Interview with Abhishek Govilkar : वायदे बाजारात शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न

Head of Agriculture, Multi Commodity Exchange (MCX) Abhishek Govilkar : मल्टी कमोडिटी एक्स्चेंजचे (एमसीएक्स) कृषी विभाग प्रमुख अभिषेक गोविलकर यांच्याशी साधलेला संवाद.
Head of Agriculture, Multi Commodity Exchange (MCX) Abhishek Govilkar
Head of Agriculture, Multi Commodity Exchange (MCX) Abhishek GovilkarAgrowon
Published on
Updated on

This Interaction with Head of Agriculture, Multi Commodity Exchange (MCX) Abhishek Govilkar :

वायदे बाजारात देशातील शेतकऱ्यांचा सहभाग कमी आहे. वायदेबाजार म्हणजेच सट्टाबाजार असा समज बऱ्याच शेतकऱ्यांचा आहे. सरकारनेही अनेक शेतीमालाच्या वायद्यांवर बंदी घातली आहे. मग वायदे बाजार खरंच सट्टाबाजार आहे का, वायदेबाजाराचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय होतो, शेतकरी वायदेबाजारात व्यवहार करू शकतात का, वायदे बाजारात व्यवहार केले तर शेतकऱ्यांना काही सवलती मिळतात का यासंदर्भात मल्टी कमोडिटी एक्स्चेंजचे (एमसीएक्स) कृषी विभाग प्रमुख अभिषेक गोविलकर यांच्याशी साधलेला संवाद.

वायदे बाजाराचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होऊ शकतो?

शेतकऱ्यांना वायदे बाजाराचा दोन प्रकारे फायदा होतो. वायदे बाजारामुळे शेतीमालाच्या पुढील चार ते सहा महिन्यांतील भावाचा अंदाज कळतो. कारण त्या महिन्यांतील वायद्यांमध्ये व्यवहार सुरू असतो. आता पेरणीच्या काळातच जर शेतकऱ्याला प्रत्येक पिकाच्या निकटच्या भविष्यातील किमतीचा अंदाज कळाला तर कोणत्या पिकांची पेरणी करावी, की ज्यातून मला चांगला भाव मिळू शकतो, हा निर्णय घेण्यास शेतकऱ्याला मदत होऊ शकते. दुसरा फायदा म्हणजे, जेव्हा शेतकऱ्यांच्या हातात पीक येईल म्हणजेच मालाची काढणी झालेली असेल त्यावेळी वायद्यांमधील भाव पाहून शेतकऱ्याला हेही ठरवण्यास मदत होते, की मी आता माल विकला तर फायदेशीर ठरेल की पुढच्या काळात मला चांगला भाव मिळू शकतो. वायद्यांमध्ये मिळत असलेल्या भावावरून शेतकऱ्याला हा अंदाज बांधण्यास मदत होते. जेव्हा पिकाची काढणी होते तेव्हा बाजारात आवकेचा दबाव वाढत असतो, हा आपला दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे भावही दबावात येतात. मग मी जर माल विकण्यासाठी थांबलो तर मला यापेक्षा जास्त भाव मिळू शकतो का, याचा अंदाज जर शेतकऱ्याला आला तर नक्कीच फायदा होईल. म्हणजेच एकतर लागवड करताना आणि दुसरे म्हणजे पिकाची विक्री करताना निर्णय घेण्यसाठी शेतकऱ्यांना वायदे बाजाराचा निश्‍चितच फायदा होत असतो.

वायदे बाजारात सट्टेबाजी होते, त्यामुळे भाववाढ होते असे सांगून सरकारने अनेक शेतीमालाच्या वायद्यांवर बंदी घातली. याकडे तुम्ही कसे पाहता?

एमसीएक्सवर कच्च्या पामतेलाचा सर्वांत मोठा वायदा होता. कारण भारत खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात करतो. त्यातही कच्च्या पामतेलाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे एमसीएक्सवर कच्च्या पामतेलाचा वायदा मोठा होता. पण सरकारने डिसेंबर २०२१ मध्ये कच्चे पामतेल, सूर्यफूल तेल आणि सोयातेलाच्या वायद्यांवर बंदी घातली आहे. त्यावेळी सरकारने सांगितले होते, की वायद्यांमुळे शेतीमालाच्या भावात मोठे चढ-उतार होतात. खाद्यतेलाच्या किमती वाढल्या हे खरं आहे. पण त्यानंतर अनेक अभ्यासांमधून पुढे आले, की खाद्यतेलाच्या किमती या प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरवठा विस्कळीत झाल्याने वाढल्या होत्या. इंडोनेशिया आणि मलेशियात उत्पादन घटले होते. देशात खाद्यतेलाची मागणी वाढली होती. त्यामुळे मागणी-पुरवठ्याचे गणित लक्षात घेता देशात खाद्यतेलाचे भाव जास्त प्रमाणात वाढले होते. त्यानंतर मात्र पुरवठा सुरळीत होत गेला. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीही कमी झाल्या. मागच्या दोन वर्षांत किमती तर अपेक्षित पातळीवर आल्या आहेत. त्यामुळे सरकारने आता वायद्यांवर बंदी घालण्याच्या आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा. वायदे बाजार हा हेजिंगसाठी खूप महत्वाचा प्लॅटफाॅर्म आहे. हेजिंग हे किमतीत होणाऱ्या बदलामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यापासून संरक्षण करण्याचे माध्यम आहे. हा पर्याय उपलब्ध असेल तर उद्योग आणि व्यापारीही जास्त धोके पत्करून व्यवहार करतील आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. सरकारनेही याचा विचार करावा. डिसेंबरमध्ये सरकार वायद्यांविषयी धोरणाबद्दल निर्णय घेण्याची शक्यता आहे. आम्हाला आपेक्षा आहे की सरकार सकारात्मक विचार करेल.

Head of Agriculture, Multi Commodity Exchange (MCX) Abhishek Govilkar
Interview with Dr. B. V. Mehta : सोयाबीनचा तिढा निश्‍चितच सुटू शकतो...

वायदे बाजाराचा शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा यासाठी एमसीएक्स काय काम करत आहे?

वायदे बाजाराचे फायदे शेतकऱ्यांनाही होतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा हेजिंगचा प्लॅटफाॅर्म आहे. शेतकऱ्यांनी वायद्यांमध्ये व्यवहार केले तर त्यांना आणखी जास्त लाभ मिळू शकतो. त्यामुळे वायदे बाजारात शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा यासाठी सरकारही प्रयत्न करत आहे. सेबीने आम्हाला तशा सूचनाही केल्या आहेत. शेतकऱ्यांपर्यंत जाऊन त्यांना वायदे बाजाराचे महत्त्व पटवून देऊन शेतकऱ्यांना एक्सचेंज प्लॅटफाॅर्मपर्यंत आणा, असा सेबीचा आग्रह आहे. त्यासाठी आम्ही शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत तालुका पातळीवर किंवा गावात जाऊन प्रशिक्षण कार्यक्रम घेतो. मागच्या वर्षी आम्ही २०० प्रशिक्षण कार्यक्रम घेतले होते. यंदाही आम्ही २०० पेक्षा जास्त कार्यक्रम घेणार आहोत. शेतकऱ्यांना वायदे बाजाराविषयी माहिती देणे, त्यांना वायद्यांमध्ये व्यवहार कसा करायचा, याचे प्रशिक्षण देणे हा महत्वाचा भाग एमसीएक्स पार पाडत आहे.

Head of Agriculture, Multi Commodity Exchange (MCX) Abhishek Govilkar
Interview with Dr Hemant Wasekar : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी विश्‍वासार्हता जपावी

वायदे बाजारात व्यवहार करताना शेतकऱ्यांना महत्त्वाची समस्या येते काॅन्ट्रॅक्ट साइजची. यासंदर्भात एमसीएक्स काही विचार करत आहे का?

नक्कीच. शेतीसंबंधी वायद्यांचा विचार केला सध्या एमसीएक्सवर कापूस आणि मेंथा ऑइल म्हणजेच पुदिना तेलाचे वायदे सुरू आहेत. शेतकरी किंवा छोटे व्यापारी यांना या मालाच्या वायद्यांमध्ये व्यवहार करता यावे यासाठी एमसीएक्सने काॅन्ट्रॅक्ट साइज कमी केले आहे. आधी कापसाची काॅन्ट्रॅक्ट साइज १०० गाठींची होती. ती कमी करून आता २५ गाठींची केली आहे. मेंथा ऑइलची काॅन्ट्रॅक्ट साइज २ ड्रमची आहे. एक्स्चेंज प्लॅटफाॅर्म म्हणून आम्ही काॅन्ट्रॅक्ट साइज कमी केली. त्यामागे हा विचार आहे, की मोठे शेतकऱ्यांनी तसेच छोट्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून वायद्यांमध्ये व्यवहार करावा. शेतकरी वायदे बाजाराशी जोडले जावेत, त्यांनी इथे व्यवहार करावेत, यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत. वायद्यांमधून शेतकऱ्यांना पेरणीसाठी आणि माल विक्रीसाठी भविष्यातील किमतींची माहिती मिळतेच. शिवाय बाजार भावात जे चढ-उतार होत असतात, त्यामुळे निर्माण होणारे धोकेही शेतकरी वायद्यामुळे कमी करू शकतात. आपण एक लक्षात घेतले पाहिजे, की बाजारातील चढ-उतार केवळ देशांतर्गत कारणांमुळे होत नाहीत. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे जास्त चढ-उतार होतात. किमती कमी झाल्या की शेतकऱ्यांचे नुकसान होते. या परिस्थितीत जर त्यांनी वायद्यांमध्ये आपला माल विकला तर त्यांना एक निश्‍चित भाव मिळू शकतो.

वायदे बाजारात शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा यासाठी एमसीएक्स शेतकऱ्यांना काही सवलती देते का?

एमसीएक्सवर येऊन जर शेतकरी आपला माल विकत असतील तर नक्कीच सवलती मिळतात. जर शेतकरी मालाची डिलिव्हरी देत असतील तर शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांना वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात. डिलिव्हरी देताना त्यांच्या गावातून एमसीएक्सच्या गोदामापर्यंत वाहतुक भाड्यात सवलत दिली जाते, तसेच गोदाम भाडे आणि इतर खर्चात शेतकऱ्यांना सवलत मिळते. शेतकऱ्यांना मालाचे उत्पादन घेतल्यानंतर एमसीएक्सच्या गोदामांपर्यंत माल पोच करण्यासाठी एक्स्चेंजच्या निकषाप्रमाणे गुणवत्ता, प्रतवारी, पॅकिंग, हाताळणी, वाहतूक आणि इतर कामांसाठी जो काही खर्च येतो, त्या प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना एमसीएक्स सवलती देते. त्यामुळे शेतकऱ्यांनी, शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी एमसीएक्स प्लॅटफॉर्मवर व्यापार करणे, आपला माल विकणे जास्त खर्चिक नाही. एमसीएक्स शेतकऱ्यांना सर्वच टप्प्यांवर मदत करायला तयार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com