Food Processing
Food Processing Agrowon
यशोगाथा

Food Processing : केळी, बटाटा चिप्स अन् नमकीन उत्पादने

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

जालना जिल्ह्यातील डोंगरगाव येथील ईश्‍वरदास घनघाव यांची सुमारे ११ एकर शेती आहे. कोरडवाहू शेतीतून (Rain Fed Agriculture) चरितार्थ भागत नसल्याने नर्सरी उद्योग (Nursery Business) करून पाहिला. परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे तोही नाद सोडावा लागला. पूरक व्यवसायाचा शोध सुरू असतानाच १९९८ मध्ये शासनाची प्रक्रिया उद्योगातील (Processing Industry) प्रशिक्षणाविषयीची जाहिरात दिसली. तेथून प्रशिक्षण पूर्ण केले. डॉ. पी. एन. सत्त्वधर यांच्या मार्गदर्शनाखाली केळी चिप्स बनविण्याचा निर्णय घेतला.

प्रकल्प अहवाल तयार करून बॅंकांच्या पायऱ्या झिजवल्या. पण कोणीही कर्ज दिले नाही. अखेर स्वभांडवलातून १९९९ मध्ये घरच्या घरी केळी चिप्स तयार करण्यास सुरुवात केली. उत्पादनाची पत्नी सौ. सुमित्राबाई तर विक्रीची जबाबदारी ईश्‍वरदास सांभाळायचे. आसपासच्या दुकानांना भेटी देऊन उत्पादन घेण्यासाठी आग्रह करावा लागायचा. सन २००२ ते २००४ पर्यंत सायकलवरून १० किलोपर्यंत व दुचाकीला दोन्ही बाजूंना रॅक्स लावून ४० किलोपर्यंत चिप्स ठेवून दुकानदार व ग्राहकांना विक्री केली. ही धडपड ‘गोकुळ’ ब्रॅण्डखाली सुरू होती. मागणी व प्रयत्नांनंतर उत्पादन व उत्पन्नही वाढले. सन २०१३ मध्ये मग वाहतुकीसाठी चारचाकी वाहन घेण्यापर्यंत यश मिळवले.

बदलाची सुरुवात

सन २००८-९ पर्यंत पारंपरिक पद्धतीने केळी चिप्स तयार करून विक्री करणाऱ्या घनघाव यांनी ‘आत्मा’ योजनेतून २००९ मध्ये बनाना स्लायसर व पॅकिंग मशिन घेतले. उद्योगाचे आधुनिकीकरण केले. त्यातून एक व अर्धा किलो पॅकिंग करणे शक्य झाले. सन २०१४ मध्ये दीपक आणि प्रवीण या मुलांच्या सल्लामसलतीतून सर्वज्ञ फूड्‌स असे ब्रॅण्डचे नामकरण केले. दीपक यांनी बीएस्सी ॲग्री तर प्रवीण यांनी बीटेक- एमबीए केले आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आज दोघे हा उद्योग सांभाळतात.

उद्योगाचा विस्तार

‘एमएसीपी’ प्रकल्पांतर्गत २०१७ मध्ये प्रगत तंत्रज्ञानाची जोड मिळाली. डोंगरगाव येथे पहिले युनिट सुरू केले होते. सन २०२० मध्ये जामवाडी (ता. जालना) येथे भाडेतत्वावरील जागेत ते स्थलांतरित केले. येथे स्वयंचलित पॅकिंग, गोदाम, ‘बनाना स्लायसर’, मसाला कोटिंग अशी यंत्रसामग्री घेतली. त्यामुळे उत्पादने वेळेत व अधिक सुनियोजित पद्धतीने करण्याची प्रक्रिया सुलभ झाली. २०, ५० ग्रॅम ते १०० ग्रॅम पॅकिंग करणे शक्‍य झाले.

उलाढाल

‘सर्वज्ञ फूड्‌स’ ब्रॅण्ड उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून, एकेकाळी शून्यातून सुरू झालेल्या या उद्योगाची उलाढाल दीड ते दोन कोटींच्या घरात पोहोचली आहे. दिवसाला दोन किलोपासून सुरू झालेले चिप्सचे उत्पादन २०० किलो व अलीकडे ४०० किलोच्या क्षमतेपर्यंत पोहोचले आहे.

उद्योग विस्तारणार

एक कोटी रुपये गुंतवणुकीच्या तयारीतून काजळा फाट्यावरील स्वतःच्या चार एकरांवर गोदाम व ‘मशिनरी’ उभारणीचे काम सुरू आहे. यामध्ये ‘मल्टीहेड पॅकिंग मशिन (क्षमता किमान १०० पाकिटे प्रति मिनिट), ‘थ्री लेअर नायट्रोजन पॅकिंग’सह रोस्टेड प्रकारांसह १० नवी उत्पादने तयार केली जाणार आहेत. प्रवीण यांना जिल्हा उद्योग केंद्राचा पुरस्कार मिळाला आहे. वडील ईश्‍वरदास यांना सह्याद्री दूरदर्शन वाहिनीचा पुरस्कार मिळाला आहे.

कोरोना काळात

‘फार्म टू किचन’ यंत्रणा

कोरोना काळात घनघाव बंधूंनी ‘फार्म टू किचन’ ही संकल्पना औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत राबविली. यात शेतकऱ्यांकडील फळे, भाजीपाला आदी मालाची सुमारे १८ हजार ग्राहकांना थेट विक्री केली. त्यातून दोन ते अडीच कोटींची उलाढाल करून १२ लोकांना रोजगार दिला.

आधुनिक यंत्रे- क्षमता

सन २०२१-२२ मध्ये स्वयंचलित बटाटा चिप्स युनिट हे पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून घेतले. त्यासाठी १० लाख रुपये अनुदान मिळणार आहे. ही यंत्रणा विस्ताराला चांगली गती देऊन गेली.

यंत्रांची क्षमता-

पोटॅटो पिलर-साली काढणे-प्रति तास २०० ते २५० किलो. पोटॅटो स्लायसर-चकत्या करणे -२०० ते २५० किलो प्रति तास.

पोटॅटो डिहायड्रर- तयार चकत्यातील पाणी काढून त्या तळण्यास तयार करणे

वूडन बॉयलर- चिप्स तयार करण्यासाठीच्या इंधनात ४० टक्‍क्‍यांपर्यंत बचत करते. उत्पादन क्षमता ४०० किलो प्रतिदिन पर्यंत वाढविली.

नायट्रोजन जनरेटर -हवेतील नायट्रोजन आवश्‍यकतेनुसार हवाबंद पॅकिंगसाठी उपलब्ध करून देतो. बॅच कोडिंग मशिन- उत्पादन तारीख, बॅच व मुदत संपल्याची तारीख आदी कामे स्वयंचलित पद्धतीने करते.

स्वयंचलित पॅकिंग मशिन- मिनिटाला ४५ पाकिटांचे पॅक करण्याचे काम वजनासह करते.

प्रकल्पातील आजची गुंतवणूक सुमारे ८० लाख रु. (टप्प्याटप्प्याने भांडवल उभारणी, बँक कर्ज, बॅंकेत पत तयार करणे व त्यानुसार विस्तार)

१४ मजुरांना वर्षभर रोजगार. चार मजूर उत्तर प्रदेशातील प्रशिक्षित असून त्यांच्यावर बरीच मदार.दहा मजूर स्थानिक.

उत्पादने

केळी थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणारे घनघाव हे जालना जिल्ह्यातील पहिल्या तीन चार केळी खरेदीदारापैकी एक झाले आहेत. दिवसाला दीड ते दोन टन केळी लागते. बटाट्याची खरेदी ते इंदूर येथून करतात.

महिन्यातील सुमारे १८ ते २२ दिवस केळी चिप्स तर सहा ते सात दिवस बटाटा चिप्सचे उत्पादन घेतले जाते.

दोन प्रकारच्या स्वादातील केळी व बटाटा चिप्स, मूगडाळ, चणा डाळ, फराळी चिवडा, भेळ, ‘व्हील’ आकारातील प्रकार, कटोरी आदी सुमारे १४ उत्पादने.

विक्री व्यवस्था

विक्री औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, लातूर, नगर या सहा जिल्ह्यांत नेमलेल्या प्रमुख वितरकांमार्फत.

पुणे जिल्ह्यात हायजेनिक पद्धतीने पॅकिंग केलेल्या मालाची विक्री ‘बी टू बी’ पद्धतीने.

‘चायनीज’ प्रकारातील उत्पादने २५ ते ४० ग्रॅममध्ये पॅक करून विकली जातात. ‘रोस्टेड’ शेंगदाणे व फुटाणे एक किलोच्या पॅकमधून पुरविले जातात.

ॲमॅझॉन, फ्लीपकार्ट, बिग बाजार, मोर आगी कंपन्यांनाही पुरवठा. महिन्याला एकूण ८ ते १० टन मालाची विक्री.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT