
डॉ. साबळे पी. ए., डॉ. पीयूष वर्मा, के. झेड. वाघेला
Onion Production Technology : अधिक कांदा उत्पादनासाठी हंगामनिहाय योग्य जातींची निवड, खात्रीशीर बियाणे, रोपवाटिका व्यवस्थापन, पुनर्लागवड या सर्व टप्प्यांवर योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता असते. विहित विलगीकरण अंतर ठेवून शुद्ध शास्त्रीय पद्धतीने बीजोत्पादन केलेले चालू वर्षाचे बियाणे कांदा रोप निर्मितीसाठी वापरावे. अनेक शेतकरी मुख्य कांदा पिकात आलेल्यांचे डेंगळ्याचे बी धरतात. अशा बियाण्यांमुळे उत्पादन व गुणवत्ता कमी राहते. रब्बी कांद्याची पुनर्लागवड नोव्हेंबर- डिसेंबर दरम्यान केली जाते.
जाती :
रब्बी हंगामासाठी एन.एच.आर.डी.एफ. लाल-४, एन.एच.आर.डी.एफ. लाल-३, भीमा शक्ती, भीमा राज, अग्रिफाउंड लाइट रेड, इ.
तणनियंत्रण :
लागवडीच्या वेळी ऑक्झिफ्लोरफेन (२३.५ टक्के ई.सी.) १ ते १.५ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करून तणाच्या उपद्रव व गरजेनुसार ३० ते ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी. (कांदा व लसूण संशोधन संचालनालय शिफारस, आणि कृषी विद्यापीठ, रायचूर, कर्नाटक संशोधन शिफारस.)
अन्नद्रव्ये व्यवस्थापन :
पिकाच्या उत्पादकता वाढीसह जमिनीची सुपीकता म्हणजेच तिचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म टिकविण्यासाठी माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. माती परीक्षणामध्ये उपलब्ध अन्नद्रव्ये (किलो /हे.) मध्यम प्रमाणात असल्यास शिफारशीत खतमात्रा द्यावी. कमी किंवा अत्यंत कमी असल्यास शिफारशीपेक्षा अनुक्रमे २५ टक्के किंवा ५० टक्के अधिक खतमात्रा द्यावी. उपलब्ध अन्नद्रव्ये जास्त किंवा अत्यंत जास्त असल्यास शिफारशीपेक्षा अनुक्रमे २५ टक्के किंवा ५० टक्के कमी खतमात्रा द्यावी.
प्रति हेक्टर १५ टन कुजलेले शेणखत किंवा ७.५ टन गांडूळ खत किंवा कोंबडी खत ७.५ टन द्यावे.
प्रति हेक्टर ॲझोटोबॅक्टर ५ किलो, स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पी.एस.बी.) ५ किलो आणि ट्रायकोडर्मा व्हिरीडी १.२५ किलो ही खते सेंद्रिय खतात १० दिवस मुरवून द्यावीत. ही जैविक संवर्धने रासायनिक खते, कीडनाशक आणि बुरशीनाशकांबरोबर एकत्र देऊ नयेत.
रासायनिक खतांचा अपव्यय टाळण्यासाठी खते उघड्यावर फेकून न देता निंबोळी पेंड किंवा सेंद्रिय खतांबरोबर मातीआड करून द्यावीत.
नत्राची अर्धी मात्रा, पूर्ण स्फुरद आणि पालाश पुनर्लागवडीच्या वेळी द्यावे. उर्वरित नत्राची अर्धी मात्रा १ आणि १.५ महिन्याने समान हप्त्याने द्यावी.
जमिनीतील सल्फरची उपलब्धता लक्षात घेऊन कांदा पुनर्लागवडीच्या वेळी पिकास पुरेसे सल्फर द्यावे. उदा. हेक्टरी २५ किलोपेक्षा अधिक सल्फर प्रमाण असलेल्या जमिनीत प्रति हेक्टर १५ किलो सल्फर पुरेसे होते. मात्र जमिनीमध्ये हेक्टरी २५ किलो पेक्षा कमी सल्फर असल्यास हेक्टरी ३० किलो सल्फर देणे आवश्यक आहे. गुजरातमधील सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठाच्या ॲग्रेस्को (२०२३) शिफारसीनुसार, रब्बी कांदा पिकास कंपोस्ट २५ टन, १००:५०:६०:२० किलो नत्र: स्फुरद: पालाश: सल्फर प्रति हेक्टरी देण्याची शिफारस केलेली आहे. तेथे सलग तीन वर्षे केलेल्या प्रयोगांमध्ये या प्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यामुळे सरासरी ६१.१२ टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळाले.
ठिबक सिंचनाची सुविधा असल्यास, लागवडीच्या वेळी जमिनीतून हेक्टरी ४० किलो नत्र, स्फुरद ४० किलो आणि पालाश ६० किलो द्यावे. ७० किलो नत्र सात हप्त्यांत विभागून ठिबक सिंचनाद्वारे द्यावे.
जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आणि पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्ये कमतरता लक्षणांनुसार, लागवडीनंतर ४५ आणि ६० दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रण ग्रेड -४ (लोह ४ टक्के, जस्त ६ टक्के, मँगेनीज १ टक्का, तांबे ०.५ टक्का, बोरॉन ०.५ टक्का) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करता येईल.
कांदा पुनर्लागवडीनंतर ३० आणि ४५ दिवसांनी, १९:१९:१९ (५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) व ६०-७० दिवसांनी १३:००:४५ किंवा ००:००:५० (५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी केल्यास अधिक उत्पादन मिळते.
पाणी व्यवस्थापन :
कांदा पिकास सिंचन हे हंगाम, जमिनीचा प्रकार आणि पिकाचे वय यावर अवलंबून असते.
सर्वसाधारणपणे, कांद्याला लागवडी वेळी, लागवडीनंतर तीन दिवसांनी आणि त्यानंतर जमिनीतील ओलाव्यानुसार ७-१० दिवसांच्या अंतराने सिंचनाची गरज असते.
सर्वसाधारणपणे रब्बी पिकाला १२ ते १५ सिंचनाची गरज असते. पीक परिपक्व होऊन कांद्याच्या माना पडू लागतात, त्या वेळी (म्हणजे काढणीच्या १० ते १५ दिवस आधी) सिंचन बंद करावे.
आधुनिक सिंचन पद्धती (ठिबक किंवा तुषार सिंचन) उपलब्ध असल्यास जमिनीपासून १५ सें.मी. उंच १२० सें.मी. रुंद माथा असलेले व उताराचे प्रमाण लक्षात घेऊन गरजेनुसार लांबीचे गादीवाफे पाडावेत व रोपांची लागवड करावी. प्रत्येक वाफ्यामध्ये १६ मि.मी. व्यासाच्या दोन लॅटरल्सचा वापर करावा. दोन ड्रीपरमध्ये ३०-५० सेमी अंतर ठेवावे. ड्रीपरची उत्सर्जन क्षमता ताशी ४ लिटर असावी.
पुनर्लागवड :
एक हेक्टर क्षेत्रावर रब्बी कांदा पुनर्लागवडीसाठी ५ ते ७ किलो बी पुरेसे होते. मात्र शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार शास्त्रीय पद्धतीने बीजोत्पादन केलेले चालू वर्षाचे हेक्टरी ३.७५ ते ४.३७५ किलो बियाणे पुरेसे ठरते. (१.५ ते १.७५ किलो प्रति एकर). रोपे साधारणतः ५०- ६० दिवसांत तयार होतात. त्यांची पुनर्लागवड सपाट किंवा ठिबक सिंचन करणार असल्यास गादीवाफ्यावर १५ सें.मी. × १० सें.मी.अंतरावर करावी. पुनर्लागवडीवेळी वाढलेल्या रोपांचा शेंड्याकडील एक तृतीयांश भाग कापून टाकावा. कार्बोसल्फान २ मि.लि. अधिक कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात रोपांची मुळे बुडवून पुनर्लागवड करावी.
डॉ. साबळे पी. ए. ८४०८०३५७७२
(उद्यानविद्या महाविद्यालय, सरदार कृषिनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, जगूदन, मेहसाणा)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.