Pruthvi Jaggery Business Agrowon
यशोगाथा

Jaggery Production : नैसर्गिक ऊस शेतीतून बनविलेला ‘पृथ्वी ब्रॅण्ड’ गूळ

Natural Sugarcane Farming : अकोला जिल्ह्यात जळगाव नहाटे येथील शरद नहाटे यांनी १३ वर्षांपूर्वी उसाची नैसर्गिक शेती सुरू केली. याच उसापासून नैसर्गिक गूळ तयार करून त्याचा पृथ्वी ब्रॅण्डही त्यांनी सुस्थापित केला आहे.

 गोपाल हागे

Success Story of Pruthvi Jaggery Business : सहकारी कारखानदारी अभावी विदर्भात उसाची शेती फारशी वाढली नाही. साहजिकच ऊस उत्पादकांची संख्याही अत्यंत कमी आहे. परंतु काही ऊस उत्पादकांनी जिद्दीने ही शेती टिकवून मूल्यवर्धनापर्यंत झेप घेतली आहे. अकोला जिल्ह्यात जळगाव नहाटे येथील शरद नहाटे त्यापैकीच आहेत. त्यांची संयुक्त कुटुंबाची ५३ एकर शेती आहे.

नैसर्गिक शेतीचे तंत्र पटले

नहाटे यांच्याकडे १९९० पासून उसाची लागवड केली जायची. सन १९९१ मध्ये त्यांनी गुऱ्हाळघरही थाटले होते. सन २००५ च्या आधी ते रासायनिक पद्धतीने शेती करायचे. त्यानंतर मात्र नैसर्गिक शेतीपद्धती त्यांच्या वाचनात आली. या शेतीबाबत त्यांनी अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली. हे तंत्र पटल्याने सन २००५ पासून या शेती पद्धतीकडे आपला मोर्चा वळवला. आजगायत त्यातसातत्य ठेवले आहे. खरे तर सुरवातीला या पद्धतीसाठी कुटुंबातून विरोध झाला. दोन्ही लहान भावांची याबाबत फारशी इच्छा नव्हती. तीन-चार वर्षे कुटुंबात हे नकारात्मक वातावरण कायम होते. मात्र नहाटे यांनी प्रवाहाविरोधात टाकलेले पाऊल नंतरच्या काळात अनुकरणीय व प्रेरक बनले. आज संपूर्ण कुटुंबाचा या शेतीला पाठिंबा असून, सर्व जण एकत्रित काम करतात.

पीकपद्धती व उसाची शेती

एकूण ५३ एकरांपैकी २८ एकरांत नैसर्गिक पद्धतीने ऊसशेती साकारली आहे. बाकी सोयाबीन, तूर, हरभरा, उसात आंतरपीक म्हणून सात एकरांत हळद अशी पीकपद्धती असते. रब्बीत उसामध्ये काबुली हरभरादेखील करण्यात येतो. विशेष म्हणजे सोयाबीन, तूर, हरभरा, सीताफळ या पिकांतही नैसर्गिक शेतीचेच तंत्र वापरले जाते. पारंपरिक पिकांच्या लागवडीसाठी घरच्याच बियाण्याचा बेण्याचा वापर करतात. मूल्यवर्धनाचा छंद असल्याने हळदीची पावडर, हरभऱ्याची डाळ, काबुली हरभऱ्याचे पॅकिंग करून नहाटे यांनी विक्री व्यवस्था तयार केली आहे. शेतामध्येच जिवामृत, दशपर्णी अर्क, गांडूळ खत तसेच अन्य सेंद्रिय-जैविक निविष्ठा तयार केल्या जातात. गुळासाठी उसाच्या ८०१४, को ८६०३२ व ४१० या जाती ते वापरतात. पैकी पहिली जात कमी पाण्यात येणारी असून, त्यापासूनच्या गुळाची गुणवत्ता चांगली असल्याचे नहाटे सांगतात. उसाचे एकरी ४० टनांपर्यंतउत्पादन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

गुळाची निर्मिती

रसायन अवशेषमुक्त शेती पद्धतीत केलेल्या कामाची फळे आता चाखायला मिळत आहेत. त्यातून उत्पादनाचा दर्जा टिकवणे शक्य झाले आहे. गुऱ्हाळ दररोज दिवसा कार्यरत राहते. गूळ निर्मितीची प्रक्रिया नोव्हेंबर- डिसेंबरला सुरुवात होते. यासाठी ऊसतोड कामगारांची १५ ते १६ जणांची टोळी राहते. गूळ तयार करण्यासाठीही तेवढेच जण काम करतात. व्यवसायातून दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च या काळात ३० जणांना पूर्णवेळ रोजगार मिळतो. एकूण गाळप हंगामात सुमारे ६०० ते ७०० टनांपर्यंत उसाचे गाळप होते. गुळाचा स्वाद, रंग संपूर्णपणे नैसर्गिक आहे. दहा वर्षांपूर्वीच ‘पृथ्वी’ हा ब्रॅण्ड तयार केला आहे. पृथ्वीराज या मोठ्या मुलाचे नावच त्यास दिले आहे. व्यवसायाच्या मोठ्या स्तरावरील उभारणीसाठी २०१८ मध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत २५ लाखांचा निधी कर्जरूपी मिळाला आहे. त्यातून गोदाम, पॅकिंग साहित्य, पायाभूत सुविधांची उभारणी करता आली आहे.

गेल्या १३ वर्षांमध्ये कृषी निविष्ठा घेण्यासाठी कृषी सेवा केंद्रात जाण्याची वेळ आलेली नाही. नैसर्गिक पद्धतीच्या माझ्या गुळाला भरपूर मागणी असून तेवढे उत्पादन करणे शक्य होत नाही. परदेशातही निर्यात करण्याचा विचार आहे. माझ्या मालाचा दर मीच ठरवतो. आणि त्याचा मला अभिमान आहे.
शरद नहाटे ७५८८५०१२०१
उत्पादित केलेल्या मालाचे शेतकऱ्यांनी मूल्यवर्धन केले तर उत्पन्नात निश्‍चित मोठी वाढ होऊ शकते. शरद नहाटे यांनी हे दाखवून दिले आहे. शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून अशा धडपडीसाठी पाठबळ देण्यात येते.
सुशांत शिंदे, तालुका कृषी अधिकारी, अकोट

मिळविलेली बाजारपेठ

बारा नगांचा (ढेप) बॉक्स तयार केला आहे. प्रति ९०० ग्रॅमची ‘एमआरपी’ १६१ रुपये आहे. गूळपावडर व क्यूब्जही मागणीनुसार तयार केले जातात. नहाटे यांनी विदर्भ ही आपल्या गुळासाठी मुख्य बाजारपेठ बनविली आहे. नागपूर, अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा यासह जळगाव, धुळे या जिल्ह्यांतही वितरकांमार्फंत विक्री होते. कर्नाल (हरियाना) व जालंधर (पंजाब) येथेही दोन वितरक त्यांच्याकडून गूळ घेतात. प्रदर्शनांमध्येही स्टॉल मांडून ‘प्रमोशन’ केले जाते. गुळासोबत तूर, हरभरा, उडीद आदींच्याही डाळी तयार करून विक्री होते. ‘मार्केटिंग’साठी पृथ्वीराज व शिवराज ही दोन्ही मुले आता मदतीला आहेत. वर्षाला एकूण ६० ते ७० लाखांपर्यंत उलाढाल करण्यापर्यंत झेप घेतली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT