Jaggery Products : गुळाचे माहेरघर अशी ख्याती असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुऱ्हाळे बंद होत आहेत. मनुष्यबळाचा अभाव व गुळाला नसलेला दर ही त्यामागील कारणे आहेत. या पार्श्वभूमीवर केवळ पारंपरिक गूळ निर्मितीवर अवलंबून न राहता नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करावीत.
त्यातून अधिक किंमत मिळवता येईल व गूळ उद्योगाला ऊर्जितावस्था प्राप्त होईल असा विचार कोल्हापूर येथील शील कोरगावकर यांनी केला. ते जिल्ह्यातील मूळचे दाजीपूर (ता. राधानगरी) येथील आहेत. त्यांची वडिलोपार्जित ३५ एकर शेती आहे. गूळ व धान्य व्यवसायाच्या निमित्ताने हे कुटुंब कोल्हापूर येथे स्थायिक झाले.
नावीन्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती
शील कृषी पदवीधारक आहेत. त्यांचे वडील सदानंद शेतकऱ्यांकडून गूळ घेऊन ५ ते १० किलोचे रवे विकायचे. शील यांनी त्याहीपेक्षा कमी वजनाचे रवे विकण्यास सुरुवात केली. सन २०१८ पर्यंत त्यांनी विविध गुऱ्हाळघरांचा अभ्यास केला. विविध बाजारपेठांमधील गूळ आधारित उत्पादनांचा अभ्यास केला.
सन २०१८ च्या सुमारास स्वतः निर्मितीत उतरण्याचे ठरवले. नावीन्यपूर्ण उत्पादनेच बाजारपेठेत सादर करायची हाच ध्यास ठेवला. सुरुवातीला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. कोको पावडरपासून चॉकलेट करताना कोरोना संकट आले. पण त्यास शील यांनी सकारात्मक घेतले.
या काळात सुंठ, आलेपाकाला चांगली मागणी होती. त्याची पेस्ट बनवूनही गूळ तयार करून पाहिला. अनेक प्रयत्नांनंतर वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन तयार झाले व त्यानुसार पुढील तशी उत्पादने तयार करण्याची दिशा मिळाली. सध्याचे प्रक्रिया युनिट हिरवडे खालसा येथे आहे. कागल औद्योगिक वसाहतीतही गुऱ्हाळे भाडेतत्त्वावर घेतली आहेत.
वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांसह पारंपरिक गुळाची निर्मिती देखील होते. हंगामामध्ये प्रति दिन तीन टन पारंपरिक गूळ, तर मूल्यवर्धित गूळ दोनशे ते अडीचशे किलोपर्यंत तयार केला जातो. हंगाम संपल्यानंतर कोल्ड स्टोअरेजमध्ये साठवून कोल्हापूर येथे लक्ष्मीपुरी, मार्केट यार्ड येथे उत्पादने विक्रीस उपलब्ध केली जातात.
...अशी आहेत आजची नावीन्यपूर्ण उत्पादने
सर्व उत्पादने वडी अर्थात क्यूब्ज स्वरूपात.
फळपल्पवर आधारित- पेरू, सफरचंद, स्ट्रॉबेरी, आंबा या फळांचा पल्प आणि उसाचा रस यांच्या मिश्रणातून क्यूब्ज.
मसाले आधारित- सुंठ, वेलची, दालचिनी आधारित क्यूब्ज
नट्स आधारित- खोबरे, तीळ, शेंगदाणे, फुटाणे आधारित.
चॉकलेट्स- बटरस्कॉच, व्हाइट, कोको पावडर, खजूर आधारित
५ व १५ ग्रॅम वजनी पॅकिंग. ५०० ग्रॅम पेट जारमध्ये पाच ग्रॅम वजनाचे १०० नग बसतात. त्याची एसआरपी २०० रुपये प्रति किलो ठेवली आहे.
न्यूट्रिशील असा ब्रॅण्ड तयार केला आहे. कोल्हापुरी जॅगरोलेट (गुळाचे चॉकलेट) असेही त्याला नाव दिले आहे.
आठ ग्रॅम वजनी मोदक
शील यांनी वर्षभराच्या सणांचा विचार करून तेथेही वेगळ्या प्रकारची काय उत्पादने देता येतील याचा विचार केला. त्यानुसार संक्रातीला लागणाऱ्या तिळाच्या मिश्रणाच्या गूळवड्या तयार केल्या गणेशोत्सवात गुळाचे मोदक सर्वत्र असतात.
मात्र केवळ आठ ग्रॅम वजनी मोदकाची निर्मिती शील यांनी केली. यात आंबा, खोबरे, चॉकलेट असे प्रकार आहेत. २१ मोदकांचे पॅकिंग ते आज १२० रुपयांना विकतात. याचाच अर्थ गुळाची प्रति किलो किंमत काही पटींनी वाढवण्यात ते यशस्वी झाले.
तीन प्रकारची काकवी
काकवीमध्येही तीन प्रकार केले आहेत. यात ७५ ते ८० ब्रिक्स प्रमाण असलेली काकवी असून, तिची साठवण क्षमता तीन वर्षे आहे. ती मधाप्रमाणे आहे. त्याचबरोबर एक वर्षे टिकवणक्षमतेची ७० ब्रिक्सची व एक आठवडा टिकवणक्षमता असलेली ५० ब्रिक्स प्रमाण असलेली काकवी देखील उपलब्ध केली आहे.
सेंद्रिय, आयुर्वेदिक मसालायुक्त गूळ पावडरही आहेच. विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या गुळाची निर्मिती रसायनांचा वापर न करता होते. शील यांना वडील सदानंद, कोल्हापूर येथील छत्रपती शाहू कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. ज्ञानेश्वर पतंगे, अभियंता मित्र कौस्तुभ यादव, प्रशांत पाटील, ऋषिकेश पाटील यांचे सहकार्य मिळाले आहे. कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयाच्या सहकार्याने गुळावर आधारित दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचाही प्रयत्न आहे.
...अशी मिळवली बाजारपेठ
शील यांनी न्यूट्रिशील नावने वेबसाइट तयार केली आहे. त्यात ‘सिनेमॅटिक’ पद्धतीचे व्हिडिओज तयार करून उत्पादनांची जाहिरात केली. यू-ट्यूबद्वारेही गूळ उत्पादनांचे व्हिडिओ प्रस्तुत केले आहेत. एकूण उत्पादनाच्या तीस टक्के गूळ स्थानिक बाजारात, तर ५५ टक्के गुजरातमध्ये विकला जातो.
सध्या पंधरा टक्के गूळ ऑस्ट्रेलिया, दुबई येथे निर्यात केला जात आहे. रायपूर, छत्तीसगड, नागपूर, हुबळीसह मुंबईतूनही उत्पादनांना मागणी आहे. वर्षाला सुमारे तीन कोटी रुपयांची उलाढाल शील यांनीसाध्य केली असली तरी ते तेवढ्यापुरते समाधानी नाहीत. अजून वेगळ्या नावीन्यपूर्ण उत्पादनांच्यानिर्मितीचा शोध त्यांनी सुरू केला आहे.
शील कोरगावकर, ८८३००५४५००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.