Fishery Employment : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

Fisheries : मत्स्य व्यवसाय म्हणजे केवळ मासे पकडणे व त्यांची विक्री करणे इतक्यापुरताच मर्यादित नाही. तर जिथे पाणी उपलब्ध आहे, ठिकाणी मत्स्य व्यवसायाशी निगडित अनेक रोजगार संधी उपलब्ध होत आहेत. त्यातून ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात.
Fishery Business
Fishery BusinessAgrowon
Published on
Updated on

Employment Opportunities in Fisheries

अमिता जैन, डॉ. भूषण ना. सानप

शेवाळ संवर्धन :

सागरी किनाऱ्यालगतच्या भागामध्ये पाण्यात शेवाळांची लागवड करण्यास भरपूर वाव आहे. या सागरी शेवाळातून आगर, अल्जिनेट व कॅरेजेनन यासारखी अनेक व्यापारीदृष्ट्या महत्त्वाची रसायने उपलब्ध होतात. त्यांचा उपयोग औषधे निर्मिती, खाद्यपदार्थ, रंग उद्योग, कागद व वस्त्र उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या शेवाळांना प्रचंड मागणी असून, उत्तम दरही मिळतो. सध्या तमिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यांच्या किनारी भागात आगर, अल्जिनेट निर्मितीचे उद्योग सुरू झाले असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात शेवाळ लागवड सुरू होत आहे.

जिवंत मासळी विक्री :

बहुतांश वेळा समुद्रातून किंवा गोड्या पाण्याच्या तलावातून पकडलेले मासे अन्य दूरवरच्या भागांमध्ये बर्फामध्ये टाकून पाठवले जातात. तिथे त्यांची विक्री केली जाते. मात्र लोकांकडून ताज्या मासळीची मागणी वाढत आहे. हे लक्षात घेता जिवंत मासळीची विक्री हा व्यवसाय करता येईल. त्यासाठी दुकानात पाण्याचे टाके तयार करून, त्यात विक्रीयोग्य जिवंत मासळी ठेवली जाते. ग्राहकांच्या मागणी व आवडीनुसार ग्राहकांसमोर ते मासे पकडले जातात. ते कापून व स्वच्छ करून दिले जातात. जिवंत मासळी विक्री केंद्राच्या माध्यमातून चांगला नफा मिळू शकतो.

मासळी सुकविणे /खारवणे / धुरी देणे :

किनारी भागात जोमाने चालणारा व प्रामुख्याने महिलांचे वर्चस्व असलेला हा व्यवसाय आहे. बाजारात कमी दर मिळणाऱ्या किंवा जाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सापडणारे छोटे मासे सूर्यप्रकाशामध्ये पसरून वाळवले जातात. काही माशांवर खारवण्याची किंवा धुरी देण्याची प्रक्रिया केली जाते. यातील अनेक पद्धती पारंपरिक असून, त्या प्रामुख्याने किनारी भागातील महिला करत असतात. या पद्धतीमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात वाव आहे.

मूल्यवर्धन व प्रक्रिया उद्योग :

मासे काढल्यानंतर त्याचे खवले व अनावश्यक टाकाऊ भाग काढून टाकले जातात. उत्तम खाण्यायोग्य भाग बर्फाच्छादित करून विक्री करण्याचा व्यवसायातूनही चांगले उत्पन्न मिळू शकते. यातील स्वच्छतेला प्राधान्य दिल्यास ग्राहकांकडून मागणी वाढते.

Fishery Business
Fishery Business : मच्छीमारी व्यवसाय अडचणीत

ताज्या मासळीचे वितरण किंवा निर्यात :

मासा हा अत्यंत नाशिवंत पदार्थ आहे. बाजारात उच्च गुणवत्तेच्या ताज्या मासळीला भरपूर मागणी असते. अशा परिस्थितीत शीतवाहनाच्या साह्याने विविध बाजारपेठेपर्यंत मासे पोहोचवणे, हाही चांगला व्यवसाय आहे. आवश्यक ते परवाने काढून माशांचे निर्यातही करता येते.

मासळी गोठवण व्यवसाय :

मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांच्या शरीरातील विविध जैविक आणि विकरांच्या प्रक्रियेमुळे कुजण्याची प्रक्रिया वेगाने होऊ लागले. हे टाळण्यासाठी माशांच्या शरीराचे तापमान शून्यापेक्षा खाली नेऊन शरीरातील जलांश गोठवला जातो. या गोठविण्याच्या प्रक्रियेमुळे मासे दीर्घकाळ टिकतात. असे गोठविलेल्या माशांची वाहतूक करणेही सोईस्कर होते. मासे व त्यांचे विविध भाग गोठवून विक्री करणे हा परदेशामध्ये चांगलाच फोफावलेला व्यवसाय आहे. भारतासारख्या देशातही त्याला चांगलाच वाव आहे.

माशांपासून उपपदार्थाची निर्मिती :

मत्स्य प्रक्रिया उद्योगात मासळीचे टाकाऊ भाग (सुमारे ४० टक्के) फेकले जातात. त्याची विल्हेवाट लावण्याची मोठी समस्या प्रक्रिया उद्योजकांसमोर असते. खरेतर या टाकाऊ म्हणून फेकून दिल्या जाणाऱ्या भागांमध्ये अनेक जीवनसत्त्वे, प्रथिने व अमिनो आम्ले असतात. त्यांचा वापर करून मत्स्यकुटी, मत्स्यसिलेज, मासळीच्या यकृताचे किंवा शरीराचे तेल निर्मिती करता येते. कोळंबीच्या कवचांपासून कायटीन, कायटोसन तयार केले जाते. या पदार्थांना रंग उद्योग, कागद उद्योग, औषध उद्योग, सौंदर्यप्रसाधने व पशुखाद्य व्यवसायामध्ये मोठी मागणी असते.

मत्स्य खाद्य निर्मिती :

मत्स्य संवर्धनामध्ये माशांच्या खाद्यावर सर्वाधिक खर्च (७० टक्के) होत असतो. पचनास सोपे, सकस, प्रथिने, कर्बोदके, योग्य प्रमाणात जीवनसत्त्वे असणाऱ्या खाद्याला मोठी मागणी असते. उच्च दर्जाचे खाद्य निर्मिती हाही एक उत्तम व्यवसाय आहे.

मत्स्य व्यवसायाशी संबंधित साहित्याची विक्री

मत्स्य व्यवसायात तलावातील पाणी बाहेर काढण्यासाठी पाण्याचे पंप, पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी लागणारी उपकरणे - पी.एच. मीटर, डी.ओ. मीटर, थर्मामीटर इ., मत्स्यखाद्य निर्मिती यंत्र, तलावात खाद्य पुरविणारे यंत्र, मासे काढण्यासाठी जाळे, जनरेटर इ. साहित्याला नियमित मागणी असते. त्याच्या विक्री किंवा वितरणातूनही चांगले उत्पन्न मिळू शकते.

मत्स्य व्यवसाय मार्गदर्शन केंद्र :

मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण सध्या उपलब्ध आहे. या पदवीसोबतच योग्य तो अनुभव मिळाल्यानंतर मत्स्य व्यवसायाशी संबंधित सल्ला सेवा सुरू करणे शक्य आहे. कारण नव्याने व्यवसायामध्ये उतरू इच्छिणाऱ्या लोकांसाठी अशा तज्ज्ञ व्यक्ती नेहमीच आवश्यक असतात. मार्गदर्शनासाठी योग्य ती सल्ला फी घेता येते.

Fishery Business
Fisheries Employment Opportunity : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

ॲक्वापोनिक्स :

ॲक्वापोनिक्स ही वनस्पती व जलीय परिसंस्था यांच्यातील एक समन्वय आहे. या पद्धतीत मासे टाक्यांमध्ये वाढवले जातात. त्यात माती विरहित वनस्पती वाढवून माशांसाठी पोषक वातावरण केले जातात. या वनस्पती व मुळांमध्ये असलेले चांगले जिवाणू पाणी स्वच्छ करण्यास मदत करतात.

या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवले जाते. पुन्हा तेच पाणी (सुमारे ९० टक्के) मासे संवर्धनासाठी वापरले जात असल्यामुळे फारच कमी पाण्यामध्ये मत्स्य संवर्धन शक्य होते. यातून बाहेर पडणारे पाणीही शेतीसाठी खत म्हणून उपयोगी ठरते. अशा प्रकारच्या मत्स्यसंवर्धनासाठी तिलापिया हा मासा प्रामुख्याने योग्य आहे.

शोभिवंत माशांशी संबंधित उद्योग

आजकाल घर, कार्यालये किंवा संस्थांमध्ये मत्स्यघर (ॲक्वेरिअम) असणे ही प्रतिष्ठेचे लक्षण बनत आहे. अगदी दवाखान्यांमध्येही त्यांचा वापर तणावमुक्तीसाठी केला जातो. शोभिवंत माशांची पैदास, संगोपन आणि वाढ करून विक्री हा एक चांगला व्यवसाय बनत आहे. अर्थात, त्यासाठी थोडा अभ्यास आणि चिकाटी आवश्यक असते. इतके पाणी आणि जागा उपलब्ध नसल्यास भारतामध्ये किंवा परदेशामध्ये पैदास केल्या जाणाऱ्या विविध शोभिवंत मत्स्यजाती मागवून त्याची विक्री घाऊक आणि किरकोळ विक्री करणे असेही पर्याय आहेत. यासाठी जागाही कमी लागते. मागणीनुसार मासे मागवून पुरवठा करायचा असल्याने जोखीमही तुलनेने कमी असते.

अ) मत्स्यालये बांधणी व सुशोभीकरण :

थोडी तांत्रिक माहिती आणि कौशल्ये असल्यास ग्राहकांच्या मागणीनुसार विविध आकाराच्या मत्स्यालयाची बांधणी करून देणे हा व्यवसाय करता येतो. त्याला थोड्या सौदर्य दृष्टीची जोड दिल्यास मत्स्यालय सुशोभीकरण हाही व्यवसाय करता येतो. मत्स्यालयासोबत सुशोभीकरणासाठी आवश्यक अन्य साहित्य उदा. फिल्टर, एरिएटर, हिटर, रंगीबेरंगी लाइट्स यांची विक्री केली जाते.

ब) मत्स्यालयातील पाणवनस्पतींचे संगोपन :

शोभिवंत माशांबरोबरच मत्स्यालयामध्ये विविध जलवनस्पतींनाही मागणी असते. अशा वनस्पती मत्स्यालय सुशोभित करण्यासोबतच पाण्याची गुणवत्ताही टिकवितात. लहान आकारांच्या माशांना लपणे, आश्रय आणि विश्रांती यासाठी त्यांचा चांगला उपयोग होतो. या वनस्पतींची वाढ करून विक्री करणे हाही चांगला व्यवसाय होऊ शकतो.

क) मत्स्यालय व्यवस्थापनाची सेवा पुरवणे :

अनेकांना शोभिवंत मासे पाळण्याचा छंद असतो. परंतु व्यस्त जीवनशैलीमुळे घर किंवा कार्यालयातील मत्स्यालयाची स्वच्छता व निगा राखणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी दर आठवडा किंवा पंधरा दिवसांतून एकदा मत्स्यालयाचे पाणी बदलणे, स्वच्छता व अन्य कामे करून देण्याची सेवा पुरवणे शक्य आहे. यातून मत्स्यालयांची संख्या वाढण्यास मदत होईल. त्याचा फायदा संपूर्ण शोभिवंत मत्स्य व्यवसायाला होऊ शकतो. आज ज्या प्रमाणे बंगले किंवा सोसायट्यांच्या बागांची देखभाल करण्याची सेवा अल्प दरामध्ये पुरवली जाते, त्या प्रमाणेच हा व्यवसायही चांगला फोफावू शकतो.

अमिता जैन, ९९११७५१५९३ (सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, जि. अमरावती)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com