Manikrao Khule is a Retired Scientist from Meteorological Department Agrowon
ॲग्रो विशेष

Interview with Manikrao Khule : ऑक्टोबरमध्ये पाऊस दणका देणार का?

Team Agrowon

A conversation with Manikrao Khule, A Retired Scientist from Meteorological Department, About the Weather in the State :

ऑक्टोबर महिन्यात पावसाचा अंदाज काय आहे?

संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तो सरासरीच्या ११५ टक्क्यांपेक्षा अधिक पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तो सरासरीच्या ११२ टक्क्यांपेक्षा अधिक पडण्याची शक्यता आहे. त्यातही कोकण व घाटमाथ्यावर ही शक्यता अधिक आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस का नाही?

सहसा जेव्हा आसामकडील पूर्वोत्तर सात राज्यांत व हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजे सिक्कीम हिमालयीन पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेशाचा हिमालयीन भाग येथे जेव्हा अति जोरदार पाऊस होतो, तेव्हा महाराष्ट्रासहित संपूर्ण मध्य भारतात म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड भागांत कमी पाऊस होतो. म्हणजेच तयार झालेले कमी दाब क्षेत्राची सर्व ऊर्जा पूर्वोत्तर सात राज्यांत व हिमालयाच्या पायथ्याशी खेचली जाते. म्हणूनच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्याकडे पावसाची शक्यता मावळली आहे. परंतु ९ ते १३ ऑक्टोबरमधील आवर्तनाच्या पावसाची शक्यता आता जाणवत आहे.

पुढील आठवडाभर पाऊस कसा राहू शकतो?

महाराष्ट्रात ८ ऑक्टोबरपर्यंत पावसाच्या उघडिपीची शक्यता आहे. मात्र ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंतच्या तीन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. पावसाची तीव्रता त्यानंतरही दोन दिवस असू शकते. विशेषतः सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व संपूर्ण मराठवाडा अशा १३ जिल्ह्यांध्ये मात्र मध्यम स्वरूपाच्या वळीव पावसाची शक्यता या तीन दिवसांत अधिक जाणवते. महाराष्ट्रात ८ ऑक्टोबरपर्यंत खरीप पीक-काढणी, रब्बी लागवडीसाठीची मशागत, सोयाबीनचे खळे, हरभरा पेर, नवीन उन्हाळ कांदा रोप-टाकणी, आगाप लाल कांदा काढणी, ऊस लागवड, रोप जर उपलब्ध असेल, तर आगाप रांगडा-लाल कांदा लागवड, तर टप्प्य-टप्प्यांतील द्राक्षे बाग-छाटणी इत्यादी शेतकामे शेतकऱ्यांनी उरकण्याचा प्रयत्न करावा, असे वाटते.

ऑक्टोबरच्या उत्तरार्धात कसा राहील पाऊस?

कोजागिरी पौर्णिमा ते नरक चतुर्दशी म्हणजेच १५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यानच्या दुसऱ्या पंधरवड्यातील पावसाळी वातावरण हे ‘ला-निना’ विकसन किंवा अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात घसरणाऱ्या हवेच्या दाबांतून कदाचित चक्रीवादळाची बीजरोवणी किंवा ५ ते २० अंश उत्तर अक्षवृत्त दरम्यान पूर्वेकडून वाहणाऱ्या मजबूत आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात मध्यम पावसाची शक्यता जाणवते.

माॅन्सूनचा परतीचा प्रवास यंदा का अडखळत आहे?

सध्या माॅन्सून राजस्थानमधून परत फिरलेला आहे. वायव्यकडून वारे वाहत आहे. पण ज्या पद्धतीने तेथे उत्तर भारतात उच्च दाब क्षेत्रे व त्याची पोळ आणि दक्षिण द्विपकल्पात म्हणजे दक्षिणेकडील ४ राज्यांत कमी दाबाचा ट्रफ तयार होत नाही, तोपर्यंत परतीचा पाऊस महाराष्ट्राकडे झेप घेणार नाही, असे वाटते. शिवाय अजूनही बंगालच्या उपसागरात बळकट कमी दाब क्षेत्रे तयार होत आहेत आणि देशाच्या वायव्य भागाकडे कूच करत आहेत. त्यामुळे माॅन्सून वारे आठवडाभर उत्तर भारतातच अडकले होते. परंतु परतीच्या पावसाने गुरुवारपासून काहीशी प्रगती साधली आहे. १६ ऑक्टोबरनंतर माॅन्सून केव्हाही निरोप घेऊ शकतो. अर्थात माॅन्सून निघून गेला तरी चक्रीवादळाचा सीझन चालू होत असल्यामुळे ऑक्टोबरच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या राज्यात पडत असलेला पाऊस परतीचा पाऊस आहे का?

महाराष्ट्रात ३ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पडणारा पाऊस परतीचा पाऊस असतो. कारण माॅन्सून परतत असताना ३ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात येतो आणि १३ ऑक्टोबर दरम्यान दरवर्षी सरासरी तारखेप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेर पडतो. परंतु संपूर्ण सप्टेंबरमध्ये पडणाऱ्या पावसालाच परतीचा पाऊस अनेक जण समजतात. खरे तर या सर्व तारखांत राजस्थानमधून मोसमी पाऊस परत फिरण्याची सुरुवात होणारी व संपूर्ण देशातून मोसमी पाऊस निघून पण फक्त तमिळनाडूमध्ये वेगळे नाव धारण करून तेथे पाऊस सुरू होण्याची तारीख या दोनच तारखा महत्त्वाच्या आहेत. कारण महाराष्ट्रातील या दोन व देशाच्या दोन तारखा यामध्ये विशेष असा फरक नसतो.

एमजेओ, ला-निना, आयओडीची काय स्थिती आहे?

गुरुवारपासून (ता. ३) एमजेओ भारत विषुववृत्तीय महासागरीय परिक्षेत्रात संचारित झाला आहे. परंतु त्याचा ‘एम्प्लिटुड’ (वर्तुळ त्रिज्येसमान वर खाली होणारी कक्षा) एक पेक्षा कमी आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये सध्या व दुसऱ्या पंधरवड्यात देशात तसेच महाराष्ट्रात जो काही पाऊस पडणार आहे त्यास या एमजेओमुळे मदतच होणार आहे. गेल्या वर्षी २०२३ च्या पावसाळी हंगामापासून पावसास अटकाव करणारा एल- निनो कार्यरत होता; तो या वर्षी २०२४ च्या पावसाळी हंगामात तटस्थच राहिला. हंगाम संपला तरी एन्सो अजूनही तटस्थच आहे. आता ऑक्टोबर महिन्यात ला- निना अवतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे घडले तर ऑक्टोबर ते डिसेंबर या ईशान्य माॅन्सूनच्या काळात दक्षिणेकडील तमिळनाडू आणि केरळ राज्यात पावसाचे प्रमाण कदाचित कमी राहून महाराष्ट्रासहित मध्य भारतात चांगला पाऊस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरुवातीला ‘आयओ’डी धन होता परंतु संपूर्ण पावसाळी हंगामात तटस्थच राहिला. त्यामुळे पावसाला अटकाव झाला नाही. तो अजून तसाच आहे. परंतु ऑक्टोबर ते डिसेंबर या ईशान्य माॅन्सूनच्या काळात दक्षिणेकडील चार राज्यांत चांगला पाऊस होण्यासाठी तो ऋण होणे गरजेचे आहे. बंगालच्या उपसागाराचे तापमान हे अरबी समुद्रापेक्षा अधिक असायला हवे. सध्या तो तटस्थ असल्यामुळे दक्षिणेकडील चार राज्यांत येत्या तीन महिन्यांत पडणाऱ्या पावसावर त्याचा नकारात्मक परिणाम नाही.

ऑक्टोबर महिन्यात तापमानाचा अंदाज काय आहे?

ऑक्टोबर महिन्यात दुपारी तीन वाजताचे कमाल तापमान कोकण व मध्य महाराष्ट्रात सरासरी इतके तर विदर्भात सरासरीपेक्षा कमी आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. म्हणून मराठवाड्यात ऑक्टोबर महिन्यात दिवसाचे वातावरणक अधिक जाचक ठरण्याची शक्यता जाणवते. तर पहाटे पाच वाजताचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता असल्यामुळे ऊबदार रात्री जाणवतील तर भल्या पहाटे दव (बादड) पडण्याचे प्रमाण कमी जाणवेल.

यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांना अपेक्षित असा झाला का?

भारतीय हवामान खात्याने जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचा देश पातळीवरील एकत्रित सरासरी इतका दिलेला अंदाज, तसेच प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला दिलेला त्या त्या महिन्याचा मासिक अंदाज हे सर्व सांख्यिकी अंकानुसार अगदी बरोबर व हुबेहूब उतरले. संपूर्ण देशात या चार महिन्यांमध्ये सरासरी ८७ सेंटिमीटर पाऊस होतो. पण यंदा ९३.५ सेंटिमीटर म्हणजेच १०८ टक्के पाऊस झाला. या वर्षी ऑगस्टमध्ये जाणवणारा पावसाचा खंड जाणवला नाही. असे असले तरी झालेल्या पावसाच्या असमान वितरणातून मात्र शेतकऱ्यांना खरीप हंगाम जोरदार पावसाचा वाटला नाही.

माॅन्सून वेळेत येणे आणि वेळेत जाणे का महत्त्वाचे असते?

जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रातून माॅन्सून १०० ते ११० दिवसांत म्हणजे त्याच्या सरासरी निसर्गाने ठरवून दिलेल्या कालावधीत निघून जाणे आवश्यक असते. असे झाले तर माॅन्सूनचे वर्तन हे नैसर्गिक व सुयोग्य समजावे त्यामुळेच त्या वर्षभरातील परंपरेने चालत आलेल्या वातावरणीय घटना पार मार्च - एप्रिलपर्यंत घडत असतात. या घटना म्हणजे योग्य, आवश्यक थंडी, परतीचा पाऊस, बंगालच्या उपसागरात अधिक व अरबी समुद्रात कमी चक्रीवादळे व त्यांची सरासरी वारंवारिता, कमी गारपीट व माफक धुक्याचे प्रमाण आणि थंडीतील भू-दवीकरण व भू-स्फटिकीकरण असे सुयोग्य वातावरणीय बदल निसर्गात शेतीसाठी घडून येतात. उष्णतेत वाढ होते. जमीन तापते पण त्याबरोबरच पूर्णपणे ढगविरहित निरभ्र आकाश असते. त्यामुळे जमिनीत दिवसभरात साठवलेली लंबलहरी उष्णताऊर्जा प्रकाशलहरीच्या वेगाने अवकाशात होणाऱ्या उत्सर्जनामुळे पहाटेपर्यंत थंडावते. म्हणून किमान तापमानात चांगलीच घट होते. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर काळात विषुववृत्तदरम्यान उत्तरेकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरात अतितीव्र अशी चक्रीवादळे या काळात तयार होतात व महाराष्ट्रतही पाऊस देतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Irrigation Management : सिंचन व्यवस्थापन बदलत्या वातावरणाशी सुसंगत हवे

Cotton Disease : कपाशीच्या पिकात पातेगळ वाढली

E-Peek Pahani : ई-पीकपाहणीची अट रद्द करा

Raju Shetti : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शेट्टींचा मोठा धमाका; ऊस परिषदेचे करणार आयोजन

Crop Damage Compensation : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना भरपाईपोटी ९८७ कोटींची मदत

SCROLL FOR NEXT