
Homemade Business Success Story: मंजूषा कोटगिरे यांना पहिल्यापासूनच स्वतःचा प्रक्रिया उद्योग उभारण्याची जिद्द होती. त्या भूगोल विषयातील पदवीधर आहेत. सातारा येथील राहुल कोटगिरे यांच्याशी त्यांचा २००२ मध्ये विवाह झाला. पण दुर्दैवाने २००९ मध्ये एका अपघातात पतीचे निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मंजूषाताईंना आई वंदना संत आणि भाऊ अनुप यांनी मोठा आधार दिला. त्या वेळी त्या साताऱ्याहून लहान मुलगा आर्यनसह सोलापुरात परतल्या. पूर्वीपासूनच जिद्दी आणि धडपडी असणाऱ्या मंजूषाताईंना वास्तवाचे भान होते,
त्यातून त्या सावरत प्रतिकूल परिस्थितीला मोठ्या धैर्याने तोंड देत, स्वतःच्या आणि मुलाच्या आयुष्याचा विचार करून स्वतःचा प्रक्रिया व्यवसाय करण्याचा विचार केला. यासाठी आई आणि भावाने चांगले सहकार्य केले. प्रक्रिया उद्योगासाठी त्यांनी बाजारपेठेचा अभ्यास केला. त्यातून प्रक्रिया पदार्थ निर्मितीचे त्यांनी प्रयोग केले. काही वेळा अपयश आले, पण त्या खचल्या नाहीत, प्रत्येक परिस्थितीवर मात करत त्यांनी प्रक्रिया उद्योगाच्या दिशेने प्रवास सुरूच ठेवला.
मंजूषाताईंनी २०१९ मध्ये खऱ्या अर्थाने प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली. कच्च्या मालाची उपलब्धता आणि बाजारपेठेतील मागणीचा विचार करून त्यांनी पहिल्या टप्प्यात ज्वारी लाडू, चकल्या निर्मितीला सुरुवात केली. यू-ट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यादा प्रक्रिया निर्मितीची माहिती घेतली. उत्पादने तयार करण्यापासून ते बाजारपेठेत फिरून उत्पादने विकण्यापर्यंत त्यांनी सर्व काम केले. पण पुढे दोन वर्षांतच काही अडचणीमुळे त्यांना थांबावे लागले. त्या वेळी काही कडू-गोड अनुभव त्यांच्या गाठीशी आले, त्यातून त्यांनी शिकत पुन्हा नव्या उत्पादनांच्या निर्मितीची तयारी सुरू केली.
उत्पादनांची निर्मिती
पहिल्या प्रक्रिया उद्योगातील अडथळ्यावर मात करून २०२४ मध्ये त्यांनी पुन्हा नव्याने प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणारी माहिती, अभ्यास केला. सध्या ग्राहकांना झटपट, कमी वेळेत तयार होणारे खाद्य पदार्थ पसंतीस पडतात, हे हेरून त्यांनी स्नॅक्ससह कोल्ड्रिंक आणि मिल्कशेकच्या प्रीमिक्स उत्पादनांचा नावीन्यपूर्ण व्यवसाय निवडला, त्यात त्यांना हळूहळू त्यांना यश मिळू लागले. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन आता मंजूषाताई नऊ प्रकारची उत्पादने तयार करतात.
विविध फ्लेवर्सची उपलब्धता
मंजूषाताईंनी नऊ प्रकारची उत्पादने बाजारपेठेत आणली आहेत. यामध्ये ढोकळा, इडली, अप्पे या तीन प्रकारच्या स्नॅक्ससह ऑरेंज, पायनापल आणि कालाखट्टा हे कोल्ड्रिंक्समधील तीन फ्लेवर्स आणि स्ट्रॅाबेरी, पिस्ता आणि मॅंगो हे मिल्कशेकमधील फ्लेवर्सची प्रीमिक्स उत्पादने तयार केली आहेत. ही उत्पादने शहरी तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहेत.
दरमहा शंभर किलो प्रीमिक्स विक्री
मंजूषाताईंनी प्रक्रिया व्यवसायाची सुरुवात अगदी कमी भांडवलात केली. पण आज त्यांची उलाढाल एक कुटुंब चालवण्यापुरती किंवा त्याहूनही अधिक होऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. आज दरमहा २५ किलो मिल्क शेक, २५ किलो कोल्ड्रिंक्स मिक्स आणि ६० किलो स्नॅक्स याप्रमाणे ११० किलोपर्यंत प्रीमिक्स पावडरची विक्री होते. त्यातून खर्च वजा जाता २० ते २५ टक्के निव्वळ नफा शिल्लक रहातो.
उत्पादनांचा ब्रॅण्ड
मंजूषाताईंनी उत्पादनांचे वेगळेपण जपण्यासाठी आकर्षक पॅकिंग, ब्रॅण्डिंगवर लक्ष केंद्रित केले आहे. या उत्पादनासाठी ‘आर्य’ नावाने ब्रॅण्ड तयार केला आहे. तसेच उत्पादनासाठी लागणारे प्रमाणपत्र देखील घेतले आहे. स्नॅक्समध्ये इडलीचे ४०० ग्रॅम पाकीट ६० रुपये, अप्पे २५० ग्रॅम पाकीट ४५ रुपये, ढोकळ्याचे २०० ग्रॅम पाकीट ४५ रुपये असे दर आहेत. मिल्कशेक आणि कोल्ड्रिंकची २५० ग्रॅम उत्पादने ५० ते ७० रुपये प्रति पाकिट असा दर आहे. या पाकिटावर उत्पादनाच्या किमतीसह रेसिपी आणि त्यातील घटकाच्या मिश्रणाची माहिती देण्यात आली आहे.
मंजूषाताई आपल्या उत्पादनासाठी कच्चा माल खरेदी करण्यापासून उत्पादने निर्मिती आणि मार्केटिंग याची सर्व जबाबदारी स्वतः पार पाडतात. त्यासाठी सोलापूर आणि परिसरातील बाजारपेठेत त्या स्वतः फिरून उत्पादनांची विक्री करतात. त्यांची उत्पादने नियमित खरेदी करणारे जवळपास पंचवीसहून अधिक ग्राहक त्यांनी जोडले आहेत. याशिवाय उत्पादनाच्या गुणवत्तेमुळे दर महिन्याला नवीन ग्राहक जोडले जात आहेत.
- मंजूषा कोटगिरे ८७८८७६९२७८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.