Cotton Crop
Cotton Crop Agrowon

Cotton Pest : कपाशी पिकातील गुलाबी बोंड अळी, बोंडसड नियंत्रण

Bollworm Control : भविष्यात वाढण्याची शक्यता असलेला गुलाबी बोंड अळी व बोंडसडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.

डॉ. वाय. जी. प्रसाद, डॉ. जी. टी. बेहेरे

Cotton Bondali : सध्या बऱ्याच भागात कपाशीचे पीक हे साधारणत: १०० ते १२० दिवसांचे आहे, तर काही भागात १ ते ३ वेचण्याही झालेल्या दिसतात. संस्थेकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणात कामगंध सापळ्यात अडकणाऱ्या गुलाबी बोंड अळीच्या पतंगांची संख्या ८ प्रति सापळा प्रतिदिनपेक्षा जास्त दिसून येत आहे. अशा शेतातील हिरव्या बोंडाचे नमुने उघडून पाहिले असता गुलाबी बोंड अळी आणि बोंड सड या रोगाचा प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीच्यावर आढळत आहे. हा सध्याचा आणि भविष्यात वाढण्याची शक्यता असलेला गुलाबी बोंड अळी व बोंडसडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.

गुलाबी बोंड अळी कीड व्यवस्थापन

सर्वेक्षण : प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात लावलेल्या कामगंध सापळ्यांत अडकणाऱ्या पतंगाच्या संख्यांचे नियमित सर्वेक्षण करावे. गुलाबी अळी पूर्णतः बोंडाच्या आतमध्ये राहून नुकसान करत असल्याने वरून सहजासहजी प्रादुर्भाव झालेला दिसून येत नाही. प्रादुर्भावग्रस्त बोंडे उमलण्यामध्ये अडथळा येऊन ते अर्धवट उमलतात. अशा बोंडामध्ये पावसाचे पाणी शिरते. बऱ्याचदा दुय्यम बुरशींची वाढ होऊन पूर्ण बोंडे सडतात.

गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावासाठी बोंडे लागण्याच्या अवस्थेत शेताचे दर आठवड्याला नमुन्यादाखल काही हिरवी बोंडे फोडून तपासणीही करावी. त्यासाठी एकरी अनिश्‍चित स्वरूपात निवडलेल्या २० झाडांचे प्रत्येकी एक बोंड याप्रमाणे २० बोंडाचा नमुना घ्यावा. २० पैकी किमान २ बोंडे (१० टक्के) प्रादुर्भावग्रस्त असतील अथवा ८ पतंग प्रति कामगंध सापळा प्रति दिन असे सलग तीन दिवस आढळले, तर प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्याचे समजून शिफारशीप्रमाणे कीडनाशकाची फवारणी करावी. गुलाबी बोंड अळी आणि बोंडसडचा असल्यास एकात्मिक संरक्षण उपाययोजनांसह फवारणीचा निर्णय घ्यावा.

Cotton Crop
Chhagan Bhujbal : मराठा समाजास सरसकट कुणबी दाखले देण्यास आमचा विरोधच ; छगन भुजबळ

अन्य रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पायरेथ्रॉइड वर्गातील कीटकनाशकांचा (उदा. सायपरमेथ्रीन, लॅम्बडा सायहॅलोथ्रिन, फेनव्हलरेट आदी. कापूस हंगामाच्या सुरुवातीच्या १०० ते १२० दिवसांपर्यंत वापरू नये, अशी शिफारस आहे. त्यामुळे जर आपले पीक पेरणीनंतर पीक ९० ते १२० दिवसांच्या कालावधीमध्ये असेल, तर फवारणी प्रति लिटर पाणी इंडोक्साकार्ब (१४.५ एस.सी.) १ मि.लि. किंवा इमामेक्टिन बेंजोएट (५ टक्के एस. जी.) ०.५ ग्रॅम किंवा क्लोरपायरिफॉस (२० टक्के ईसी) २.५ मि.लि.

अर्थात, सध्या बऱ्याच ठिकाणी हा कालावधी उलटून गेला आहे. बहुतांश ठिकाणी पीक पेरणीनंतर १२० दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काळाचे आहे. हे लक्षात घेता, पुढीलपैकी एका कीडनाशकाची फवारणी करावी. (प्रमाण ः प्रति लिटर पाणी) सायपरमेथ्रिन (१० टक्के ईसी) १ ते १.५ मि.लि. किंवा सायपरमेथ्रिन (२५ टक्के ईसी) ०.४ ते ०.६ मि.लि. किंवा अल्फा सायपरमेथ्रिन (१० टक्के ईसी) ०.६ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५ ईसी) १ मि.लि. किंवा डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के ईसी) १ मि.लि. किंवा फेनप्रोपाथ्रीन (१० टक्के ईसी) १.५ ते २ मि.लि.

टीप : एकावेळी एकापेक्षा अधिक कीटकनाशकांचे मिश्रण फवारू नये. फवारणी करतेवेळी हातमोजे, चष्मा, संरक्षक कपडे इ. वापरावेत.

बोंड सड रोगाचे प्रकार

मागच्या दोन-तीन वर्षांपासून राज्याच्या प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यामध्ये हिरव्या बोंडातील आतील भाग सडण्याची समस्या प्रामुख्याने बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत आढळत आहे. अशी बहुतेक बोंडे बाह्य भागावरून निरोगी किंवा रस शोषक किडी व ढेकूण यांच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसतात. मात्र अशी हिरवी बोंडे फोडून बघितल्यानंतर आतील रुई व बिया प्रामुख्याने पिवळसर - गुलाबी ते लाल रंगाच्या होऊन सडल्याचे आढळते. साधारणतः बोंडातील एक ते दोन कप्पे, तर काही ठिकाणी संपूर्ण बोंड सडल्याचे आढळले. संस्थेने हिरव्या बोंडाचे नमुने फोडून केलेल्या सर्वेक्षणात अनेक ठिकाणी बोंडसडचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर आढळून आलेला आहे.

Cotton Crop
Rabi Sowing : रब्बी ज्वारीची ८ हजार ९७५ हेक्टरवर पेरणी

बोंड सडण्याचे प्रामुख्याने दोन प्रकार आढळतात.

बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा संसर्ग : या प्रकारात मुख्यतः काही रोगकारक बुरशी, कुजलेल्या अवशेषांवर जगणारे सूक्ष्मजीव तसेच काही प्रमाणात बोंडावरील जिवाणू कारणीभूत असतो.

आंतरिक बोंडसड रोग : ही समस्या प्रामुख्याने कमी प्राणवायू अवस्थेत तग धरणारे संधिसाधू जिवाणू, रोगकारक जिवाणू आणि काही प्रमाणात आंतरवनस्पतीय रोगकारक बुरशीच्या संसर्गामुळे होतो. अशी बोंडे बाहेरून निरोगी दिसतात. मात्र आतील रुई पिवळसर-गुलाबी ते लाल-तपकिरी रंगाची होऊन सडते. विकसित अवस्थेतील बियासुद्धा सडल्याचे आढळतात.

बोंडसड रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना

नत्रयुक्त खतांचा अति वापर टाळावा.

चांगल्या व्यवस्थापन पद्धतींद्वारे कापूस पिकाची अतिवाढ रोखावी.

लाल रंगाच्या ढेकणापासून पिकाचे संरक्षण करावे.

बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी कार्बेन्डाझिम (१२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६३ टक्के डब्ल्यू.पी.) (संयुक्त बुरशीनाशक) ०.३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यू.पी.) ०.४ ग्रॅम किंवा मेटीराम (५५ टक्के) अधिक पायराक्लोस्ट्रोबिन (५ टक्के डब्ल्यू.जी.) २ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५ टक्के ई.सी.) १ मि.लि. किंवा ॲझोक्सीस्ट्रॉबीन (१८.२ टक्के डब्ल्यू/डब्ल्यू) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४ टक्के डब्ल्यू/डब्ल्यू एस.सी.) (संयुक्त बुरशीनाशक) १ मि.लि. किंवा प्रोपीनेब (७० टक्के डब्ल्यू.पी.) २.५ ते ३ ग्रॅम. आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून दुसरी फवारणी करावी.

- डॉ. जी. टी. बेहेरे,

९४०२५०६४६१

(केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com