Fisheries Employment Opportunity : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

Fisheries : मत्स्य व्यवसाय म्हणजे केवळ मासे पकडणे व त्यांची विक्री करणे इतकाच मर्यादित नाही. मत्स्य व्यवसाय व मत्स्य व्यवसायाशी निगडित अनेक रोजगार संधी उपलब्ध होत असून, त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.
Fisheries
FisheriesAgrowon
Published on
Updated on

अमिता जैन, डॉ. भूषण ना. सानप

Employment Opportunities Related to Fisheries : पारंपरिक नदी-नाल्यातील मासेमारी नदी-नाले किंवा नैसर्गिक जलाशयात गळ किंवा जाळ्याच्या मदतीने पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे अनेक मच्छीमार आहेत. त्यातून त्यांना अल्प उत्पन्न मिळते.

जलाशय/ तलावातील मासेमारी

विविध कारणांसाठी पाण्याची साठवण केली जाते. त्यासाठी लघू, मध्यम व मोठे प्रकल्प उभारले जातात. अशा तलावातही पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जाते. याच्या मासेमारीचे हक्क शासनाकडे असतात. ते संबंधित विभागामार्फत मत्स्य व्यवसाय विभागाकडे हस्तांतरित केले जातात. मत्स्य व्यवसाय विभागामार्फत सदर तलाव नोंदणीकृत मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था/खासगी व्यक्ती यांना मासेमारीकरिता भाडेतत्त्वावर दिले जातात.

त्याचा कालावधी सामान्यतः पाच वर्षे असून, तो शासन निर्णयाच्या निकषाप्रमाणे कमी अधिक होतो. या तलावात त्या ठेकेधारक दरवर्षी इष्टतम प्रमाणात मत्स्यबीज संचयन करून मत्स्योत्पादन घेतात. मासळीचे उत्पादन हे तलावातील नैसर्गिकरीत्या उपलब्ध खाद्यांवर अवलंबून असते. या प्रकारात व्यवस्थापन व मासेमारीकरिता अधिक मनुष्यबळ व खर्च करावा लागतो.

शेततळ्यातील मत्स्यसंवर्धन

शेततळी ही सामान्यतः संरक्षित सिंचनासाठी तयार केली जातात. मात्र त्यातही मत्स्यसंवर्धन केल्यास उत्तम पूरक व्यवसाय ठरू शकतो. शेततळ्यात किमान ८ ते १० महिन्यांपर्यंत पाणी उपलब्ध राहत असल्यास त्यात रोहू, कटला, मृगळ या भारतीय प्रमुख कार्प बरोबरच गवत्या, चंदेऱ्या व सायप्रिनस या प्रजातींच्या मत्स्य बोटुकलीचे संवर्धन करता येते.

प्लॅस्टिक अस्तर नसलेल्या शेततळ्यात कार्प माशांबरोबरच गोड्या पाण्यातील कोळंबीचेही संवर्धन करता येते. पाणी दर्जा सांभाळण्यासोबतच खाद्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले मत्स्य उत्पादन व पर्यायाने उत्पन्न मिळू शकते.

खास तलावात मत्स्य संवर्धन

तलावात मत्स्य बोटुकली सोडून, त्यांना अनुकूल वातावरण व योग्य प्रमाणात खाद्य देऊन माशांची वाढ केली जाते. या मत्स्य तळ्यांमध्ये रोहू, कटला, मृगळ या भारतीय प्रमुख कार्प बरोबरच गवत्या, चंदेऱ्या व सायप्रिनस या प्रजातींच्या मत्स्य बोटुकलीचे संचयन करता येते. योग्य वजनाचे झाल्यानंतर विक्री केली जाते. या माशांना १६० ते २०० रु. प्रति किलो या प्रमाणे बाजारभाव मिळू शकतो.

Fisheries
Fisheries Scheme : मत्स्यपालनासाठी कर्ज आणि प्रशिक्षणाची केंद्र सरकारची योजना

एकात्मिक मत्स्यसंवर्धन

यात पशू-पक्षिपालनासोबत तळ्यामध्ये मत्स्यपालन केले जाते. पशुपक्ष्यांच्या विष्ठा किंवा टाकाऊ पदार्थांचा वापर तळ्यातील प्लवंगाच्या वाढीसाठी कंपोस्ट म्हणून होतो. हेच पाणी एकात्मिक किंवा इंटिग्रेटेड मत्स्यसंवर्धन ही कृषी किंवा पशुपालन व्यवसायासोबत मत्स्य उत्पादन करण्याची पद्धत आहे. यामध्ये भातशेती, कुक्कुटपालन, पशुपालन यांच्या सोबत मत्स्यसंवर्धन केले जाते.

जिथे भात शेतीमध्ये ३ ते ८ महिने पाणी राहते, अशा ठिकाणी भातशेती सोबत मत्स्यसंवर्धन केले जाते. त्याच प्रमाणे मत्स्यतळ्यावर पशू किंवा पक्षिपालन फार्म उभारला जातो. या सजीवांची विष्ठा व टाकाऊ पदार्थ पाण्यात पडून त्यावर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक प्लवंग वाढते. त्याचा फायदा मत्स्यसंवर्धनासाठी होतो. अशा प्रकारे शेतातील जमीन व जलस्रोतांचा संपूर्ण वापर करून कमीत कमी श्रम आणि खर्चात चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते.

पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन

(Cage Culture)

ही मत्स्यसंवर्धनाची बंदिस्त पद्धत आहे. यामध्ये पाण्याची मुक्त देवाणघेवाण चालू असताना बंदिस्त जागेत मत्स्यसंवर्धन करतात. सदर पद्धतीत तिलापिया, सायप्रिनस, पंकज इ. मत्स्य प्रजातींचे संवर्धन केले जाते. पिंजरा हा तलावात किंवा धरणामध्ये ठेवला जातो. पिंजऱ्यात माशांची उत्पादन क्षमता १० ते २० पटीने वाढलेली आढळून आली आहे. तसेच, पिंजरा बांधणी हे तळे खोदण्यापेक्षा कमी खर्चिक ठरते.

Fisheries
Fisheries : मत्स्य व्यवसायाला द्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड

बायोफ्लॉक (Bio-Flock)

ही आधुनिक मत्स्यसंवर्धन पद्धती असून, त्यात पोषक तत्त्वांचा वापर आणि पुनर्वापर शक्य आहेत त्यामुळे कमीत कमी पाण्यामध्ये मत्स्यपालन करता येते. कार्बन व नायट्रोजनचे संतुलन साधत पाण्याची गुणवत्ता वाढवली जाते. त्यात सूक्ष्म जंतूंची वाढ केली जाते. यामार्फत माशांना प्रथिनयुक्त खाद्य व ऑक्सिजनचा पुरवठा केला जात असल्यामुळे माशांची वेगाने नैसर्गिक वाढ होते. मत्स्योत्पादन वाढते.

पाणी पुनर्वापर मत्स्यसंवर्धन प्रणाली (Recirculating Aquaculture System)

जिथे पाण्याची उपलब्धता कमी आहे, अशा ठिकाणी कमी पाण्यामध्ये माशांची वाढ केली जाते. या पाण्यात मिसळला गेलेली माशांची विष्ठा, कुजलेले खाद्य व घनकचरा फिल्टरद्वारे वेगळा केला जातो. या टाकाऊ घटकांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा वापर खताप्रमाणे शेतामध्ये केला जातो.

फिल्टर केलेल्या पाण्यामध्ये पुन्हा माशांची वाढ केली जाते. या पद्धतीत कमी जागेत जास्त मत्स्यबीज संचयन करून जास्त मत्स्योत्पादन घेता येते. ५० ते १५० किलो प्रति घनमीटर इतक्या प्रमाणात माशांची घनता ठेवली जाते. अलीकडे शहरी भागामध्येही मत्स्योत्पादनासाठी ही पद्धत वापरली जात आहे.

मत्स्यबीज निर्मिती

उच्च प्रतीचे बीज योग्यवेळी योग्य प्रमाणात उपलब्ध करण्यासाठी मत्स्यबीज निर्मिती या उद्योगाचे महत्त्व मोठे आहे. महाराष्ट्रात अनेक लहान मोठी तलाव, शेततळी व धरणे यात संवर्धनासाठी मत्स्यबीजाची मागणी सातत्याने वाढत आहे.

मत्स्यबीज निर्मितीच्या उद्योगामध्ये मोठ्या संधी असून, त्यातूनही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत. त्याच प्रमाणे मत्स्यबीज निर्मितीनंतर त्याचे पुढील वाहतूक व संगोपन अवस्थेपर्यंत संगोपन करावे लागते. मत्स्यबीज घेऊन त्याची वाढ करण्याचा व्यवसाय तितकाच महत्त्वाचा आहे. यातूनही अधिक रोजगार उपलब्ध होतात.

अमिता जैन, ९९११७५१५९३, (सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, जि. अमरावती)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com