Food Processing : तांदूळ, गहू प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची आश्‍वासक घौडदौड

नागपूर जिल्ह्यातील कन्हान- निलज भागातील (ता. पारशिवणी) शेतकऱ्यांनी ‘कन्हान ऍग्रोव्हिजन फार्मर प्रोड्यूसर कंपनी’ची स्थापना केली आहे. राइस मिल, सॉर्टिंग यंत्र, ‘क्लिनिंग- ग्रेडिंग’ यंत्रणा आदी यांत्रिकीकरण केले आहे.
Food Processing
Food ProcessingAgrowon

नागपूर जिल्ह्यातील कन्हान- निलज भागातील (ता. पारशिवणी) शेतकऱ्यांनी ‘कन्हान ऍग्रोव्हिजन फार्मर प्रोड्यूसर कंपनी’ची (Kanhan Agrovision Farmer Producer Company) स्थापना केली आहे. राइस मिल (Rice Mill), सॉर्टिंग यंत्र, ‘क्लिनिंग- ग्रेडिंग’ यंत्रणा आदी यांत्रिकीकरण (Mechanization) केले आहे. प्रक्रिया- विक्रीच्या माध्यमातून वार्षिक एक कोटी रुपयांची उलाढाल करण्यापर्यंतची मजल गाठताना परिसरातील शेतकऱ्यांचे कष्ट कमी करून त्यांचे अर्थकारण उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.

नागपूर जिल्ह्यात पारशिवणी तालुक्यातील कन्हान, निलज व अन्य सात- आठ गावांमधील शेतकरी धान (भात) उत्पादन घेतात. या भागात प्रक्रिया उद्योग अत्यंत कमी आहेत. भातावर प्रक्रिया करून घ्यायचे म्हटले तर शेतकऱ्यांना किमान पंधरा किलोमीटरची यातायात करावी लागते. वाहतूक खर्च व कष्ट होतात. ही समस्या तसेच भात व अन्य शेतमालाच्या बाजारपेठांची संधी लक्षात घेऊन भागातील काही शेतकरी एकत्र आले.

Food Processing
Food Inflation : अन्नधान्य, दुधाच्या किंमतींचा भडका उडणार ?

त्यांनी शेतकरी सोयी- सुविधा, उत्पादन ते विक्री व्यवस्था असे जाळे तयार करण्याचे ठरवले. त्यातून ‘कन्हान ॲग्रोव्हिजन फार्मर प्रोड्यूसर कंपनी’ची स्थापना ३० जून २०१८ रोजी झाली. पाच संचालक, सहा ‘प्रमोटर्स’ तर २५२ भागधारक आहेत. दोन कोटी १५ लाख रुपयांचे भाग भांडवल उभारण्यात आले. त्यामध्ये ४३ लाख रुपयांच्या कर्जाचा समावेश होता. एकूण प्रकल्प किमतीच्या एक कोटी रुपयांचे अनुदान गटशेती योजनेतून मिळाले.

Food Processing
Food Processing : सीताफळावर कशी कराल प्रकिया ?

राइस मिलपासून सुरवात

भात उत्पादकांच्या अडीअडचणी व गरजा लक्षात घेऊन कंपनीने राइस मिल’ पासून सुरवात केली. सुमारे पाच हजार चौरस फूट आकाराचे शेड उभारले. त्यासाठी ४२ लाख रुपयांचा खर्च झाला. प्री इंजिनिअरिंग बिल्डींग’ संकल्पनेतील हे शेड आहे. कमलेश भोयर कंपनीचे अध्यक्ष, राजेंद्र बंड हे सचीव तर अभिजित फरसोळे हे कोषाध्यक्ष आहेत. बहुतांश संचालक खासगी नोकरी सोबत घरची शेती सांभाळतात. कमलेश यांना राइस मिल’ मधील कामाचा अनुभव आहे. त्यामुळेच हा प्रकल्प उभारताना अडचणी कमी आल्या. आवश्‍यक यंत्रांची खरेदी नागपूर येथील उद्योजकांकडून झाली.

आधुनिक यांत्रिकीकरण

राइस मिल’ सह गव्हासारख्या धान्यांवरही प्रक्रिया करण्याचे कंपनीने ठरविले. त्यासाठी आवश्‍यक यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान सुविधा उभारली. ‘बकेट एलेव्हेटर, प्री क्लीनर, ‘डिस्टोनर’,

धानावरील आवरण काढण्याची प्रक्रिया करणारा ‘हस्कर’ अशी यंत्रे आहेत. तांदळाचे वर्गीकरण व प्रतवारी योग्य साधण्यासाठी ‘पॅडी सेपरेटर’, ग्रेडर आहे. काही व्यापाऱ्यांना ‘पॉलीश’ केलेला तांदूळ लागतो. त्यासाठी ‘पॉलिशर’ सुविधा देखील आहे. पूर्ण तांदूळ, अर्धा, पाऊण आणि रवा याप्रमाणे तांदळाचे वर्गीकरण होते. ‘कलर सॉर्टिंग’ हे यंत्र तांदळाच्या रंगानुसार वर्गीकरण करून त्याला वेगळा करते. त्या माध्यमातून उत्तम प्रतीचा तांदूळ मिळतो.

हंगाम, प्रक्रिया व दर

-कंपनी सभासदांना ११० रुपये तर बिगर सभासदांना ११० रुपये प्रति क्‍विंटल दराने

तांदळावर प्रक्रिया करून दिली जाते. बाजारात हाच दर १२० रुपये आहे. यातून शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १० ते २० रुपयांची बचत होते.

-डिसेंबर ते फेब्रुवारी असा प्रक्रिया हंगाम. या काळात सुमारे एक लाख ८० हजार क्‍विंटलपर्यंत प्रक्रिया.

-प्रति क्‍विंटल प्रक्रियेवर ५५ ते ६० रुपये खर्च.

-धानात ‘मॉईश्‍चर’ चे प्रमाण अधिक असल्यास प्रक्रियेतून तुकडा अधिक पडतो. त्यामुळे बहुतांश शेतकरी नुकसान टाळण्यासाठी स्वतःच वाळलेले धान आणतात.

-प्रति क्‍विंटल धानापासून ६० ते ६२ किलो तांदूळ मिळतो. उर्वरित ७ ते १० टक्‍के ब्रान, १० टक्‍के बारीक कणी तसेच २० टक्‍के कोंडा मिळतो. मालाच्या दर्जानुसार यात कमी अधिक प्रमाणात बदल.

थेट ग्राहकांना ‘ब्रॅण्ड’ने विक्री

शेतकऱ्यांनी प्रक्रियेसाठी धान आणल्यानंतर पुढील हंगामात उत्तम बियाणे म्हणून वापरासही कंपनीकडून प्रोत्साहन दिले जाते. अशा धानावर पुढे बीज प्रक्रियाही होते. हंगामात या माध्यमातून १०० ते १५० एकरांवर लागवड होते. काही शेतकरी प्रक्रियायुक्त तांदूळ कंपनीनेच विकून द्यावा अशी अपेक्षा व्यक्‍त करतात. तशी सुविधाही उपलब्ध केली आहे. तीस व ५० किलो वजनी बॅगांमधून कंपनीने कन्हान, नागपूर आदी भागांत कंपनीच्या नावे (ब्रॅण्ड) तांदळाची यंदा सुमारे १० टनांपर्यंत विक्री केली. यात चंद्रपूर भागातील दोन वाणांचा समावेश आहे. वाणनिहाय किलोला ५० ते ६६ रुपये दर मिळाला आहे.

गव्हावरही प्रक्रिया

धानाचा हंगाम सुमारे तीन महिन्यांचा असल्याने उर्वरित काळात उत्पन्नस्त्रोत सुरू ठेवण्यासाठी कंपनीने गव्हाची क्लिनिंग, ग्रेडिंग’ यंत्रणाही उभारली आहे. सुमारे चार महिने हे काम सुरू राहते.सभासद शेतकऱ्यांसाठी प्रति क्‍विंटल ९० तर बिगर सभासदांसाठी १०० रुपये दर आकारला जातो. हंगामात ३००० ते ४००० क्‍विंटल गव्हावर अशा रीतीने प्रक्रिया होते. व्यापाऱ्यांना देखील ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

एक पाऊल पुढे

कंपनीने एकूण विक्रीतून वर्षाला एक कोटी रुपयांची उलाढाल करण्यापर्यंत मजल गाठताना त्यात सातत्यही ठेवले ही उत्साहवर्धक बाब आहे. यापुढे पाऊल टाकताना कृषी सेवा केंद्र उभारणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शेतमाल विक्री मध्यस्थांविना सुलभ व्हावी यासाठी खासगी बाजार समितीचा परवाना मिळविला आहे. शेतकऱ्यांची ऑनलाइन कामे सुकर व्हावीत यासाठी ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’ उभारले आहे. पीकविमा, ई.-श्रम कार्ड व अन्य सेवा त्याद्वारे दिल्या जातात. त्यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे.

कमलेश भोयर- ९९२३५९४५५१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com