Oil Production : लाकडी घाणा तेलाचा तयार केला ब्रॅण्ड

Article by Gopal Hage : अकोल्‍यातील शीतल श्रीकांत पागृत यांनी चाकोरी बाहेर पडत बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन तेल निर्मिती उद्योगात स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. जिद्द, चिकाटीच्या जोरावर कुटुंबाच्या साथीने विविध प्रकारच्या तेलविक्रीसाठी ‘नामदेव लाकडी घाणा’ ब्रॅण्ड तयार केला आहे.
Namdev Lakdi Ghana
Namdev Lakdi Ghana Agrowon
Published on
Updated on

Namdev Lakdi Ghana Oil Industry : अकोला शहरातील शीतल पागृत यांचे शिक्षण बीए. बीएडपर्यंत झाले आहे. कौटुंबिक जबाबदारी आणि मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी शिक्षिकेची नोकरी केली नाही. मात्र तीन वर्षांपूर्वी कोरोनाकाळात त्यांच्या जीवनाला खरी कलाटणी मिळाली. पती श्रीकांत यांच्या पाठिंब्यावर त्यांनी छोटा गृहोद्योग सुरु करण्याचा विचार केला.

यासाठी समाज माध्यम, ठिकठिकाणच्या प्रदर्शनांना भेटी देऊन माहिती घेतली. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी लाकडी घाण्यावर तेल निर्मिती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कोरोनाच्या काळात सर्व बाजारपेठ ठप्प होती. नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होते. शिवाय या काळात आरोग्य विषय जागरूकता नागरिकांमध्ये निर्माण झाली.

दैनंदिन खाण्यातील घटक आरोग्यदायी असणे किती महत्त्वाचे आहे, हे लोकांच्या लक्षात आले. या काळात नागरिकांकडून शुद्ध तेलाची मागणी वाढली होती. याचा थोडाफार आढावा घेत पागृत दांपत्याने लाकडी घाण्यावर तेलनिर्मिती सुरू करण्यासाठी पाऊल उचलले. तीन वर्षांपूर्वी राहत्या घरामध्ये तेल निर्मितीची यंत्रणा उभारली.

गुणवत्तापूर्ण उत्पादनावर भर

छोटेखानी असलेला तेलनिर्मिती गृहोद्योग सुरुवातीपासून नीटनेटका, स्वच्छ, पारदर्शी आणि दर्जा टिकवून ठेवणारा कसा राहील याची शीतल पागृत यांनी काळजी घेतली आहे. या ठिकाणी तयार होणाऱ्या तेलांसह विविध पदार्थांमध्ये कुठलीही भेसळ नसते.

रसायनाचा वापर केला जात नाही. नैसर्गिक रंग या तेलांना असतो. शुद्धता, स्वच्छता, पारदर्शकता, गुणवत्ता या चार बाबींवर विशेषत्वाने भर देऊन तेल निर्मितीमध्ये त्यांनी सातत्य ठेवले आहे.

बाजारपेठेत उत्पादनांना वेगळी ओळख तयार होण्यासाठी त्यांनी सासऱ्यांच्या नावाने ‘नामदेव लाकडी घाणा’ हा ब्रॅण्ड तयार केला. काटेकोर व्यवस्थापन असल्याने त्यांच्या तेल निर्मिती उद्योगाला आयएसओ-९००१:२०१५ प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.

Namdev Lakdi Ghana
Oil Production : लाकडी घाण्यावरील ‘पार्थ’ तेलांची आश्‍वासक उलाढाल

तीन वर्षांपूर्वी सुरू केलेला तेल निर्मिती उद्योगाने आता गती घेतली आहे. या उद्योगामध्ये शेंगदाणा, खोबरे, तीळ, जवस, मोहरी, करडई, सूर्यफूल, बदाम अशा विविध प्रकारच्या तेलाची निर्मिती केली जाते. शीतलताईंनी राहत्या घरामध्ये उत्पादनांच्या विक्रीसाठी दुकान सुरू केले आहे.

या सोबतच अकोला शहरातील चार मोठ्या दुकानांना उत्पादनांचा पुरवठा केला जातो. शहरातील ग्राहक तसेच अमरावती, मुंबई, नागपूर,पुणे, बैतुल या शहरातूनही उत्पादनांना मागणी असते. सध्या दर महिन्याला शेंगदाणा तेल ६०० लिटर, सूर्यफूल तेल १०० लिटर, करडई तेल १०० लिटर, खोबरेल तेल २५० लिटर,

तीळ तेल २५० लिटर, जवस तेल २०० लिटर, मोहरी तेल २०० लिटरपर्यंत विक्री होते. दरवर्षी दोन टनांवर सैंधव मिठाची विक्री होते. सरासरी ३१० ते ४५० रुपये लिटर असे विविध प्रकारच्या तेलाचे दर आहे. दरमहा खर्च वजा जाता तीस हजारांची उलाढाल होते, असे शीतलताई सांगतात.

बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन शीतलताईंनी वायगाव हळद, गूळ, धने पावडर, शेवगा पावडर निर्मिती आणि विक्रीस सुरुवात केली आहे. विविध प्रकारच्या तेलांना ग्राहकांची मागणी सातत्याने वाढत असून,

सध्याची यंत्रणा पुरेशी ठरत नाही. यासाठी जास्त क्षमतेच्या मोठ्या यंत्राच्या खरेदीचे नियोजन त्यांनी केले आहे. यामुळे लवकरच प्रक्रिया आणि पॅकिंग उद्योगाचा यंत्रणेचा विस्तार करणार असल्याचे शीतलताईंनी सांगितले.

कुटुंबीयांची भक्कम साथ

तेलनिर्मितीला सुरुवात करण्यापूर्वी नागपूर येथे शीतलताईंचे पती श्रीकांत यांनी पाच दिवसांचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांच्याकडून शीतलताईंनी उद्योगाची इत्थंभूत माहिती मिळवली. त्यानंतर स्वतः लाकडी घाण्यावर तेल निर्मितीला सुरवात केली. आता तेल निर्मितीचे काम मजुरांकडून केले जाते.

त्यामुळे शीतलताई तेल विक्री व्यवस्थापन सांभाळतात. विक्री केंद्रात मालाची उपलब्धता, तयार तेलांचे पॅकिंग, त्यावर लेबलिंग, स्वच्छता अशी विविध कामे त्या करतात. या प्रक्रिया उद्योगामध्ये पती, मुलगा, सासू- सासऱ्यांची चांगली साथ मिळाली आहे. त्यामुळे कुटुंबातील दैनंदिन जबाबदारी सांभाळून त्या प्रक्रिया उद्योगासाठी पूर्णवेळ देतात.

Namdev Lakdi Ghana
Oil Cake Products : तेलघाणीतील पेंडीपासून खाद्यपदार्थांची निर्मिती

रोजगार निर्मितीला चालना

मुलाचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर नोकरी करावी, असे शीतलताईंनी निश्‍चित केले होते. बीए बीएड शिक्षण असल्याने शिक्षिकेची नोकरी करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र कोरोना काळात तेल निर्मिती गृहोद्योगात अचानक पाऊल ठेवले आणि त्यांनी नोकरीचा विचार सोडून दिला. नोकरी करायची नाही तर इतरांना रोजगार द्यायचा हे त्यांनी ठरवले. त्यानुसार तेलनिर्मिती उद्योगाच्या माध्यमातून वर्षभर एक कामगार आणि चार महिलांना त्यांनी रोजगार दिला आहे.

प्रदर्शनातून विक्री

सुरुवातीचे काही महिने बाजारपेठ विकसित करण्यासाठी शीतलताईंना मोठ्या प्रमाणात कष्ट घ्यावे लागले. मात्र गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे हळूहळू ग्राहकांकडून विविध प्रकारच्या तेलांना मागणी वाढू लागली. उत्पादित तेलांचा अधिक प्रचार होण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्नही सुरू ठेवले. या वर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित प्रदर्शनात त्यांनी सहभाग नोंदविला होता. यातून लाकडी घाण्याचा ब्रॅण्ड ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मदत झाली.

ढेपेला चांगली मागणी

तेल निर्मिती केल्यानंतर तयार ढेपेला देखील चांगली मागणी आहे. पशुखाद्य, प्रक्रिया उद्योगासाठी विविध प्रकारच्या ढेपेला चांगली मागणी आहे. मोहरीच्या ढेपेपासून परसबागेतील झाडांसाठी सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते. या खतास शहरी ग्राहकांकडून मागणी आहे.

कच्च्या मालाची शेतकऱ्यांकडून खरेदी

प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या कच्चा मालाची जास्तीत जास्त प्रमाणात शेतकऱ्यांकडून खरेदी केली जाते. शेतकऱ्यांकडून वायगाव हळद विकत घेऊन त्यापासून पावडर तयार केली जाते. याचबरोबरीने तेल निर्मितीसाठी तीळ, मोहरी, जवस थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यावर शीतलताईंचा भर आहे. अकोला जिल्हा तसेच परिसरातील जिल्ह्यातील ३० शेतकऱ्यांच्याकडून शेंगदाणा, जवस, तीळ, सूर्यफुलाची त्या खरेदी करतात.

ॲग्रोवन’मधून जोडले शेतकरी

उद्योगाचा विस्तार करताना शीतलताईंना विविध माहिती लागत होती. अशातच त्यांना ‘ॲग्रोवन’बाबत माहिती मिळाली. ॲग्रोवन दैनिकातील लेख आणि यशोगाथांच्या माध्यमातून त्यांनी तेल प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, बॉटल याबाबत माहिती मिळविली. या माहितीच्या आधारे त्यांनी यंत्र सामग्री, पॅकेजिंगमध्ये बदल केले.

ग्राहकाला हाताळायला सहज सोपे पॅकिंग तयार करून तेल, खाद्यपदार्थ विक्री करण्यासाठी मदत झाली.तसेच कच्चा माल खरेदी करण्यासाठी त्यांना विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधणे सोपे झाले आहे.

- शीतल पागृत, ८१४९७९५१५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com