Cotton Disease Agrowon
टेक्नोवन

Cotton Disease : गुलाबी बोंड अळीवर मिळविले नियंत्रण

Pink Bollworm Infestation : गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव ३३ ते ४२ टक्क्यांपर्यंत घटल्याचे आढळले आहे. कीटकनाशकांवरील खर्च ४६ ते ३३ टक्के व वापर ३७ ते ३८ टक्के कमी होऊन प्रकल्पातील तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी पथदर्शक ठरत असल्याचे आढळले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

विनोद इंगोले

Cotton Pest Management : अलीकडील काळात गुलाबी बोंड अळी ही कपाशीवरील सर्वात गंभीर समस्या तयार झाली आहे. त्याची दखल घेत केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या निधीतून नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडून कीटकनाशक प्रतिकार व्यवस्थापन (आयआरएम) प्रकल्प २०१८ पासून देशभरात राबविण्यात येत आहे.

यंदाच्या वर्षी १० राज्यांचा त्यात समावेश आहे. सुरुवातीच्या वर्षापासूनच महाराष्ट्राचा त्यात समावेश आहे. मागील वर्षी राज्यातील ११ जिल्ह्यांचा त्यात समावेश होता. यंदा नागपूर, बुलडाणा हे जिल्हे त्यातून वगळण्यात आले. यवतमाळ येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत व जळगाव येथील अशा दोन कृषी विज्ञान केंद्रांचाही (केव्हीके) प्रकल्पात सहभाग आहे. प्रकल्पाद्वारे कापूस उत्पादकांन प्रकल्पातून तंत्रज्ञान मार्गदर्शन देण्यात येत आहे. संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विश्‍लेष नगरारे प्रकल्पाची जबाबदारी सांभाळत आहेत.

गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाचे प्रयत्न

देशात २०१४ पासून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढता असल्याचे निरीक्षण नागपूरच्या संस्थेकडून नोंदविण्यात आले आहे. बीजी- टू हे वाणरूपी तंत्रज्ञानही या अळीसाठी प्रतिकारक ठरले नसल्याची बाब समोर आली आहे. कपाशीचे पीक फूल आणि बोंडांवर आल्यानंतर सप्टेंबरपासून या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. उत्तरेकडील राज्यांत एप्रिलच्या मध्यातच कापसाची लागवड होते.

त्यामुळे देशाच्या अन्य भागांच्या तुलनेत तेथे प्रादुर्भाव लवकर दिसून येतो. प्रत्येक जिल्ह्यात पाच गावे, प्रत्येक गावात १२ एकर असे एकूण ६० एकर क्षेत्र व प्रत्येक अंतर्भूत शेतकऱ्याचे एक एकर क्षेत्र अशी प्रकल्पाची रचना आहे. शेतकऱ्यांना कामगंध सापळे, कडुनिंबावर आधारित तसेच शिफारसींपैकी एक रासायनिक कीटकनाशक असा लाभ दिला जातो. प्रशिक्षण, शिवार भेंट, मोबाइल फोनद्वारे ‘व्हॉइस मेसेज’, मेळावे याव्दारे गुलाबी बोंड अळी नियंत्रण विषयक जागृतीवर भर देण्यात आला आहे.

गुलाबी बोंड अळी नियंत्रण- रणनीती- ठळक बाबी

वेळेवर पेरणी, तुडतुड्यास सहनशील, कमी कालावधीतील शिफारस वाणांची निवड.

अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी दोन कामगंध सापळे.

पीक ५० ते ६० दिवसांचे झाल्यानंतर कडुनिंब आधारित कीटकनाशकाचा वापर.

आर्थिक नुकसान पातळीनुसार (पीक फुलांवर किंवा बोंडावर असताना) दहा टक्‍के प्रादुर्भाव असल्यास अथवा कामगंध सापळ्यामध्ये सरासरी ८ नर पतंग सतत ३ दिवस आढळल्यास कीटकनाशक फवारणी.

एकरी २० बोंडाचे निरीक्षण करून प्रादुर्भावाचा अंदाज घेत फवारणीची शिफारस.

फवारणी मात्रा ( मिली प्रति एकरी)

क्‍लोरपायरीफॉस (२० टक्‍के ईसी) ५०० मिलि, क्‍विनॉलफॉस (२० टक्‍के एएफ)- ५०० मिलि,

इमामेक्टिन बेन्झोएट (५ एसजी) १०० ग्रॅम, इंडोक्‍साकार्ब (१४.५ एससी)- २०० मिलि,

प्रोफेनोफॉस (५० टक्‍के ईसी) ६०० मिलि.

रसायनांचा वापर केलेला नसल्यास लागवडीनंतर ९० ते १०० दिवसांनी- ट्रायकोग्रामा मित्रकीटकाची

६० हजार अंडी प्रति एकरी शेतात सोडण्याची शिफारस.

पीक चार महिन्यांचे झाल्यावर ‘सिंथेटिक पायरेथ्रॉइड्‍स’ गटातील सायपरमेथ्रीन, डेल्टामेथ्रीन, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन आदींची फवारणी.

नर पतंगांना मादी पतंगांकडे आकर्षित करण्यासाठी यंदापासून ‘मेटिंग डिस्ट्रप्शन टेक्नॉलॉजी’ची प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. यात जेल स्वरूपात व तारेचा वापर करून ल्यूरचा वापर करण्यात आला आहे.

पेरणीच्या १८० दिवसांनंतर पीक ठेवू नये.

काढणीनंतर धसकटे, पीक अवशेष यांचे शिफारशीनुसार व्यवस्थापन.

(कंपोस्टिंग, ब्रिकेटस निर्मिती आदी)

प्रकल्पाचे निष्कर्ष

सहा वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे निष्कर्ष आता समोर आले आहेत. त्यानुसार २०१९- २० ते २०२३-२४ या कालावधीत कीटकनाशकांवरील खर्च ४६ ते ३३ टक्के तर एकूण वापर ३७ ते ३८ टक्के कमी झाल्याचे आढळले आहे. हेक्टरी उत्पादनात अडीच ते तीन क्विंटलची वाढ झाली आहे.

तर गुलाबी बोंड अळीचा बोंडांमधील प्रादुर्भाव ३३ ते ४२ टक्क्यांपर्यंत घटल्याचे आढळले आहे. त्यातून निसर्ग संवर्धन होण्यासही मदत झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातही राबवलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यात बऱ्याच अंशी यश आल्याचे तेथील केव्हीकेचे प्रमुख डॉ. सुरेश नेमाडे आणि कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर यांनी सांगितले.

आमचे आदिवासीबहुल गाव आहे. संयुक्त कुटुंबाची आमची दहा एकर शेती असून, या संपूर्ण शिवारात कापूस आहे. पैकी एक एकर क्षेत्राची ‘केव्हीके’ यवतमाळच्या माध्यमातून प्रकल्पातील प्रात्यक्षिकासाठी निवड झाली. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यास एकरी अवघी ५ ते ६ क्‍विंटल किंवा त्याहून कमी उत्पादन मिळते असा अनुभव आहे. मात्र प्रकल्पातील बाबींमुळे आठ ते ९ क्‍विंटलपर्यंत उत्पादन घेता आले. सर्व वातावरण पोषक असल्यास एकरी १२ क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळते. आता माझ्याकडे प्रकल्प संपला असला त्यातील बाबींच्या वापरावर भर दिला आहे.
आशिष बबनराव गायकी ९७६३१७५१०३, लखमापूर (टेंभुर्णी), ता. जि. यवतमाळ
माझी ११ एकर कपाशी आहे. पूर्वी शेतात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव जास्तच प्रमाणात होता. उत्पादकता पूर्वीच्या एकरी १० क्‍विंटलवरुन सहा ते ७ क्‍विंटलवर आली होती. प्रकल्पात सहभागी झाल्याने त्यातील शिफारशींचा वापर करता आला. त्यातून उत्पादकता ९ ते १० क्‍विंटलवर पोहोचली आहे. काढणी शिफारशीनुसार करून या क्षेत्रात गहू, भाजीपाला किंवा जनावरांसाठी चारा घेतो. त्यातून पीक फेरपालट होते. कपाशीची उत्पादकता त्यातून वाढते असा अनुभव आहे.
सचिन विठ्ठल कारामोरे ९५११६९०३४०, नागापूर, सेवाग्राम, जि. वर्धा

डॉ. विश्‍लेष नगरारे ९४२०३९७१७८

(प्रमुख शास्त्रज्ञ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर)

डॉ. प्रमोद मगर ७७५७०८१८८५ (केव्हीके यवतमाळ)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara Vidhansabha Election 2024 : सातारा जिल्ह्यात चुरशीने ७१.९५ टक्के मतदान

Kashmir Cold Weather : हिमवृष्टीने काश्‍मीरमध्ये थंडीचा कडाका वाढला

Memorandum of Understanding : दापोली येथील कृषी विद्यापीठाचा ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठाशी करार

Sugar Factory : वेळेत परवाने दिल्याने ३८ कारखान्यांची धुराडी पेटली

Farmer Producer Organizations : ‘एफपीओं’ना बीजोत्पादनात आणा; केंद्राच्या सूचना

SCROLL FOR NEXT