Agriculture  Agrowon
यशोगाथा

Agriculture Success Story : ‘ॲग्रो-कट्टा’ बनला कृषी विस्ताराचे सक्षम माध्यम

Agrowon Diwali Ank : मंगरूळपीर येथील माझ्या सायकल दुकानात ‘अॅग्रोवन कट्टा’ सुरू झाला. या कट्ट्यावर कृषी माहितीची देवाणघेवाण होऊन त्याचा शेतात वापरही सुरू केला. परिणामी, शेतकऱ्यांच्या शेतात, घरात समृद्धी आली.

Team Agrowon

रशीद शादाँ

साधारणतः १५-२० वर्षांपूर्वी आजच्या इतकी माध्यमे नव्हती. वर्तमानपत्र, मासिक आणि दूरदर्शन हेच माहितीचे मुख्य स्रोत. संशोधन आणि विविध योजनांच्या प्रसार व प्रचाराची जबाबदारी प्रामुख्याने कृषी खात्याच्या खांद्यावर होती. अशा काळात ‘अॅग्रोवन’ सुरू झाला. हे दैनिक सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, या निरपेक्ष हेतूने मंगरूळपीर येथील माझ्या सायकल दुकानात ‘अॅग्रोवन कट्टा’ सुरू झाला. या कट्ट्यावर कृषी माहितीची देवाणघेवाण होऊन त्याचा शेतात वापरही सुरू केला. परिणामी, शेतकऱ्यांच्या शेतात, घरात समृद्धी आली.

पश्‍चिम विदर्भातील वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर शहरात अकोला चौकात आमचे सायकल दुकान आहे. उर्दू माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर पोटापाण्यासाठी म्हणून १९८५ मध्ये हे सायकल दुकान सुरू केले. त्या काळात दळणवळणाची फारशी साधने नव्हती. सायकल हे सर्वसामान्यांचे वाहन होते. खरे तर सायकलींच्या भरभराटीचाच हा काळ होता.

त्यामुळे दुकानात काम करण्यासाठी सोबतीला आणखी दोन माणसे घ्यावी लागली होती. माझा स्वभावही बऱ्यापैकी बोलका. उर्दू माध्यमातून शिकलो असल्याने मराठी चांगली बोलता येत असली, तरी वाचन मात्र तोडके मोडके करता येते. तरीही मराठीतून कविता करणारा कवी माणूस. मित्रांच्या मदतीने मराठीमध्ये कवितासंग्रहसुद्धा प्रकाशित केले आहेत. अशा कलासक्त स्वभावामुळे गप्पांना अंत नाही आणि येणाऱ्या, बसणाऱ्या माणसांना कधी खळ पडत नाही.

खरेतर शेतीचा आणि आमचा तसा लांबूनही संबंध नाही. पण तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांसाठी येणारे शेतकरी येथून सायकल भाड्याने नेत. स्वतःच्या सायकलींची दुरुस्ती करत. त्या वेळी तासन् तास चाललेल्या चर्चांमधून कुठले पीक लावले, काय उत्पादन आले, भाव किती मिळतो आहे, कीड-रोगांबाबतही बोलणे व्हायचे.

फायदा नुकसान या पद्धतीने चाललेल्या बोलण्यामध्ये चांगली शेती कोण करतो, नवीन काय केले, याविषयी फारच थोडे बोलणे असायचे. दरम्यान, अॅग्रोवन सुरू झाला होता. त्याचा उल्लेख शेतकऱ्यांच्या बोलण्यात येत होता. काही जण तर त्यांच्या गावात अॅग्रोवन मिळत नसल्यामुळे थेट तालुक्याच्या गावात येऊन घेऊन जायचे. त्यातून शेतीची शास्त्रशुद्ध माहिती मिळते, असे समजल्याने मी एक अॅग्रोवन या सर्व शेतकऱ्यांसाठी सुरू केला.

त्याचा चांगला प्रतिसाद आला. पण एक पेपर किती जणांना पुरणार? दुकानावर येणारे शेतकरी केशवराव भगत व इतर काही शेतकऱ्यांशी चर्चा करत २००८ मध्ये अॅग्रो कट्टा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणखी काही अॅग्रोवन घेऊ लागलो. पुढे काही जणांचे अॅग्रोवन पेपर आमच्या दुकानाच्या पत्त्यावर येऊन पडू लागले. हे सर्व वाचकांसाठी मोफत वाचायला मिळू लागले. या ॲग्रोवन कट्ट्याच्या माध्यमातून सुरू झालेली ही विस्तारसेवा अविरतपणे सुरू आहे. शेतकऱ्यांपर्यंत कृषीचे ज्ञान पोहोचवणे, हाच एकमेव हेतू या प्रकल्पामागे आहे.

गोतावळा वाढला

सन २००८ ते २०२३ या १५ वर्षांच्या वाटचालीत या कट्ट्यावर नियमित येणाऱ्या माणसांचा एक गोतावळा बनला आहे. जागरूक शेतकऱ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ झाले आहे. केशवराव भगत, गंगाराम खांडरे, भाऊराव व्यवहारे, विठ्ठल ब्रह्मकार, डिगांबर गिरी, चंद्रकांत पाकधने असे असंख्य शेतकरी या कट्ट्याच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेले. त्यांच्यात ऋणानुबंध तयार झाले.

आता केवळ शेतीच नाही तर एकमेकांच्या सुखदुःखातही ते आवर्जून भाग घेतात. हळूहळू प्रत्येक जण पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळला. कुणी बारमाही भाजीपाला घेऊ लागले. तर कुणी थोडीफार फळबाग लावत आपल्या उत्पन्नाचा स्रोत वाढवला. कुणी वर्षातून तीन पिके घेऊ लागला. शेतीतील शास्त्रशुद्ध ज्ञानाच्या बळावर स्वतःच्या उत्पन्नात भर घालण्यात शेतकरी यशस्वी ठरत आहेत, याचेच मला समाधान वाटते.

हा गोतावळा शेतीविषयक माहिती, प्रयोगांवर चर्चा करतो. कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांशीही किंवा यशकथांच्या शेतकऱ्यांशी येथूनच संपर्क साधतो. अधिक शास्त्रशुद्ध माहिती घेऊन स्वतःपाशीच न ठेवता लगेच इतरांपर्यंत प्रसारित करतो. या कट्ट्यावर दिवसभरात मंगरूळपीर जवळच्या १५ ते २० गावखेड्यातील ४०-५० जण येतात. त्यातील बऱ्याच जणांना वाचनाची आवड आहे.

ते संपूर्ण पेपर वाचल्याशिवाय हलत नाही. काही जण नुसतेच पेपर चाळतात. हा कट्टा अविरत पुढे सुरू राहावा यासाठी अनेकांनी मदतीचे हातही पुढे केले. चंद्रकांत पाकधने यांनी वाचकांना बसण्यासाठी खुर्च्या भेट दिल्या. विशेष म्हणजे कृषी विभागातील कृषी अधिकारी, कर्मचारी आणि विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक मंगरूळपीरला आले, तर या कट्ट्याला भेट दिल्याशिवाय जात नाही.

ज्ञानाच्या प्रसाराची किमया

आज वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर हा तालुका फलोत्पादन, नवनवीन पीकपद्धती, भाजीपाला उत्पादन अशा विविध क्षेत्रांत अग्रेसर बनतो आहे. या तालुक्यात संत्रा हे मुख्य फळपीक झाले आहे. हळदीचे क्षेत्रही विस्तारले. आता तालुक्यातून समृद्धी महामार्ग गेला आहे. त्यामुळे पिकविलेला शेतीमाल नागपूर, मुंबईला अवघ्या चार-पाच तासांत पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध झाली. बदलाची ही नवी सुरुवात येत्या काही वर्षांत शेतकऱ्यांसाठी निश्‍चितच उपयोगी होणार आहे.

...म्हणून तर हे दिवस दिसले

वरुड बुद्रुक गावातील विठ्ठल ब्रह्मकार हे अत्यल्प भूधारक शेतकरी. वडिलोपार्जित पाऊण एकर शेती त्यांच्या वाट्याला आली आहे. एवढ्या क्षेत्रातील पिकातून कुटुंबाचे फारसे भागत नव्हते. ते सुरुवातीपासून ट्रॅक्टरचालक म्हणूनही काम करत. त्यात त्यांनी नैपुण्यता मिळवली. पुढे बीबीएफ पेरणी तंत्राने लागवड कशी करायची हेही शिकून घेतले. त्यामुळे शासनाच्या कृषी समृद्धी प्रकल्पांतर्गत त्यांना या प्रकारच्या लागवडीच्या प्रशिक्षणासाठी राज्यभर फिरण्याची संधी मिळाली.

या फिरतीमध्ये अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांची शेती पाहण्याचा योग आला. आपणही असे काही करण्याची प्रेरणा निर्माण झाली. मग ठरवले की स्वतःच्या शेतातही फळबाग लावायची. विविध शेतकऱ्यांसोबत चर्चा करून सीताफळाची निवड केली. आज पाऊण एकरातील ही बाग वर्षाला लाखभर उत्पन्न देऊ लागली आहे. सोबतीला ते भावाचेही शेत बटईने करतात. या शेतात वर्षात दोन ते तीन पिके काढतात. खरिपाचे पीक काढून गेल्या वर्षी त्यांनी कांदा बीजोत्पादन केले.

त्यातून तीन लाखांपर्यंत उत्पन्न झाले. अर्धा पैसा भावाला दिला. कमी क्षेत्रातही हिमतीने आज विठ्ठल ब्रह्मकार प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. सीताफळांची स्वतः विक्री केल्यामुळे अधिक दर मिळवत आहेत. सुरुवातीला सेंद्रिय खतांवर भर देता देता पुढे चक्क रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे बंद केला. सीताफळ, कपाशीसारख्या पिकाला सेंद्रिय निविष्ठा वापरतो. माझ्या पिकात व रासायनिक खत वापरणाऱ्यांच्या पिकात फारसा फरक नसतो.

उलट माझे पीक हे कमी खर्चात मला त्यांच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळवून देते. शिवाय माझी जमीन ही दिवसेंदिवस सुपीक बनते आहे. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढत आहे. माझ्या कुटुंबासाठी ही मोठी समाधान देणारी बाब आहे. पेपरमध्ये वाचले आणि विसरून गेलो असे बहुतेकांच्या बाबतीत होते. पण वाचले, पाहिले ते शेतात राबवायचा प्रयत्न केला. हळूहळू का होईना, शास्त्रीय माहितीचा प्रत्यक्ष शेतात वापर सुरू केल्यामुळे हे दिवस दिसू शकले, असे विठ्ठल ब्रह्मकार उत्साहाने सांगतात.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crops: जीएम आणि जनुकीय संपादित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?; तज्ज्ञ म्हणतात...

Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळ न्यायालयात जाणार; कागदपत्रांची बारकाईने पडताळणी सुरू

Shikshanratna Award: डॉ. साताप्पा खरबडे यांचा शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मान

Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी

UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित

SCROLL FOR NEXT