Pink Bollworm : कापूस पट्ट्यात गुलाबी बोंड अळीचा शिरकाव

Cotton Pinkball Worm : विदर्भात कापूस पिकात गुलाबी बोंड अळीचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे पिकाचे अधिकचे नुकसान होत असून, शेतकरी या समस्येमुळे चिंतेत आहेत.
Pink bollworm on cotton
Pink bollworm on cottonAgrowon

Akola News : अकोला जिल्ह्यात कापूस पट्ट्यात गुलाबी बोंड अळीचा अखेर शिरकाव झाला असून, तेल्हारा तालुक्यात तळेगाव परिसरात अळीने केलेले नुकसान समोर आले आहे. शेतकरी अळीच्या निर्मूलनासाठी कीडनाशकाच्या फवारणीला लागला आहे.

Pink bollworm on cotton
Cotton Pink Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कपाशी फरदड टाळावी

या हंगामात कपाशीच्या पिकावर आजपर्यंत गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसून आलेला नव्हता. कृषी विभागाकडूनही तसे दावे केले जात होते. आता ही अळी दिसू लागली आहे. जूनच्या सुरुवातीला लागवड झालेले पीक आता सुमारे ७० दिवसांपेक्षा अधिक कालावधीचे झाले आहे. कपाशीचे पीक ४५ ते ५० दिवसांचे झाल्यानंतर पिकावर डोमकळ्या किंवा अर्धवट उमललेली फुले दिसू लागतात.

यंदा अळी उशिरा आली. सध्या कपाशीचे पीक बहुतांश ठिकाणी संरक्षित सिंचनावर लागवड केली असल्याने आता फुलपात्या, बोंडाच्या अवस्थेत आहे. बऱ्याच झाडांवर १० ते १५ बोंड्यासुद्धा परिपक्व होण्याच्या स्थितीत आहेत.

Pink bollworm on cotton
अकोला जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना विमा भरपाई द्यावी

तेल्हारा तालुक्यातील तळेगाव परिसरात मंगळवारी (ता. १५) कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या वेळी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. सध्या अळीने नुकसान पातळी ओलांडलेली नाही. मागील दोन ते तीन हंगामांत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेला नव्हता. यंदा सुरुवातीपासूनच ही लक्षणे दिसून येत होती. सतत ढगाळ वातावरण अळीसाठी पोषक बनलेले आहे.

उपाययोजना करण्याची सूचना

कपाशीच्या पिकात गुलाबी बोंड अळी सर्वेक्षणासाठी प्रति एकरी तीन ते चार कामगंध सापळे लावावेत. कीड व्यवस्थापनासाठी एकरी आठ ते दहा कामगंध सापळे लावावे. कामगंध सापळे पिकाच्या उंचीच्या सहा इंचावर लावावेत. गुलाबी बोंड अळीचा प्राथमिक स्वरूपाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा कडुनिंबावर आधारित कीटकनाशकाची शिफारसीनुसार फवारणी करावी.

अळीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास पाच ते दहा टक्के प्रादुर्भावग्रस्त पात्या, फुले (डोमकळ्या) किंवा अर्धवट उमललेली फुले आढळल्यास अझाडिरेक्टीन किंवा कृषी विद्यापीठांच्या सल्ल्यानुसार कीटकनाशकांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

वऱ्हाडात कपाशीचे साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र

या खरीप हंगामात बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत कपाशीची लागवड सरासरीपेक्षा वाढली. बुलडाण्यात एक लाख ९४ हजार ६३९ हेक्टर, वाशीममध्ये २३ हजार ९१३ हेक्टरवर पेरणी झाली. अकोल्यात कपाशीचे क्षेत्र घटले. सरासरी १,५३,५७१ हेक्टरच्या तुलनेत १,२८,५७१ हेक्टरवर लागवड झाली.

पाऊस उशिरा आल्याने कोरडवाहू क्षेत्रातील कपाशीचे पीक आता महिना ते दीड महिना कालावधीचे झालेले आहे. सिंचनावर लागवड झालेल्या कपाशीने ६० ते ७० दिवसांचा पल्ला गाठलेला आहे. यंदा वऱ्हाडातील तीनही जिल्हे मिळून तीन लाख ४५ हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवड झालेली आहे.

मी पाच एकर शेती लागवडीसाठी केलेली आहे. या शेतात पाचही एकरांत कपाशीची लागवड केली. सध्या बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. याबाबत योग्य उपाययोजना, सल्ल्याची गरज आहे.
- श्याम गौतम हिवराळे, शेतकरी, तळेगाव बाजार, जि. अकोला

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com