
Maharashtra Women Entrepreneurs : मेहनत, जिद्द आणि कुटुंबासाठी समर्पणाच्या भावनेतून पान्हेरा या छोट्याशा खेड्यातील महिलेने अनन्यसाधारण अशी कर्तबगारी बजावली आहे. पतीच्या आजारपणामध्ये शेतीच नव्हे तर अगदी घरही विकावे लागले. हाताशी राहिलेल्या १२ गुंठे क्षेत्रातून मुलांचे संगोपनापासून लग्नाची कर्तव्ये बजावणाऱ्या महिलेचे नाव आहे, सुमन तुकाराम चौधरी.
आज वयाच्या साठीमध्ये असलेल्या सुमनताईंना ३० वर्षांपूर्वी पतिच्या आजारपणामध्ये वडिलोपार्जित तीन एकर शेती आणि घरही विकावे लागले होते. त्या वेळी भविष्याचा फारसा विचार न करता केवळ पतीला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आणण्याचाच त्यांचा विचार होता. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या केवळ १२ गुंठे शेतीमध्ये भाजीपाला उत्पादन घेत आपल्या कुटुंबाला त्यांनी सावरले.
संघर्षाला ‘थांबा’ नाही
पतीच्या उपचारावेळी शेती व घरदार गेल्यानंतरच आयुष्याची खरी परीक्षा सुरू झाली. अशा परिस्थितीत हिंमत न हारता सुमन यांनी गावाबाहेर एका मोकळ्या जागेत छोटेसे झोपडे उभारले. छोट्या असलेल्या तीन अपत्यांचा सांभाळ करावा लागत होता. दुसरीकडे पतीला अवजड काम करता येत नव्हते.
त्यामुळे सर्वभार एकट्या सुमनबाईंवर आला. त्यात शिल्लक १२ गुंठ्यांत आपले कसे भागणार? मग त्यांनी न लाजता मोलमजुरी सुरू केली. दिवसभर कामाला गेल्या तरच संध्याकाळी चूल पेटायची, असे सुमनबाईंनी बोलताना सांगितले. त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी पाइपलाइन खोदण्याची खडतर कामेही केली. पत्रावळीचा व्यवसाय केला. पण जिद्द सोडली नाही.
महिलादिनी होणार सन्मान...
गावातील सोनू कुळे यांच्या शेतातच अनेक वर्षे नियमित मोलमजुरी करणाऱ्या सुमनबाईंच्या संघर्ष व प्रेरणादायी प्रवासाचे तेच मोठे साक्षीदार आहेत. सोनू कुळे यांची एक सामाजिक संस्था असून, त्यामार्फत आज शनिवारी (ता. ८) या सुमनबाईंचा सन्मान करण्यात येणार आहे.
परिस्थितीला आणले शरण
रोजीरोटीतून कधीमधी पोटाला चिमटा काढत थोडेथोडे पैसे साठवत एक बकरी विकत घेतली. बकरी पालनातून थोडा हातभार लागू लागला. हळूहळू एकाचे दोन असे वाढवत बकरीपालनात जम बसवला. त्यातून थोडी जागा विकत घेतली. यात दहाएक वर्षे गेली. त्यानंतर त्यांनी १२ गुंठे शेतीत भाजीपाला पिकविण्यास सुरुवात केली. गेल्या २० वर्षांपासून योग्य नियोजन करून वर्षभर वांगे, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, मेथी, पालक, फुलकोबी अशी भाजीपाला पिके घेतात. त्याची विक्री गावातच करतात.
त्यातून या दांपत्याला चांगली आर्थिक स्थिरता मिळाली. आता वर्षाला ४ ते ५ लाख रुपये उत्पन्न मिळवत असल्याचे सुमनबाई स्वाभिमानाने सांगतात. त्यातूनच दोन मुली व एका मुलाचे लग्नाचे कर्तव्यही पार पाडले. मुलगा प्रमोद याला गावातच दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे दुकान सुरू करून दिले. २० वर्षे भाजीपाला डोक्यावर आणणाऱ्या सुमनताईंनी दररोज १०० रुपये बचत करीत ६० हजार रुपये खर्चून दुचाकी घेतली. त्याचा वापर भाजीपाला व्यवसायासाठी करतात. आता मुलगाही मदतीला आला असून, सुमनबाई प्रशस्त घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे लागल्या आहेत.
सुमन चौधरी ९०२२९६४७९३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.