Food Processing  Agrowon
यशोगाथा

Food Processing : नैसर्गिक शेती, गूळ, खाद्यतेले अन् पीठ निर्मितीही

Organic Jaggery Production : सेंद्रिय गूळनिर्मिती, लाकडी घाण्यावर आधारित विविध खाद्यतेले, दगडी जात्यावर आधारित खपली गहू, ज्वारी, बाजरी यांची पिठे तयार केली आहेत.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Rural Food Processing Business : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याने कायमच दुष्काळाचे चटके सोसले आहेत. प्रतिकूलतेतही इथल्या शेतकऱ्यांनी डाळिंब, द्राक्षाच्या बागा फुलवत निर्यातही साधली आहेत. सातारा आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर याच आटपाडी तालुक्यातील शेवटचे गाव म्हणजे दिघंची. मोठी बाजारपेठ येथे आहे.

पूर्वी भुईमूग, कापसासाठी गाव प्रसिद्ध होते. परंतु काळाच्या ओघात ही पिके कालबाह्य झाली. याच गावातील केशवराव औदुंबर मिसाळ यांच्या घरची परिस्थिती पूर्वी बेताचीच होती. शिक्षण बारावीपर्यंत पूर्ण केलं. शेती पाच एकर. दुष्काळाशी दोन हात करत १९८० पासून हे कुटुंब डाळिंब, कापूस अशी पिके यशस्वी घेत होते.

पुढे तेलकट रोग, पाणीटंचाई आदी समस्यांमुळे दोन्ही पिके टिकवणे अशक्य झाले. उमराण बोरांनीही मध्यंतरी वैभव मिळवून दिले. परंतु कोणत्याही संकटात जिद्द, हिंमत, चिकाटीच्या जोरावर आपण शेतीतून प्रगती करू शकतो हा आत्मविश्‍वास मिळाला.

नैसर्गिक शेतीची धरली कास

सन २००७ च्या दरम्यान केशवरावांवर स्वदेशी चळवळीचा मोठा प्रभाव पडला. त्याविषयीच्या व्याख्यानांमधून नैसर्गिक शेतीची दिशा मिळाली. अंकलखोप येथील सुहास पाटील, निमशिरगावचे नीतेश ओझा आदी सेंद्रिय उत्पादकांकडून अधिक मार्गदर्शन झाले.

दोन खिलार गाईंवर आधारित शेण व गोमूत्राचा वापर शेतीत होऊ लागला. परिसरातच शेतीमाल विक्री सुरू झाली. मात्र उत्पन्नस्रोत वाढवण्यासाठी केवळ शेतीवर अवलंबून न राहता प्रक्रिया उद्योगाकडे वळणे केशवरावांना गरजेचे वाटू लागले. सेंद्रिय गुळाला अधिक मागणी असल्याचे अभ्यासातून समजले.

सेंद्रिय गूळ निर्मिती

जुन्या मार्गदर्शकांसह तळबीड (ता. कऱ्हाड) येथील सुधीर चिवटे यांच्याकडून दर्जेदार गूळ निर्मितीचे धडे घेतले. घरची नैसर्गिक ऊस शेती (को ८६०३२ वाण) होतीच. त्याआधारे गावापासून चार किलोमीटरवरील एका गुऱ्हाळघरी स्वदेखरेखीखाली शंभर टक्के सेंद्रिय गूळ तयार करून घेण्यास सुरुवात केली. सध्या हंगामात चार ते पाच टनांपर्यंत उत्पादन होते. यंदा १५० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. पाचशे लिटरपर्यंत काकवी तयार केली जाते.

खाद्यतेल निर्मितीचाही व्यवसाय

स्वदेशी चळवळीचा मोठा पगडा असल्याने लाकडी घाण्यावर आधारित खाद्यतेले, त्यांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व यावर केशवरावांचे विचारमंथन सुरू होते. त्यातूनच २०१४ मध्ये या व्यवसायात उतरण्याचे ठरवले. अधिक चौकशीतून परभणी येथे जाऊन लाकडी घाण्यावरील तेलनिर्मिती पाहिली. तेथून घाणा आणला.

मात्र त्यापूर्वी संबंधित घाणामालकांनी एक मनुष्य प्रशिक्षणासाठी पाठवा अशी सूचना केली. आठ दिवसांच्या या प्रशिक्षणात प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणी शिकून घेतल्या. त्यानंतर २०१७ व ०२१८ कोइमतूर येथून दोन सुधारित लाकडी घाणे आणले. आता एकूण चार घाणे आहेत. महिन्याला शेंगतेल ३०० लिटर, करडई तेल १५० ते २०० लिटर तर सूर्यफूल तेलाचे १०० लिटर उत्पादन घेतले जाते.

एक, पाच लिटर असे आकर्षक पॅकिंग केले जाते. पेंडीची प्रति ४० रुपये दराने परिसरात विक्री होते. पेंडीतून मिळणारी रक्कम तेलबियांच्या खरेदीसाठी वापरला जातो. शेतकऱ्यांनाही त्याच्या मालापासून प्रति किलो २५ रुपये दराने तेल काढून देण्यात येते. सूर्यफुलाची परिसरातून तर करडई सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथून खरेदी केली जाते. प्रकल्प उभारणीसाठी १३ लाख रुपये खर्च आला आहे.

आत्मा विभागाची मिळाली साथ

तालुका कृषी अधिकारी मारुती कौलगे, आटपाडी तालुका आत्मा विभागाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रशांत पाटील, कृषी अधिकारी गोरख जरे यांचे मार्गदर्शन केशवराव व गावातील शेतकऱ्यांना मिळते. त्यातून परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत माणभूमी पुत्र स्वदेशी व स्वावलंबी सेंद्रिय शेतकरी गटाची २०१६ मध्ये स्थापना झाली आहे.

केशवरावांचे वडील औदुंबर हे या गटाचे अध्यक्ष आहेत. गटातील शेतकऱ्यांनी ५० एकरांत भुईमूग पेरणी केली आहे. केशवरावांनी त्यांच्याकडून बाजारभावापेक्षा पाच रुपये अधिक दराने भुईमुगाची खरेदी केली आहे.

विक्री, मार्केटिंग, अर्थकारण

नैसर्गिक भाजीपाला, गूळ, खाद्यतेले यांच्या पाठोपाठ आता दगडी जात्यावर आधारित खपली गहू, ज्वारी, बाजरी यांच्या पिठांचीही विक्री सुरू केली आहे. जात्यावर जो खुंटा असतो त्याजागी इलेक्र्टिक मोटर लावून मजुरीचे श्रम कमी केले आहेत. महिन्याला एकूण ५० किलो पीठविक्री होते.

खपली गव्हाच्या पिठाला प्रति किलो १०० रुपये, तर ज्वारी, बाजरीच्या पिठाला प्रति किलो ८० रुपये दर मिळतो. ‘माउथ पब्लिसिटी’ द्वारे केशवराव यांच्या सर्व उत्पादनांचा प्रसार झाला आहे. सोशल मीडियाचाही उपयोग झाला आहे. माउथ टू माउथ अशीही जाहिरात सुरू केली. आटपाडीसह मुंबई, पुणे, नाशिकपर्यंत त्यांनी आपले ग्राहक तयार केले आहेत.

माणदेश ग्रामोद्योग या आपल्या संस्थांतर्गत गौ ग्राम (लाकडी घाणा) हा ब्रँड तयार केला आहे. अन्न सुरक्षिततेविषयीच्या एफएसएसएआय संस्थेचा परवानाही घेतला आहे. वर्षभरात एकूण सर्व उत्पादनांच्या माध्यमातून सुमारे १५ ते २० टक्के नफा होतो. केशवरावांना वडील औदुंबर व पत्नी तनुजा यांचीही शेती व प्रक्रिया उद्योगात मोठी साथ मिळते.

ठरावीक जिन्नस तेवढेच मी बाहेरून खरेदी करतो. बाकी बहुतांश उत्पादन माझ्या शेतात पिकवून स्वयंपूर्ण जीवन जगतो आहे. शेतकऱ्यांना माझे सांगणे आहे की पीक उत्पादनासह विक्री कौशल्यही त्यांनी आत्मसात करावे. त्यातून होणाऱ्या मूल्यवर्धनातून अधिक उत्पन्न त्यांच्या पदरी पडू शकेल. जो अनुभव मी घेतला आहे.
केशवराव मिसाळ ७७२००३७५५५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Installment Date : पीएम किसानच्या हप्त्याची प्रतिक्षा कायम; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Agrowon Podcast: उडदाचे भाव दबावातच; बाजरीचे दर स्थिर, कोबी- मेथीचा भाव टिकून, फ्लाॅवर दर तेजीत

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार

APMC SIT Investigation: नागपूर बाजार समितीच्या चौकशीसाठी एसआयटी

Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस पिकाची वाढ जोमात

SCROLL FOR NEXT