Akola News : राज्यात सध्या गेल्या हंगामासाठी कापूस, सोयाबीन उत्पादकांना अनुदान देण्याच्या उद्देशाने प्रक्रिया पार पाडली जात आहे. यासाठी गावोगावी याद्या लावण्यात आल्या असून, कृषी सहायकांना कागदपत्रे, संमतिपत्र गोळा करण्याचे काम देण्यात आले आहे. मात्र याद्यांमध्ये नावे नसल्याचा राग कृषी सहायकांवर काढण्याचे प्रकार घडत असून, काही ठिकाणी त्यांना प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागत आहे.
यासाठी कृषी सहायक हा घटक जबाबदार नसतानाही रोषाला बळी पडत असल्यामुळे या अनुदान प्रक्रियेचे काम करणार नसल्याचा इशारा कृषी सहायक संघटनेने बुधवारी (ता. १४) कृषी आयुक्तांना पत्राद्वारे दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष संदीप केवटे यांनी याबाबत पत्र दिले.
संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे, की संघटनेने संदर्भीय पत्रान्वये विषयांकित कामकाजाच्या अनुषंगाने येत असलेल्या अडचणीची सोडवणूक करण्यासाठी विनंती केली होती. त्यामध्ये विभागाच्या वतीने कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालयांकडून देण्यात आलेल्या लाभार्थी याद्या कृषी सहायकांनी गावांमध्ये प्रसिद्ध केल्यानंतर सदर याद्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांची नावे नमूद नसल्याचे समोर येत आहे.
त्यामुळे विविध कृषी सहायकांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. वाशीम जिल्ह्यातील मानोरा व मंगरूळपीर तालुक्यातील कृषी सहायकास यादीत नावे नसल्याच्या कारणाने यादी प्रसिद्ध करण्यास विरोध झाला. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील महिला कृषी सहायिकेस यादीत नावे नसल्याच्या कारणाने शेतकऱ्यांनी घेराव घातला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात पिरबावडा येथील कृषी सहायकास घेराव घालण्यात आला. तसेच जळगाव जामोद तालुका कृषी अधिकाऱ्यांनाही याच कारणाने घेराव घालण्यात आला आहे. खुलताबाद तालुक्यात कृषी सहायकास यादीत नाव का आले नाही, याचे स्पष्टीकरण देत असताना त्यांना शेतकऱ्याकडून मारहाण झाली असून, त्याच्या जीवितास धोका निर्माण झाल्यामुळे पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या घटनांमुळे क्षेत्रीय स्तरावर कृषी सहायकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर खरीप हंगाम २०२३ मध्ये कापूस व सोयाबीन पिकाची नोंद आहे. मात्र त्यांची नावे शासनाच्या यादीमध्ये नाहीत, याबाबत शासन स्तरावरून स्पष्ट भूमिका जाहीर करणे आवश्यक आहे. तसेच सराई (ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील कृषी सहायकास मारहाण करणाऱ्या इसमास अटक करून कारवाई होईपर्यंत राज्यातील सर्व कृषी सहायक या योजनेच्या अनुषंगाने कामकाज नाइलाजाने बंद करीत आहोत, असेही पत्रात म्हटले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.