंत अंडी विक्री होतात. कडकनाथच्या या प्रत्येक अंड्यावर ‘ट्रेडमार्क’चा शिक्का आहे. त्यातून ग्राहकांना गुणवत्ता व विश्वास देण्याबरोबर पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला आहे.

एक डझन व अर्धा डझन या स्वरूपात अंड्यांचे आकर्षक टीन प्रीमिअम बॉक्स विक्रीसाठी आणले आहेत. एक डझन साडेपाचशे रुपये, तर अर्धा डझनसाठी ३०० रुपये असे दर आहेत. प्रति अंड्याचा होलसेल दर ४० रुपये ठेवला आहे. पुढील काळात गावरान अंड्याप्रमाणे खर्च नियंत्रणात आणून कडकनाथ अंडी सर्वसामान्य ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे

अंड्यांपासून पावडर निर्मिती

संदीप यांच्या पोल्ट्रीत अंडी उत्पादनक्षमता टप्प्याटप्प्याने वाढत गेली. तरीही बाजारपेठेतील उपलब्ध अंडी व कडकनाथची अंडी यांतील दरांत मोठी तफावत होती. त्यामुळे विक्री वाढ हा आव्हानात्मक विषय होता. शिवाय अंडी हे नाशिवंत उत्पादन म्हणजे टिकवणक्षमता १० ते १२ दिवसांची होती. अशावेळी अंड्यांपासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याची कल्पना संदीप यांना सुचली.

अन्न प्रक्रिया, शास्त्रीय शिफारशी व मानकांचा अभ्यास करून अंडी निर्जलीकरण करून त्याची पावडर तयार करण्याचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेतले. त्यास ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. त्यातून आत्मविश्वास वाढला. आज बेकिंग व कुकिंग वापरासाठी प्रथिनयुक्त १०० टक्के नैसर्गिक पद्धतीने उपयुक्त ‘होल एग पावडर’ संदीप यांनी सादर केली आहे.

अंडा ऑम्लेट पावडर

मग संशोधन आणि विकास (आर ॲण्ड डी) करून विविध उत्पादनांच्या निर्मितीचा छंदच संदीप यांना लागला. त्यातूनच शहरातील नोकरदार गृहिणींची गरज ओळखून ‘रेडी-टू-कुक धर्तीवर ‘ऑम्लेट एग पावडर’ विकसित करून बाजारात आणली. त्यात कांदा, टोमॅटो, मिरची व मीठ आदी घटक समाविष्ट केले. पाण्यात ही पावडर टाकून झटपट व रुचकर अंडा ऑम्लेट आता तयार करणे शक्य झाले आहे. या उत्पादनाला परदेशात शिकायला गेलेले रहिवासी व विद्यार्थी यांच्याकडून चांगली मागणी असल्याचे संदीप सांगतात.

प्रोटिन बार व शेक

कडकनाथ अंड्यामध्ये सर्वाधिक प्रमाण प्रथिनांचे असते. त्याचाच अभ्यास करून अंड्यातील प्रथिनयुक्त घटक वेगळे करून ‘प्रोटीन पावडर’ बाजारात आणली आहे. याशिवाय चॉकलेटप्रमाणे खाता येणारा ‘प्रोटिन बार तयार केला आहे. काही वेळा लहान मुले अंडी व दूध एकत्र घेण्यामध्ये टाळाटाळ करतात किंवा नाक मुरडतात. अशावेळी दुधातून घेण्यासारखे ‘प्रोटिन शेक’सारखे नावीन्यपूर्ण उत्पादन तयार केले आहेत.

ताजे व फ्रोझन चिकन

संदीप यांनी ताजे व ‘फ्रोझन’ पद्धतीचे प्लॅस्टिक पिशवीबंद चिकन उत्पादनही बाजारात आणले आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याची टिकवणक्षमता सुमारे ९० दिवस आहे. पक्ष्यांची अंडी देण्याची क्षमता संपल्यानंतर मांसापासून प्रक्रियायुक्त ‘पेटफूड’ही तयार केले आहे. अलीकडेच अंडी पावडर व काही आयुर्वेदिक घटक एकत्रित करून ‘च्यवनप्राश’ तयार केले आहे. या उत्पादनाच्या चाचण्या सुरू आहेत.

नैसर्गिक शाम्पूची क्रेझ

अंड्यातील प्रथिनयुक्त घटक व जोडीला कोरफड, शिकेकाई असे आयुर्वेदिक घटक मिसळून मूल्यवर्धित ‘प्रोटिन शाम्पू’ विकसित केला आहे. नैसर्गिक पद्धतीच्या या शाम्पूची सामान्य ग्राहकांपासून ते बॉलिवूडमधील अभिनेत्यांपर्यंत क्रेझ आहे. यापुढे जाऊन केसांसाठी ‘कंडिशनर’, चेहरा उजळण्यासाठी ‘फेस पॅक’ अशी उत्पादनेही संदीप यांनी तयार केली आहेत. कडकनाथ कोंबड्यात उपलब्ध असलेल्या एका विशिष्ट वीर्यधातूचे संकलन करून ‘ब्लॅक व्हीगर’ नावाने कामवर्धक पावडरही तयार केली आहे. या संशोधनाचे संदीप यांनी पेटंट देखील मिळवले आहे.

अन्नसुरक्षेच्या मानकांची अंमलबजावणी

संदीप यांची पोल्ट्री व विक्री दालन अशा दोन्ही ठिकाणी अन्न व जैव सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाते. मूलभूत स्वच्छता ठेवली जाते. त्यासाठी अत्याधुनिक ‘किलिंग कोन’ उपकरण, शीतकरण आदी प्रक्रियांचा वापर होतो. ‘फ्रोझन’ पद्धतीच्या पिशवीबंद विक्रीत चिकन कापणीनंतर विशिष्ट तापमानात ब्लास्ट करून ते निर्जंतुक केले जाते. यापूर्वीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाची खबरदारी घेत चिकन विक्री पार पडली.

सामाजिक जाणिवा

केवळ व्यावसायिक न राहता संदीप यांनी आपल्यातला संवेदनशील माणूस जपला आहे. सामाजिक बांधिलकीतून सामाजिक उपक्रमांतही त्यांचा पुढाकार असतो. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत महापूर आलेल्या काळात सेवा बजाविणारे पोलिस, सैनिक यांसह मदतनिसांसाठी ३० हजार कडकनाथ अंड्यांचे वितरण त्यांनी केले होते. तरुणाईला ते व्यावसायिक मार्गदर्शनही करतात. त्यांच्या उद्योजकीय कार्याची दखल घेऊन ‘सकाळ माध्यम समूहा’च्या साम वाहिनीतर्फे ‘ग्लोबल अचिव्हर्स ॲवॉर्ड’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

संशोधन- विकास प्रक्रिया

उत्तर महाराष्ट्रात शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. अनेक शेतकरी चिकनसाठी ब्रॉयलर, तर अंडी उत्पादनासाठी लेयर पक्षी संगोपन करत आहेत. खासगी कंपन्यांकडील पक्षी व सोबतचे व्यवस्थापन तंत्रज्ञान वापरून करार शेतीही केला जात आहे. संदीप यांनी मात्र जाणीवपूर्वक कडकनाथ जातीच्या पक्ष्याची निवड केली. सात वर्षांपासून सातत्याने त्यांची प्रक्रियायुक्त उत्पादनांसंबंधी संशोधन व विकास प्रक्रिया सुरू आहे.

बाजारपेठेत सध्या जंक फूडची चलती आहे. त्यादृष्टीने आपली उत्पादने आजच्या काळात सरस असावीत असा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. ही उत्पादने रोगप्रतिकारक शक्ती सुधारणा, हृदयरोग, क्षयरोग, अस्थमा, उच्च रक्तदाब तसेच लहान मुलांच्या वाढीसाठी उपयुक्त असल्याचे संदीप सांगतात.

कडकनाथ अंडी व चिकन यांचा समावेश मात्र मैद्यासारखे घटक न वापरता धान्ये व कडधान्यांचा वापर करून पिझ्झा व बर्गरला पर्याय देणाऱ्या उत्पादनांवर ते काम करीत आहेत. त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून, या उत्पादनांसह चिकनपासून आरोग्यवर्धक सूपही बाजारात आणण्याचा मानस आहे

उत्पादनांचे ‘मार्केटिंग’

संदीप यांनी kadaknath.com नावाचे संकेतस्थळ बनविले आहे. याशिवाय ‘kadaknath77’ नावाने फेसबुक, यू-ट्यूब, ट्विटर, इन्स्टाग्राम या माध्यमांद्वारे उत्पादनांचा प्रसार केला आहे. सण- उत्सव काळात भेट देण्यासाठी ‘कडकनाथ हेल्दी प्रीमियम गिफ्ट बॉक्स’ संकल्पना सुरू केली. दिवाळी व रमजान काळात त्यांची चांगली विक्री होते. नाशिक येथे स्वतःचे ‘आउटलेट’ आहे. शिवाय मुंबई, बंगळूर, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, गुरगाव आदी शहरांमध्ये फ्रॅंचायसी, अर्थात विक्री काउंटर्स देण्यात आली आहेत.

घरपोच सेवाही आहे. त्यासाठी प्रतिनिधीला गणवेश व बाइकचे डिझाइन देखील आकर्षक अशी व्यावसायिक आखणी केली आहे. ऑनलाइन पद्धतीत विविध आघाडीच्या कंपन्यांसोबत विक्री साखळी जोडली आहे. आखाती देशांपैकी दुबई, कतार, शारजा येथे अंडी व चिकन निर्यात सुरू केली आहे.

येत्या काळात कॅनडामध्ये निर्यात करण्याचे नियोजन आहे. यासह buykadaknath.com या नावाने ई-कॉमर्स संकेतस्थळ बनविले आहे. त्यातून देशातील दक्षिणेकडील व उत्तरेकडील प्रमुख शहरांमध्ये उत्पादनांना मागणी आहे. अंडी व मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीसाठी अपेडा मान्यताप्राप्त प्रमाणीकरणासह सेंद्रिय प्रमाणीकरण देखील घेतले आहे.

बॉलिवूडच्या सेलिब्रिटींना उत्पादनांची भुरळ

बॉलिवूड व मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अजय देवगण, सलमान खान, स्वप्नील जोशी आदींनाही संदीप यांच्या उत्पादनांना भुरळ पडली आहे. ते या उत्पादनांचा नियमित वापर करतात. याशिवाय काही प्रसिद्ध उद्योजकही या उत्पादनांचे ग्राहक असल्याचे संदीप सांगतात.

संदीप सोनवणे, ९८२२०१२९९४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT