Learning from History: नाना प्रकारचे घोळ आपण इतिहासात घालून ठेवत आहोत. त्यासाठी कधी अपुरे आकलन कारणीभूत ठरते, तर कधी हे सामाजिक दबावामुळे घडते. इतकेच नव्हे तर त्यासाठी कधी आपलाच अहंगंड कारणीभूत ठरतो, तर कधी न्यूनगंड जबाबदार असतो. इतिहासाबाबत रास्त अभिमान बाळगायलाच हवा. पण शेवटी एक बाब लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे- ज्यांच्यात सद्यःस्थितीत इतिहास घडवण्याची किंवा त्यात ठसा उमटवण्याची क्षमता नसते, तेच ओढूनताणून उभ्या केलेल्या इतिहासाचा वृथा अभिमान बाळगतात किंवा या गोष्टींमध्ये नको तितके रमतात. म्हणूनच इतिहास हा त्यात असलेल्या करड्या रंगाच्या छटेसह स्वीकारायला हवा आणि त्यात काही उणिवा राहिल्या असतील तर त्या आपल्या कार्याने होतील तेवढ्या दूर करण्याचे प्रयत्न करायला हवेत....इतिहास हा बरेच काही शिकविणारा आणि रंजक विषय, महाराष्ट्राच्या दृष्टीने तर खूपच रोमांचक. म्हणूनच शाळेतही तो बहुतांश विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय ठरतो. शाळेच्या वयात, गोष्टींमध्ये रमण्याच्या वयात हे ठीक आहे, पण वय वाढते तसे इतिहासाचे अनेक कंगोरे माहीत होतात आणि आपल्या काही धारणा घट्ट होत जातात. इतक्या घट्ट की त्या आपला ताबाच घेतात. बरं, या धारणा वस्तुस्थितीवर आधारित असतातच असे नाही. किंबहुना, बहुतांश वेळा त्या वस्तुस्थितीऐवजी इतर गोष्टींवर आधारित असतात. आपला सांस्कृतिक अवकाश, आपण कोणत्या वातावरणात वाढलो, या विषयाच्या अनुषंगाने आपण कोणाच्या संपर्कात आलो, आपल्या घरात - अवतीभवती काय घडते या घटकांचा त्यावर खूप मोठा प्रभाव पडतो. म्हणून ही बाब वस्तुनिष्ठ न राहता अधिकाधिक भावनिक बनत जाते. प्रत्येकाचा या संदर्भातील भवताल वेगळा असल्याने स्वाभाविकपणे प्रत्येकाच्या धारणा वेगवेगळ्या असतात. म्हणून मग वेगवेगळी मंडळी हाच इतिहास वेगळ्या पद्धतीने मांडतात. या साऱ्याचा परिणाम म्हणून इतिहास हा अनेकदा वादविवादांचा विषय बनून पुढे येतो..Naneghat History: इतिहास घडविणारा भूगोल.सध्या विविध पातळ्यांवरील अस्मिता टोकदार झालेल्या काळात तर या वादांचे रूपांतर हिंसक अशा वादंगातातही होताना पाहायला मिळते. अर्थात, त्यात इतरही बदलांची भर पडली आहे. आता सर्वच समाज शिक्षित होत आहेत. स्वत:च्या इतिहासाबद्दल जागरूकही होत आहेत. त्यामुळे तेसुद्धा त्यांच्या पद्धतीने इतिहासाची मांडणी करू लागले आहेत, घडून गेलेल्या घटनांचा अर्थ लावू लागले आहेत. त्यासोबतच स्वाभिमानाचे भानही वाढत आहे. त्याच्या जोडीलाच जनसामान्यांच्या व्यक्त होण्याच्या माध्यमांमध्ये प्रचंड क्रांती झाली आहे. माहिती-तंत्रज्ञानातील क्रांती झाली आणि सोशल मीडियाचे अनेक प्लॅटफॉर्म उभे राहिले. त्यांनी सर्वांच्याच हाती व्यक्त होण्याचे माध्यम दिले. पूर्वी माध्यमे आणि त्यांचे नियंत्रणही मोजक्या लोकांपुरतेच मर्यादित होते. आजही मुख्य प्रवाह मानल्या जाणाऱ्या माध्यमांची स्थिती बऱ्यापैकी अशीच आहे, पण सोशल मीडियाचे याबाबत गणितच वेगळे असल्याने प्रत्येक व्यक्ती व्यक्त होऊ शकते, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकते. परिणामी, इतिहासाचे अनेक पैलू, कंगोरे पुढे येत आहेत. मग स्वाभाविकपणे मतमतांतरे, मतभेद आणि वादविवाद वाढणारच. तेच आता घडत आहे..हे सारे घडत असताना इतिहासाबद्दल काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. निदान ज्यांना इतिहास गांभीर्याने आणि वस्तुनिष्ठपणे समजून घ्यायचा आहे त्यांना तरी या गोष्टींचे आकलन हवे. अलीकडे एकूणच सर्व गोष्टींकडे काळ्या किंवा पांढऱ्या रंगात पाहिले जाते. हेच इतिहासाच्या बाबतीतही घडत असल्याचे पाहायला मिळते. म्हणूनच इतिहासातील काही गोष्टी, घटना, व्यक्ती चांगल्या आणि काही वाईट अशी स्पष्ट विभागणी केली जाते. पण अशी विभागणी करणे हे इतिहासाच्या मांडणीचे सुलभीकरण ठरते. कारण कोणतीही ऐतिहासिक गोष्ट असो किंवा व्यक्ती असो, त्यात काही चांगल्या - काही वाईट गोष्टींचे मिश्रण असणे स्वाभाविक आहे. कोणतीही परिपूर्ण वाटणारी व्यक्ती शेवटी तिच्या भवतालाच्या अनुषंगाने अनेक निर्णय घेत असते आणि तशी कृतीही करत असते. त्यामुळे त्या सर्व गोष्टी सर्वोत्तम कशा असतील? त्यात काही चुका, त्रुटी, मर्यादा असणे स्वाभाविक आहे. हे समजून घेतले पाहिजे..इतकेच नव्हे तर त्या व्यक्ती किंवा घटना इतिहासाच्या कोणत्या तरी कालखंडात घडलेल्या असतात. त्यामुळे ऐतिहासिक व्यक्तींच्या भूमिका, वागणे यावर एक प्रकारे त्या काळाचा सुद्धा प्रभाव असतोच. तो काळ आणि आताचा काळ यामध्ये बरेच अंतर असते, सर्वच प्रकारची परिस्थिती बदललेली असते, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते. त्यामुळे तेव्हाच्या आणि आताच्या धारणा, चांगल्या-वाईट याबाबतच्या कल्पना यामध्ये मोठी तफावत असते. त्यामुळे एखादी व्यक्ती कितीही आदर्श असली तरी तिने घेतलेले निर्णय त्या काळातील असतात. हे निर्णय वर्तमान काळाच्या कसोटीवर ताडून पाहिले तर त्यात काही खटकणाऱ्या आणि आक्षेपार्ह गोष्टी असणे अपेक्षितच आहे. मग काळाची ही मर्यादा आपण लक्षात घ्यायची की नाही?.Gopalgarh Fort History: अपरिचित मात्र वैभवशाली जलदुर्ग गोपालगड .याच्याही पुढे जाऊन सांगायचे तर चांगले आणि वाईट या गोष्टी बहुतांश वेळा सापेक्ष असतात. तुम्ही एखाद्या घटनेचा कोणत्या संदर्भात विचार करता किंवा ती घटना कोणत्या बाजूने पाहता, त्यावर ती चांगली आहे की वाईट? हे ठरते. त्यामुळे इतिहासातील घटनांची आणि व्यक्तींची वेगवेगळ्या लोकांची मांडणी नक्कीच सापेक्ष असणार. ही बाब स्वीकारल्यावर इतिहासाचे आकलन करणे सोपे जाईल..याचाच अर्थ इतिहासात काळे-पांढरे असे स्पष्ट काही नसते, तर इतिहास नेहमीच या दोन्ही रंगाचे मिश्रण असलेल्या ‘ग्रे’ अर्थात करड्या रंगाचा असतो. आपण सोयीनुसार, आवडणाऱ्या काही ऐतिहासिक व्यक्तींचा काळा रंग पुसून टाकून त्यांना पूर्णपणे पांढऱ्या रंगात रंगवतो, इतकेच नव्हे तर त्यांचे जमेल तेवढे उदात्तीकरण करत असतो. तेवढ्यावरच न थांबता त्यांना दैवतीकरणाकडे नेत असतो आणि त्यांच्या नावावर अतर्क्य असे चमत्कार खपवत असतो. याउलट, काही नावडणाऱ्या किंवा नको असणाऱ्या व्यक्तींची प्रतिमा काळवंडून टाकतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील, कर्तृत्वातील आहे नाही तो पांढरा रंग काढून त्यांना जमेल तेवढा काळाकुट्ट रंग फासतो. इतका की त्या व्यक्तीला कर्तृत्वाने अगदीच किरकोळ करून टाकतो. पण असे करताना हेही भान राहत नाही की असे करण्याने आपण ज्यांना आदर्श म्हणून सादर करत आहोत त्यांचे कर्तृत्वही कमी करत असतो... इतिहासाच्या अनुषंगाने आपण अशा कितीतरी गडबडी करत असतो..इतिहासात होऊन गेलेली प्रत्येक व्यक्ती माणूस म्हणूनच जन्माला आलेली होती. माणूस म्हटले की व्यक्तिमत्त्वात काही उणिवा, मर्यादा, दोष हे असणारच. पण अशाच काही उणिवा, मर्यादा असलेल्या व्यक्तींनी मानवतेसाठी, समाजासाठी, एखाद्या प्रदेशासाठी, तेथील लोकांसाठी कितीतरी मोठे कार्य करून ठेवले आहे. अशा वेळी त्यांचे कर्तृत्व मोजताना त्यांनी केलेले प्रचंड कार्य हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असलेल्या एखाद्या दोषाने कसे झाकोळून जाईल? पण या व्यक्तींना दैवी करण्याच्या प्रयत्नात आपण त्यांच्या प्रचंड कर्तृत्वाचे महत्त्व कमी करत असतो. कारण त्या व्यक्तीला अवतार पुरुष करून टाकले की त्याच्याकडून चुका तरी कशा घडणार? तिला अवतार करण्याने त्या व्यक्तीने सर्वसामान्य परिस्थितीत केलेल्या कर्तृत्वावर आपणच पाणी टाकतो. ती व्यक्ती दैवीच होती, अवतारच होती म्हटल्यावर त्यांनी कितीही कर्तृत्व केले त्यात काय विशेष? अशीच भावना होते. अशा प्रकारे त्या व्यक्तीचे असामान्यत्व नाकारून हा तिच्यावर केलेला अन्यायच नव्हे का?.असे नाना प्रकारचे घोळ आपण इतिहासात घालून ठेवत आहोत. त्यासाठी कधी अपुरे आकलन कारणीभूत ठरते, तर कधी हे सामाजिक दबावामुळे घडते. इतकेच नव्हे तर त्यासाठी कधी आपलाच अहंगंड कारणीभूत ठरतो, तर कधी न्यूनगंड जबाबदार असतो. इतिहासाबाबत रास्त अभिमान बाळगायलाच हवा. पण शेवटी एक बाब लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे- ज्यांच्यात सद्यःस्थितीत इतिहास घडवण्याची किंवा त्यात ठसा उमटवण्याची क्षमता नसते, तेच ओढूनताणून उभ्या केलेल्या इतिहासाचा वृथा अभिमान बाळगतात किंवा या गोष्टींमध्ये नको तितके रमतात. म्हणूनच इतिहास हा त्यात असलेल्या करड्या रंगाच्या छटेसह स्वीकारायला हवा आणि त्यात काही उणिवा राहिल्या असतील तर त्या आपल्या कार्याने होतील तेवढ्या दूर करण्याचे प्रयत्न करायला हवेत... तरच इतिहासातून आपण शिकल्यासारखे होईल.abhighorpade@gmail.com(लेखक वरिष्ठ पत्रकार असून ‘भवताल’ या पर्यावरण विषयक मंचाचे संस्थापक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.