कृष्णा जोमेगावकर
Agriculture Development : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूरगडापासून तीन किलोमीटर अंतरावर लांजी (जि. नांदेड) हे गाव वसले आहे. लोकसंख्या जेमतेम बाराशेतर घरांची संख्या तीनशे पर्यंत आहे. सन २०१२ मध्ये मारोती रेकुलवार यांनी सरपंचपदाचा पदभार स्वीकारला. आपले गाव ‘आदर्श ग्राम’ करण्याचा ध्यास त्यांना होता. सर्वप्रथम गावातील रस्त्यांवर वाहणारे सांडपाणी, त्यामुळे पसरणारे आजार व दुर्गंधी कशी दूर करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. ‘आदर्श ग्राम’ संबंधीचे प्रशिक्षण ‘यशदा’ मध्ये घेतले. हिवरेबाजार, नगर, सातारा, पुणे जिल्ह्यातील आदर्श गावांना भेटी दिल्या.
गावात सुरू झाली अंमलबजावणी
घेतलेले प्रशिक्षण व झालेल्या अभ्यासातून सरपंच महोदय तसेच ग्रामपंचायत व ग्रामस्थ देखील कामाला लागले. त्यातून मॅजिक पीट प्रकल्प आकारास येऊ लागला. त्या अंतर्गत घरटी शोषखड्डे तयार करण्यात आले. रस्त्यावर वाहणारे सांडपाणी त्यात मुरविण्यात येऊ लागले. बघता बघता सहा महिन्यांत लांजी गाव गटार व डासमुक्त झाले.
नाल्याचे खोलीकरण
गाव डोंगराच्या उतराला असल्याने पावसाचे पाणी नदीला वाहून जायचे. सन २०१६ च्या दरम्यान शासनाचा कोणताही निधी न घेता लोकसहभागातून तीन किलोमीटर नाल्याचे काम पूर्ण झाले.नाला वीस फूट रुंद तर १५ ते २० फूट खोल आहे. नाल्याला केवळ सात फुटांवर पाणी लागले. त्यात वर्षभर पाणी साठून राहील असे खच पाडले आहेत. त्यामुळे पाणी जमिनीत मुरते.
जलस्रोत झाले जिवंत
जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळी वाढली. परिणामी मागील वीस ते पंचवीस वर्षापासून बंद असलेल्या विहीरी, कूपनलिका यांना पाणी आले. नवीन विहिरींनाही फायदा झाला. आजही अनेक शेतकरी या पाण्यावर बारमाही सिंचनाची सोय असलेली पिके घेत आहेत. तर पावसाचा ताणपडलेल्या काळात सोयाबीन, कपाशी या सारख्या पिकांना संरक्षित पाण्याचा वापर करीत आहेत.
विकास कामांत सातत्य
डिसेंबर २०२३ मध्ये सरपंच म्हणून दुसऱ्यांदा रेकुलवार थेट जनतेतून निवडून आले आहेत. त्यानंतर त्यांनी पुन्हा विकासाच्या कामांचे सातत्य ठेवले. विद्युतीकरणासाठी ६२ पथदिवे तर दहा हायमॅक्स दिवेलावण्यात आले. सात घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिकशाळेच्या प्रांगणात पेव्हर ब्लॉकसाठी दहा लाखांचा निधी उपलब्ध झाला असून लवकरच त्याचे काम करण्यात येणार आहे. शाळेसाठी आरओ फिल्टर प्लांट’ ची सुविधाही उभारली आहे.
विविध विधायक कामे
ग्रामपंचायत विविध विधायक कामांत सक्रिय आहे. राष्ट्रीय पेय जल योजनेंतर्गत ५० लाख रुपये निधी खर्च करून पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. सर्व तीनशे घरांना घरगुती नळ जोडणी देण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास मोफत पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ग्रामपंचायतीमार्फत ट्रॅक्टरने दररोज घनकचरा संकलित केला जातो. नरेगा अंतर्गत दहा सिंचन विहिरींची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
गाव घेतले दत्तक
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी गावाला भेट दिली. जलसंधारणाची कामे, गटारमुक्त मोहीम, ग्रामविकासातील गावकऱ्यांचे योगदान पाहता गाव अधिक सक्षम बनविण्यासाठी ते दत्तक घेतल्याचे जाहीर केले. मॅजिक पीट प्रकल्पाची ‘युनिसेफ’सह राज्य व केंद्राकडून दखल घेण्यात आली आहे. हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्यासह राज्यभरातील मान्यवर व संस्थांनी गावाला भेटी दिल्या आहेत. महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत १८ पैकी १० बचत गटांना खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे. विहीर पुनर्भरण व आरोग्य तपासणी शिबिरेही आयोजित करण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक डी. जी. गज्जलवार सांगतात.
गावात राबविलेला ‘मॅजिक पीट प्रकल्प’ राज्यासह केंद्राने दखल घ्यावा इतका लोकप्रिय झाला आहे. आता जिल्हा परिषद शाळेत दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना लोकसहभागातून मोफत जेवण देण्याचा संकल्प आहे. सर्व पाणंद रस्ते मुक्त करून खडीकरण व मजबुतीकरण करणार आहे. सन २०२७पर्यंत गावातील एकही शेतकरी कोरडवाहू राहणार नाही या दृष्टीने सिंचन विहीर मंजूर करण्यासाठी पुढील प्रयत्न आहेत.मारोती रेकुलवार (सरपंच) ९८३४९ ६७४६३
ग्रामपंचायतीची वैशिष्ट्ये
’आयएसओ’ मानांकन प्राप्त ग्रामपंचायत. राजीव गांधी पंचायत राज सक्षमीकरण योजने अंतर्गत १२ लाख रुपये खर्च करून स्वतंत्र, सुसज्ज ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम. माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या निधीतून १५ लाख रुपये खर्च करून दुसऱ्या मजल्यावर सुसज्ज सभागृह. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष. कॉन्फरन्स हॉल’
ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेस मोफत वाय-फाय सेवा.
नागरिकांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात आपले सरकार सेवा केंद्र आहे. तसेच
ग्रामपंचायत इमारतीमध्ये सुसज्ज असे विश्रामगृह तयार करण्यात येत आहे.
कार्यालयातून नागरिकांना आपले सरकार सेवा केंद्रातून एक ते सात चे सर्व दाखले ऑनलाइन देण्यात येतात.
शंभर टक्के कर वसुली करणारी ग्रामपंचायत.
माझी वसुंधरा अभियानातून वृक्ष लागवड.
गावाला मिळालेले पुरस्कार
स्मार्ट ग्राम- २०१६-१७
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत २०१७-१८ मध्ये तीस हजार रुपयांचा वसंतराव नाईक स्मृती विशेष पुरस्कार
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदारी मुक्त गाव (जिल्हास्तरीय).
तंटामुक्त गाव- २००९-१०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.