Poultry Business Agrowon
यशोगाथा

Poultry Business : व्यवसाय प्रशिक्षणातून घडला देशी कोंबडीपालन उद्योजक

Poultry Entrepreneur : निपाणा (ता. जि. अकोला) येथील बबन नाचोणे या उच्चशिक्षित युवकाने व्यवसाय उभारणीचे प्रशिक्षण घेतले. अंड्यांसाठी कावेरी व चिकनसाठी सोनल जातीचे कोंबडीपालन व त्याला अनुसरून सुनियोजित व्यवस्थापन केले.

 गोपाल हागे

Poultry Farming Management :

निपाणा (ता. जि. अकोला) येथील नाचोणे कुटुंबाची दोन ठिकाणी एकूण १० एकर शेती आहे. सध्या कुटुंबातील बबन हक शेती व पूरक व्यवसायाची जबाबदारी सांभाळतात. बबन यांनी अर्थशास्त्र विषयात एमए ची पदवी घेतली. त्यानंतर कृषी विषयातील पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यरत असलेल्या ‘ॲग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटर’ मध्ये दोन महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. यामध्ये व्यवसाय उभारणी आणि त्या संबंधित बाबींची माहिती मिळाली. त्या माध्यमातून १ लाख २० हजार रुपयांचे व्यवसायासाठी अर्थसाह्यदेखील झाले.

व्यवसाय उभारणी व व्यवस्थापन

बबन यांची मध्यम स्वरूपाची जमीन असून चार एकरांत सिंचनाची सुविधा आहे. उर्वरित क्षेत्र कोरडवाहू आहे. केवळ शेतीतून पुरेसा उदरनिर्वाह होणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यास पूरक व्यवसायाची जोड देणे गरजेचे होते. त्यातून २०१९ मध्ये त्यांनी देशी कोंबडीपालन सुरू केले.

यात अंडी व चिकनसाठी कोंबड्या असा दुहेरी हेतू ठेवला. नगर भागातून अंडी देण्यासाठी कावेरी जातीच्या ५०० कोंबड्या व चिकनसाठी सोनल जातीच्या एकहजार कोंबड्या आणल्या. कावेरी जातीच्या कोंबड्यांपासून पाच ते सहा महिन्यांनी अंडी मिळण्यास सुरवात झाली.

साधारण दोन वर्षांपर्यंत कोंबड्या व्यावसायिक पद्धतीने अंडी देतात. दिवसाला सरासरी २५० ते ३०० पर्यंत अंडी मिळतात. तर सोनाली जातीच्या पक्षांची बॅच ६० ते ७० दिवसांत तयार होते. त्या काळात एक किलोपर्यंत त्यांचे वजन मिळते.

चोख व्यवस्थापन

शक्यतो मजुरांची मदत न घेता बबन स्वतः संपूर्ण व्यवस्थापन सांभाळतात.

चांगल्या कंपन्यांकडील दर्जेदार खाद्याची खरेदी. घरच्या शेतीतील मक्याचा वापर.

सोनल जातीच्या कोंबड्यांसाठी ६० बाय ३० फूट आकाराचे शेड.

लेअर कोंबड्यांसाठी कौशल्यपूर्ण रचना केली आहे. यात २५ बाय २५ बाय ८ फूट आकाराचा पाण्याचा मोठा टँक आहे. त्यावर लोखंडी जाळीचे आच्छादन केले आहे. टँकमध्ये कटला जातीचे मत्स्यपालन तर जाळीच्या वरच्या भागात कोंबडीपालन असा दुहेरी वापर आहे. पहिल्या बॅचपासून प्रति किलो १५० ते १७५ रुपये दराने मासे विक्री. मत्स्यपालनातून अतिरिक्त उत्पन्न.

प्रकल्पाचे पाठबळ

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने ‘उत्कर्ष-पीडीकेव्ही’ हा ‘ॲग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटर’ प्रकल्प २०१९ पासून कार्यरत आहे. त्यातून ग्रामीण भागात उद्योजक तयार होण्यासाठी चालना देण्यात येते.

केंद्राच्या माध्यमातून राज्यातून २०६ जणांची निवड करून ९२ जणांना प्रशिक्षण देण्यात आले. पैकी १९ जणांच्या नवसंकल्पनांना पाठबळ म्हणून केंद्र शासनाचे अर्थसाह्य देखील मंजूर झाले आहे. यातील १२ जणांचे उद्योग मार्गी लागले आहेत. बबन नाचोणे हे त्यापैकीच एक आहेत.

शेतीतूनच साधली प्रगती

नाचोणे कुटुंबाकडे २००० पर्यंत अवघी दोन एकर शेती होती. मात्र योग्य नियोजन, पीक पद्धतीची घडी बसवून त्यातील उत्पन्नातूनच सारी प्रगती साधली. २००६ मध्ये गावशिवारात सहा एकर शेती खरेदी केली. २०२२ मध्ये अकोला शहरात ‘प्लॉट’ घेतला. एक विहीर व दोन बोअरवेल्स घेतल्या.

चार एकरांतील केलेल्या सिंचन सुविधेमुळे वर्षभर तीन पिके घेणे शक्य झाले. खरिपात सोयाबीन अधिक तूर, रब्बीत गहू व ज्वारी व उन्हाळ्यात मूग किंवा अन्य पीक अशी पद्धती वापरली आहे. कोंबडीपालनातून वर्षाला तीन ते पाच लाख रुपयांची उलाढाल शक्य होते.

जागेवरच विक्री व्यवस्था

बबन यांनी जागेवरच विक्री व्यवस्था तयार केली आहे. व्यापारी व ग्राहक जागेवर येऊन चिकनसाठी कोंबड्या घेऊन जातात. प्रति किलो २५० ते ३०० रुपये त्यास दर मिळतो. गावरान असल्याने अंड्यांनाही मोठी मागणी आहे.

नेहमीच्या किंवा ठोक खरेदी करणाऱ्यांना किलोला १० रुपये व इतरांना १२ रुपये प्रति नगाने अंड्यांची विक्री होते. बबन यांचे धाकटे बंधू गजानन अकोला शहरात राहतात. त्यांच्याकडे ‘मार्केटिंग’ची जबाबदारी आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, महावितरण कंपनी व अन्य शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग बबन यांच्या अंडी उत्पादनाचे नियमित ग्राहक झाले आहेत. नाचोणे कुटुंबाची अकोला येथे ‘लाँड्री’ आहे. तेथेही अंडी विक्रीस ठेवली आहेत. शिवाय याच शहरात दोन दुकानदारही वर्षभर विक्री करतात. असा रीतीने विक्री व्यवस्था मजबूत केली आहे.

मी ॲग्रोवनचा नियमित वाचक आहे. जसा मासा पाण्याविना राहू शकत नाही तसे आम्हा शेतकऱ्यांना ॲग्रोवनशिवाय राहणे अशक्य आहे. ज्याला शेतीत भविष्य तयार करायचे आहे त्याने ॲग्रोवन वाचलाच पाहिजे असे मला वाटते.
बबन नाचोणे ८८०५७१५३२२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT