Waste Disposal Agrowon
ॲग्रो विशेष

Waste Management: गुंतागुंत: कचऱ्याची आणि आपल्या जगण्याची!

Environmental Impact of Waste : माणूस आणि निसर्गातील इतर प्राणी यांच्यातील वेगळेपण काय? इतर कोणताही प्राणी कचरा निर्माण करत नाही, ते श्रेय माणसाला जाते. इतर प्राण्यांकडून मल-मूत्राच्या स्वरूपात ज्या काही जैविक गोष्टी निर्माण होतात, त्या निसर्गात सामावल्या जातात. विशेष म्हणजे याच्या निर्मितीची गतीसुद्धा निसर्गात सामावून जाण्याच्या गतीशी जुळणारीच असते. याउलट माणूस भौतिक विकासाच्या टप्प्यात कचरा निर्माण करायला लागला. जितका विकास जास्त, तितका कचरा जास्त हे जणू सूत्रच बनले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात माणसाचा कचरा निसर्गात जिरवण्याची चक्रीय पद्धती अस्तित्वात होती. उकिरडा हे त्याचे उत्तम उदाहरण.

अभिजित घोरपडे

Environmental Issue: प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारी रोजी घराजवळ असलेल्या काका हलवाई दुकानात गेलो, अर्थातच जिलेबी आणण्यासाठी. खरं तर, देशाचे राष्ट्रीय सण- प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन- यांच्याशी जिलेबीचे घट्ट नाते आहे. विशेषत: सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये हे दिवस साजरे करण्यासाठी जिलेबी खाल्ली जाते. अगदी गावागावांमध्ये जिलेबी तयार करून विकली जाते. कदाचित, इतरही भागांत ही प्रथा असावी.

दुकानात काम करणाऱ्या युवकाने सुंदरशा कागदी बॉक्समध्ये जिलेबी दिली. ते पाहून मी त्याला म्हणालो- ‘‘अरे, प्लॅस्टिक पिशवीत द्यायची ना, बॉक्स चिकट होतो...’’ आधी त्याला माझ्या सूचनेबाबत आश्‍चर्य वाचलं. नंतर बोलला हिंदीत, ‘‘अहो, त्याला काय होतंय, बॉक्स तर कचऱ्यातच जाणार आहे ना.’’ त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मग लक्षात आलं, की तो बिचारा हुकमाचा ताबेदार. शहाणपणा करून वेगळं काही केलं तर त्याची नोकरी जायची.

म्हणून मी काउंटरवर गेलो आणि पैसे देताना तिथल्या व्यक्तीला बोललो, ‘‘तुम्ही जिलेबी प्लॅस्टिकच्या पिशवीत दिली तर बरं होईल.’’ त्याला मी काय सांगतोय यामध्ये खरंतर काही रस नव्हता. तो गिऱ्हाइकांचे पैसे घेण्यात मग्न होता. तरीही मी पिच्छा पुरवल्यावर त्याचं अपेक्षित उत्तर आलं, ‘‘अहो साहेब, प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचं नुकसान होतं, म्हणून आम्ही कागदी बॉक्स वापरतो..’’ मग त्याला सारं उलगडून सांगावं लागलं.

बॉक्समध्ये जिलेबी दिल्यावर पुढे काय होते? तिचा चिकट पाक बॉक्समध्ये गळतो. मग जिलेबी खाल्ल्यावर त्या बॉक्सचे नेमके काय करायचे, हा प्रश्‍न निर्माण होतो. (अर्थातच, ज्यांना असे प्रश्न पडतात त्यांनाच. बहुतांश लोकांना त्याच्याशी काहीही देणे-घेणे नसते.) बॉक्स पाकाने बरबटलेला असल्याने तो पुन्हा वापरता येत नाही. आणि तो कचऱ्यात टाकायचे म्हटले तर कुठे टाकायचा- ओल्या कचऱ्यात की सुक्या कचऱ्यात, हा प्रश्‍न निर्माण होतो. बरं, बॉक्स कागदी असल्याने धुता येत नाही.

हे टाळण्यासाठी जिलेबी, मान्यताप्राप्त दर्जाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीतून दिली (मग ती पिशवी बॉक्समध्ये भरा किंवा तशीच द्या!) की सोयीची ठरते. जिलेबी काढल्यावर पिशवी धुणे शक्य होते. मग तिचा पुन्हा वापर होऊ शकतो. पुनर्वापर केला नाही तरी सुद्धा पिशवी धुवऊन-सुकवून सुक्या कचऱ्यात देता येते...

हे सारे सांगितल्यावर काउंटरवरच्या व्यक्तीने सूचना-वही पुढे केली. त्यात सूचना लिहली की कोणीतरी फोन करेल, असेही सांगितले. मी हे सविस्तर त्या वहीत नोंदवले आणि आता फोनच्या प्रतीक्षेत आहे... त्यांच्याकडून फोन येईल की नाही हे माहीत नाही, पण या उदाहरणावरून आपल्या कचऱ्याच्या समस्येत किती गुंतागुंत आहे, याची कल्पना येते.

हे जिलेबी पुराण उरकून दुकानातून घरी आलो. इमारतीत आमच्याच मजल्यावर एका फ्लॅटच्या बाहेर कचऱ्याचा अक्षरश: ढीग लागलेला पाहिला. त्यात सर्व काही होते- उष्टे उरलेले खाद्यपदार्थ, खरकटे पुसलेले वर्तमानपत्रांचे कागद, कितीतरी प्रकारच्या कागदी-प्लॅस्टिकच्या पिशव्या, त्यात कोंबलेला कचरा, पेयांच्या रिकाम्या बाटल्या, ऑनलाइन मागवलेल्या वस्तूंचे बॉक्स... हे फक्त त्याच दिवशी नव्हते, तर अधूनमधून असा ढीग पाहायला मिळतो. या कचऱ्याची ना विभागणी, ना तो व्यवस्थित ठेवणे! कचरा पाहून अक्षरश: भीती वाटावी इतके त्याचे प्रमाण असते. सोसायटीने नेमलेले कर्मचारी दारात येऊन कचरा नेतात म्हणून किती बेफिकिरी असावी, याचे हे ज्वलंत उदाहरण. एकूणच कचऱ्याबाबत आपले अज्ञान आणि अनास्था पावलोपावली पाहायला मिळते.

कचरा आणि त्याचे व्यवस्थापन याची बहुतांश लोकांची कल्पना म्हणजे- केवळ प्लॅस्टिक वापरायचे नाही, कचऱ्याची ओला-सुका अशी विभागणी करायची, वगैरे. या गोष्टी केल्या म्हणजे झाले, अशी त्यांची समजूत. अगदी या प्रश्‍नाबाबत आस्था असलेल्यांनाही याच्या पलीकडे ही समस्या दिसत नाही. प्रत्यक्षात मात्र कचरा व्यवस्थापनाचे प्रश्न त्याच्या किती तरी पुढे गेले आहेत आणि आपण त्यांच्या मागे अगदी कासवाच्या गतीने हळूहळू सरकत आहोत. स्वाभाविकपणे, ही समस्या अक्राळ-विक्राळ स्वरूप धारण करत आहे.

कचरानिर्मित माणूस

खोलात जाऊन पाहिले तर माणूस आणि निसर्गातील इतर प्राणी यांच्यातील वेगळेपण काय? त्यातील प्रमुख मुद्दा म्हणजे कचऱ्याचा. इतर कोणताही प्राणी कचरा निर्माण करत नाही, ते श्रेय माणसाला जाते. इतर प्राण्यांकडून मल-मूत्राच्या स्वरूपात ज्या काही जैविक गोष्टी निर्माण होतात, त्या निसर्गात सामावल्या जातात. विशेष म्हणजे याच्या निर्मितीची गतीसुद्धा निसर्गात सामावून जाण्याच्या गतीशी जुळणारीच असते. याउलट माणूस भौतिक विकासाच्या टप्प्यात कचरा निर्माण करायला लागला.

जितका विकास जास्त, तितका कचरा जास्त हे जणू सूत्रच बनले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात माणसाचा कचरा निसर्गात जिरवण्याची चक्रीय पद्धती अस्तित्वात होती. उकिरडा हे त्याचे उत्तम उदाहरण. शेतातून पीक घरी यायचे. ते निवडून-पाखडून उरलेल्या गोष्टी उकिरड्यात जायच्या. बैल-म्हशी अशा जनावरांना शेतातून चारा यायचा. त्यांचा उरलेला चारा, शेण हे सारेच उकिरड्यात जायचे. हा उकिरडा वर्षाच्या शेवटी मोकळा केला जायचा आणि त्यातले खत किंवा कंपोस्ट पुन्हा शेतातच खत म्हणून जायचे.

पुढच्या काळात या चक्रात न बसणारा कचरा निर्माण होऊ लागला आणि साऱ्या गोष्टी बदलत गेल्या. त्याचाच परिणाम म्हणून या समस्येतील गुंतागुंत वाढत गेली. आता तर ती पराकोटीची वाढली आहे. त्याला आपली सार्वजनिक किंवा वैयक्तिक पातळीवर सामोरे जाण्याची क्षमता नसल्याने समस्येत भरच पडत आहे. वैयक्तिक पातळीवरचे घरातले उदाहरण घेता येईल. कोणाला छोटीशी जखम झाली तर त्यासाठी डेटॉल, मलम, कापूस, बँडेज हे वापरले जाते. हा खरं तर घातक वैद्यकीय कचरा! तो वापर झाल्यावर कुठे जातो? आदर्श व्यवस्था म्हणून तो कुठे जायला पाहिजे आणि प्रत्यक्षात जातो कुठे? ही बाब सॅनिटरी पॅड, अलीकडे वाढलेले डायपर्स, गर्भनिरोधक साधने या सर्वांना लागू होते.

दुसरे उदाहरण सर्वांनीच कधी ना कधी अनुभवलेले असते. ते म्हणजे अन्नपदार्थांचे पार्सल. ते प्लॅस्टिक पिशव्या, त्याचेच जाड डबे, कधी हे सारे जाड पुठ्ठ्याचे मटेरियल कंटेनर यातून दिले जाते. पण ते ज्यातून दिले जाते त्याचे पुढे काय होते? त्या पिशव्या, त्यात उरलेले अन्न, त्याच पिशव्यांमध्ये कोंबलेले खरकटे कागद हे सारे एकत्र मोठे भेंडोळे करून कुठे तरी ठेवले जाते किंवा फेकून दिले जाते. चार-दोन लोकच या कचऱ्याचा विचार करतात, बाकी बहुतांश जण तो कचरा फेकण्यासाठी जागा शोधत असतात.

धोरणात्मक पातळीवर काहीतरी व्हावे म्हणून आपणच दबाव आणू शकतो. निदान बदलाची सुरुवात करू शकतो. म्हणून याला प्रतिसाद म्हणून वैयक्तिक पातळीवर स्वत:ची कापडी पिशवी, छोटा पेला आणि पाण्याची बाटली जवळ बाळगतो. अगदीच अट्टहास म्हणून नव्हे, पण जमेल तिथे शक्य तिथे कचरा निर्माण होणार नाही, याची काळजी नक्कीच घेतो. काय सांगावे, आपली हीच छोटी पावले कदाचित या प्रचंड समस्येला तोंड फोडण्यासाठी कारणीभूत ठरतील!

जीवनशैली कारणीभूत

आता तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत कचऱ्याचे प्रकार, त्याची गुंतागुंत आणि गांभीर्य कितीतरी वाढले आहे. टेट्रापॅकसारखी वेष्टने, खाद्य पदार्थांपासून प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींची होम-डिलिव्हरी, सोय म्हणून पाण्याच्या बाटल्या, कागदी ग्लास, किराणा माल असो वा फळे-भाजीपाला प्रत्येक गोष्टीसाठी पॅकिंग... आजूबाजूला डोळे उघडून पाहिले तर किती अफाट प्रमाणात कचरा निर्माण होतो आणि आपणही त्याच संस्कृतीचा अविभाज्य भाग आहोत, ही जाणीव असह्य करते. कारण गुंतागुंत ही खरे तर कचऱ्याची नाही, तर आपल्याच जगण्याची, जीवनशैलीची आहे. असहाय असण्याचे नुसते उसासे टाकून भागणार नाही.

abhighorpade@gmail.com

(लेखक वरिष्ठ पत्रकार असून ‘भवताल’ या पर्यावरण विषयक मंचाचे संस्थापक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmers Support: कांद्याच्या भावात घसरण, उपाययोजनांसाठी सरकारकडून समिती गठित

Crop Damage Nashik: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींच्या निधीचा प्रस्ताव

Fertilizer Overprising: सोलापूर जिल्ह्यातील १९ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

Assembly Elections 2026: पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी ९१.४६ टक्के, तामिळनाडूत ८४.४१ टक्के मतदान

Crop Insurance Hingoli: हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचा ९८ कोटी ७० लाख रुपये पिकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT