Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे भाव सरकारच्या हाती

Soybean Rate : नवीन हंगामातील सोयाबीन पुढच्या महिन्यापासून बाजारात यायला सुरुवात होईल. बाजारात सध्या प्रति क्विंटल ४००० रुपयांपासून भाव मिळत आहे.

अनिल जाधव

soybean Market Update : सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात ठरत असतो. बाजारातील चढ-उताराचा भारतातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असतो. भारताच्या सोयाबीनचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे ते नाॅन जीएम पीक आहे. पण जीएम सोयाबीनचा पुरवठा वाढला आणि भाव पडले तरी आपल्या सोयाबीनचेही भाव पडतात.

तसेच भारतात सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता आघाडीच्या देशांच्या तुलनेत तीन पटीने कमी आहे. अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता तीन ते साडेतीन टन आहे. तर भारतात केवळ एक टन उत्पादकता आहे. यामुळे भारताच्या शेतकऱ्यांचे हेक्टरी उत्पन्नही कमी आहे.

यंदा सोयाबीनच्या बाजाराने शेतकऱ्यांची खरी चिंता वाढवली. कारण ऑफ सीझनमध्ये म्हणजेच जेव्हा बाजारात आवकेचा दबाव नसतो, शेतकऱ्यांकडे माल नसतो या काळातच भाव गेल्या चार वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचला. अमेरिकेत सोयाबीनचे भाव दबावात येत असल्याने अमेरिकेतील शेतकरी मागील हंगामातील सोयाबीनची विक्री करत आहेत.

शेतकऱ्यांना प्रॉपर्टी टॅक्स, पीकविमा आणि इतर खर्च भागविण्यासाठी पैशांची गरज आहे. एकीकडे जागतिक उत्पादनवाढीचा अंदाज आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची विक्री वाढल्याने गुंतवणुकदारही शाॅर्ट सेलिंग करत आहेत.

चीनकडूनही अमेरिकेच्या सोयाबीनला उठाव कमी झाला आहे. याचाही दबाव सोयाबीनच्या बाजारावर येत आहे. सोयाबीनचा बाजार गेल्या एकाच महिन्यात तब्बल १६ टक्क्यांनी कमी झाला. शुक्रवारी सोयाबीन बाजाराने गेल्या ४ वर्षांतील नीचांकी ९.३६ डाॅलरचा टप्पा गाठला होता. शेवटी बाजार ९.३८ डॉलरवर बंद झाला होता.

यंदा अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, युक्रेन, रशिया, भारत, पॅराग्वे आणि बेनिन या देशांमध्ये उत्पादन वाढेल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) दिला. त्यातही ब्राझील आणि अमेरिकेतील उत्पादन प्रत्येकी १० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे जागतिक सोयाबीन उत्पादन ८.५ टक्क्यांनी वाढून विक्रमी ४ हजार २८७ लाख टनांवर पोहोचेल, असा अंदाज आहे.

अमेरिका यंदा विक्रमी सोयाबीन पीक घेणार आहे. अमेरिकेत यंदा सोयाबीनची पेरणी ३४९ लाख हेक्टरवर झाली होती. वातावरण पोषक असल्याने सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता ३.६ टन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिका यंदा विक्रमी १ हजार २४९ लाख टन उत्पादन घेईल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने दिला. अमेरिकेतील सोयाबीन पीक सध्या फुलोऱ्यात आहे. परिस्थिती पोषक असल्याने उत्पादन वाढेल, असा अंदाज असला तरी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हवामान कसे राहते याकडे बाजाराचे लक्ष आहे.

ब्राझील, अर्जेंटिनात लागवड वाढेल?

यंदा ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन्ही देशांमध्ये सोयाबीनची लागवड वाढण्याची शक्यता यूएसडीएने व्यक्त केली. ब्राझीलमध्ये सोयाबीनची लागवड विशेषतः ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात होते, तर अर्जेंटिनातील लागवड नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळात होते. म्हणजेच या देशांमध्ये अजून पेरणी सुरू व्हायची आहे. पण आताच जागतिक बाजारात सोयाबीनचा भाव पडले आहेत.

गेली तीन वर्षे म्हणजेच कोरोनानंतर सोयाबीनचा भाव चांगला राहिला होता. त्यामुळे अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांतील शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड वाढवली. पण यंदा सोयाबीन पडले आहे. एकाच वर्षात ४० टक्क्यांनी भाव कमी झाले. बाजार कोरोनापूर्व काळातील पातळीवर पोहोचला. त्यामुळे यूएसडीए अंदाज देत असल्याप्रमाणे ब्राझील आणि अर्जेंटिनातील शेतकरी क्षेत्र खरेच वाढवतील का, हा प्रश्‍न बाजारात विचारला जात आहे. ब्राझील आणि अर्जेंटिना हे महत्त्वाचे देश असल्याने तिथे पेरणी वाढली की बाजारभावावर निश्‍चित परिणाम होतो.

२०२३-२४ च्या हंगामात देशनिहाय उत्पादनाचा वाटा (टक्के)

ब्राझील - ३९

अमेरिका - २९

अर्जेंटिना - १३

चीन - ५

भारत - ३

पॅराग्वे - ३

इतर - ८

भारतातली स्थिती

देशात सोयाबीनची लागवड सुरुवातीच्या टप्प्यात जवळपास ९ टक्क्यांनी आघाडीवर होती. पण पेरणी जसजशी अंतिम टप्प्याकडे आली तशी ही आघाडी कमी होत गेली. ९ ऑगस्टपर्यंत सोयाबीनची लागवड केवळ दीड टक्क्याने आघाडीवर आहे. आतापर्यंत जवळपास १२५ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली. तर यूएसडीएच्या मते, भारतातील सोयाबीन उत्पादन यंदा ८ टक्क्यांनी वाढेल. गेल्या हंगामात ११८ लाख टन उत्पादन झाले होते ते यंदा १२८ लाख टनांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज यूएसडीएने दिला. पण पुढील दोन महिन्यांत हवामान कसे राहते यावर बरेच काही अवलंबून आहे.

यंदा सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. गेल्या काही वर्षांत ऐन काढणीच्या काळात म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत सोयाबीन पिकाचे नुकसान होत आहे. यंदाही काढणीच्या काळात पाऊस दणका देऊ शकतो. प्रक्रियादारांनी सांगितले, की मागील काही चांगल्या पावसाच्या वर्षांत सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. विशेष म्हणजे सोयाबीनची गुणवत्ता कमी झाली आहे. यंदाही असे घडू शकते. म्हणजेच देशात नक्की उत्पादन किती राहील, हे पीक काढणीच्या काळात स्पष्ट होईल. आता आपण केवळ जर तरच्या गोष्टी करू शकतो.

आंतरराष्ट्रीय बाजारात मंदीचे वारे

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव पडलेले आहेत. भावात फार मोठ्या सुधारणेची अपेक्षा सध्या तरी दिसत नाही. यूएसडीएने अमेरिकेतील २०२४-२५ चा सरासरी भाव १०.८० डाॅलर प्रतिबुशेल्स राहील, असा अंदाज वर्तविला आहे. तसेच ‘ला निना’चा ब्राझील आणि अर्जेंटिनातील उत्पादनावर परिणाम होत असला तरी यंदा ला निना सप्टेंबर किंवा त्यानंतर निर्माण होऊ शकतो, असा अंदाज आहे. पण ब्राझील आणि अर्जेंटिनातील पिकाला फटका बसेल एवढी त्याची तीव्रता यंदाच्या सोयाबीन हंगामात वाढेल, याची शक्यता खूपच कमी आहे. म्हणजेच यंदा जागतिक सोयाबीन बाजारावर उत्पादनवाढीचा दबाव राहण्याची भीती कायम आहे.

सकारात्मक घटक

देशात यंदा सोयाबीन उत्पादन वाढेल की नाही हे पीक हाती आल्यानंतर कळेलच. पण नव्या हंगामासाठी सध्याच्या मंदीच्या काळातही सकारात्मक घटक दिसत आहेत. नुकतेच सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया, अर्थात ‘सोपा’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नव्या हंगामात सोयाबीनचा शिल्लक साठा निम्म्याने कमी राहील, असे म्हटले आहे. शिल्लक साठा यासाठी महत्त्वाचा असतो यामुळे नव्या हंगामातील एकूण पुरवठ्यावर याचा परिणाम होत असतो. म्हणजेच नव्या हंगामातील उत्पादन आणि मागच्या हंगामातील शिल्लक साठा यावरून नव्या हंगामातील पुरवठा ठरत असतो.

सोपाने सांगितले, की यंदाचा सोयाबीनचा शिल्लक साठा ११ लाख टन असेल, जो मागच्या वर्षी तब्बल २४ लाख टन होता. त्यामुळे यंदा उत्पादन ५ टक्क्यांपर्यंत वाढले तरी देशातील एकूण पुरवठा गेल्या वर्षीपेक्षा वाढण्याची शक्यता नाही. तसेच सोयापेंडचा साठाही वाढलेला नाही. भारताची सोयापेंड निर्यात जुलैपर्यंत १९ लाख २४ हजार टन झाली. जुलै महिन्यातही दीड लाख टनाची निर्यात झाली. म्हणजेच भारताची सोयापेंड निर्यात थांबलेली नाही. हे सकारात्मक घटक मंदीच्या काळातही नव्या हंगामात जमेच्या बाजू ठरू शकतात.

सरकारच्या भूमिकेवर मदार

भारताचे सोयाबीन नाॅन जीएम असले तरी भारताच्या सोयाबीन आणि सोयापेंडेचे भावही आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. या परिस्थितीत भारतीय शेतकऱ्यांना सरकारने दिलासा देणे आवश्यक आहे. सरकारने हमीभावाने सोयाबीनची खरेदी केली तर किमान ४ हजार ८९२ रुपये भाव तरी मिळेल. सरकारला खरेदी करायची नसेल तर सरकार सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवू शकते.

तसेच खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करूनही सरकार देशातील सोयाबीन बाजाराला आधार देऊ शकते. आयातशुल्क वाढविल्यास आयात होणारे तेल महाग होईल. यामुळे देशातील सोयाबीनपासून तयार होणाऱ्या तेलाला चांगला भाव मिळेल. आयात शुल्कातून मिळणाऱ्या उत्पन्नातून सरकारने सोयापेंड निर्यातीसाठी अनुदान दिल्यास निर्यातवाढीला मदत होऊन त्याचाही फायदा बाजाराला होऊ शकतो.

विधानसभा निवडणुकीमुळे सरकारही दक्ष

लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी सरकारला चांगलाच इंगा दाखवला होता. शेतकरीविरोधी धोरणांचा फटका बसल्याचे राज्यातील सर्वच धोरणकर्त्यांनीही मान्य केले. त्यातच सरकार भाव वाढल्यानंतर बाजारात हस्तक्षेप करून खाद्यतेल आयातशुल्क कमी केले, यापूर्वी जीएम सोयापेंड आयातीला परवानगी दिली होती, तसेच आता सोयाबीनचे भाव पडल्यानंतर हस्तक्षेप करा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असून त्या आता दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येणाऱ्या ऐन काळात निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत सोयाबीन उत्पादकांची नाराजी सरकार ओढवून घेणार नाही, अशी अपेक्षा आहे. सरकार सोयाबीनला किमान हमीभाव मिळेल, याची दक्षात घेईल. याची तयारीही सरकार करत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात मंदीचे वारे असले तरी आपल्या शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळण्याची दाट शक्यता आहे.

(लेखक अॅग्रोवन डिजिटलमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर-मार्केट इण्टेलिजन्स आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT