
यशवंत जगदाळे
Women Entrepreneurs: निंबूत (ता. बारामती, जि. पुणे) येथील स्वाती बन्यासाहेब काकडे यांनी पंचक्रोशीतील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन लोणचे, मसाला निर्मिती उद्योगाला सुरुवात केली. यामुळे महिला बचत गटाला कायम स्वरूपी रोजगार मिळाला. प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या कच्या मालाची खरेदी शेतकऱ्यांच्याकडून केली जाते. बाजारात उत्पादने विक्रीस नेण्यासाठी विशेष गाडी तयार केली आहे.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर शेतीला प्रक्रिया व्यवसायाची जोड द्यायला हवी, असा विचार सातत्याने मौजे निंबूत, (ता.बारामती, जि. पुणे) येथील सौ. स्वाती बन्यासाहेब काकडे यांच्या मनात येत होता. याबाबत त्यांची कुटुंबीयांशी चर्चा व्हायची. पाच एकर खंडाने घेतलेल्या शेतीबरोबरीने स्वातीताईंनी मसाला, लोणचे निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. प्रक्रिया उद्योग सुरू करण्यापूर्वी त्यांनी बारामती (जि. पुणे) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित प्रक्रिया उद्योग प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर गावामधील गोकूळ महिला बचत गटातील सदस्यांशी चर्चा करून २७ डिसेंबर २०१९ मध्ये मसाले उद्योगाला सुरुवात केली.
प्रक्रिया उद्योगाविषयी स्वातीताई म्हणाल्या, की मी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित शेती आणि प्रक्रिया उद्योगाबाबत प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला. प्रामुख्याने मी फळे व भाजीपाला प्रक्रिया, लोणचे, मसाले निर्मिती तसेच पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि मार्केटिंग या विषयांचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर डीएसआय संस्था, पुणे तसेच निरा येथील उद्योजकांकडून मसाला निर्मितीबाबत तांत्रिक मार्गदर्शन मिळविले.
प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीसाठी शारदा महिला संघाकडून दोन लाख रुपये कर्ज स्वरूपात मदत मिळाली. पुरेसे आर्थिक भांडवल तयार झाल्यानंतर मी प्रक्रिया उद्योगासाठी मिरची कांडप यंत्राची खरेदी केली. प्रक्रिया उद्योगाचे उद्घाटन अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते झाले. त्यांनी त्याच दिवशी आमच्या प्रक्रिया उद्योगाकडे शंभर किलो मसाल्याची पहिली मागणी नोंदवली.
मसाला,चटणी, लोणचे निर्मितीवर भर
प्रक्रिया उत्पादनांच्या निर्मितीबाबत स्वातीताई म्हणाल्या, की आज अनेक उद्योग लोणची तसेच मसाले निर्मिती करतात. परंतु आम्ही कोणतेही रसायन आणि रंग न वापरता मसाला, लोणचे, चटणी निर्मितीचे नियोजन केले. बाजारपेठेच्या मागणीनुसार पस्तीसपेक्षा अधिक प्रक्रिया उत्पादनांची निर्मितीचे आमचे उद्दिष्ट आहे. यामध्ये प्रामुख्याने तीन प्रकारची लोणची (आंबा, ओली हळद, आवळा),
लिंबू आणि मिरची लोणचे, करवंद लोणचे, पापड, कुरडई, सांडगे, नाचणी बॉबी, शेंगदाणा चिक्की, आले पाक वडी, सुका मेवा, पाच प्रकारच्या शेवया तसेच दहापेक्षा जास्त प्रकारचा काळा, लाल मसाला, विविध प्रकारच्या चटण्यांचा समावेश आहे. मसाला निर्मितीसाठी लागणारे काही घटक पुण्यातील घाऊक बाजारपेठेतून खरेदी केले जातात. तिखट बनविण्यासाठी ब्याडगी मिरची वापरली जाते. कृषी विज्ञान केंद्रातील प्रयोगशाळेत उत्पादनांचे परिक्षण करण्यात येते. प्रक्रिया उत्पादनांच्या निर्मितीसाठी प्रमाणपत्र घेतले आहे.
बाजारपेठेत ‘श्री समर्थ कृपा मसाले’ या ब्रॅण्ड नेम उत्पादनांची विक्री केली जाते. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन मसाल्याचे २५० ग्रॅम पॅक (१८० रुपये), चटणी २५० ग्रॅम पॅक (१०० रुपये), लोणचे ५०० ग्रॅमचा पॅक (२०० रुपये) तयार केला आहे. प्रक्रिया उद्योगात वर्षभर ग्राहकांच्या मागणीनुसार विविध मसाल्यांची निर्मिती केली जाते. वर्षभर कायम स्वरूपी चार महिला काम करतात. हंगामानुसार २५ ते ३० महिलांना आमच्या प्रकल्पात रोजगार उपलब्ध झाला आहे.
कृषी विभागाच्या ‘पीएमएफएमई’ योजनेतून मला प्रक्रिया उद्योगाच्या विस्तारासाठी चार लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. बारामती कृषक, भीमथडी जत्रा तसेच जिजाऊ भवन येथे स्टॉल लावून उत्पादनांची विक्री केली जाते. तसेच गाव परिसरातील विविध आठवडे बाजारांमध्ये गटाची गाडी नेऊन प्रक्रिया उत्पादनांची विक्री केली जाते. सुरुवातीला २०१९ मध्ये भीमथडी जत्रेच्या माध्यमातून उत्पादनांच्या विक्रीला सुरुवात केली. त्या वेळी सुमारे २५,००० रुपये नफा झाला. आज आमच्या प्रक्रिया उद्योगाची वार्षिक उलाढाल सात
लाखांवर पोहोचली आहे. यातून खर्च वजा जाता तीस टक्के नफा शिल्लक राहतो. या प्रक्रिया उद्योगामध्ये स्वातीताईंना पती बन्यासाहेब, सासू शालन, जाऊ सारिका, मानसी यांची चांगली साथ मिळाली आहे. मुलगा रितेश हा मसाला विक्री करणाऱ्या गाडीचे दैनंदिन नियोजन पाहतो.
शेतकऱ्यांकडून खरेदी
प्रक्रिया उद्योगासाठी लागणारा कच्चा माल गावपरिसरातील शेतकऱ्यांच्याकडून खरेदी केला जातो. लोणचे बनविण्यासाठी आंबा कैरी, लिंबू, कारले, माईन मुळा, मिरची, हळद, कांदा, लसूण हे विविध गावातील शेतकऱ्यांच्याकडून खरेदी केली जाते. प्रक्रिया उद्योगाला वर्षभर विविध हंगामात सुमारे शंभर शेतकरी कच्या मालाचा पुरवठा करतात.
उत्पादनांच्या विक्रीसाठी फिरती गाडी
गावशिवारातील आठवडे बाजारात प्रक्रिया उत्पादनांची विक्री सोईची होण्यासाठी स्वातीताईंनी गटाच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी छोटी गाडी खरेदी केली. अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या फूड इनक्युबेशन सेंटरच्या मदतीने गाडीमध्ये प्रक्रिया उत्पादनांची मांडणी आणि विक्री करणे सोईचे जाण्यासाठी आकर्षक रचना करण्यात आली आहे. या गाडीमध्ये एकावेळी सहाशे किलोपर्यंत उत्पादनांची वाहतूक करता येते.
गाडीचा फायदा म्हणजे दररोज विविध गावांमध्ये उत्पादनांची जाहिरात होते, प्रत्येक आठवडे बाजारामध्ये वेळेवर पोहोचता येते. गावामध्ये कोणत्याही ठिकाणी गाडी उभीकरून उत्पादनांची विक्री करणे शक्य होते. या गाडीमध्ये गोकूळ महिला बचत गटाच्या उत्पादनाबरोबरीने गाव परिसरातील बारा महिला बचत गटांची विविध उत्पादने विक्रीस ठेवली जातात. यामुळे या बचत गटांना देखील आर्थिक फायदा होत आहे.
महिला बचत गटातून प्रगती
गोकूळ महिला बचत गटामध्ये वीस महिला कार्यरत आहेत. स्वातीताई बचत गटाच्या अध्यक्षा आहेत. गटाच्या उपक्रमाबाबत त्या म्हणाल्या की, आम्ही २०१७ मध्ये महिला बचत गट स्थापन केला. गटामध्ये सुनिता काकडे उपाध्यक्ष आणि राजश्री काकडे सचिव म्हणून कार्यरत आहेत. बचत गटातर्फे प्रक्रिया उद्योगाच्या बरोबरीने दरवर्षी महिलांसाठी आरोग्य शिबिर, रक्तगट तपासणी शिबिर राबवले जाते. दरवर्षी दिंडीतील वारकऱ्यांना बारामती येथे जेवणाची सुविधा उपलब्धकरून दिली जाते.
गाव परिसरातील बारा महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी आम्ही मदत करतो. येत्या काळात बचत गटाच्या माध्यमातून भरडधान्यावर आधारित प्रक्रिया उत्पादनांच्या निर्मितीचे नियोजन आहे. स्वाती काकडे यांची २०२१ मध्ये कृषी विज्ञान केंद्रातर्फे फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगातील ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी चौदापेक्षा जास्त प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. प्रशिक्षण कार्यक्रमातून पाचशेहून जास्त महिलांना प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण दिले आहे. स्वाती काकडे, ९३७००७५९९१ यशवंत जगदाळे, ९६२३३८४२८७ (विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, जि. पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.