Fish Conservation and Panzade Family Agrowon
यशोगाथा

Fish Conservation : शोभिवंत मत्स्यपालनात तयार झाली ओळख

 गोपाल हागे

Fish Hostel Success Story : वाशीम हे विदर्भातील जिल्ह्याचे ठिकाण असले तरी लोकसंख्येच्या दृष्टीने छोटे शहर आहे. गेल्या काही वर्षांत या शहरात टुमदार घरे साकारलेली बघायला मिळतात. या शहरात मध्यवर्ती ठिकाणी पल्लवी पानझाडे यांनी ग्राहकांची गरज ओळखून ॲक्वारिअम दुकान सुरु केले. पल्लवीताईंचे शिक्षण केवळ बारावीपर्यंत झाले आहे. सुरवातीला त्यांनी ब्युटीपार्लरचे काम केले. पतीच्या व्यवसायात मदतही केली. त्यांना शोभिवंत मत्स्यपालनाचा छंद होता. हा छंद त्यांनी व्यवसायात परावर्तित केला. साधारणतः २५ वर्षापूर्वी पल्लवीताईंचे पती दीपक यांनी वाशीममध्ये एका छोट्या ॲक्वारिअम दुकानापासून सुरवात केली होती.

पतिची मेहनत आणि मासे पालनातील आवड याबाबींमुळे पल्लवीताईंनी शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय वाढविण्याचा निर्णय घेतला. वाशीम हा विकासाच्या बाबतीत थोडा मागास जिल्हा आहे. अशा आकांक्षीत जिल्ह्यात शोभिवंत मत्स्यपालनाविषयी फारशी ओळख नव्हती. अशा परिस्थितीतही ग्राहकांच्यामध्ये शोभिवंत मासे पालनाची आवड निर्माण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. सुरवातीच्या टप्प्यात मत्स्यालय दुकानाचे कामकाज आटोपून संध्याकाळी तीन तास पानझाडे दांपत्याने ग्राहकांच्या घरी जाऊन मत्स्यालयाची स्वच्छता तसेच व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन, मदत करण्यास सुरवात केली. यातून व्यवसायवाढीला चालना मिळाली.

विविध प्रजातींचे संगोपन

वाशीम जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाबाबत आढावा घेण्यासाठी २०१९ मध्ये जिल्ह्याचे मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त श्री. भारती यांनी पल्लवी पानझाडे यांच्या मत्स्यालयाला भेट दिली. त्यावेळी विविध शासकीय योजनांची माहिती दिली.त्यानंतर २०२० मध्ये पंतप्रधान मत्स्य संपदा योजना अमलात आली असता मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी या योजनेतील ‘फिश कियॉस’ या १० लाख रुपये किमतीच्या प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर केला. योजनेमार्फत त्यांना सुमारे सहा लाख रुपये अनुदान प्राप्त झाले.

प्राप्त अनुदान आणि चार लाख रुपये लाभार्थी हिस्सा असा मिळून दहा लाख रुपये किमतीचा प्रकल्प त्यांनी उभा केला. त्यानंतर त्यांच्या व्यवसायाने गती घेतली. प्रकल्पाच्या माध्यमातून मिळालेल्या अनुदानातून त्यांनी दुकानात संचयन टाक्या आणि सुविधांमध्ये वाढ केली आहे. पानझाडे यांच्याकडे शोभिवंत माश्‍यांच्या ॲरोवाना, फ्लॉवर हॉर्न, सिक्लिड्स, ऑस्कर यासारख्या महागड्या विदेशी प्रजातींच्या माश्‍यांपासून ते गप्पी, कोई, गोल्ड फिश सारख्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या प्रजातीचे मासे विक्रीसाठी उपलब्ध असतात. विविध ॲक्वारिअम ॲक्सेसरीज, माश्‍यांसाठी विविध खाद्याचा त्यांच्याकडून पुरवठा केला जातो. विविध कार्यालयासह घरगुती मत्स्यालयांचे व्यवस्थापन, सेवांच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांशी संपर्क वाढविला आहे.

ई-मार्केटींगवर भर

पल्लवी पानझाडे यांचा शोभिवंत मत्स्यपालन प्रकल्प सुरु होऊन तीन वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढले आहे. या व्यवसायामध्ये मुलगा समर्थ हा महाविद्यालयातील शिक्षण सांभाळून मदत करतो. या व्यवसायाने कुटुंबातील तिघांसह दोन व्यक्तींना पूर्णवेळ रोजगार उपलब्ध करून दिला. विशेष बाब म्हणजे त्यांनी व्यवसाय वाढीसाठी ई-मार्केटिंग प्लॅटफॉर्मचा वापर सुरू केला आहे. भविष्यात शोभिवंत माश्‍यांची हॅचरी तयार करण्याचे त्यांनी नियोजन केले आहे.

राष्ट्रीय पातळीवर दखल

वाशीमसारख्या छोट्या शहरात पल्लवी पानझाडे यांनी सुरू केलेल्या या प्रकल्पाची दखल केंद्र शासनाच्या पोर्टलवर घेण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे यांनी त्यांना विविध प्रशिक्षणांना आमंत्रित केले होते. त्यामुळे तांत्रिक ज्ञानात भर पडली. मोर्शी येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अमिता जैन यांचे त्यांना मार्गदर्शन मिळते. याचबरोबरीने सहआयुक्त (मत्स्यव्‍यवसाय), प्रादेशिक उपायुक्तांचे मोलाचे तांत्रिक मार्गदर्शन मिळत आहे. पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेतून यशस्वी उद्योगाला सुरवात केल्यामुळे यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास पानझाडे कुटुंबीयांना नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावरील कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून केंद्र शासनामार्फत निमंत्रित करण्यात आले होते.

‘फिश होस्टेल’ची सुविधा

काहीवेळा शोभिवंत माश्‍यांमध्ये व्यवस्थापनाच्या चुकीमुळे आजार होतात. अशा ग्राहकांच्या ॲक्वारियममधील शोभिवंत माश्‍यांना क्वॉरंटाईन करणे असो किंवा ग्राहक जास्त दिवसांसाठी बाहेरगावी जाणार असल्यास त्यांच्याकडील शोभिवंत मासे पल्लवी पानझाडे स्वतःच्या ॲक्वॅरियममध्ये ठेवतात. त्यामुळे ‘फिश होस्टेल' या नव्या संकल्पनेला सुरवात झाली. अशाप्रकारच्या किरकोळ अडचणीच्या काळात त्यांच्याकडून ग्राहकांना सहकार्य केले जाते. यामुळे ग्राहकांचा विश्‍वास निर्माण झाला.

पल्लवी पानझाडे ७०२८४३७९००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT