River Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

River Conservation : असा घडला साखरपा पॅटर्न

मागील अंकात आपण नदी संवर्धनाच्या साखरपा पॅटर्न बाबत चर्चा केली. साखरपा पॅटर्न कसा झाला हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

Team Agrowon

डॉ. सुमंत पांडे

मागील अंकात आपण नदी संवर्धनाच्या (River Conservation) साखरपा पॅटर्न (Sakharapa Pattern) बाबत चर्चा केली. साखरपा पॅटर्न कसा झाला हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. साखरपा आणि कोंडगाव बाजारपेठ काजळी नदीच्या (River) पुरापासून वाचवणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोकसहभागाने काम करणे ही प्राथमिकता होती. सुमारे एक किलोमीटरचे हे काम होते; तथापि त्या कामातून अनेक जणांनी प्रेरणा घेऊन कोकणातील (Kokan) विविध गावातील नदीवर काम केले, ही खरी यशकथा होय आणि हाच खरा साखरपा पॅटर्न होय.

कोंडगाव- साखरपा हे गाव संगमेश्‍वंर (जि. रत्नागिरी) तालुक्यात काजळीच्या किनारी वसलेले आहे आहे. आंबा घाटातून आणि विशाळगडाच्या पायथ्यापासून येणाऱ्या नद्यांची मिळून काजळी नदी बनलेली आहे. दर पावसाळ्यात या भागात सरासरी पाऊस सुमारे चार हजार मिलिमीटर इतका पडतो.

त्यातल्या त्यात काही दिवसांतील पाऊस हा ढगफुटीप्रमाणे असतो. पावसाची तीव्रता, उगमाच्या ठिकाणचा नदीचा उतार आणि त्यामुळे पाण्याचा वाढलेला वेग या सर्व बाबींचा एकत्रितपणे परिणाम म्हणजे काजळी नदीला वारंवार पूर येतो. असेच चित्र वाशिष्ठी, काळ, गांधारी जगबुडी आणि कोकणातील इतर नद्यांवर देखील आहे. त्यामुळे साखरप्यामधील लोकसहभागाने झालेले काम दिशादर्शक ठरते.

लोकसहभाग महत्त्वाचा ः

साखरपा गावातील काजळी नदीतील गाळ काढण्यासाठी स्थानिकांनी पैसे उभा करताना केलेले प्रयत्न खूप सूचक आणि अवलंब करण्यासारखे आहेत. मुग्धा सरदेशपांडे यांनी नदी व्यवस्थापनाच्या अभ्यासावर आधारित एक रंगीत टिपण तयार केले. त्याचप्रमाणे सोशल मीडियासाठी सादरीकरण तयार केले.

ही माहिती नजीकचे आप्त, मित्र-मैत्रिणी यांना पाठवायला सुरुवात केली. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम यांचाही चतुराईने वापर केला. याचा परिणाम अगदी पन्नास रुपयांपासून ते पाच लाखांपर्यंतची मदत जमा झाली. पाहता पाहता सुमारे ३३ लाख रुपये निधी उभा राहिला आणि काम पूर्णत्वास नेता आले. ही रक्कम दत्त देवस्थानाच्या खाती जमा करण्यात येत असे आणि तशी नियमित पावती लगेचच व्हॉट्सॲपवर प्रत्येकाकडे पोहोचवण्यात आली. त्याचबरोबर झालेल्या कामाची दैनंदिन प्रगती देखील त्यांना कळविण्यात येत होती, अशी माहिती गिरीश सरदेशपांडे यांनी दिली.

नदीसाठी पिग्मी :

नदी स्वच्छता निधीमध्ये खारीचा वाटा उचलणारे प्रशांत कुष्टे यांची यशस्विता आणि मदत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. प्रशांत कुष्टे हे कोंडगाव-साखरपा येथील व्यापारी लोकांना सकाळचा नाश्‍ता त्यांच्या दुकान स्थळावर नेऊन देतात. यामध्ये त्यांची सेवा आणि व्यवसाय हे दोन्ही दडलेले होते. काजळी नदीवर होत असलेल्या कामाची त्यांना जेव्हा माहिती कळाली, त्यांनी स्वच्छेने गिरीश सरदेशपांडे यांना त्यांच्या योगदानाविषयी सांगितले. नाष्टा देत असताना त्या लोकांना ते काजळी नदीच्या कामाविषयी माहिती देत असत.

साखरपा निवासी डॉ. केतकर यांनी प्रशांत कुष्टे यांना विचारले, की तू काजळीसाठी पिग्मी गोळा करशील का? त्यांनी लगेच होकार दिला आणि ती माहिती देत असताना यथाशक्ती मदत करण्याचे आव्हान लोकांना केले. याचा परिणाम असा झाला की, प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसार दररोज थोडी थोडी रक्कम पिग्मीच्या स्वरूपामध्ये प्रशांत कुष्टे यांच्याकडे जमा करत असत.

ती रक्कम नियमितपणे चैतन्य सरदेशपांडे यांच्याकडे जमा केली जायची. त्याची पावती दुसऱ्या दिवशी लोकांना दिली जात असे. तसेच त्या दिवशीच्या कामाचा अहवाल लोकांना दिला जायचा. याचा परिणाम खूप चांगला झाला. लोकांना कामाच्या पारदर्शकतेविषयी विश्‍वासार्हता वाढली आणि आपला खारीचा वाटादेखील किती महत्त्वाचा आहे हे कळाले. पाहता पाहता काही दिवसांमध्ये ही रक्कम हजारांवर गेली. प्रशांत कुष्टे यांनी सुमारे १३ हजार रुपये या माध्यमातून गोळा करून काजळी नदीच्या कामासाठी दिले.

नदी संवर्धनाची पुढील दिशा ः

साखरपा गावाचे यश हे खूप काही सांगून जाते. गावाला नदीच्या पुरापासून वाचवणे हे उद्दिष्ट होते, तथापि संपूर्ण नदीचा अभ्यास करण्यात आला, तो आजही चालू आहे. यामध्ये नदीच्या उगमापासून ती समुद्राला मिळेपर्यंतचा प्राथमिक अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासाचे काही निष्कर्ष पुढील प्रमाणे आहेत.

१) नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. तो डोंगरातून वाहत येऊन नदीपात्रात आलेला आहे, तो दूर करणे.

२) कोकणातील नद्यांमध्ये कोंडी खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, तो नैसर्गिक वारसाच आहे. तथापि, वारंवार येणाऱ्या या पुरामुळे त्या कोंडी गाळाने भरलेले आहेत. त्यामुळे तेथील जलसाठा कमी होतो. तसेच गोड्या पाण्यातील मासळीदेखील तिथे वाढू शकत नाही, त्यामुळे कोंडी स्वच्छ करणे हा देखील उपक्रमाचा भाग आहे.

३) कोकण रेल्वे मार्गातील बोगदे करत असताना मोठ्या प्रमाणावर माती बोगद्याच्या आजूबाजूला ठेवण्यात आली. कालांतराने सतत येणाऱ्या आणि होणाऱ्या पावसामुळे हळूहळू ही माती काजळी नदीच्या पात्रात यायला सुरुवात झाली. नदी उथळ होण्याचे हे एक कारण आहे.

४) नदीचे पात्र उथळ होण्यास काही मानवी हस्तक्षेपदेखील कारणीभूत आहे. जसे की गॅसची मोठ्या व्यासाची पाइपलाइन टाकत असताना त्या ठिकाणी खोदकाम करण्यात आले. परिणामी, तेथील गाळ नदीपात्रामध्ये आला.

५) काजळी नदीच्या संपूर्ण पात्रामध्ये प्रत्येक ठिकाणी झालेल्या कामाची आणि नदीच्या आघातांची तीव्रता भिन्न आहे. चांदेराई दाभोळे इथून नदी थोडीशी खोल होऊन समुद्राला मिळते तिथपर्यंत जात असेपर्यंत तिचा वेग कमी होतो आणि हा गाळ रत्नागिरीला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये साचून राहतो. त्यामुळे धरणांची उपयुक्तता देखील कमी झाली आहे.

६) काजळी नदी जेव्हा अरबी समुद्राला मिळते तेथे खूप मोठ्या प्रमाणावर अगदी बारीक वाळू आणि माती मिश्रित गाळ साचला आहे, त्यामुळे तेथे उत्कृष्ट प्रकारचे कुळीथ होत असे, त्या शेतीवर देखील परिणाम झालेला आहे. पुराची वारंवारता त्या ठिकाणीदेखील वाढली आहे.

७) गोड्या पाण्याच्या विहिरी खाऱ्या होण्याची वारंवारता वाढली आहे.

नदीशी संवाद :

महाराष्ट्र शासनाने नदी संवाद यात्रा लोकसहभागाने घेण्याविषयी निर्णय घेतला असून, ते काम संपूर्ण राज्यभरामध्ये प्रगतिपथावर आहे. या अभ्यासाचा उपयोग होऊन त्याच्या नोंदी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्य सचिव यांना सादर होणार आहेत. तज्ज्ञ समितीमार्फत अभ्यास होऊन प्रत्यक्ष कृती कार्यक्रम ठरवणे गरजेचे आहे. शासनाने तशी मानसिकता स्पष्टपणे दर्शविली आहे.

याप्रमाणे जर कृती झाली नद्यांतील पुराची तीव्रता कमी होईल, कोंडीमुक्त होतील आणि जलचर देखील मोकळा श्‍वास घेऊ शकतील. परिणामी, कोकणातील नद्यांमुळे होणारी वित्तहानी आणि मनुष्यहानी कमी होईल. अशी आशा करायला हरकत नाही. स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, लोकसहभाग आणि यात शासनाचा सहभाग मिळाल्यास क्रांती घडेल याची खात्री आहे. लोकसहभागाने नद्या पुनरुज्जीवित होतात.

नदी की पाठशाला आणि काजळी नदी ः

साखरप्यामधील यशानंतर आणि या वर्षी साखरपा गावात पूर आला नाही, ही बातमी समाज माध्यमात पसरली. संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशाच्या इतर भागांतून देखील या यशाबद्दलची चर्चा झाली. नाना पाटेकर यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांना देखील या यशाचे कौतुक वाटले; आणि साखरपावासी यांनी केलेल्या एकजुटीने कामाबद्दल त्यांनी समाधानदेखील व्यक्त केले.

याच पार्श्‍वभूमीवर साखरपा येथे देशातील पहिली नदी की पाठशाळा घेण्यात आली. नदी की पाठशाला म्हणजे नदीला सर्वार्थाने समजून घेण्याचा प्रयत्न होय. नदीचा उगम, नदीचे तट, नदीमधील जंगल, जैवविविधता, इत्यादी बाबत समाजातील घटकांना अवगत करणे हे नदी की पाठशाळेचे उद्दिष्ट होय.

याला बीन भिंतीची नदी ती पाठशाळा असेही संबोधले जाते. साखरपा येथे लोकसहभागातून नदीची पाठशाला घेण्यात आली. पहिल्यांदाच नदी समजून घेण्यासाठी किमान फी आकारण्यात आली. ही पाठशाळा अत्यंत यशस्वी झाली. डॉ. राजेंद्र सिंह स्वतः या ठिकाणी उपस्थित होते. काजळी नदीवरील काम, नदीच्या उगमापासून ते रत्नागिरीच्या खाडीपर्यंत नदीचा प्रवास अशा या सर्व बाबी यामध्ये समाविष्ट होत्या.

या पाठशाळेची यशस्विता सांगायची झाली, तर काजळी नदीच्या संपूर्ण प्रभावक्षेत्रामध्ये जागरूकता निर्माण झाली. त्याचप्रमाणे काळ नदी, गांधारी नदी यांच्या किनारी राहणारे तसेच वाशिष्ठ नदी किनारी राहणारे नागरिक या सहभागी झाले होते.

त्यांनी पाठशाला संपल्यानंतर आपापल्या नदीवर काम करण्यासाठी काजळी नदीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून सुरुवात केली. तेथेही नाम फाउंडेशनने यंत्रणा देऊन मदत केली. गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च शासन आणि लोकसहभागातून करण्यात आला. परिणामी, २०२२ मध्ये काळ आणि वशिष्ठ नदी या दोघांच्याही प्रभावक्षेत्रामध्ये पूर आल्याचे दिसले नाही किंवा पूर आला नाही.

कोकणातील नद्यांमधील गाळ :

कोकणातील नद्यांमधील गाळ हा दगड- धोंडे आणि गोट्यांच्या स्वरूपामध्ये आहे. डोंगरातून होत असलेल्या हालचालींतून नदीपात्रामध्ये येतो आणि हा गाळ नियमितपणे काढणे आणि नदीपासून दूर नेणे अत्यंत गरजेचे आहे. खनिजकर्म विभागाच्या नियमानुसार याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. निघणाऱ्या गाळाची उपयुक्तता खूप आहे.

सध्या रस्त्याची कामे खूप मोठ्या प्रमाणावर कोकणामध्ये चालू आहेत, सबब या गाळाचा उपयोग या बांधकामासाठी होऊ शकतो. त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. या दगड धोंड्यापासून बांधकामाला पूरक ठरणारी क्रश सॅण्ड बनवता येते. यामुळे नद्यांच्यामधून वाळूच्या उपसा कमी होईल आणि नद्या सुरक्षित राहतील, असेही स्थानिकांचे मत आहे. यावर शासनाने गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे. संतुलितपणे याचा वापर केल्यास पुढील काही वर्षे कोकणातील रस्ते बांधकामाला पुरेल एवढा गाळ इथे आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी १२ टक्के ओलाव्याच्या अटीनेच सुरू

Natural Farming : नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानास मंजुरी

Sugarcane Crushing : सोलापुरातील ९ कारखान्यांत ३ लाख ४४ हजार टन गाळप

Sugarcane Harvesting Workers : ऊसतोडणी मजूर कारखान्यावर आल्याने परिसर गजबजला

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली

SCROLL FOR NEXT