
कपाशी पिकामध्ये वाढीच्या अवस्थेत बोंड अळी (Boll worm On Cotton) तसेच विविध रसशोषक किडींचा प्रादुर्भाव (Sucking Pest Outbreak) मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सतर्कता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. किडींचे योग्यप्रकारे व्यवस्थापन (Cotton Pest Management) न केल्यास उत्पादनात सुमारे ४० ते ९० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. त्यामुळे पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे. किडींनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास नियंत्रणासाठी योग्य उपाययोजनांचा अवलंब केल्यास संभाव्य नुकसान टाळता येते.
गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन ः
- आठवड्यातून एक वेळ कपाशीच्या शेतातील १२ ते १४ झाडांचे निरीक्षण करावे. संपूर्ण शेताचे प्रतिनिधित्व करू शकतील अशीच झाडे निवडावीत. या झाडावरील एकंदर पात्या, कळ्या, फुले आणि हिरवी बोंडे मोजावीत. त्यापैकी गुलाबी बोंड अळी प्रादुर्भावग्रस्त किती झाडे आहेत, ती काळजीपूर्वक मोजावीत. विशेषतः डोमकळ्या दिसतात का ते पाहावे. नुकसानीचे प्रमाण ५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास, व्यवस्थापनासाठी योग्य ती उपाययोजना करावी.
- पीक ४५ ते ५० दिवसांचे झाल्यावर शेतामध्ये बोंड अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी २ कामगंध सापळे उभारावेत. नर पतंग पकडण्यासाठी हेक्टरी २० कामगंध सापले वापरावेत.
- बोंड अळ्यांच्या प्रकारानुसार विविध ल्युरचा वापर करावा. प्रत्येक महिन्यात या सापळ्यांमधील ल्यूर बदलावेत.
- सर्वेक्षणासाठी हेक्टरी ५ फेरोमोन सापळे पिकापेक्षा एक ते दीड फूट उंचीवर लावून त्यात गुलाबी बोंड अळीचे लिंग प्रलोभने (ल्यूर) गॉसीपल्यूर बसवावे. या सापळ्यांमध्ये २ ते ३ दिवस सतत ८ ते १० पतंग आढळून आल्यास त्वरित उपाययोजना कराव्यात.
- बीटी कपाशीच्या शेतातील हिरवी बोंडे फोडून नियमित सर्वेक्षण करावे. गुलाबी बोंड अळ्यांनी प्रादुर्भावग्रस्त १० टक्के बोंडे आढळल्यास व्यवस्थापनासाठी उपाययोजना कराव्यात.
- हंगामामध्ये बीटी कपाशीचे शेतात कामगंध सापळे लावावेत. मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडण्यासाठी हेक्टरी २० फेरोमन सापळे लावावेत. नुकसानीचे प्रमाण ५ टक्के पेक्षा कमी असल्यास डोमकळ्या जमा करून नष्ट कराव्यात.
- ट्रायकोग्रामा स्पे. या मित्रकीटकांची अंडी असलेली ट्रायकोकार्ड शेतात लावावीत (१.५ लाख अंडी प्रति हेक्टर).
- पिकावर मित्र कीटक (लेडी बर्ड बीटल, क्रायसोपा) व किडी (मावा, तुडतुडे, फुलकिडे, अळ्या व बोंड अळ्या) यांचे प्रमाण १:५ आढळल्यास, रासायनिक कीटकनाशकाऐवजी निंबोळी अर्क (५ टक्के) प्रमाणे फवारणी करावी.
- हिरव्या बोंड अळीचे नुकसान ५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास, एचएएनपीव्ही ५०० एल.ई. प्रति हेक्टर प्रमाणे फवारावे. मॉन्सूनपूर्व कपाशीची अर्धवट उमटलेली फुले (गुलाबी बोंड अळीच्या डोमकळ्या) तोडून जाळाव्यात.
फवारणी (प्रति १० लिटर पाणी)
किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर,
- निंबोळी अर्क किंवा कडुनिंबयुक्त कीडनाशक ॲझाडिरेक्टीन (३०० पीपीएम) ५० मिलि किंवा स्पिनोसॅड (४५ एस.सी.) २.२२ मिलि किंवा बीटा- सायफ्लुथ्रीन (२.५ टक्के प्रवाही) १० मिलि.
- ट्रायकोग्रामा १.५ लाख अंडी प्रसारण करावेत. तसेच फेरोमोन सापळे (हिरव्या बोंड अळीसाठी हेक्झाल्यूर किंवा हेलील्यूर आणि गुलाबी बोंड अळीसाठी गॉसीपल्यूर) हेक्टरी ८ या प्रमाणात लावावते.
किडीच्या जैविक नियंत्रणासाठी पक्षिथांबे २० प्रति हेक्टर उभारावेत.
गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर खालीलप्रमाणे फवारणी करावी.
आर्थिक नुकसान पातळी ः
सरासरी ८ ते १० पतंग प्रति सापळा सतत २ ते ३ दिवस किंवा १० टक्के नुकसानासह हिरव्या बोंडामध्ये जिवंत अळ्या.
(फवारणी ः प्रतिलिटर पाणी)
क्लोरपायरिफॉस (५० टक्के ईसी) २ मिलि किंवा
प्रोफेनोफॉस (५० टक्के ईसी) ३ मिलि किंवा
थायोडीकार्ब (७५ टक्के डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा
आवश्यकतेनुसार
इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के एजी) ४ ग्रॅम
रस शोषक किडींचे व्यवस्थापन ः
मावा, तुडतुडे, पांढरी माशी तसेच फुलकिडे या रसशोषक किडींचा कपाशीवर प्रादुर्भाव होतो. किडींनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर शिफारशीत खालीलपैकी कीटकनाशकांची फवारणी करावी.
इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के एस.एल.) २ मिलि किंवा
प्रोफेनोफॉस (५० टक्के ई.सी.) २० मिलि
प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
- डॉ. संजय काकडे, ९८२२२३८७८०
(कापूस कृषिविद्यावेत्ता, कापूस संशोधन विभाग,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.