Onion  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Price Crash : कांद्याच्या भावात मोठी घसरण; भाव आणखी कमी होतील का? निर्यात शुल्क काढण्याची शेतकऱ्यांची मागणी 

Onion Market : कांद्याच्या बाजारभावात मागील काही दिवसांपासून घसरण सुरु आहे. कालच्या तुलनेत आजही काही बाजारांमध्ये भाव १०० ते २ हजार रुपयांनी कमी झाले आहेत.

Anil Jadhao 

Pune News : कांद्याच्या बाजारभावात मागील काही दिवसांपासून घसरण सुरु आहे. कालच्या तुलनेत आजही काही बाजारांमध्ये भाव १०० ते २ हजार रुपयांनी कमी झाले आहेत. गेल्या आठवडाभरात कांदा भाव १५०० ते २ हजार रुपयांनी कमी झाले. त्यामुळे कांदा उत्पादक पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा कांदा स्वस्त असल्याने निर्यातीत अडथळे येत आहेत. त्यामुळे सरकारने २० टक्के निर्यात शुल्क काढावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

कांद्याचे भाव दबावात येण्यामागे वाढलेला आवकेचा दबाव आणि निर्यातीमधील अडथळे ही कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कांद्याचे भाव कमी झाले आहेत. त्यातच पाकिस्तानचा नवा मालही बाजारात येत आहे. पाकिस्तानच्या कांद्याचे भाव कमी आहेत. अफगाणिस्तानचाही माल बाजारात आहे. बांगलादेशात भारताच्या कांद्याऐजी पाकिस्तानच्या कांद्याला पसंती मिळत आहे. तसेच आखीत देशांमध्येही पाकिस्तानचा कांदा मोठ्या प्रमाणात जात आहे. शिवाय हा कांदा स्वस्त आहे, असे काही निर्यातदारांनी सांगितले. 


भारताच्या कांदा निर्यातीवर आजही २० टक्के शुल्क आहे. याचा फटका आपल्याला बसत आहे. निर्यातशुल्कामुळे भारताचा कांदा २० टक्के महाग होत आहे. आता भाव कमी असल्याने भारताचा कांदा जास्त भाव कुणी घेणार नाही. त्यामुळे निर्यातीमध्ये अडचणी येत आहेत. सरकारने २० टक्के कांदा निर्यात शुल्क तातडीने मागे घ्यावे, अशी मागणीही निर्यातदारांनी केली.

कांद्याचे भाव आठवडाभरातच १५०० ते २ हजारांनी कमी झाल्यानंतर शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. तर आपले कृषिमंत्री सरकारने कांदा उत्पादकांसाठी निर्यात खुली केली, किमान निर्यात मूल्य काढले, निर्यात शुल्क कमी केले याचीच माळ आजही लोकसभेत जपत आहेत. पण कदाचित ते हे विसरले की ही सर्व बंधने त्यांच्याच सरकारने घातली होती. आजही कांद्यावर २० टक्के निर्यात शुल्क आहे. हे निर्यातशुल्क काढल्यावर कांदा उत्पादकांना काहिसा दिलासा मिळेल. आता शेतकऱ्यांचे लाडके कृषिमंत्री निर्यात शुल्क मागे घेणार का? हेच आपल्याला पाहावे लागेल.

बाजारातील कांद्याची आवक गेल्या आठवडाभरापासून वाढलेली आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये कांद्याची आवक वाढल्याचे दिसत आहे. त्यातही राजस्थान आणि मध्य प्रदेशातील आवक जास्त आहे. महाराष्ट्रातही कांदा आवक वाढली. नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये आवक चांगली दिसत आहे.

कांद्याचे भाव चांगले असल्याने शेतकरी कांदा पूर्ण पक्व न होऊ देताच काढणी करून बाजारात आणत आहेत, असे नाशिक जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी सांगितले. खरिपातील कांद्याची लागवड वाढल्याच्या बातम्या सगळीकडे येत होत्या. त्यामुळे आवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावरही दबाव येईल, अशी भीती होती. त्यामुळे ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांचा दर पाहून अनेक शेतकऱ्यांनी वेळेच्या आधीच कांदा बाजारात आणायला सुरुवात केली. यामुळे आवक जास्त दिसत आहे. पण आता भाव कमी झाल्याने या कांद्याचे प्रमाणही कमी होत असल्याचे काही व्यापारी सांगत आहेत.

लाल कांद्याचे भाव आठवडाभरापुर्वी सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान होते. तर उन्हाळ कांदा ५ हजारांच्या पुढे होता. मात्र खरिपातील लाल कांद्याची आवक जशी वाढत गेली तसा बाजार दबावात येत गेला. रोज भावात क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची घसरण होत गेली. मागील ३ दिवसांमध्येच कांद्याच्या भावात मोठी नरमाई आली. गेल्या आठवडाभरात कांदा भाव २ हजार ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत. 

देशभरात खरिप कांद्याची आवक वाढत आहे. देशातील महत्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमध्ये कांदा काढणीला वेग येईल. पुढच्या महिन्यात दुसऱ्या आठवड्यापासून कांदा आवकेचा दबाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कांद्याच्या भावातही चढ उतार दिसतील. आवकेचा दबाव वाढल्यानंतर कांदा १५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान येऊ शकतो. मात्र सरकारने निर्यात पूर्णपणे खुली केली तर बाजाराला आधार मिळेल, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT