Dairy Processing  Agrowon
यशोगाथा

Dairy Processing Business : शून्यातून विस्तारलेला काळे बंधूंचा प्रक्रिया उद्योग

Processing Industry : शेतकऱ्यांचे ‘नेटवर्क’, दूध संकलन, उत्पादने निर्मिती, विक्री व्यवस्था अशा सर्व स्तरांवर साखळी यंत्रणा- सुविधा व कुटुंबातील सर्वांचे योगदान याद्वारे महिन्याला तीस लाखांच्या उलाढालीपर्यंत यशस्वी टप्पा गाठला आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Milk Processing Industry : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भांबर्डा येथे प्रकाश काळे यांचे कुटुंब राहते. त्यांची सुमारे सहा एकर शेती आहे. त्यांच्या कृष्णा व अर्जुन या दोघा चिरंजीवांनी (काळे बंधू) दूध प्रक्रिया उद्योगात स्वहिमतीने आज आपले नाव तयार केले आहे.

शेतीला जोड म्हणून उद्योग असावा ही कृष्णा यांची पहिल्यापासून इच्छा होती. तर धाकटे बंधू अर्जुन स्पर्धा परीक्षेत रमले होते. त्यांना पोलिस दलात काम करण्याची इच्छा होती. परंतु प्रयत्न करूनही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर फळबागायतीमधून प्रगती करण्याचा प्रयत्न काळे बंधूंनी केला. परंतु कुटुंबाचं अर्थकारण अजून सक्षम होत नव्हतं.

प्रक्रियेचा स्टार्ट अप

सन २०१५ च्या सुमारास महत्त्वाकाक्षी असलेल्या अर्जुन यांनी दुग्धप्रक्रियेचा स्टार्ट अप सुरू केला. त्या वेळी त्यांच्याकडे जनावरे नव्हती. मात्र बाहेरून दूध घेऊन प्रक्रिया करण्याचा हा प्रयत्न होता. परंतु तांत्रिक माहिती व अनुभव यांचा अभाव असल्याने या उद्योगात यश मिळाले नाही. त्यामुळे थोडे थांबून अर्जुन यांनी अन्य उद्योगांमध्ये तीन वर्षे अनुभव घेत उत्पादनांमधील बारकावे व तांत्रिक बाबी शिकून घेतल्या. त्यानंतर २०१८ मध्ये उद्योगात आत्मविश्‍वासाने पाऊल टाकले.

उद्योगची वाटचाल

सन २०१८ मध्ये सुरू केलेल्या आपल्या उद्योगाला काळे बंधूंनी सहा वर्षे पूर्ण केली आहेत. या काळात टप्प्याटप्प्याने अर्जुन डेअरी फार्म या नावाने उद्योगाचा चांगला विस्तार व वृद्धीदेखील केली आहे. सध्या दूध, दही, पनीर व तूप या मुख्य उत्पादनांवर भिस्त आहे. दररोज प्रत्येकी २०० किलो पनीर व दह्याची तर महिन्याला चारशे किलो तुपाची विक्री होते. तूप निर्मितीत तुळशीची थोडी पाने त्यात समाविष्ट केली जातात. त्यामुळे त्याची चव आणि सुगंध चांगला येत असल्याचा अनुभव आहे.

महिन्याला मागणीनुसार सुमारे २०० किलो खवा विकला जातो. पुढील काळात कुल्फी, लस्सी तयार करण्यासह आपल्या उत्पादनाचा ब्रॅण्ड विकसित करण्याचा संकल्प केला आहे. आजमितीला दूध गरम करण्यासाठी ७५० लिटर क्षमतेचे यंत्र, ताशी ५०० व ३०० लिटर क्षमतेचे क्रीम सेपरेटर, खवा यंत्र, ५०० लिटर क्षमतेचे नऊपेक्षा जास्त फ्रीजर्स, दूध संकलनासाठी सुरे ८५ कॅन, पनीर, दह्यासाठी ड्रम, फॅट- एसएनएफ तपासणी यंत्र, पनीर साचे अशी यंत्रसामग्री आहे. ४५ बाय ४० फुटांचे शेड आहे. त्यात दररोज उत्पादने तयार केली जातात.

दूध उपलब्धता व संकलन

जिल्ह्यातील लाडसावंगी येथे ३०० लिटर, शेंद्रा येथे ४०० लिटर, करमाड येथे २०० लिटर, तर भांबर्डा येथे सुमारे ७०० लिटर असे दररोज दूध संकलन केले जाते. पुणे जिल्ह्यातील दौंड नजीकच्या एका फार्ममधूनही एक दिवसाआड सुमारे १५०० लिटर दूध आणले जाते. आपल्या पंचक्रोशीतील सुमारे दीडशे दुग्ध उत्पादकांचे नेटवर्क काळे बंधूंनी उभारले आहे. लाडसावंगी व शेंद्रा येथे नातेसंबंधातील दुग्ध उत्पादकांना संकलन केंद्र सुरू करून देण्यासाठी मदत केली आहे. त्यातून दूध उत्पादनासोबत जोडधंदाही उपलब्ध करून दिला आहे.

संपूर्ण कुटुंबाची साथ

कुटुंबातील प्रत्येक व्यक्‍ती आपापली जबाबदारी सांभाळत असल्यानेच उद्योगाचा विस्तार करणे शक्य झाले आहे. कृष्णा प्रक्रिया निर्मिती सांभाळतात. अर्जुन सर्व ठिकाणचे दूध संकलन, विक्री पाहतात. वडील प्रकाश करमाड येथील ‘आउटलेट’कडे लक्ष देतात. तर कृष्णा यांची पत्नी ललिता व अर्जुन यांची पत्नी दीपाली या देखील उद्योगाच्या अन्य जबाबदाऱ्या चोख पार पाडतात.

आई गंगासागर घरकामांसह सुनांना मदत व शेतीची जबाबदारी सांभाळतात. उद्योगाच्या माध्यमातून तीन व्यक्तींची वर्षभरासाठी तर सुमारे १० जणांची अप्रत्यक्ष रोजगाराची सोय झाली आहे. कृष्णा व अर्जुन यांना प्रत्येकी एक मुलगा एक मुलगी असे अपत्य असून ते शिक्षण घेत आहेत. पूर्ण लक्ष प्रक्रिया उद्योगाकडे देता यावे यासाठी अलीकडे काही शेती मक्‍त्याने दिली आहे.

विक्री व्यवस्था. उलाढाल

करमाड येथे ‘आउटलेट’ आहे. शिवाय छ. संभाजीनगर शहरातील दूध विक्री केंद्र व हॉटेल व्यावसायिक अशा सुमारे ३५ जणांना उत्पादनांचा दररोज पुरवठा होतो. सुमारे आठ वर्षांपासून त्यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध तयार केले आहेत. आज २२०० लिटर क्षमतेचा दूध टॅंकर आहे. शिवाय मालवाहू व चारचाकी वाहने घेतली आहेत.

काही वेळा जालना जिल्ह्यातील तीर्थपुरीसह विदर्भातील वाशीम जिल्ह्यातूनही दूध आणले जाते. स्वतःची वाहने असल्यानेच हे शक्‍य होत असल्याचे कृष्णा सांगतात. सुरुवात दीड लाखांच्या गुंतवणुकीतून झाली होती. आज महिन्याला तीस लाखांच्या उलाढालीपर्यंत मजल मारली आहे.

अर्जुन काळे ९८२२६९४२४०

कृष्णा काळे ८८०६५१८२०७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather Update : राज्यात हलक्या पावसाची शक्यता; तापमानात चढ उतार शक्य

Ajit Pawar : पंतप्रधान मोदींकडे राज्यातील योजनांसाठी मागितला केंद्राचा निधी ः अजित पवार

Maharashtra Election 2024 : महायुती, महाविकास आघाडीला बंडखोरांच्या मतविभाजनाची चिंता

Crop Damage : कोल्हापुरात जोरदार पाऊस; भात, भुईमूग पिकांचे नुकसान

Maharashtra Voting : मतदानापूर्वीच्या ४८ तासांसाठी निर्बंध जारी

SCROLL FOR NEXT