Pune News : नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, कांदा आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
सोयाबीन दबावातच
आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावातील नरमाई कायम आहे. सोयाबीन ११ डाॅलरपेक्षा कमीच पातळीवर दिसून येत आहे. आजही सोयाबीन दुपारपर्यंत वायद्यांमध्ये १०.१९ डाॅलर प्रतिबुशेल्सचा भाव मिळत होता. देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही ४ हजार १०० ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशात सोयापेंडचे भाव ४० हजार रुपये प्रतिटनांवर होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापूस बाजार स्थिर
कापसाच्या बाजारावरील आजही कायम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही कापसाला तसेच सुताला उठाव मिळत नाही. त्यामुळे कापूस भाव दबावातच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाची विक्री वाढलेली आहे. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ६८.९२ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे ५६ हजार ९२० रुपये प्रतिखंडीवर होते. तर बाजार समित्यांमधील भाव ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
टोमॅटोचे भाव नरमले
बाजारात टोमॅटोची आवक वाढत आहे त्या प्रमाणात भावातही काही प्रमाणात नरमाई दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरापासून टोमॅटोचा भाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. टोमॅटोचा सरासरी भाव ५ हजारांवरून आता ३ हजार ५०० रुपयांपर्यंत आल्याचे राज्यातील बाजार समित्यांमध्ये मिळालेल्या दरावरून दिसून येत आहे. आजही बाजारात टोमॅटोला सरासरी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. राज्यातील अनेक भागात सध्या टोमॅटोची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. पण आवक हळूहळू वाढू शकते, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कांदा भाव स्थिरावले
कांद्याचा बाजार आज काहीसा स्थिरावला आहे. कांद्याला वाढलेल्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी मागणी कमी झाली होती. त्याचा परिणाम दरावर दिसून आला. कांद्याला आजही सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील कांद्याची आवक यापुढच्या काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. पण मागणीत होणाऱ्या बदलानुसार बाजारातील दरही बदलू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.
ज्वारीचा बाजार कायम
ज्वारीच्या भावातील तेजी मागील दोन महिन्यांपासून कमी झालेली आहे. बाजारात रब्बीतील ज्वारीची आवक वाढल्यानंतर दरात नरमाई येत गेली. ज्वारीचा बाजार सध्या दबावात आला आहे. राज्यातील बाजारांमध्ये सध्या आवक कमी झाली आहे. पण उठावही स्थिर असल्याने भाव दबावातच आहेत. सध्या ज्वारीला सरासरी वाणानुसार २ हजार ३०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.