
Nashik News : जिल्हा कांद्याचे आगर असले तरी खरिपातील लाल व रब्बीतील रांगड्या कांद्याच्या उत्पादनात चांदवड व येवल्याचा हात कोणी धरणार नाही. दोन-तीन वर्षे परवडणारा भाव असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी तीनही प्रकारांतील कांद्याकडे वळले. निसर्गाने लाल कांद्याचे नुकसान केले असले तरी भावातील अनुकूल वातावरणामुळे दुष्काळी येवल्यात यंदा उन्हाळ कांदालागवड वेगाने सुरू आहे.
यंदा दहा हजारांवर हेक्टरवर लागवड होणार असल्याचा अंदाज असून, आतापर्यंत चार हजार ७३० हेक्टरवर लागवड झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख कांदा उत्पादक तालुक्यात येवल्याचे नाव घेतले जाते. दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोट्यवधीचा कांदा पिकवत आर्थिक परिस्थितीत सुधारणा केली. कांद्याने काही वर्षांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला.
चार दशकांपासून दुष्काळी असलेल्या या तालुक्याबतील शेतकऱ्यांचे कांदा प्रमुख पीक असून, कांद्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण आणि जीवनशैलीही बदलवली आहे. काही वर्षांपासून समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकरी परिस्थितीला न जुमानता कांदा लागवड करत आहेत. चार वर्षांपूर्वी तालुक्याचे कांद्याचे क्षेत्र ३० हजारांपेक्षाही कमी होते. तर उन्हाळ कांद्याची तीन ते चार हजार हेक्टरमध्येच लागवड होत होती.
यंदा वातावरण पोषक असल्याने उन्हाळ कांदालागवड केली असून, पालखेड डाव्या कालव्याच्या पट्ट्यात शेवटपर्यंत पाणी पुरत असल्याने येथे अजूनही लागवड सुरूच आहे. यंदा बाजारभाव सरासरी चार ते पाच हजारांपर्यंत टिकून असल्याने यंदा कांदा शेतकऱ्यांना साथ देईल आणि अतिवृष्टी व सततच्या हवामानामुळे झालेले नुकसानही काहीअंशी भरून निघेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.
सिन्नर तालुक्यातही उन्हाळ कांद्याची लागवड
सिन्नर जिल्ह्यासह सिन्नर तालुक्यात थंडीचा कडाका वाढला असून. या थंडीचा गहू, हरभरा पिकांना लाभ होणार आहे. यामुळे रब्बीच्या क्षेत्रातही वाढ होणार आहे. यंदा ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू होता. मात्र नोव्हेंबरच्या शेवटच्या टप्प्यात थंडीने जोर पकडला. सध्या रात्रीचे किमान तापमान ११ अंशांपर्यंत खाली आले आहे.
तर दिवसाचेही तापमान कमी झाल्याने दिवसभर थंडी जाणवते. रब्बीसाठी हे वातावरण फायदेशीर असून, गहू, हरभरा पिकांना पोषक आहे. या हंगामात जिल्ह्यात अनेक हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी पूर्ण झाली आहे. ऊस कारखानेही आता सुरू होत आहेत. उसाचे क्षेत्र जसजसे मोकळे होईल, तसतसे गहू व हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरण्या सिन्नर, येवला, निफाड तालुक्यांत झाल्या आहेत.
उन्हाळ कांद्याचे पीक शेतकरी घेत असून, कालवे, कूपनलिका व शेततळ्यांच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी सर्वाधिक प्राधान्य उन्हाळ कांदा लागवडीला दिले आहे. पण आधीच काही बियाणे खराब झाल्याने पाहिजे त्या प्रमाणात कांदा रोपे झाली नसून बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना फिरावे लागत आहे. याखालोखाल थंडीसह अल्प पाण्यावर येणाऱ्या ज्वारी, मका याकडे अधिक कल असून, थंडीच्या ओलीवर येणाऱ्या हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी झाली आहे. अवर्षणप्रवण व दुष्काळी भागात हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.