Tariff Impact On India : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ ऑगस्ट २०२५ रोजी भारतातून अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर २५ % वाढीव आयात कर लावला. आता भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर एकूण कर ५० टक्के झाला आहे. अमेरिका ज्या देशांबरोबर व्यापार करते त्यापैकी ब्राझील वगळता इतर कोणत्याही देशावर इतका प्रचंड कर अमेरिकेने लावला नाही. चीनमधून अमेरिकेत निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के शुल्क आहे. चीनबाबत अमेरिकेने तुलनेने मवाळ भूमिका घेतली आहे. व्हिएतनाम आणि फिलिपिन्समधून अमेरिका आयात करत असलेल्या वस्तूंवर २० टक्के शुल्क आहे. फक्त भारत आणि ब्राझील या दोनच राष्ट्रांवर अमेरिकेने ५० टक्के शुल्क लावले आहे. औषधे, सेमी कंडक्टर, काही खनिजे यांना यातून सूट असली तरी सुद्धा हे आयात शुल्क जबरदस्त म्हणावे असेच आहे..रशियाने युक्रेन वर युद्ध लादले आहे आणि भारत रशियाकडून तेल विकत घेतो, नुसताच घेत नाही तर इतर देशांना विकतो, म्हणून भारताला शिक्षा करण्यासाठी हा वाढीव कर लावल्याचे ट्रम्प सांगत आहेत. यात तथ्यही आहे. काही खासगी भारतीय तेल कंपन्या (यात रिलायंस सुद्धा आहे) स्वस्त रशियन तेल खरेदी करून ते इतर देशांना विकत आहेत. यात फायदा खूप आहे असे नाही. साधारण प्रति बॅरल २ $ इतका फरक पडतो. पण रशियाचे तेल विकले जाते आहे आणि म्हणून ट्रम्पना हे आवडत नाहीये. रशियन तेल स्वस्तात खरेदी करून भारताच्या नागरिकांचा काहीच फायदा होत नाहीये. फायदा होतोय खासगी कंपन्यांचा. ट्रम्प यांचे हे म्हणणे सुद्धा खरे आहे. अमेरिकन व्यापार कायद्याच्या कलम २३२ (राष्ट्रीय सुरक्षा) आणि कलम ३०१ (अयोग्य व्यापार पद्धती) या कलमांखाली हा कर लागू होत असल्याचे अमेरिकेतर्फे सांगितले गेले आहे. शिवाय भारत, ब्राझील वगैरे देश हे ‘ब्रिक्स’चे सदस्य आहेत. अमेरिकेच्या दृष्टीने ब्रिक्स गट अमेरिकेच्या अधिसत्तेला आव्हान आहे. त्यामुळे ब्रिक्स गटाला कमकुवत करणे हे सुद्धा या वाढीव शुल्काचे उद्दिष्ट आहे..Trump Trade Tariffs : अमेरिकेच्या आयात शुल्कवाढीमुळे कापड, कोळंबी, सोयापेंडला फटका.व्यापारातील असमतोल ःभारत आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणात व्यापार होतो. पण यात असमतोल आहे. अमेरिका भारतीय वस्तूंचा सर्वांत मोठा खरेदीदार आहे. आपल्या निर्यातीचे ते सर्वात मोठे मार्केट आहे. आपल्या एकूण निर्यातीच्या १८ टक्के निर्यात एकट्या अमेरिकेत होते. अमेरिकेच्या दृष्टीने मात्र एकूण अमेरिकन आयातीत भारताचा क्रमांक दहावा लागतो. बाजारपेठ म्हणून भारताची अमेरिकेच्या दृष्टीने फार किंमत नाही..२०२४ मध्ये भारत- अमेरिका व्यापाराचे मूल्य १९०० कोटी डॉलर्स होते. भारतातून ज्या वस्तू अमेरिकेत निर्यात होतात त्यात औषधे (८१ कोटी डॉलर्स), दूरसंचार व्यापाराशी निगडित यंत्रसामग्री (६५ कोटी डॉलर्स) आणि हिरे व मौल्यवान खडे (५३ कोटी डॉलर्स) हे तीन प्रमुख क्षेत्र आहेत. भारत अमेरिकेत जितक्या मूल्याची निर्यात करतो त्यापेक्षा अमेरिकेतून भारतात होणारी आयात कमी आहे. अमेरिकेची भारताबरोबर व्यापार तूट ४५७ कोटी डॉलर्स इतकी आहे. ही तूट भरून काढून भारत- अमेरिका व्यापार संबंध अधिक समतोल करण्याचे प्रयत्न दोन्ही देश करत आहेत. भारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या बर्बन व्हिस्की, मोटारसायकल इत्यादींवर लागू असलेले शुल्क कमी केले आहे.त्यामुळे भारतात या वस्तूंची किंमत कमी होईल, परिणामी मागणी वाढेल आणि अमेरिकेची भारताशी असलेली व्यापार तूट कमी होईल अशी अपेक्षा आहे. आता भारतीय वस्तूंवर कर लावल्यामुळे त्यांची अमेरिकेतील किंमत वाढेल, अमेरिकेत मागणी कमी होईल आणि त्यामुळे अमेरिकेची भारतासोबतची व्यापार तूट अजून कमी होईल अशी ही मांडणी आहे..भारताला मोठा फटका ःया शुल्कामुळे भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या कोणत्या वस्तूंवर प्रभाव पडणार आहे? कापड आणि वस्त्र निर्यात, दागिने आणि जवाहिरे, चर्म वस्तू, विशेषतः बूट, चप्पल वगैरे, ऑरगॅनिक रसायने, कृषी संबंधित निर्यात (उदा. कांदे), दुग्धजन्य वस्तू, लाकडी सामान, कागद, रबरी वस्तू इत्यादींवर याचा परिणाम होणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होऊ शकतो. भारताची अमेरिकेत होणारी निर्यात भारताच्या जीडीपीच्या २.५ टक्के आहे. वाढीव शुल्कामुळे ४० ते ६० कोटी डॉलर्स इतकी घट भारतीय निर्यातीत होईल आणि त्यामुळे जीडीपी वाढ ०.२ ते ०.५ टक्का इतकी घटेल, असा अंदाज आहे. भारतीय जीडीपी वाढ या वर्षी ६.५ टक्क्यांऐवजी ६ टक्के इतकी असेल असे भाकीत आता वर्तविण्यात येत आहे..जीडीपीपेक्षा गंभीर परिणाम रोजगारावर होईल. आपल्याकडे देशांतर्गत रोजगार निर्मिती फार होत नाहीये. परकीय बाजारपेठा रोजगार निर्माण करू शकतात. दुसरीकडे वाढीव आयात शुल्काचा फटका बसणारे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, लाकूड सामान इत्यादी उद्योग रोजगार निर्मितीमध्ये आघाडीवर आहेत. तिथे जादा मनुष्यबळ लागते. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लघू आणि सूक्ष्म उद्योग कार्यरत आहेत. या उद्योगांमध्ये यंत्रसामग्रीचे प्रमाण तुलनेने कमी असते. मनुष्यबळाची मागणी तुलनेने जास्त असते. म्हणून या क्षेत्रांना रोजगार निर्मितीसाठी महत्त्व आहे. तमिळनाडूसारख्या राज्यात तीरुपूर आणि इतर जी वस्त्रोद्योग केंद्रे आहेत त्यांच्या बाबत हे प्रकर्षाने जाणवणार आहे. .Trump India Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचे आयात कर अस्त्र.त्यांच्याकडे येणाऱ्या ऑर्डर्स थांबविल्या जात आहेत किंवा बांगलादेश, कंबोडिया, व्हिएतनाम किंवा पाकिस्तानकडे वळविल्या जात आहेत. आग्रा येथील चर्मोद्योग नुकताच कुठे अमेरिकेत स्थिरावत होता, पण आता या उद्योगाला सुद्धा फटका बसतो आहे. २०२०-२१ पासून २०२४-२५ पर्यंत अमेरिकेची भारतातून होणारी चर्म वस्तूंची निर्यात ६२ टक्के वाढली होती. यापुढे मात्र अमेरिकी मार्केट अधिक आव्हानात्मक होणार आहे. एप्रिलमध्ये पहिली कर वाढ झाल्यापासून सौराष्ट्र (गुजरात) येथे हिरे उद्योगातील एक लाख रोजगार गेले आहेत. तमिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यांतील कपडा, चर्मोद्योग यांना सुद्धा फटका बसणे साहजिक आहे.अर्थातच या सगळ्याचा परिणाम रोजगार निर्मितीवर होणार आहे. रोजगार निर्मिती हे आधीच आपल्या धोरणकर्त्यांपुढचे मोठे आव्हान आहे. नियमित रोजगार आणि तो सुद्धा बऱ्यापैकी वेतन असलेला कसा निर्माण करायचा ही आपल्या पुढची खरी समस्या आहे. या क्षेत्रातील उद्योग मोठ्या प्रमाणात सूक्ष्म आणि लघुउद्योग क्षेत्रांत आहेत. अमेरिकेच्या करवाढीमुळे या क्षेत्रांना फटका बसू शकतो..दोन्ही देशांचे नुकसान ःट्रम्प यांच्या उद्योगामुळे भारताचे नुकसान तर आहेच, पण अमेरिकेतील ग्राहकांचे सुद्धा नुकसान होणार आहे. त्यांना हव्या असणाऱ्या भारतीय वस्तूंवर आता वाढीव कर द्यावा लागणार आहे, त्यामुळे त्या वस्तू अधिक महाग होतील. त्यामुळे खरे तर हे वाढीव शुल्क दोन्ही देशांच्या हिताचे नाही. पण भारताच्या रोजगारावर होणारे परिणाम अमेरिकन ग्राहकांवर होणाऱ्या परिणामांपेक्षा अधिक गंभीर असतील. त्यामुळे यातून चर्चेनेच मार्ग काढावा लागेल. तशी चर्चा सुरू सुद्धा आहे. भारत-अमेरिका संबंध, खास करून पंतप्रधान मोदी आणि त्यांचा ‘फ्रेंड डोलंद’ यांचे संबंध, पार रसातळाला गेलेले आहेत. तरी सुद्धा चर्चा करावीच लागेल. पण अमेरिकेतून भारतात येणाऱ्या शेतीमालावरील आयात शुल्क काढून टाकणे या सारखे ट्रम्प यांना खूष करायचे पर्याय भारताला उपलब्ध नाहीत. .अमेरिकी शेतीमाल भारतात स्वस्त दराने विकला जाऊ लागला तर भारतीय शेतीवर आधीच असलेले संकट अधिक गडद होईल. त्यामुळे चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तरी अमेरिकेव्यतिरिक्त इतर पर्यायी बाजारपेठा शोधणे, भारतीय मालाची स्पर्धात्मकता, दर्जा वाढवणे हेच प्रयत्न भविष्यात करावे लागणार आहेत. वाणिज्य मंत्रालयाने अशी योजना सुद्धा तयार करायला सुरुवात केली आहे. भारत सध्या यूएई, ऑस्ट्रेलिया, जपान, कोरिया आदी देशांबरोबर जो व्यापार करतो, तिथे जास्तीत जास्त संधी मिळवायचा प्रयत्न ते करणार आहेत. युरोपियन युनियनशी सुद्धा चर्चा सुरू आहे. यातून शक्य तेवढ्या लवकर काहीतरी ठोस हातात पडले पाहिजे. पण एकंदरीत परिस्थिती आव्हानात्मक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.