Rose Farming: लग्नसराईत गुलाबाच्या ग्रेडिंग, पॅकेजिंगवर भर

Rose Farming Management: लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर गुलाब फुलांची मागणी झपाट्याने वाढत आहे. दिलीप काळे यांनी नियोजनबद्ध शेतीतून ग्रेडिंग आणि पॅकेजिंगवर भर देऊन अधिक नफा मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
Flower Farming
Flower FarmingAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success:

शेतकरी नियोजन । पीक ः गुलाब

शेतकरी : दिलीप गोपाळ काळे

गाव : पवनानगर, ता. मावळ, जि. पुणे

गुलाब लागवड : तीन एकर

पुणे जिल्ह्यातील पवनानगर (ता. मावळ) येथील दिलीप काळे यांनी तीन एकरांत पॉलिहाउसमध्ये गुलाब लागवड केली आहे. यावर्षी ‘व्हॅलेंटाइन’ काळात गुलाब फुलांना बाजारात चांगली मागणी होती. या काळात दर्जेदार गुलाब फुलांची काढणी करून विक्री करण्यात आली. त्यासाठी महिनाभर आधीपासून कामकाजाचे नियोजन करण्यात आले होते. आगामी काळात लग्न सराईत चांगले दर मिळण्यासाठी दैनंदिन नियोजनानुसार ग्रेडिंग, पॅकेजिंगवर भर देण्यात येणार आहे.

दिलीप काळे यांची सात एकर शेती आहे. त्यापैकी तीन एकर गुलाब लागवड आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये गहू, ऊस या पिकांची लागवड केली आहे. त्यांनी २०१५ पासून गुलाब शेती करण्यास सुरुवात केली. त्यावेळी वीस गुंठे क्षेत्रावर गुलाब लागवड होती. कालांतराने क्षेत्रात वाढ करत गेले. सध्या त्यांच्याकडे तीन एकरांवर पॉलिहाऊस आहेत. यामध्ये बाजारात चांगली मागणी असलेल्या गुलाबाची लागवड करण्यावर भर दिला आहे. बाजारपेठेत कोणत्या रंगाच्या गुलाबांना सर्वाधिक मागणी आणि दर आहेत, याचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी टॉप सिक्रेट या गुलाब फुलांना मागणी जास्त असून दरही चांगले असल्याचे लक्षात आले. त्यानंतर या गुलाबाची पॉलिहाऊसमध्ये जास्त लागवड करण्यात आली.

Flower Farming
Rose Farming : गुलाब शेतीने बहरले शेतकऱ्यांचे अर्थकारण

झिगझॅग लागवड

सुरुवातीच्या काळात २०१५-१६ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर पॉलिहाउसमध्ये गुलाब रोपांची लागवड करण्यात आली. लागवड करण्यापूर्वी पॉलिहाउसमधील लागवडीपासून ते काढणीपर्यंत आवश्यक सर्व माहिती घेतली. पहिल्याच वर्षी चांगल्या प्रतीच्या गुलाब फुलांचे उत्पादन मिळाले. उत्पादित फुलांची पुणे आणि मुंबई येथील मार्केटमध्ये विक्री केली. फुलांच्या विक्रीतून बऱ्यापैकी चांगले उत्पन्न हाती आले. चांगले उत्पन्न मिळत असल्याने सर्व शेती गुलाब लागवड करून पॉलिहाउसखाली आणण्याचे नियोजन केले. हळूहळू पॉलिहाउसच्या क्षेत्रात वाढ करण्यात आली.

सुरुवातीची पॉलिहाउसमधील गुलाब लागवड ही बेडवर सलग पद्धतीने लागवड केली होती. त्यामुळे फुलांची प्रत अपेक्षित मिळत नव्हती. तसेच रोग, किडींचा प्रादुर्भाव देखील जास्त होता. त्यामुळे आता नवीन पॉलिहाउसमध्ये झिगझॅग पद्धतीने गुलाब लागवड करण्यावर भर देण्यात आला. सध्या तीन एकरांवर झिगझॅग पद्धतीने गुलाब लागवड केलेली पॉलिहाउसची उभी आहेत.

विविध रंगी लागवड

सध्या पॉलिहाउसमध्ये सहा प्रकाराच्या गुलाब फुलांची लागवड आहे. त्यात लाल (टॉप सिक्रेट), पर्पल, पिवळा, पिंक, लाइट पिंक, पांढऱ्या रंगासह स्वीट पिंक अशा विविध रंगाच्या गुलाब फुलांची विविधता आहे.

सिंचनाचे काटेकोर व्यवस्थापन

पॉलिहाउसमधील सर्व गुलाब लागवडीमध्ये ठिबकने सिंचन करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे पाणी बचत होण्यास मोठी मदत झाली असून पाणी टंचाईच्या काळात फुलांचे उत्पादन घेण्या शक्य झाले आहे. दिवसातून एक वेळ ठिबकद्वारे पाणी सोडले जाते. सिंचनाचे काटेकोर नियोजन केल्यामुळे फुलांची प्रत व झाडे चांगले राहण्यास मदत झाली असल्याचे दिलीप काळे सांगतात.

ग्रेडिंग, पॅकिंगवर भर

हंगामात फुलांची काढणी केल्यानंतर ग्रेडिंग, पॅकिंगवर भर दिला जातो. ग्रेडिंगवेळी ए ग्रेड, बी ग्रेड यानुसार प्रतवारी केली जाते. पॅकिंग करताना निर्यातीच्या फुलांची एक गड्डी १० फुलांची असते. तर स्थानिक मार्केटमध्ये विक्रीसाठी २० फुलांची एक गड्डी केली जाते. काढणीनंतर ग्रेडिंग, पॅकिंगवर भर दिल्यामुळे मार्केटमध्ये चांगले दर मिळण्यास मदत होते. दरवर्षी गुलाब शेतीतून चांगली आर्थिक उलाढाल होत आहे. त्यामुळे हळूहळू गुलाब शेतीला अधिक प्राधान्य देण्यावर भर दिला जात आहे.

Flower Farming
Rose Farming : अन्नद्रव्य व्यवस्थापनासह पीक संरक्षणावर भर

कोल्ड स्टोअरेजची उभारणी

दरवर्षी ‘व्हॅलेंटाइन’च्या काळात गुलाब फुलांची निर्यात करण्याच्या अनुषंगाने काही महिने अगोदर तयारी सुरू केली जाते. योग्य नियोजनातून दर्जेदार अधिकाधिक फुलांचे उत्पादन कसे मिळेल, यासाठी प्रयत्न केले जातात. दरवर्षी साधारणपणे २५ जानेवारी ते १० फेब्रुवारी या काळात गुलाबाची बाहेरच्या देशांमध्ये निर्यात केली जाते. निर्यातीसाठी काढलेले गुलाब खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी कोल्ड स्टोअरेजची उभारणी केली आहे. सध्या प्रीकूलिंग आणि कूलिंग असे दोन कोल्ड स्टोअरेज आहेत.

या दोन्ही कोल्ड स्टोअरेजची फुले ठेवण्याची क्षमता सुमारे दीड ते दोन लाख इतकी आहे. या कोल्ड स्टोअरेजचा फायदा हंगामात कायम होतो. शिवाय बाजारात दर कमी असताना किमान २ ते ३ दिवस फुले कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवली जातात. त्यानंतर दर वाढल्यावर पुन्हा बाहेर काढून बाजारात विक्रीसाठी पाठविली जातात. त्यामुळे दरांच्या तफावतीमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळणे शक्य झाले असल्याचे दिलीप काळे सांगतात.

खर्चाच्या दैनंदिन नोंदी

गुलाबाचे क्षेत्र वाढले असल्याने मालाची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून उत्पादित गुलाब एकाच ठिकाणी आणून त्यांचे ग्रेडिंग, पॅकिंग करून एकाच ठिकाणाहून विक्री करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत झाली आहे. ग्रेंडिंग, पॅकिंगसाठी किती फुले पाठविली, त्यांच्या नोंदी ठेवल्या जातात. तसेच किती फुलांची विक्री झाली, कोणत्या व्यापाऱ्याकडून किती मागणी आहे, दैनंदिन खर्च, एकूण खर्च, मजुरांवरील खर्च, एकूण नफा आदी सर्व तपशिलाची नोंदवहीमध्ये नोंद केली जाते. त्यामुळे आर्थिक नियोजन करणे सोयीचे होते. शिवाय व्यवसायातून आलेला पैसे आणि खर्च यांचा ताळमेळ बसतो, असे श्री. काळे सांगतात.

मागील कामकाज

व्हॅलेंटाइनसाठी दर्जेदार फुले उपलब्ध होण्यासाठी महिनाभर आधीपासून नियोजन करण्यात आले. दररोज नियोजित वेळेत खत, पाणी देणे, झाडांवर पाणी मारणे, क्लिप करणे, तण काढणे, वाळलेल्या फांद्यांची छाटणी, पिवळी पाने बाहेर काढणे आदी कामांवर भर देण्यात आला. या सहपॉलिहाउस स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात आला.

 निर्यातीच्या अनुषंगाने २९ जानेवारीपासून गुलाब काढून साठवणूक करण्याचे नियोजन केले. या फुलांची ए ग्रेड, बी ग्रेड यानुसार प्रतवारी केली. प्रतवारी प्रमाणीकरण करून विक्रीचे नियोजन करणे सोयीचे होते, असे दिलीप काळे सांगतात.

आगामी नियोजन

येत्या काळात लग्नसराईच्या हंगामास सुरुवात होईल. त्या अनुषंगाने पूर्वतयारी सुरू केली आहे. कटिंग, वेडिंग, क्लिपिंग, योग्यरीत्या मशागत अशी विविध कामे केली जाणार आहेत. लग्न सराईत चांगला दर मिळण्यासाठी फुलाच्या प्रतवारीवर विशेष भर देण्यात येईल.

तापमानात चांगलीच वाढ होत चालली आहे. त्यामुळे गुलाब लागवडीत सिंचनाचे योग्य नियोजन केले जाईल. ओलावा कायम राखण्यावर भर दिला जाईल.

दर फुलांचा आकार मोठा राहण्यासाठी सेंद्रिय खते व संजीवकांचा वापर करण्यात येईल.

निर्यातीसह देशांतर्गत विक्री

हंगामात गुलाब फुलांना देशभरातून चांगली मागणी असते. त्यासाठी बाजारपेठेचा अंदाज घेऊन विक्रीचे नियोजन केले जाते. देशांतर्गत दिल्ली, सुरत, अहमदाबाद, वाराणसी, बडोदा, गुवाहाटी, राजकोट, जम्मू, हैदराबाद, पटना यासह पुणे, मुंबई येथे देखील फुले विक्रीसाठी पाठविली जातात.

देशांतर्गत विक्रीसह परदेशातही फुलांची निर्यात केली जाते. निर्यातीमधून प्रति फुल सरासरी १७ ते १८ रुपये दर मिळतो. तर स्थानिक मार्केटमध्ये सरासरी ६ ते ७ रुपये इतका दर मिळतो. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या काळात फुलांची मागणी चांगली असते, शिवाय दरही चांगले मिळतात.

दिलीप काळे ८२३७५८७६७९

(शब्दांकन : संदीप नवले)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com