Agri Tourism : विषमुक्त शेतीतून कृषी पर्यटनाला आधार

पुणे जिल्ह्यातील बेल्हे (ता. जुन्नर) येथील म्हशींचा बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. येथील ६२ वर्षीय गणपतराव सुदाम औटी यांच्याकडे केवळ २० गुंठे शेती असली, तरी त्यांत विविध संकल्पना राबविल्यामुळे लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. विषमुक्त आणि कमी खर्चातील शेतीच्या तंत्रावर आधारित ‘सुदामा’ हे पर्यटन केंद्र नवी ओळख बनत आहे.
Agri Tourism
Agri TourismAgrowon

गणपतराव आणि सौ. कुंदा या औटी दांपत्याला जितेंद्र, यश आणि ओम अशी तीन मुले आहेत. वाटणीनंतर केवळ अर्धा एकर शेती (Farm) त्यांच्याकडे आली. यात मुळातच काही झाडे होती. आधीच कमी जमीन, त्यात झाडांच्या सावलीमुळे पिके (Crop) येण्यात अडचण म्हणून अनेक जण त्यांचा झाडे काढून टाकण्याचा सल्ला देत. मात्र ती जपतानाच त्यांनी जागा मिळेल, तिथे दुर्मीळ औषधी वनस्पतींची (Medicinal Plant) लागवड सुरू केली.

अधिक झाडे, वनस्पती यांच्या माध्यमातून दाट जंगलसदृश शेती उभी केली आहे. त्यातूनच कृषी पर्यटन केंद्राची संकल्पनेने मूळ धरले. त्याविषयी माहिती देताना त्यांची कृषी पदवीधर (Agriculture Graduate) असलेला मुलगा जितेंद्र म्हणाले, की २००२ पर्यंत आमची शेतीही सर्वांप्रमाणे रासायनिक पद्धतीने केली जाई. मात्र आपण कीडनाशके म्हणजे विषच फवारतोय, याची जाणीव कुटुंबाला होत गेली. आई-वडिलांनी रसायनांचा वापर थांबवून विषमुक्त शेतीचा ध्यास घेतला.

आरोग्यदायी शेतीमाल, औषधी वनस्पती यांच्याविषयी वडील आपल्या बोलक्या स्वभावाप्रमाणे सर्वांना सांगत राहत. त्यातून त्यांच्या विषमुक्त शेतीविषयी परिसरातील शहरी लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले. अनेक जण स्वतःहून शेती पाहायला येऊ लागले. आतिथ्यशीलतेमुळे लोकांचा ओढा वाढत चालला आहे.

Agri Tourism
Agro Tourism : नियोजन, कष्टांतून साकारलेले मुलूख कृषी पर्यटन केंद्र

औटी दांपत्याने शेतीच्या भोवती तुतीच्या वृक्ष भिंती वाढवल्या आहेत. शेतीमध्ये वांगी, टोमॅटो, पालक, लसूण, कांदे, शेवगा अशा हंगामी भाज्या असतात. सोबतच बांध आणि परिसरात आंबा, नारळ, केळी, पेरू, डाळिंब, मलबेरी, स्ट्रॉबेरी, भोकर, ड्रॅगनफ्रूट, संत्रा, मोसंबी, बोर अशी फळझाडे लावलेली आहेत. सौ. कुंदा औटी म्हणाल्या, की विषमुक्त शेतीवर आमच्या संसाराचा गाडा चालतो आहे.

कोणत्याही रासायनिक घटकांच्या वापराशिवाय वाढलेल्या भाज्या, फळे विकत घेण्यासाठी लोक येतात. अलीकडे शेती पाहण्यासाठी, वन भोजनासाठी पर्यटकही येऊ लागले आहेत. मोठा जितेंद्र कृषी पदवीधर झाला, तर यश बारावी शिकून नोकरी करतो आहे. तर छोटा ओम शिक्षण घेत वडिलांना कृषी पर्यटनात मदत करतो. आयुर्वेदिक औषधींच्या सुमारे १५० वनस्पती आमच्याकडे आहेत. त्यांच्या रोपांचीही विक्री होते.

Agri Tourism
Heritage Tourism : ऐतिहासिकस्थळी पर्यटक वाढविण्यासाठी प्रयत्न करा

पर्यटन केंद्राला नवे रूप देण्याचा प्रयत्न करणारा ओम सांगतो, की केवळ विषमुक्त शेती दाखवण्याचा आमचा उद्देश नाही, तर प्रत्येकाने निसर्गाच्या सान्निध्यात जगले पाहिजे. लहानपणापासून आई-वडिलांना झाडे, पशू- पक्षी यांच्याशी बोलताना पाहिले आहे. शेती आणि निसर्ग वेगळा नाहीत. अवतीभवतीच्या निसर्गाच्या कुशीमध्ये आपली पिके वाढली पाहिजेत, हा त्यांचा अट्टहास होता. भपकेपणा, चकचकीतपणा टाळून आम्ही येथे साधेपणा, ग्रामीणपणा जपत आहोत.

अनेकांना दिली प्रेरणा

इतक्या कमी शेतीमधूनही औटी दांपत्य आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह निगुतीने करत आहे. शेतीतील खर्च कमी करताना विषमुक्त उत्पादनावर भर देत आहे. यामुळे त्यांच्या शेतीला भेट देणारा शेतकरी भारावून आणि प्रेरणा घेऊन जातो. त्याविषयी बोलताना कणस (ता. पारनेर, जि. नगर) येथील शेतकरी युवराज गाडगे म्हणाले की, औटींची शेती पाहून मलाही विषमुक्त शेती करण्याची इच्छा झाली.

ती बोलून दाखवताच त्यांनी मला त्वरित लाल अंबाडी, ड्रॅगन फ्रूट्‍स, खपली गहू व काळी मका याचे बियाणे देत प्रोत्साहन दिले. आवश्यक तिथे मार्गदर्शन केल्यामुळेच माझी अडीचपैकी दीड एकर शेती विषमुक्त पद्धतीखाली आणली आहे. सध्या सिंचनासाठी पाण्याचा कमतरता आहे. तो सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कमी खर्चात, पाण्यात शेती करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे.

पूर्वी गणपतरावांना मोबाईल चालवणे अजिबात जमत नव्हते. मात्र त्यातून कृषी पर्यटन केंद्राचा प्रसार चांगल्या प्रकारे होऊ शकतो, हे लक्षात आल्यानंतर त्यांना हुरूपाने मुलाकडून फोन चालवण्यासोबतच विविध सामाजिक माध्यमे चालवण्याचेही शिकून घेतले. सातत्याने शेतीतील फोटो व माहिती अपलोड करत असतात. त्यांच्याकडे आलेल्या पर्यटकांचे लिखित अभिप्राय प्रसिद्ध करण्यावर औटी यांचा भर असतो. आलेले लोकच माझ्या पर्यटन केंद्राचा प्रसार करत असल्याचे ते आवर्जून सांगतात.

उदार पर्यटक...

आलेल्या पर्यटकांसाठी शेती कामातील भरपूर वेळ देऊन आदरातिथ्य करावे लागते. त्यामुळे अल्पसे प्रवेश शुल्क ठेवले आहे. माझ्यासारखाच अल्पभूधारक, गरीब शेतकरी असल्यास त्याच्याकडून मी शुल्क घेत नाही. अनेक जण स्वतःहून अधिक रक्कम हाती ठेवतात. एकदा बडोद्याहून आलेले व फिलिपिन्स येथील कृषी सेवेतून निवृत्त झालेले श्री. पटेल माझे मानवनिर्मित छोटे जंगल पाहून भारावून गेले. जाताना चक्क माझ्या हातावर दहा हजार रुपये ठेवून गेल्याची आठवण गणपतराव सांगतात.

उत्पन्नाच्या बाजू

औटी कुटुंबाचा ताळेबंद...

पर्यटन केंद्रात प्रवेश शुल्क - १५० रुपये प्रति व्यक्ती. गेल्या वर्षभरामध्ये पर्यटन शुल्कातून मिळालेले उत्पन्न २० हजार रुपये.

शाकाहारी जेवण - १५० रुपये प्रतिव्यक्ती. पर्यटकांच्या आहार सुविधेतून मिळालेले उत्पन्न २५ हजार रुपये

आंबा विक्रीतून मिळालेले उत्पन्न - ५० हजार रुपये.

औषधी वनस्पती, फळझाडे रोपांच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न - १० ते १२ हजार रुपये

कंदमुळांना लोकांची मोठी मागणी असते.

शेती आणि पर्यटन केंद्राची वैशिष्ट्ये

वृक्षभिंतीमुळे वाचला कुंपणाचा खर्च.

राज्य, परराज्यातून उत्तमोत्तम वनौषधी व फळांची रोपे आणून लागवड केली आहे.

सिमेंट, लोखंड, प्लॅस्टिक याचा अत्यल्प वापर

शेतीत बांबू व झाप टाकून शेणमातीच्या भुई असलेल्या दोन झोपड्या केवळ २५ हजार रुपयांमध्ये उभारल्या.

शुद्ध शाकाहारी, ग्रामीण साध्या भोजनाची सोय केली.

झाडावर लाकडी मचाण उभारले व झोके बांधले.

विना मशागत किंवा कमीत कमी मशागतीसह नैसर्गिक उतारावर बिनयंत्राची शेती.

रासायनिक कीडनाशके व खतांचा वापर अजिबात नाही. पीक संरक्षणासाठी जैविक घटकांचा वापर केला जातो. ठिकठिकाणी पक्षी थांबे तयार केले. पक्ष्यांसाठी भरपूर फळे आणि पाणी राखीव ठेवले.

शेतातील माती, कीटक, मुंग्या, गांडुळे यांचे संवर्धन करण्यावर भर. त्यासाठी पिकांचे अवशेष, काडीकचरा शेतजमिनीत गाडला जातो.

- गणपतराव औटी,

८९९९६९०६६९

- ओम औटी,

९१७५८५९३१९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com