Farmer Success Story : पुणे जिल्ह्यात जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) या दुष्काळी भागात तिघा उमाप बंधूंची मिळून सुमारे ५० एकर शेती आहे. पैकी मोठे बंधू कैलास यांचे निधन झाले असून प्रकाश आणि शरद आता पूर्णवेळ शेती सांभाळतात. पूर्वी हे सर्व माळरान होते. टप्प्याटप्प्याने सिंचन सुविधा निर्माण करीत २० ते ३० एकर शेती त्यांनी ओलीताखाली आणली.
पूर्वी उपलब्ध पाण्यावर ऊस, गहू, ज्वारी, बाजरी अशी पिके व्हायची. आता व्यावसायिक पीक पद्धतीचा अवलंब करून पॉलिहाऊस, केशर आंबा, पाच एकर पपई, कलिंगड या पिकांसह आंतरपीक म्हणून वांगी, मिरची, काकडी अशी विविधता शेतीत ठेवली आहे. अन्य क्षेत्र पडीक असून ते विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत
केसर आंब्याचे सेंद्रिय व्यवस्थापन
सुमारे १० एकर क्षेत्रावर केशर आंब्याची लागवड केली आहे. त्यात २००० मध्ये १२० झाडांची लागवड केली असून, २०२० मध्ये नव्याने अति घन पद्धतीनेही दोन हजार झाडे लावण्यात आली आहेत. काढणी हंगाम संपल्यावर प्रत्येक झाडाच्या आळी खोदून त्यांची मशागत केली जाते. त्यानंतर प्रत्येक झाडाला प्रत्येकी पाच किलो कंपोस्ट खताची मात्रा दिली जाते. बुंध्याला कीटकनाशक दिले जाते.
पावसाळा सुरू झाल्यावर पावसाच्या पाण्यावर ऑक्टोबरपर्यंत शक्यतो खतांचा वापर केला जात नाही. ऑक्टोबरमध्ये मात्र प्रत्येक झाडाला खताची मात्रा दिली जाते. मोठ्या झाडांना (जुनी लागवड) पाटपाण्याने तर लहान झाडांना (अति घन लागवड) ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते.
डिसेंबरमध्ये मोहर लागण्याच्या अवस्थेत जैविक कीडनाशक फवारणी घेतली जाते. याव्यतिरिक्त रासायनिक खते आणि कीडनाशकांचा वापर केला जात नाही. संपूर्णतः कंपोस्ट खत, बेसल डोस आणि एखाद्या जैविक फवारणीवरच आंब्याचे अधिकाधिक सेंद्रिय व दर्जेदार उत्पादन घेतले जाते.
विक्री व्यवस्था
उमाप बंधूंपैकी उमाप सांगतात, की अनेक वर्षांपासून अधिकाधिक नैसर्गिक, सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला व अत्यंत गोड चवीचा, रसाळ आंबा परिसरात लोकप्रिय आहे. त्याचा ग्राहक वर्ग तयार झाला आहे, त्यास दरवर्षी आगाऊ मागणी असते व सर्व विक्री जागेवरूनच होते. पाचशे रुपयांपासून ते ३५० रुपये प्रति किलोपर्यंत त्यास दर मिळतो. दहा मे ते दहा जून या एक महिन्याच्या काळात संपूर्ण आंबा संपून जातो. मागील वर्षी उत्पादन सुरू झालेली बाग व्यापाऱ्यांना सव्वातीन लाख रुपयांना उक्ती पद्धतीने दिली. काही लाख रुपयांचे उत्पन्न ही बाग दरवर्षी देऊन जाते.
अन्य पिकांचे व्यवस्थापन
यंदा चार एकर कलिंगडातून सुमारे ७५ ते ८० टनांचे उत्पादन घेतले. व्यापाऱ्यांना साडेअकरा रुपये प्रति किलो दराने जागेवरच विक्री केली. सुमारे पावणेतीन एकरांत पॉलिहाउस आहे. त्यात रंगीत ढोबळी मिरची व गुलाब आहे. उमाप सांगतात, की काही वर्षांपूर्वी रंगीत ढोबळी मिरचीची आवक बाजारात अत्यंत कमी असताना किलोला चक्क १५० ते २५० रुपये दर मिळवून काही लाख रुपयांचा नफा आम्हाला मिळाला होता.
अलीकडील काळात एकरी ३० टनांपर्यंत उत्पादन, तर किलोला ६० ते ७० रुपये दर मिळतो. याच पॉलिहाउसमध्ये गुलाबही आहे. त्याच्या विविध रंगांचे वाण घेतले आहे. आमच्या परिसरात अनेक गुलाब उत्पादक आहेत. त्यामुळे सर्वांचा गुलाब एकत्रितपणे पुणे बाजारपेठेत पाठवणे शक्य होते. ऊस व त्यानंतर केळीचेही उत्पादन घेण्यात येते. बहुतांश पिकांच्या उत्पादन खरेदीसाठी व्यापारीच जागेवर येतात. विविधता जपल्याने वर्षभर उत्पन्नाचा स्रोत सुरू राहतो. शेतीतील जोखीम कमी होऊन जाते.
कामगारांचे नियोजन
अलीकडील काळात मजूरटंचाईची समस्या तीव्र झाली आहे. उपाम बंधूंनी त्यावर उत्तर शोधले आहे. त्यांनी शेतात काम करणाऱ्या कामगारांना वाट्याने शेती करण्यास दिली आहे. यामध्ये भाजीपाल्याचे उत्पादन अर्ध्या वाट्याने केले जाते. या पद्धतीत सुमारे पाच कुटुंबांची गुजराण होते. त्यामुळे कामगार शेती सोडून जात नाहीत आणि त्यांचे कुटुंब स्थिरावण्यास मदत होते.
कुटुंब रमले शेतीत
एकत्रित कुटुंब पद्धतीत सर्वच सदस्य शेतात राबतात. यात कैलास यांची मुले अविनाश आणि अभिषेक, प्रकाश यांच्या पत्नी कविता, शरद यांच्या पत्नी मोनिका या विविध पिकांची वा कामांची जबाबदारी सांभाळतात. प्रकाश आणि शरद यांची मुले लहान असून शालेय शिक्षण घेत आहेत. महानुभाव पंथी, श्रीकृष्णभक्त व संपूर्ण शाकाहारी असे आमचे कुटुंब आहे. एकमेकांच्या विचारांच्या देवाणघेवाणीतून व समन्वयातूनच शेतीचा विकास व प्रगती करणे शक्य झाल्याचे शरद सांगतात.
कंपोस्ट खताचे नियोजन
जातेगाव परिसरात औद्योगिक क्षेत्र आहे. साहजिकच येथे विविध कंपन्यांचे जाळे आहे. तेथील पालापाचोळा किंवा झाडांचे अवशेष संकलित करण्याचे कंत्राट शरद यांच्या नातेवाइकांकडे आहे. या संपूर्ण पाल्याचा वापर शरद यांनी आपल्या शेतासाठी केला आहे. शेतात खड्डा घेऊन त्यात हा पाला कुजविण्यात येतो. त्यासाठी पुणे कृषी महाविद्यालयातून जिवाणू कल्चर आणले आहे. खड्ड्यालगत असणाऱ्या ओढ्याच्या पाण्याचा ओलावा खतास मिळतो. दरवर्षी साधारण ३०० ट्रक पाल्यातून सुमारे १५० ट्रॅक्टर ट्रॉली खताचे उत्पादन होते. त्यावर संपूर्ण शेतीची गरज भागते. खताच्या मुबलक उपलब्धतेमुळे रासायनिक खतांचा वापर टाळला जातो.
शरद उमाप ८६६८७२५८१६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.